अध्याय – ४
श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.
मागील अध्यायी कथिले । स्वामी विठुमंदिरी बैसले ।
खांडवा गाव असे भले । मध्यप्रदेश प्रांतातील ॥
सदा दत्तनामाचा जप । स्वामींचे असे ऊग्र तप ।
अष्टसिद्धी तयांच्या समीप । हात जोडोनी उभ्या ॥
त्या विठ्ठल मंदिरी । विठ्ठल रुक्मिणी मूर्ती गोजिरी ।
चाळ बांधून पायावरी । स्वामी करिती विठुस्तुती ॥
तो पाहूनी पांडुरंग । स्वामी होती भजनी दंग ।
सहज मुखी येई अभंग । वर्णन करिती स्वामी ॥
उठे विठ्ठल सावळा । झाली पहाटेची वेळा ।
सडा घाली चोखामेळा । नाम घेई विठूचे ॥१ ॥
आरास रांगोळी फुले । मंडपी तोरणे झुले ।
संत सखु शुद्ध जले । स्नान घाली विठूला ॥२ ॥
संत नामदेवे शेला । पीतांबर आणियेला ।
अर्पिले शुभ वस्त्राला । विणे नामाचे धागे ॥३ ॥
श्री नरहरी सोनार । अर्पी गोफ आणि हार ।
रूप सगुण साकार । सुखवी लोचनासी ॥४॥
श्री संत सावता माळी । आणी फळे भाज्या केळी ।
प्रेम आरती ओवाळी । विठाई माऊलीची ॥५॥
संत श्रेष्ठ रोहिदास । वंदी विठू चरणास ।
देई चर्मपादुकांस । विठ्ठलाचे चरणी ॥६॥
बनवी गोरा कुंभार । मडकी विविधाकार ।
विठू जयजयकार । ऐकू येई सर्वांना ॥७॥
संत जनाबाई संगे । धान्य दळण्यात रंगे ।
विठूराया जनी सांगे । दर्शन दे मजला ॥८॥
संत तुकाराम देहू । देह चरणासी वाहू ।
कान्होपात्रा नृत्य पाहू । पांडुरंगासी ध्याऊ ॥९॥
एकनाथ ज्ञानेश्वर । भेटला ज्यांना ईश्वर ।
पहावा परमेश्वर । सर्वभूतांठाई हा ॥१०॥
प्राप्तीसाठी नारायण । संत देती शिकवण ।
करावे नामस्मरण । नित्यनेमाने सदा ॥११॥
ह्या विठ्ठलमंदिराचा मालक । छोटू पटेल असे अर्चक ।
यज्ञी जैसा पावक । तैसे शुद्ध अंतःकरण ॥
मंदिरी यावे विनंती करी । छोटू पटेल वरचेवरी ।
स्वामी करिती इच्छा पुरी । बऱ्याचवेळा जाती मंदिरात ॥
एके दिनी मंदिरात । स्वामी बैसले असत ।
दोन युवती तेथे येत । रडती स्वामींसमोरी बैसून ॥
स्वामी वदले तयांलागून । का तुमचे मुख म्लान ।
किमर्थ हे रुदन । सांगावे मजलागी सत्वरी ॥
दोघी वदती स्वामींसी । जाणून घेण्या भविष्यासी ।
पुसले आम्ही ज्योतिष्यासी । कधी होईल पुत्रोदय ॥ २० ॥
तेव्हा तो ज्योतिषी म्हणे । पाहूया कुंडलीचे काय सांगणे ।
न दिसती पुत्रलक्षणे । एक युवती होई वांझ ॥
दुसऱ्या युवतीसी । न होईल कधी पुत्रासी ।
परंतु एका कन्येसी । अवश्य जन्म देईल ती ॥
स्वामी हसले प्रसन्नतेने । श्रीफळ दिले स्वहस्ताने ।
आशीर्वचपर वचने । वदती स्वामी युवतींना ॥
काळजी करु नका । माझे शब्द तुम्ही ऐका ।
वांझ युवतीसी नेटका । होईल पुत्र प्राप्त ॥
त्यानंतर दुसऱ्या युवतीस । प्राप्त होई कन्येस ।
निश्चिंत करावे संसारास । आशीर्वाद माझे तुम्हांस ॥
स्वामीवाणीनुसार । दोघी राहिल्या गर्भार ।
झाले कन्यापुत्र मनोहर । आजही वंश असे त्यांचा ॥
खांडवा विठ्ठल मंदिरात । स्वामी चमत्कार करत ।
होवोनी सावधचित्त । ऐका कथा श्रोतेहो ॥
विठुराऊळी एका शुभतिथीस । मध्याह्नी भोजनास ।
बहु अतिथी जमले खास । अन्नदान सदावर्त चालतसे ॥
सर्व अतिथी यजमानांनी । स्वामींसी केली विनवणी ।
बैसावे आपण आता भोजनी । कृपा करावी गुरुराया ॥
विहीर असे मंदिराजवळ । करण्यास्तव शरीर निर्मळ।
पाण्याने भरले घंगाळ । स्वामींनी स्नानासाठी ॥३०॥
स्वामींचे स्नान सुरु होत । यजमान विविध पदार्थ वाढत ।
चटणी कोशिंबीरी असत । ताटात अन्न षड्रसाचे ॥
तुपाने होतसे अन्नशुद्धी । तूप वाढावे ऐसी बुध्दी ।
यजमानांची आर्थिक समृद्धी । असे बहुत त्या वेळी ॥
पाकशाळेत यजमान जाती । आज्यपात्र रिकामे पाहती ।
मनी बहुत चिंतित होती । भोजन कैसै घृताशिवाय ॥
इकडे स्वामी स्नान करिती । कौपिन भस्म धारण करिती ।
तात्काळ यजमान धाव घेती । स्वामींपाशी तेधवा ॥
स्वामींना वदती यजमान । थोर असे तुमचा महिमान ।
करावे संकट निवारण । तूप संपले काय करु ॥
स्वामी मिटती दिव्य नेत्र । हाती धरुनी घृतपात्र ।
विलंब न करिती क्षणमात्र । पाणी ओतती विहिरीचे ॥
घृतपात्र जलाने भरले । स्वामींनी यजमानासी दिधले ।
ह्यातील तूप वाढा वदले । सुरू करा आता भोजन ॥
घृतपात्रातील ते घृत । त्यावेळी सतत वर्धित होत ।
त्याचा क्षय न कदापि होत । कितीही वाढले तरीही ॥
ऐसा स्वामींचा चमत्कार । अष्टसिद्धी तयांच्या चाकर ।
दादाजी मंडलोई साक्षीदार । असती ह्या घटनेचे ॥
ऐश्या लीला करुन । बऱ्हाणपूरी जाऊन ।
तापीकाठी पर्णकुटी बांधून । त्यात राहती स्वामी ॥ ४० ॥
सातपुड्याच्या पायथ्यावरी ।तापीच्या नदीकिनारी ।
स्थापन दत्तपीठ मनोहारी । ही दत्तात्रेयांची इच्छा ॥
यास्तव बऱ्हाणपूरास । भक्त आणि संत दत्तस्वामींस ।
एकत्र आणूनी लीलेस । दाविले श्रीदत्तप्रभूंनी ॥
तेथे एका देवालयात । पूजा – अर्चा करित ।
उत्तम भजन गात । सुस्वर असे स्वामींचा ॥
॥अभंग ॥
चला घालू हो प्रदक्षिणा श्रीदत्तस्थानाला ।
मुखी घोळवत ठेऊ सदा श्रीदत्तनामाला ॥धृ ॥
टाळ मृदुंग वीणा घेऊ नृसिंह वाडीसी जाऊ ॥
भजनानंदी तल्लीन होऊ भक्तीरसात न्हाऊ ॥१ ॥
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ऐसा गजर ऐकला ॥
दर्शनासी भक्त येती पीठापूर *कुरवपुराला ॥२ ॥
औदुंबर गिरनार माहूर असे श्रीदत्त तीर्थक्षेत्र
सद्भक्तांवर नित्य असे श्रीदत्तगुरु कृपाछत्र ॥३॥
चला चला रे सर्व मिळून जाऊ गाणगापुरासी ।
खांद्यावरी घेऊया श्रीदत्ताच्या पालखीसी ॥४॥
प्रदक्षिणा करुनी भक्ता पुण्य लाभतसे
हात जोडोनी दत्तदास चरणी नमितसे ॥५॥
॥ओवी ॥
बऱ्हाणपुरी भाविक जन । घेती स्वामींचे दर्शन ।
परगांवाहूनी भक्तजन । येती बहु दर्शनासी ॥
तेथे एक भट दांपत्य । तयांसी नव्हते अपत्य ।
स्वामी दर्शनासी नित्य । येई दांपत्य नेमाने ॥
दत्तस्वामी प्रसन्न होत । श्रीफलाचा प्रसाद देत ।
भटांसी अपत्यप्राप्ती होत । अजूनही चाले वंश ॥
प्रसादरूपी श्रीफलास । पूजूनी करिती दत्तजन्म उत्सवास ।
आजही त्या परंपरेस । चालू ठेविले भट वंशाने ॥
ह्या बऱ्हाणपुरात । शेषाद्रीबुवांची भगिनी राहात ।
स्वामी तिच्याकडे जात । बऱ्याचदा निवासास्तव
रावेरचे शेषाद्रीबुवा असती । ते बऱ्हाणपुरी जाती ।
स्वामीदर्शने कृतार्थ होती । स्वभगिनीगृही त्यावेळी ॥
रावेरमधील ग्रामस्थांत । सुपडू शेट गृहस्थ असत ।
शेषाद्रीबुवा तयांसी वदत । माझ्या मनीची इच्छा सांगतो ॥
दत्तमहाराज नावे एक स्वामी । असती बऱ्हाणपूरी ग्रामी ।
व्यक्तिमत्त्व बहुआयामी । आणावे आपुल्या रावेरी ॥
घनःश्यामशेट अग्रवाल असती । मुजुमदारही सवे येती ।
चितोडे बनिया सांगाती । विचार करती तैसा ॥
रावेरमधील ग्रामस्थांनी । विचार केला सर्वांनी ।
उत्तम बैलगाड्या शृंगारूनी । आले सर्व बऱ्हाणपुरात ॥
त्यावेळी स्वामी बैसले असती । तापी नदीकाठावरती ।
गाती स्वामी तापी स्तुती । अतिशय तन्मयतेने ॥५०॥
तुझ्या दर्शने जाहलो धन्य तापी
तुझ्या जलस्पर्शे उद्धरती पापी
सूर्यकन्या स्वसा शनैश्चराची तू
गंगा नर्मदा इतकी पवित्र तू
मास आषाढ शुक्ल सप्तमी तिथी
भूवरी प्रगट तू अवतीर्णतिथी
तुला वंदिता होई सौम्य शनीची दृष्टी
जीवन देसी जगी मुदित होतसे सृष्टी
सकलांवरी कृपा असे तुज विनवणी
दत्तदास नमितो तापी तुझ्या चरणी
दत्तस्वामींचे तेज पाहूनी । दंडवत घालती साश्रू नयनी ।
हस्तक मस्तक जोडोनी । विनवीती रावेरकर ॥
आपुल्या पदस्पर्शाने । यमुनेसी पूनित केले कृष्णाने ।
त्रिपाद ठेऊनी वामनाने । पावन केले त्रैलोक्य ॥
रामस्पर्श जेव्हा जाहला । तेव्हा उद्धरिले अहल्येला ।
पावन केले पर्णकुटीला । सेवूनी बोरे प्रेमभरे ॥
भारत असे देवभूमी । महाराष्ट्र असे संतभूमी ।
पावन होवो रावेरभूमी । आपुल्या चरणस्पर्शाने ॥
आम्ही बालके अनाथ । करावे आम्हांसी सनाथ ।
तुम्हीच श्रीसद्गुरूनाथ । आमुची विनंती परिसावी ॥
पुरवावे आमुचे मनोरथ । पहा हे सजविले वृषभरथ ।
आम्ही करितो सारथ्य । न्यावयासी आलो आम्ही ॥
ऐकूनी रावेरकरांची स्तुती । स्वामी तयांसी वदती ।
साजशृंगार कासया लागती । आम्ही आहोत निःसंग ॥
घेऊनी साजशृंगार सारा । तुम्ही जावे पुढारा ।
आम्ही अवश्य येऊ रावेरा । शब्द देतो तुम्हांसी ॥
रावेरकर झाले खिन्न । तेव्हा पडली मते भिन्न ।
काय करावे आता अन्य । उपाय काही सुचेना ॥
रावेरकर दुःखी भक्तजन । निघाले बैलगाडीत बैसून ।
बैल गेले बहुत दमून । आले रावेर वेशीवरी ॥६० ॥
जैसी काशीत वाहे गंगा । पवित्र करी जी अंगप्रत्यंगा ।
तैसीच नदी पाताळगंगा । पुनीत करीतसे रावेर ॥
पाताळगंगेचा पवित्र तीर । तेथे पुरातन मारुती मंदिर ।
त्या मंदिराजवळील विहीर । असे पाण्याने भरलेली ॥
बैलगाड्या विहीरीजवळ । थांबल्या तेथे अंमळ ।
प्राशन केले शुद्धजळ । तृषार्त रावेरकर मंडळींनी ॥
त्या मारुती मंदिरात । सहज डोकावून पाहत ।
एक सिद्धपुरुष दिसत । रावेरकर मंडळींना ॥
मंडळी होती अचंबित । साक्षात दत्तस्वामी असत ।
मंडळी स्वामींना विचारत । केव्हा आलात रावेरी ॥
हास्यमुख स्वामी वदत । तुमच्या आधी आलो म्हणत ।
रावेरकरांसी खात्री पटत । स्वामी साक्षात दत्तप्रभू ॥
मुख्य मंडळी गावात जाती । ग्रामस्थांसी सांगती ।
परब्रह्म आले वेशीवरती । करा तयारी स्वागताची ॥
ध्वज तोरणे उभारली । उत्तम रांगोळी रेखाटली ।
रावेर नगरी सजली । पालखी आणली ग्रामस्थांनी ॥
दत्तस्वामी पालखीत बैसले । ढोल नगारे वाजू लागले ।
दत्तनामाचा गजर चाले । पालखीच्या पुढती ॥
पालखी चाले वाजत गाजत । रावेरवासी फुले उधळत ।
दत्तस्वामी पालखी थांबवत । म्हणती येथे थांबतो मी ॥
त्या जागी असे उकिरडा । वास येतसे घाणेरडा ।
नाल्यात असे राडिरोडा। सांडपाणी वाहतसे ॥
रावेरकर विनविती स्वामींसी । येथे न करावे वस्तीसी ।
येथे नाल्याच्या काठासी । राहू नये स्वामी आपण ॥
दत्तस्वामी वदले ग्रामस्थांसी । येऊ द्यावे दुर्गंधीसी ।
मी राहीन ह्याच स्थानासी । नाही कुठे जाणार ॥
होईल हे स्थान सुगंधी । जावा लागेल थोडा अवधी ।
दत्तभक्तीचा जलधी । उचंबळून येईल येथे ॥
दत्तस्वामींचे आगमन रावेरास । ह्या अध्यायी कथा सुरस ।
वर्णून आता देतो विरामास । ह्या चौथ्या अध्यायासी ॥
हे बुद्धीच्या दातारा । नमन श्रीसद्गुरूवरा ।
गोड मानूनी कृपा करा । चौथा अध्याय अर्पण ॥ ७६॥
इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते चतुर्थोSध्यायः
N/A
References : N/A
Last Updated : August 24, 2026

TOP