मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – ७ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – ७ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – ७ Translation - भाषांतर जेथे घडतो चमत्कार । तेथे होतो नमस्कार ।प्रेरणा देतो ईश्वर । संतांच्या चमत्कारासी ॥न घडे तो कधीही ठरवून । येतो तो आपोआप घडून ।प्रसंगानुरूप शिकवून । जाती संत आपणासी ॥रावेरी एक ज्योतिषी । स्वतःसी म्हणवी सिद्धांत ज्योतिषी ।ग्रामस्थ जाती त्याच्यापाशी । भविष्य जाणून घ्याया ॥एक गुजराथी कासार । त्यासी दुःख अपार ।असे तो बिजवर । राही दोन पत्नींसमवेत ॥जरी द्विभार्या असती । परी नसे तयासी संतती ।कैसी होईल पुत्रप्राप्ती । सदा चिंता तयाच्या मनी ॥दोन कलत्रांसी घेऊनी । आला तो ज्योतिषसदनी ।सांगावे पत्रिका पाहूनी । वदे तो ज्योतिषासी ॥ज्योतिषाने पत्रिका पाहिली । दोन्ही पत्नींची हस्तरेषा वाचली ।थोडी आकडेमोड केली । केला चेहरा गंभीर ॥ज्योतिषी म्हणे कासारासी । देतो मी आता उत्तरासी ।पुत्र न होणार तुम्हांसी । ग्रहस्थिती प्रतिकूल ॥पत्नींची पाहिली पत्रिका । अभ्यासली मी हस्तरेखा ।माझे सांगणे ऐका । पुत्रप्राप्ती योग नसे तुम्हासी ॥परंतु केले अनुष्ठान जपतपा । झाली विधात्याची कृपा ।जन्म देई कन्यारूपा । तुमची कनिष्ठ भार्या ॥कासार बहु दुःखित । मनाशी विचार करित ।म्हणे मी जाईन नरकात । पुत्राविना कैसे जीवन ॥अतिशय खिन्न मनाने । कासार चाले वाटेने ।अचानक त्याच्या दृष्टीने । पाहिले तेथे दत्तस्वामी ॥दत्तस्वामी म्हणती कासारासी । काय रे झाले तुजसी ।का खिन्नता तव मानसी । उपजली असे व्यर्थ ॥घडलेला सर्व वृत्तांत । कासार कथन करित ।पुत्रसुख नाही नशीबात । सांगे तो दत्तस्वामींना ॥ऐकूनी तयाचे आर्जव । दत्तस्वामींचे शब्द मार्दव ।असती साक्षात दयार्णव । देती आशीष कासारासी ॥जेव्हा संपतील बारा मास । पुत्र होईल प्रथम भार्येस ।जन्म देईल द्वितीय पुत्रास । कनिष्ठ भार्या त्यानंतर ॥स्वामी वचनाप्रमाणे । प्रसविला पुत्र प्रथम भार्येने ।हे घडले एक वर्षाने । दत्तस्वामींचा शब्द असे ॥कासार गेला आनंदुनी । द्वितीय भार्येपासूनी ।पुत्र कन्या प्राप्त होवोनी । सुखी जाहला मानसी ॥श्रीसद्गुरू असे दयावान । नसे त्यावीण आन ।न करावा कधी अनमान । श्रीसद्गुरू आज्ञेचा ॥श्रीसद्गुरूंचे वचन । असे ब्रह्मदेवाचे कथन ।दृढ श्रद्धा ठेवून । नाम घ्यावे श्रीसद्गुरूंचे ॥दत्तस्वामी चमत्कार करिती । दूर पसरे तयांची कीर्ती ।दूरदूरोनी भक्त येती । दत्तस्वामींच्या दर्शनासी ॥वालचंद शेट श्रीमंत । रावेरातील लक्ष्मीवंत ।आले तयांच्या मनांत । दत्तस्वामींची पूजावे ॥सुंदर मेणा करविला । त्यावरी मोत्यांच्या माला ।उत्तम सुशोभित केला । वालचंद शेट यांनी ॥आले वालचंद मेणा घेऊनी । नमन दत्तस्वामींलागुनी ।करिती विनंती हात जोडोनी । चलावे मम गृहासी ॥गृहासी आपुले लागता चरण । धन्य होईल माझे जनन ।होईल भवसागरतरण । कृपा करावी दत्तस्वामी ॥वालचंदाची ऐकूनी विनंती । दत्तस्वामी देती सहमती ।मेण्यात बैसोनी जाती । वालचंदाच्या गृही ॥वालचंद करी अन्नसंतर्पण । करितसे नैवेद्य अर्पण ।निष्ठा तयाची असे पूर्ण । दत्तस्वामींवरी बहुत ॥त्याची श्रद्धा पाहून । दत्तस्वामींचे संतुष्ट मन ।नित्य षोडशोपचारे पूजन । भजन चाले दत्तस्वामींचे ॥त्या परिसरातील न्यायालयात । एक शिरस्तेदार असत ।त्याचा एक मुलगा असत । पिशाच्च बाधा असे ॥मांत्रिक केले पुष्कळ । यत्न होती निष्फळ ।शिव्या देई अमंगळ । पिशाच्च बाधित मुलगा ॥शिरस्तेदारासी वार्ता कळली । दत्तस्वामी सामर्थ्यशाली ।पावले त्याची वळली । दत्तस्वामींच्या दर्शनासी ॥दत्तस्वामी आसनी बैसले । दत्तभजन होते चालले ।भक्तजन रंगूनी गेले । होते भजनानंदात ॥शिरस्तेदार मुलासहित । आला वालचंदाच्या घरात ।दत्तस्वामी दृष्टी ठेवत । पिशाच्चबाधित मुलावरी ॥तो मुलगा उड्या मारित । जोरजोरात ओरडत ।दत्या दत्या ऐशा शिव्या देत । करितसे थयथयाट ॥काठी हाती घेतली स्वामींनी । दिधली जी दत्तप्रभूंनी ।दत्तनाम घेऊनी मुखानी । मारिली जोरात मुलावरी ॥त्या काठीच्या आघाताने । अंग टाकिले मुलाने ।सोडून दिले पिशाच्चाने । त्या मुलाचे शरीर ॥काठीचा जेव्हा स्पर्श झाला । मुक्ती मिळाली पिशाच्चाला ।गेले ते दत्तलोकाला । दत्तस्वामींच्या कृपेने ॥दत्तभजन झाल्यावरी । तो मुलगा आला शुद्धीवरी ॥प्रसाद देऊनी पाठविले घरी । दत्तसावामींनी तयासी ॥जोवरी नसे गभस्ती । नभी चंद्राची वसती ।जंबूक वनी गर्जती । जोवरी नसे मृगेंद्र ॥भूत पिशाच्चांची मस्ती । न चाले दत्तप्रभूंपुढती ।भूतयोनीतून मुक्त करती । दत्तप्रभूं दुष्ट शक्तींना ॥दत्तस्वामींची अशी थोरवी । कोणाची बाधा घालवी ।कोणास देवदर्शन घडवी । दत्तावतारी दत्तस्वामी ॥रावेरी असे कासार बाई । दत्तस्वामींच्या दर्शनासी जाई ।निष्ठा तिची स्वामींच्या पायी । शिष्य ती दत्तस्वामींची ॥दत्त दर्शनाचा तिचा नेम । मुखी असे दत्तनाम ।दत्तमंदिर तिचे सुखधाम । नित्य येई रावेरी मंदिरात ॥ऐसे अनेक मास लोटले । डोईवरील केस पिकले ।मुखातील दात गळले । वृद्ध कासार बाई ॥एके दिनी रोजच्याप्रमाणे । झाले तिचे मंदिरात येणे ।केले तिने एक मागणे । दत्तस्वामींच्या पुढती ॥म्हणे ती दत्तस्वामींस । जायचे आहे मज काशीस ।वृद्धत्व आले शरीरास । कैसे जाऊ मी आता ॥प्रवास मी करु कैसा । मजकडे नाही पैसा ।अळीस भ्रमरध्यास जैसा । मन धावते काशीस ॥दत्तस्वामी तियेसी वदले । हेच काशीस्थान आपुले ।रावेरी विश्वनाथ बैसले । का जायचे तुज काशीस ॥परि तिची समजूत पटेना । आपुला हट्ट ती सोडीना ।म्हणे दत्तस्वामींना । सांगा काशीस कैसे जाऊ ॥दत्तस्वामी स्मितहास्य करिती । कासार बाईच्या डोईवरती ।आपुला वरदहस्त ठेविती । म्हणती तिजला ध्यान लाव ॥बाई बंद करी डोळे । चित्र पालटले सगळे ।जी अभिषिक्त गंगाजळे । शिवपिंडी दिसे तिजला ॥दर्शन होई विश्वनाथाचे । सार्थक होतसे जन्माचे ।शिवस्तुती ती करी वाचे । समाधी अवस्था अनुभवली ॥॥ शिवस्तुती ॥मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥धृ ॥समुद्रमंथनातून हलाहल विष येईप्राशूनी तयाला नीलकंठ तो होईस्वये सांब धरी डोईवरती निशिकांतामज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥१ ॥व्याघ्रचर्म पांघरी चिताभस्म अंगामस्तकावरी वाहते जटागंगानंदी भृंगी रुद्रगण नमिती पशुपतीनाथामज मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥२ ॥डमडमडम डमरू उच्चरवे वाजतीनटराज ताडव नृत्य तदा करितीनमू सांब शिवासी सकल जगत त्रातामज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥३ ॥॥ ओवी ॥कासार बाई भानावरी येई । विश्वनाथाचे दर्शन होई ।बहुत असे ते सुखदायी । दत्तस्वामींची कृपा ॥ब्रह्मा विष्णू शिवाचे । असे रूप दत्ताचे ।दत्तात्रेयाच्या अवताराचे । पूर्णरूप दत्तस्वामी ॥ह्याच शिवाच्या अंशाचे । विश्वनाथाच्या रूपाचे ।दर्शन घडविले साचे । दत्तस्वामींची कासार बाईस ॥पवित्र असे काशीपुरी । दत्तात्रेयांची तेथे होय फेरी ।दत्तस्वामी संचार करी । जरी असले रावेरात ॥दत्तस्वामींसी सर्व शक्य । तयांचे असे ब्रह्मवाक्य ।पंचमहाभूतांशी ऐक्य । सहज साधती दत्तस्वामी ॥ऐका आता पुढची कथा । वानू दत्तस्वामी समर्था ।कळोन येईल सर्वथा । अधिकार दत्तस्वामींचा ॥रावेर ग्रामाजवळ । असे एक धरणगाव ।तेथील जोशी कुटुंबाचा भाव । असे दत्तस्वामींवरी ॥रावेरी मंदिरी येवोनी । जोशी करिती विनवणी ।चलावे अमुच्या सदनी । धरणगावी स्वामी हो ॥दत्तस्वामी तेथे जाती । भक्त पूजन करिती ।दत्तस्वामी प्रसन्न होती । दत्तनामस्मरणाने ॥जेव्हा असे परधाम । तेव्हा दोन दिन करावा मुक्काम ।दत्तस्वामींचा असे नियम । कुठेही न राहती तिसरे दिनी ॥होतसे दत्तनामसंकीर्तन । दत्तमय होती भक्तजन ।दत्तस्वामींना न मोडवे मन । वस्ती केली दुसरे दिनी ॥तिसरे दिनी भानू उदित । नरवेल ग्रामी स्वामी निघत ।धरणगाव भक्त म्हणत । जाऊ नका स्वामी हो ॥दत्तस्वामी समजूत घालत । भक्तांचा निरोप घेत ।बैलगाडीत बैसत । संध्याकाळ जाहली ॥सूर्यप्रभा लया गेली । पर्जन्यवृष्टी सुरु झाली ।माती वाहून आली । नरवेलच्या मार्गात ॥बैलगाडीचे चाक घसरत । बैलांचे पाय सटकत ।भक्तमंडळी विनवित । माघारी फिरावे दत्तस्वामी ॥दत्तस्वामी म्हणती भक्तांसी । काळजी कासयासी ।भजा तुम्ही दत्तासी । तोचि तारून नेईल ॥दत्तस्वामी डोळे मिटती । दत्ताचे स्मरण करिती ।दत्तनामाचा जयघोष करिती । श्रीगुरुदेव दत्त दत्त ॥आणि चमत्कार जाहला । सर्वांसी प्रकाश दिसला ।बैलगाडीचे बाजूला । दोन मशाली दिसू लागल्या ॥त्या मशालींच्या प्रकाशात । सर्व बैलगाड्या धावत ।दत्तरूपाचे दर्शन होत । दत्तस्वामींमध्ये भक्तांना ॥नरवेल ग्रामस्थ वेशीवर येत । दत्तस्वामींची वाट पाहत ।दुरून बैलगाड्या दिसत । मशाली दोन्ही बाजूंस ॥नरवेलची वेस जवळ आली । गुप्त झाल्या मशाली ।भक्तमंडळी चकित झाली । पाहूनी हा चमत्कार ॥दत्तस्वामींचे स्वागत । झाले नरवेल गावात ।भक्तमंडळी स्वामींसी पुसत । मशाली कश्या लागल्या ॥दत्तस्वामी स्मितहास्य करिती । काहीही न बोलती ।सर्व भक्त जाणती । ही असे दत्तप्रभूंची किमया ॥जैसे नाथांचे चोपदार । झाले दत्त दिगंबर ।तैसै दत्तप्रभूंचे कर । धरिती मशाली स्वामींकारणे ॥अनेक चमत्कार घडत । दत्तस्वामींच्या अवतारात ।भक्तांनी घ्यावा ध्यानात । दत्तस्वामींचा अधिकार ॥दत्त आणि दत्तस्वामी । भिन्नरूपे एक नामी ।रूपे असती बहुआयामी । श्रीसद्गुरूतत्व एक असे ॥भक्तांना भुलविण्यासी । कधी न करिती चमत्कारासी ।संत महिमा वाढविण्यासी । होती ऐसे चमत्कार ॥संतांसी ह्याची नाही जरूर । चमत्कार घडवितो ईश्वर ।सामर्थ्य असे अपार प। ईश्वरशक्तीचे संतांमध्ये ॥गेलो आपण मंदिरात । ईश्वरसेवा घडत ।परि पाहिजे पूर्वसुकृत ।श्रीसद्गुरू सेवेसाठी ॥सोपे ईश्वराचे दर्शन । कठीण संतचरणसेवन ।जर पवित्र असे प्राक्तन । तर श्रीसद्गुरू भेटतील ॥जरी ईश्वर आला सामोरी । तरी सद्गुरूसी जो नमस्कारी ।ऐसा श्रीसद्गुरू अधिकारी । ईश्वराहून श्रेष्ठ असे ॥श्रीसद्गुरू सेवा ज्याची घडली । त्याची पापे गळाली ।मोक्षप्राप्ती तयासी झाली । जन्ममृत्यू चक्र संपले ॥न अडकावे चमत्कारांत । अडकावे चमत्कार करणाऱ्यांत ।म्हणजेच श्रीसद्गुरूंत । अडकवावे आपुले मन ॥अनुभवामृताची गोडी । चाखावी भक्तांनी आवडी ।दासवैभव हात जोडी । सातवा अध्याय पूर्ण ॥इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते सप्तमोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP