मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – ६ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – ६ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – ६ Translation - भाषांतर साधू जरी असती वेगळाले । परि ते स्वस्वरूपी मिळाले ।श्रीसद्गुरूतत्वाशी जोडले । अनुसंधान तयांनी ॥रावेरनजिक वाघोड ग्राम । संत कुंवरस्वामी नाम ।दत्तस्वामींवरी निष्ठा निष्काम । महायोगी कुंवरस्वामी ॥दत्तस्वामींची आज्ञा पाळती । दत्तमंदिरात भोजन घेती ।दतमंदिरात कधी वस्ती करिती । कुंवरस्वामी ॥कुंवरस्वामींचा एक सेवक असे । तयांच्या बरोबरी नित्य राहतसे ।गांजाची गोळी देतसे । कुंवरस्वामी महाराजांना ॥ती गोळी चिलीमीत ठेवून । चिलीम टाकिती पिऊन ।अनेकदा दिवसातून । चिलीम ओढती कुंवरस्वामी ॥आकार न कमी होई । गोळी जशीच्या तशी राही ।कुंवरस्वामींची असे नवलाई । जन्मभर पुरली एक गोळी ॥रावेर दत्तमंदिरालगत । एक नाला असत ।मलमूत्र त्यातून वाहत । फिरती साप आणि जनावरे ॥कुंवरस्वामी जाती नाल्यावरी । साप धरून आणिती मंदिरी ।असती साप विषारी । चावती ते कुंवरस्वामींना ॥अंगी असे बहुत सामर्थ्य । सर्पदंश होतसे व्यर्थ ।ह्या कृतीतील मथितार्थ । सांगती कुंवरस्वामी ॥षड्रिपू हे सर्प असती । क्षणोक्षणी दंश करिती ।बुद्धीसी भ्रमित करिती । कलियुगाचा महिमा ॥ईश्वरी चित्त लावावे । षड्रिपूसर्पभय नसावे ।सतत अनुसंधान ठेवावे । जागृत असावे मनुष्याने ॥दत्तमंदिराच्या जमिनीवरती । सर्प सभोवताली फिरती ।भक्तजन बहुत घाबरती । घाबरू नका कुंवरस्वामी म्हणती ॥जेव्हा दत्तस्वामी आज्ञापिती । कुंवरस्वामी सर्पांसी घेती ।नागझिरी नदीकाठी सोडती । कुंवरस्वामी महाराज ॥एक विहीर दत्तमंदिरालगत । तेथे कुंवरस्वामी उभे राहत ।काही माणसे सोबत असत । कुंवरस्वामी महाराजांच्या ॥कुंवरस्वामी माणसांना सांगत । विहिरीतून पाणी काढा म्हणत ।माझ्या अंगावर ओता म्हणत । मी पुरे म्हणेपर्यंत ॥माणसे पाणी ओतती । अनेक बादल्या रित्या होती ।कुंवरस्वामी म्हणती । अजून ओता पाणी ॥शेवटी माणसे थकली । पाणी ओतायची शक्ती नुरली ।कुंवरस्वामींना दया आली । माणसांना सांगती जा आता ।एक कांबळे घेऊन । ओले अंग पुसून ।दत्तमंदिरात जाऊन । वरच्या माळ्यावर झोपले कुंवरस्वामी ॥कांबळे घेऊन अंगावरती । तीन दिवस आणि राती ।कुंवरस्वामी निद्रा घेती । कळजी वाटे माधवदासांना ॥तिसरे दिवशी माधवदास । विचारती जवळील माणसांस।कुंवरस्वामींच्या तब्येतीस । काय झाले तीन दिन ॥जवळील माणसे म्हणाली । कुंवरस्वामींची प्राणज्योत विझली ।पुढची तयारी करू लागली । इतक्यात झाला चमत्कार ॥कुंवरस्वामींनी कांबळे काढले । मैं जिंदा हूँ ऐसे वदले ।सर्वजण चकित जाहले । ऐसी लीला कुंवरस्वामींची ॥रावेर दत्तमंदिरालगत । नाल्यात बहुत कचरा असत ।कुंवरस्वामी पळत जात । एके दिनी नाल्यावरी ॥तेथील सर्व कचरा आणून । दत्तमंदिरात ढीग करून ।कचऱ्याला आग लावून । शेकत बसती कुंवरस्वामी ॥प्रचंड मोठा जाळ करत । ज्वाला छतासी जाऊन भिडत ।सर्वांना भय वाटत । मंदिराचे छत काळे होणार ॥परंतु जेव्हा अग्नी शांत झाला । काही न होई छताला ।कुंवरस्वामींची अगम्य लीला । असती बहुत रहस्यमय ॥संत मस्तानशहावली । दत्तस्वामींशी भेट झाली ।दत्तमहाराजांशी मैत्री केली । बहुवेळा येती मंदिरात ॥मस्तानशहांचे कर्णभेदन । करिती ते रुद्राक्ष धारण ।हिंदू आहेत की मुसलमान । न कळे भक्तांना ॥मस्तानशहांच्या मस्तकावरती । एक जखम झाली होती ।काही औषधोपचार न करती । मस्तानशहावली जखमेसी ॥कालांतराने ह्या जखमेत । अनेक अळ्या वळवळत ।जनतेसी किळस येत । दिसता मस्तानशहावली ॥ह्या अळ्या मरू नयेत । काळजी मस्तानशहा घेत ।अळ्यांसी साखर देत । डोक्यावरील जखमेत ॥जखमेतूनी जरी अळी खालती ।अरे मर जाएगी मस्तानशहा म्हणती ।पुन्हा उचलोनी ठेविती । जखमेमध्ये अळीला ॥ह्यात दडला आहे परमार्थ । तो जाणून घ्यावा यथार्थ ।न घ्यावा चुकीचा अर्थ । मस्तानशहावलींच्या कृतीचा ॥जे जे दिसे भूत । ते ते मानिजे भगवंत ।ऐसी धारणा निश्चित । होती मस्तानशहांची ॥श्रीसद्गुरूतत्व व्यापक असे । पंचमहाभूतांतही वसे ।आपपरभाव नसे । कधीही संतांच्या ठिकाणी ॥स्वहृदयी जो भगवंत । तोच प्राणिमात्रांच्या अंतरात ।संत असती कृपावंत । सर्वव्यापी परमेश्वर ॥तान्हे बाळ जोराने रडते । कोSहं ऐसे विचारते ।जर श्रीसद्गुरू कृपा होते । त्या बाळावरी ॥सद्गुरूकृपा होता बाळावरी । चित्तवृत्ती पालटती ।सो हं चे ज्ञान होय भीतरी । बाळाच्या अंतरंगात ॥जैसे भ्रमराच्या ध्यासाने । भ्रमररूप घ्यावे सुरवंटाने ।तैसे ईश्वराच्या ध्यासाने । ईश्वररूपी होती संत ॥मस्तानशहावली दत्तस्वामी । एकत्र येती कुंवरस्वामी ।सत्संग होतसे बहु नामी । सदा भगवंताची चर्चा ॥कुंवरस्वामी विचारिती । भक्ताची लक्षणे कैसी असती ।सांगावीत ती आम्हाप्रती । म्हणती मस्तानशहावली ॥दत्तस्वामी उपदेश करित । तुकोबांचा अभंग सांगत ।विविध दृष्टांत देत । मांडिती ते सिद्धांत ॥पाणी आवश्यक मानवास । तैसे ते आवश्यक मत्स्यास ।जरी पाणी न मिळे तयास । मृत्यू पावतो तत्काळ ॥जरी भक्तासी देव आवडतो । परि खरा भक्त तो असतो ।ज्याचा जीव व्याकूळ होतो । भगवंताच्या विस्मरणाने ॥जैसे सूर्यप्रकाश मिळे सर्वांसी । परि आवश्यकता कमळासी ।तैसे योग्य भक्तासी । नामस्मरण महत्त्व कळते ॥सुंदर बाळ गोजिरवाणे । रूप अतिशय लोभसवाणे ।आनंद होतो त्याकारणे । सर्व नातेवाईकांना ॥परंतु बाळाची काळजी मातेसी । तैसेच नाते ईश्वरासी ।जो ठेवितो निश्चियेसी । तोचि खरा भक्त जाणावा ॥ज्याच्या मनी जैसा भाव । तैसा तेथे राहतो देव ।देवाचा अंश असे जीव । महत्त्वाचा असे सिद्धांत ॥कुंवरस्वामी पुन्हा विचारिती । नाममहिमा सांगावा म्हणती ।दत्तस्वामी महिमा वर्णिती । आपुल्या रसाळ वाणीतुनी ॥नाम सदा स्मरावे । नाम सदा मुखी घ्यावे ।स्वतःचे विस्मरण व्हावे । नामरंगी तल्लीन होता ॥नामस्मरण करता सद्गुरूंचे । सार्थक होईल जन्माचे ।काळ वंदितो पाय त्याचे । असे नामाचा महिमा ॥नामाने तारिले प्रल्हाद बाळा । रामनामे तरल्या जडशीळा ।नामाने प्राप्त कृष्णसांवळा । झाला मीराबाईस ॥सद्गुरूंच्या स्मरणात । स्वतःच्या विस्मरणात ।रंगून जावे नामस्मरणात । मोक्षपद प्राप्त होईल ॥नामसंकीर्तन होतसे । मुखातुनी वाक्सुधा वाहतसे ।अध्यात्मज्ञान मिळतसे । दत्तस्वामींकडून संतांसी ॥दत्तस्वामींच्या समकालीन । कुंवरस्वामी मस्तानशहा दोन ।संत एक होत्या अजून । रामबाई नाव तयांचे ॥संत रामबाई असे नाम । मध्यप्रदेश खेडीघाट ग्राम ।सदा मुखी रामनाम । असे रामबाईंच्या ॥रामबाईंचा निवर्तला धव । आता ध्यास रमाधव ।रामनामाचा अर्णव । उसळे निरंतर हृदयी ॥खेडीघाट ग्रामात । रामबाईंचा दरबार असत ।एका पातेल्यात धान्य घेत । वाटावयासी गरिबांना ॥शेवटचा भिक्षुक येईपर्यंत । पातेल्यातील धान्य न संपत ।पातेले सदा भरलेले राहत । परमहंस योगिनी राम बाई ॥रामबाई येती रावेरी । निष्ठा तयांची दत्तस्वामींवरी ।भेट होतसे वरचेवरी । दत्तस्वामी आणि रामबाईंची ॥रावेर दत्तमंदिरालगत । एक विप्र होते राहत ।अग्निहोत्री उपनाम असत । होते बहुत शंकेखोर ॥दत्तस्वामी आणि रामबाई । कधी एकांतात भेट होई ।अग्निहोत्री विप्रामनी विकल्प येई । संशयपिशाच्च मानेवरी ॥अग्निहोत्री म्हणे विप्रांना । का पूजिता तुम्ही दत्तस्वामींना ।शुद्ध चारित्र्य मुळीच ना । ढोंगी आहे दत्तस्वामी ॥रामबाई मंदिरात येते । दत्तस्वामींसवे गोष्टी करिते ।एकांतात तयाजवळी बसते । दांभिक असती हे दोघे ॥ह्यांसी कैसे म्हणावे संत । शुद्धता नसे हृदयांत ।कैसा भेटला भगवंत । भोंदू दत्तस्वामी अन् रामबाई ॥जरी अग्निहोत्री बोल लाविती । दत्तस्वामी शांत असती ।जरी कोणी सूर्यावर थुंकती । सूर्यासी काय त्याचे ॥दत्तमंदिरी एके दिनी । येती रामबाई योगिनी ।दत्तस्वामींसी नमस्कार करूनी । बैसल्या त्या पाटावरी ॥भोजनाची वेळ झाली । नैवेद्याची ताटे मांडली कुंवरस्वामी मस्तानशहावली । उपस्थित होत तेथे ॥तेव्हा दत्तस्वामी म्हणती । रमाबाई, अर्पण करा नैवेद्याप्रती ।रामबाई भिंतीस टेकती । घेती मुखाने रामनाम ॥नेत्रकमले मिटली । रामबाईंची समाधी लागली ।जाणीव काही नुरली । आत्मानंदमग्न रामबाई ॥रामबाई ज्या भिंतीसी टेकती । तेथे लाकडी फळ्या असती ।फटीतून ढेकूण येती । चावती रामबाईंना ॥रामबाईंचे रक्त पिऊनी । ढेकूण जाती टम्म फुगुनी ।नवीन ढेकूण येती फळीतूनी । ढेकणांची रांग तेथे ॥दत्तस्वामी आज्ञापिती । अग्निहोत्री द्विजासी बोलविती ।अग्निहोत्री स्वतः पाहती । दृश्य ते रामबाईंचे ॥अग्निहोत्रींसी चूक उमगली । म्हणती व्यर्थ निंदा केली ।योग्यता नाही मी जाणली । परमहंस योगिनी रामबाई ॥आळंदीचे नृसिंहसरस्वती । दत्त स्वामींचे दर्शन घेती ।ऐशा भेटी वारंवार होती चालती । मोठा अधिकार दत्तस्वामींचा ॥श्रीसद्गुरूतत्वाची रूपे अनंत । त्याचा कधी कळेना अंत ।अनेक रूपे घेतसे भगवंत । अज्ञानी आपणास कसे ज्ञात ॥संतांसी ओळखण्यासी । हवे शुद्ध अंतःकरणासी ।लोळण घ्यावी संतपदासी । लीन शुद्ध भाव ठेऊनी ॥संतांच्या बाह्यरूपावरूनी । न घ्यावे तयांसी जाणूनी ।बुद्धीचे वजन लावूनी । न मोजावे तराजूत ॥सहाव्या अध्यायात जाणून । घेतला संत महिमान ।भक्तांचे होवो कल्याण । प्रार्थितो वैभव संतचरणी ॥इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते षष्ठमोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP