अध्याय – ९

श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.


संन्यासाश्रम स्वीकारला । काळ मागे सरला ।
कंपवात शरीरास झाला । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ॥
सदा दत्तनाम चित्ती । पूर्वस्मृती जागृत होती ।
श्रीसच्चिदानंद स्वामी सांगती । माधवदासांसी अनेक गोष्टी ॥
रेवापरिक्रमा केली तरुणपणी । तेव्हा स्नानासी थंडपाणी ।
कडुलिंबाचे सेवन प्रतिदिनी । केले मी माधवा रे ॥
कडुलिंबाचे अतिसेवन । सदा शीतजलाने स्नान ।
त्यामुळे आता शरीरास कंपन । भोग आहेत शरीराचे ॥
स्वामी म्हणती माधवदासास । माझ्या आलिया भोगास ।
परंतु त्रास होतो तूस । परि तू सेवा करतोस माझी ॥
कंपवाताने क्षीण प्रकृती । परि साधनातेज मुखावरती ।
भगवन्नामी रंगून जाती । सदासर्वकाळ स्वामी ॥
शरीर झाले जर्जर । परि दत्तनामाचा निर्झर ।
स्वामीमुखातूंनी वाहे भरभर । दत्तप्रभू देती संकेत ॥
देहाची खोळ सांडावी । संजीवन समाधी घ्यावी ।
अवतार समाप्ती करावी । ऐसी दत्ताज्ञा होय स्वामींसी ॥
वार्धक्याने थकून । गेल्या भुवया पडून ।
त्याखालील मांसल भाग गळून । खाली आला स्वामींचा ॥
मांसल भाग येई डोळ्यावरी । त्यामुळे न दिसे समोरी ।
कोण भेटाया आले सत्वरी । सांगू शक्ती स्वामी ॥
स्वामींसी असे दिव्यदृष्टी । त्यांना दिसे सर्व सृष्टी ।
स्वामी करिती अमृतवृष्टी । आपुल्या प्रिय भक्तांवरी ॥
सहावा महिना हिंदू वर्षाचा । असे तो भाद्रपदाचा ।
गणपती गौरी उत्सवाचा । अन् स्वामींच्या निर्वाणाचा ॥
माधवदासांसी स्वामी वदले । अवतारकार्य आता संपले ।
आता थोडेच दिन उरले । आम्ही संजीवन समाधी घेणार ॥
दत्तभजनी घालवा काळ । सेवा दत्तप्रभूंसी सर्वकाळ ।
तेच करतील प्रतिपाळ । माधवा तुझ्या वंशजांचा ॥
सर्वस्व अर्पण केलेस मजला । माधवा, मम आशीष तुजला ।
ह्या मंदिराच्या व्यवस्थेला । आता पुढे चालवावे ॥
ऐकूनी ही स्वामीवाणी । माधवदासांच्या डोळा येई पाणी ।
त्यांची चर्या दीनवाणी । सद्गतित झाले माधवदास ॥
जैसा मासा जळावीण । पाडसाविना अस्वस्थ हरिण ।
जैसी गाय वासरावीण । तैसी अवस्था माधवदासांची ॥
परंतु श्रीसद्गुरूंची इच्छा प्रमाण । स्वये माधवदास आपण ।
शोकाकुल अंतःकरण जाण । करू लागले सर्व तयारी ॥
बोचरे नाम ब्राह्मण । नित्य करिती भागवत पठण ।
संस्कृत मूलपाठ वाचन । श्रीसच्चिदानंद महाराजांपुढे ॥
सुरू होई भगवद्गीतापठण । आणि दत्तनामस्मरण ।
स्वामींच्या आवडीचे भजन । सुरू होई मंदिरात ॥
सकाळ अन् संध्याकाळ । पायात बांधूनी चाळ ।
भजननेम सदासर्वकाळ । श्रीसच्चिदानंद स्वामींचा ॥
गळ्यात वीणा चाळ पायात । दत्तगायत्री संकीर्तनात ।
समाधीयोगाच्या सकाळ प्रहरात । कीर्तन केले स्वामींनी ॥
ही वार्ता रावेरात पसरली । मंडळी दर्शनासी येऊ लागली ।
श्रीसच्चिदानंदमाऊली । आशीष देतसे सर्वांना ॥
मातेशिवाय तान्हे कैसे । हरिणीविना पाडस कैसे ।
दत्तमाऊलीस सोडून कैसे । राहतील श्रीसच्चिदानंद स्वामी ॥
स्वामींचे माधवदासांसी आज्ञापन । दत्तचरणासी समाधीस्थान ।
संन्यासाचे जरी पूर्वेसी आनन । परि पश्चिमुखी मी होणार ॥
समाधीव्यवस्था झाली । श्रीसच्चिदानंद स्वामींनी हाक मारली ।
माधवा, अरे दत्तमाऊली । बोलविते आहे आज मजला ॥
वद्य पक्ष नवमी भाद्रपद मास । घातले स्वामींनी पद्मासनास ।
शुचिर्भूत होवोनी दत्तास । प्रार्थिती श्रीसच्चिदानंद स्वामी ॥
अनंत जन्मीचे सुकृत फळले । श्रीदत्ताचे दर्शन झाले ।
आता हे शरीर थकले । द्यावा विसावा चरणापाशी ॥
केली दत्तप्रभूंची सेवा । चाखला दत्तभक्तीचा मेवा ।
आता चरणी ठाव द्यावा । आला समाधीक्षण जवळी ॥
नेसली होती धाबळ सुंदर । भस्मांकित कांती मनोहर ।
श्रीसच्चिदानंद यतिवर । चालले आता निजधामी ॥
स्वामी म्हणती माधवासी । कोणी न यावे माझ्यापाशी ।
श्रीदत्ताच्या चरणासी । रहावयासी चाललो आम्ही ॥
तेवढ्यात जानकीबाई येती । केशवदास सोबत असती ।
म्हणती त्या स्वामींप्रती । लेकरासी आशीर्वाद द्यावा ॥
उचलावे माझ्या हस्तकी । ठेवावा केशवाचे मस्तकी ।
शरीर माझे थकले की । स्वामी सांगती जानकीसी ॥
स्वामी म्हणती जानकीबाईंसी । माझा आशीष केशवासी ।
सेवा तुम्ही श्रीदत्तासी । योगक्षेम तोचि चालवेल ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींनी हात जोडले । श्रीगुरुदेव दत्त उच्चारिले ।
नेत्रकमल मिटले । देहासी समाधीअवस्था ॥
चित्ताचा होय लय । प्राणाचा पंचमहाभूंतांत होय विलय ।
देह होतसे चैतन्याचा आलय । अशी समाधीअवस्था ॥
दत्तात्रय अवधूता । जनार्दन स्वामी एकनाथा ।
श्रीसच्चिदानंद स्वामी कृपा करा । ऐसा होतसे जयघोष ॥
घेतली मोठी परात । स्वामींसी ठेविले त्यात ।
श्रीदत्तमूर्ती लगत । ठेविले श्रीसच्चिदानंद स्वामींना ॥
जैसी सुंदर वेल उपटावी गजाने । आकाश व्यापावे काळोखाने ।
तैसी मनोवस्था झाल्याने । सर्व भक्तांसी होती क्लेश ॥
ज्यांनी बालपणी सांभाळ केला । ज्यांनी लाविले भक्तीमार्गाला ।
ज्यांनी दाविल्या अनंत लीला । त्यांचा विरह सहन न होय ॥
माधवदासांनी घट्ट केले मन । केले और्ध्वोदेहिक तर्पण ।
जैसे सांगती विद्वान । तैसे केले संन्यासी स्वामींचे कार्य ॥
श्रीदत्तचरण हेचि गेह । श्रीसच्चिदानंद स्वामीदेह ।
मनी न उरे संदेह । संजीवन समाधी जाहली ॥
वय वर्षे अष्टोत्तर शत । इसवीसन अठराशे अठ्ठ्यांशी असत ।
उत्सवप्रसंगी अन् प्रतिदिनी । समाधीपूजा होते सुगंधी द्रव्यांनी ।
चैतन्यमय अद्वितीय सुगंधांनी । क्वचित वातावरण भरते ॥
ह्या सुगंधाची अनुभूती । क्वचित प्रसंगी येते प्रचिती ।
तपश्चर्येत सामर्थ्य असती । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ॥
संजीवन समाधी आहे का खरी । शंका येई परोपरी ।
ऐसे बोलती वैखरी । अतिशहाणे विप्र समाधी आधी ॥
त्यावेळी स्वामी बोलिले । विद्वत्तेचे नको दाखले ।
ज्ञानेश्वर अन् नाथांनी केले । तैसेच सत्य दावीन मी ॥
समाधीवेळी चमत्कार घडला । बजाज कुटुंब होते खांडव्याला ।
‘श्रीगुरूदेव दत्त ध्वनी’ आला । घरातील खांबांतूनी ॥
समाधी योगावेळी स्वामीयती । श्रीगुरुदेव दत्त म्हणती ।
त्याचवेळी खांबातूनी येती । श्रीगुरुदेव दत्त एसे ध्वनी ॥
बजाज कुटुंब खांबाची महती । ह्याच ग्रंथांत वर्णिली यथामती ।
पुन्हा नको पुनरावृत्ती । ग्रंथ विस्तारभयास्तव ॥
खांडवा भक्तजन रावेरी येती । हा वृत्तांत सांगती ।
संजीवन समाधी प्रचिती । चूक मान्य केली विप्रांनी ॥
आमुच्या मनी आला संशय । संजीवन समाधी विषय ।
आता दुःख अतिशय । क्षमा करावी विप्र म्हणती ॥
स्वामींचे लाडके कुत्रे दोन । त्यांचेही अस्वस्थ झाले मन ।
एका कुत्र्याने सोडला प्राण । समाधीवरी मस्तक ठेवूनिया ॥
कालांतराने दुसरा श्वान । नीरस झाले त्याचे जीवन ।
भागवत सप्ताह ऐकून । त्यानेही केला प्राणत्याग ॥
कुत्रे दोन्ही बहुत निष्ठावंत । कृपा करिती भगवंत ।
जाहला तयांचा देहांत । मोक्षपद प्राप्त जाहले ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींनी । संजीवन समाधी घेऊनी ।
मोक्षप्राप्ती दिली करूनी । जडमूढ अज्ञजनांसी ॥
श्रीसच्चिदानंदस्वामींचे रूप । झाले सर्वांसी ते अरूप ।
भक्तांनी जाणावे स्वस्वरूप । भक्त प्रार्थिती एकमुखाने ॥

॥ प्रार्थना ॥

श्रीसच्चिदानंद स्वामीराया, आतुरलो रूप पहाया ॥
आजानुबाहू शरीर टोपी मुकुटाकार
रूप तुझे सगुण साकार ॥
रावेर दत्तमंदिर तुमचे स्थान
गातो आम्ही तुमचे गान ॥
श्रीसच्चिदानंद स्वामी हो, धरितो पाय
माय तुम्ही वत्सा जैसी गाय ॥
विश्वावरी तुमची सत्ता ब्रह्मांड नायका
आशीष द्यावा आम्हा बालका ॥
भवनदी तरण्यासाठी आळवू स्वामी
वैभव तल्लीन तव नामी ॥
ऐसी प्रार्थना करुनिया । सांगता करितो अध्याया ।
श्रीसच्चिदानंद स्वामींच्या पाया । साष्टांग नमस्कार करितो ॥

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते नवमोSध्यायः

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP