मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – १ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – १ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – १ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसद्गुरवे नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।श्रीगणेशा अंबाकुमरा । विघ्ननाशना तुज नमो ।मंगलमूर्ते वक्रतुंडा । बुद्धिदाता तुज नमो ॥१ ॥हंसवाहिनी तू सरस्वती । देई मजला तू मती ।येवो मज आता स्फूर्ती । श्रीसद्गुरू चरित्र लिहाया ॥२ ॥हे शंकरा गंगाधरा । मदनांतक तू गौरीहरा ।नमन तुजसी महेश्वरा । कृपा करावी दासावरी ॥३ ॥भाग्यलरेखा लिहसी तू । चतुरानन ब्रह्मा तू ।लेखनसवेचे भाग्य तू । लिहावेस माझ्या प्राक्तनी ॥४॥राहसी तू क्षीरसागरी । तूंचि लक्ष्मीकांत श्रीहरी ।मजवरी आता कृपा करी । सद्गुरूकथा लेखन ॥५॥यदु अलर्का एकनाथा । चरणी मी ठेवितो माथा ।श्रीसद्गुरूंची चरित्रकथा । लिहाया आशीष द्यावा ॥६॥आता नमितो कुलदेवता । शांतवी मम चित्ता ।त्रिलोकी असे सत्ता । गुणगान लिहवी मजकडुनी ॥७॥हे सच्चिदानंद स्वामी । दत्तात्रेय तू स्मर्तृगामी ।यश द्यावे मज ह्या कामी । चरित्र लेखनाच्या ॥८॥श्रीसद्गुरूंची करणी । चालवावी माझी लेखणी ।गुण गाया न पुरे वाणी । श्रीसच्चिदानंद चरित्र हे ॥९॥म्या मूढे चरित्र लिहावे । छे! तयांनी लिहवून घ्यावे ।मी निमित्तमात्र असावे । ही श्रीसद्गुरुंची इच्छा ॥१० ॥श्रीसद्गुरू गभस्तीसम । मी तर असे काजव्यासम ।श्रीसद्गुरूकृपार्णव असीम । मी तयांतील एक मीन ॥११॥श्रीसद्गुरू असती ज्ञानराशी । मी तर फक्त पापराशी ।नष्ट करिती झट्दिशी । ज्ञानशूल मारूनी ॥१२ ॥चरित्र ऐका सद्गुरूंचे । कान करूनी सर्वांगाचे ।श्रीसच्चिदानंद महाराजांचे । चरणी शत शत नमन ॥१३ ॥श्रीक्षेत्र माहूर नांदेड प्रांत । नजीकच्या एका ग्रामात ।लाहोरकर वंशात । दत्तात्रेय नामे एक द्विज ॥१४॥लक्ष्मी असे त्याची भार्या । सुलक्षणी सुमुखी आर्या ।तिचे मन सदा देवकार्या । गुंतलेले असे नित्यनेमे ॥१५ ॥दत्तात्रेयलक्ष्मी दंपती । उत्तम संसार करिती ।अन्नधान्याची नसे भ्रांती । सुरळीत चाले संसार ॥१६ ॥काळा डाग जरी उमटला । शोभा न ये श्वेतवस्त्राला ।नसता फूल संसारवेलीला । संसार होई निरर्थक ॥१७ ॥वंशात न होई पुत्रोदय । पतीपत्नींचा विचारविनिमय ।आता करावा काय उपाय । कोणा जावे शरण ॥१८ ॥ईश्वरेच्छा बलीयसि । ती येई द्विजाच्या मानसी ।आळवावे श्रीदत्तासी । करावे अनुष्ठान ॥१९ ॥माहुरगड असे बहु पवित्र । दत्ताचे तीर्थक्षेत्र ।तप करिती भक्त सत्पात्र । स्मरातृगामी दत्तप्रभू ॥२ ०॥ह्याच माहूरगडावरी । जाऊन दत्त शिखरावरी ।अनुष्ठान करावे वैखरी । मनी विचार येई द्विजाच्या ॥२१ ॥लक्ष्मीभार्या वदे द्विजासी । साथ द्याया मी येते तुम्हांसी ।जोडीने करु तपाचरणासी । फळ निश्चित मिळेल ॥२२ ॥द्विज म्हणे हे लक्ष्मी । तू आहेस गृहलक्ष्मी ।जातो तपासी एकटाच मी । वाढव तू गृहशोभा ॥२३ ॥पत्नीचा निरोप घेऊन । दत्तशिखरावरी जाऊन ।पद्मासन घालून । अनुष्ठान आरंभले दत्तविप्राने ॥२४॥अनुष्ठान सुरू जाहले । बहुत दिन सरले ।दत्तविप्राने आळविले । धांव धांव दयाळा ॥२५ ॥स्वप्नी विप्रास दृष्टांत होई । दत्तप्रभू दर्शन देई ।विप्रासी गहिवरून येई । लोटांगण घाली चरणी ॥२६॥दत्तप्रभू वदले विप्रासी । मी प्रसन्न झालो तुजसी ।पुरे कर अनुष्ठानासी । होईल तुझी इच्छा पूर्ण ॥२७॥वाढेल तुझा वंश । जन्मास येईल माझा अंश ।लाहोरकरकुलावतंस । जगी श्रेष्ठ होईल ॥२८ ॥दत्ते ऐसे बोलिले वचन । पाणावले द्विजाचे नयन ।विप्र वदे धन्य जीवन । माझे जाहले आजि ॥२९॥विप्रासी दत्ताज्ञा प्रमाण । केले गृहासी प्रयाण ।कथिले भार्येसी वर्तमान । श्रीदत्तकृपा जाहली ॥३०॥दत्तवचनाची प्रचीती । लक्ष्मी जाहली गर्भवती ।दीप्तीमान तिची कांती । गर्भाच्या तेजाने ॥३१॥लक्ष्मीसी लागले डोहाळे । असती बहु वेगळे ।मुखकमल तिचे उजळे । दत्तांश वाढे गर्भात ॥३२॥कीर्तन प्रवचन श्रवण करावे । सदा दत्तभजन करावे ।दत्तासी नित्य आळवावे । ऐसे डोहाळे तिज असती ॥३३॥दिव्य स्वप्न दिसत निद्रेत । सिद्धयोगी दर्शन देत ।दिव्य सुगंध पसरत । भोवताली लक्ष्मीच्या ॥३४॥मिलाफ भक्ती आणि श्रद्धेचा । पाठ करी श्रीमद्भागवताचा ।लक्ष्मीच्या उपासनेचा । प्रत्यय येई लवकरी ॥नऊ मास भरले लक्ष्मीचे । वेध लागले पुत्राचे ।वायू सुटले प्रसूतीचे । आली आनंदाची वेळ ॥३५ ॥तिथी भाद्रपद पौर्णिमेत । शके १७०२ असत१८३६ असे संवत । पुत्रोदय झाला हो ॥३६॥पुत्राकडे पाहता लक्ष्मीने । डोळे दीपले तेजाने ।साखर वाटली दत्तविप्राने । मंगल वाद्ये वाजू लागली ॥३७ ॥सृष्टीत चैतन्य पसरले । गंधर्व किन्नर गाऊ लागले ।पर्णसंभारांनी वृक्ष सजले । जन्मताच दिव्य बालक ॥३८ ॥सिद्धमुनी आणि यती । सूक्ष्मरूप घेऊन येती ।दर्शन घेऊनी आनंदित होती । ह्या दिव्य बालकाचे ॥३९ ॥आसपासची मंडळी येती । दिव्य बालकासी कुरवाळिती ।दर्शनाने धन्य होती । बालक असे दत्तांश ॥४० ॥ठेवावयास अभिधान । निश्चित केला बारावा दिन ।सुवासिनी करिती औक्षण । पाळण्यात घालती बालकासी ॥४१ ॥गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या । दामोदर घ्या कोणी माधव घ्या ।अत्रिसुत घ्या कोणी श्रीदत्त घ्या । जोजविती बाळासी ॥४२ ॥वंश हा धर्मपरायण । नांव ठेविले नारायण ।सुस्वरे गाती पाळणा । आनंदाने त्या वेळी ॥४३॥जो जो जो जो रे । नारायणा । लाहोरकरकुलभूषणा ॥४४॥पाहता मुखकमल । मन निर्मल । नष्ट होती पापे सकल ॥४५॥अंश तू दत्ताचा । सर्व जगताचा । पालक तू सृष्टीचा ॥४६॥जडमूढ ताराया । दत्तात्रेया । अवतरसी तू सदया ॥४७॥आनंदे पाळणा गातो । तुज भजतो । वैभव शीर नमवितो ॥४८ ॥आपुला सनातन धर्म । सांगे चार आश्रमांचे वर्म ।गृहस्थाश्रमाचे कर्म । करावे श्रद्धेने ॥४९ ॥गृहस्थाश्रमी उत्तम संतती । होवो इच्छिती जे दंपती ।प्रथम अध्याय वाचा निश्चिती । मनोरथ पूर्ण होईल ॥५० ॥वर्णन अवतार प्रसंगाचे । पुष्प प्रथम अध्यायाचे ।श्रीसद्गुरूंच्या चरणांचे । ध्यान सदा मज लागो ॥५१॥इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते प्रथमोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP