मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – २ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – २ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – २ Translation - भाषांतर मागील अध्यायी आपण । जन्मकथा केली श्रवण ।आता पाहू बालपण । कैसे होते महाराजांचे ॥१॥नारायण मूळ नाव असे । हे नाव प्रगट नसे ।भक्तांच्या मुखी वसे । दत्तबाबा हेचि नाव ॥२ ॥दत्तभक्ती होती स्वामींची । सदा उपासना दत्ताची ।बालपणी केली साची । म्हणून दत्तमहाराज असे नाव ॥३ ॥जशी वाढते चंद्रकला शशी । स्वामींची वाढ होय तशी ।खेळण्याची पद्धत खाशी । होती स्वामींची बालपणी ॥४॥दगडाचे देव मांडूनी । तयांची पूजा करुनी ।भजन आरती गाऊनी । पूजन करिती बालस्वामी ॥५॥खेळण्याची रीत असे न्यारी । तल्लीन होई स्वामींची स्वारी ।बुद्धी भक्ती त्यांची सारी । एकवटे देवापाशी ॥६॥माहूर असे तीर्थक्षेत्र । रेणुकामाता परमपवित्र ।भक्तांवरी तिचे कृपाछत्र । विद्वान विप्रांचे आश्रयस्थान ॥७॥विद्याभासाची अथश्री । संपादन करण्या धीश्री ।स्वामींचे पिताश्री । पाठविती तयांना विप्राकडे ॥८॥विद्या केली संपादन । केले वेदांचे अध्ययन ।शास्त्रे पुराणांचे चिंतन । केले दत्तमहाराजांनी ॥९॥अनेक भाषा अवगत । योग्य वेळी परभाषेत बोलत ।फारसी भाषेत संवाद साधत । जन आश्चर्य करिती ॥१०॥अचानक मातृछत्र हरपले । एक संवत्सर झाले ।एकाएकी पितृछत्रही हरपले । स्वामींचे वय दहा वर्षे ॥११॥संत एकनाथांचे झाले ऐसे । जन्मनक्षत्र मूळ असे ।आईवडिलांविना पोरके असे । नाथांचे बालपण ॥अशीच घटना स्वामींचे बाबतीत । आजूबाजूचे लोक म्हणत ।मूळ नक्षत्रावरी जन्म होत? । मूळावरी उठला मातापित्यांच्या ॥परि स्वामी दत्तस्वरूप होते । जन्ममृत्यू चक्रातून मुक्त होते ।आयुष्याची चिंता न भासते । कधीही दत्तस्वामींना ॥स्थितप्रज्ञ दत्तस्वामींनी । मातापित्यांचे श्राद्धकर्म करुनी ।एव्हढे लहान वय असूनी । शांततेत जीवन आरंभले ॥ज्या विप्राकडे केला अभ्यास । कलत्रासहित तयास ।बोलाविले रहावयास । स्वामींनी आपुल्या घरी ॥१२ ॥कुटुंबासहित विप्र आला । स्वामींबरोबर राहू लागला ।आश्रय तयासी दिधला । स्वामींनी प्रेमाने ॥१३॥सोय कशी करावी दिव्य बालकाची । हीच चिंता असे ग्रामस्थांची ।कठोर मुद्रा भासे दत्तस्वामींची । स्वामींची महती अज्ञात ॥आहे का मूळ नक्षत्रावर जन्मला? । आईवडिलांचा वियोग झाला ।काय अर्थ ऐशा जीवाला । प्रश्न पडला ग्रामस्थांना ॥शोधिली कन्या उपवर । ग्रामस्थांनी सत्वर ।घ्यावा हाती तिचा कर । विनविले स्वामींसी ॥१४ ॥कष्ट घेता तुम्ही कासया । वैराग्य स्त्री असे जाया ।दत्तासी अर्पण माझी काया । वदले स्वामी ग्रामस्थांना ॥१५॥घर अर्पण केले विप्रासी । त्यागिले त्या गृहासी ।केले स्वामींनी प्रस्थानासी । निःसंग होऊनिया ॥१६ ॥नांदेड क्षेत्र गोदातीरासी । स्वामी आले रहावयासी ।करिती तेथे तपासी । दिव्य मुद्रा दत्तस्वामींची ॥श्वेत वस्त्र परिधान करून । कपाळी मोठे कुंकू लावून ।गोदावरी माता तेथे येऊन । वदली दत्तस्वामींसी ॥तुझे तप येईल फळाला । स्वये सद्गुरू येतील तुज भेटायला ।देतील तुजसी अनुग्रहाला ।दत्तप्रभूंचा आज्ञेने ॥*एके दिनी शिष्यांसमवेत । हरिदासांचे आगमन होत ।*तेही दत्तस्वामींच्या शोधार्थ येत । अपूर्व असे ही घटना ॥एकनाथांचा संप्रदाय । आराध्य असे दत्तात्रेय ।दत्तकृपा अनुपमेय । असे हरिदासांवरी ॥१८ ॥साक्षात आदिनारायण । परंपरा असे पावन ।आपण करुया अवलोकन । महान गुरुपरंपरेचे ॥१९ ॥वंदुनी निज ज्ञान दायक । ब्रह्मरूप गुरु स्वये ।नासूनी अज्ञानतम हा । दाविले जग अद्वये ॥पूर्ण तत्व स्वरूप निश्चय । जेथूनी मज जाहला ।तो गुरू निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥ २० ॥हंसरूपी आदिनारायण । ब्रह्मदेवा शिक्षिता ।ज्ञान हे निज अंतरी विधी । जाहला मज रक्षिता ॥ते पुढे निज गुह्य सांगुनी । अत्री ऋषी हा बोधिला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥तो पुढे अवधूतरूपी । आदिनाथचि लाघवी ।दत्तरूपे अवतरोनी । संप्रदाया वाढवी ॥तेथूनी विस्तार बहु हा । साधकाप्रति दिधला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥यावरी करुनी कृपा । निजज्ञान प्राप्त जनार्दना ।देऊनी अभयास करवी । कलिमलासही मर्दना ॥दुष्ट नष्ट पतित अधम । पातकी बहु तारिला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥प्रेम देऊनी एकनाथा । एकरूप स्वये करी ।येऊनी सदनासि जेथे । श्रीहरी सेवा करी ॥तेथूनी मग पत्र पुष्पी वृक्ष बहु हा शोभला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥एकनाथे नरहरीप्रति तत्व तेचि निवेदले ।नरहरीने कृष्णदासा । निजमुखे मग शिक्षिले ।कृष्णदास प्रसादवर । विश्वंभराप्रति दिधला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥ २५॥तेथूनी नारायणे निज । हित बरवे साधिले ।तेचि ज्ञान अगाध । उद्धवराज यासि अर्पिले ॥यापरी निजदास तारुनी । मार्ग जगी स्थापिला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥मुक्त पदवीप्राप्त राजाराम । तो मनी आठवा ।जीवशिव वियोग नासुनी । आत्मरुपी भेटवा ॥पूर्णप्राप्त गुरुकृपा । हरिदास वर हा लाधला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥हरिदासे श्रीदत्तस्वामी तत्व तेचि निवेदिले ।माधवासी दास पदवी । देऊनी रावेरासी स्थापिले ।नासूनी भव आपदा । वरी मुक्ती दे शेषाद्रीला ।तो गुरु निज संप्रदाय । एकनाथचि वंदिला ॥जो करील गुरुपरंपराष्टक पठन । इष्ट देवतेचे होईल दर्शन ।प्रतिष्ठान नगरीत देवकिनंदन । राहिला नाथांघरी सेवेत ॥अशी गुरुशिष्यपरंपरा थोर । सेवाया आला मुरलीधर ।संकटे टळतील घोर । गुरुपरंपराष्टक पठणाने ॥स्वामींवरती गुरुकृपा झाली । वृत्ती स्वस्वरूपी मिळाली ।समाधी अवस्था अनुभवली । स्वामींनी त्या समयी ॥श्रीसद्गुरू हरदास । आज्ञापिती स्वामींस ।करावे दक्षिणयात्रेस । आता तुम्ही निश्चये ॥३०॥श्रीसद्गुरुआज्ञा प्रमाण । यात्रेसाठी प्रयाण ।स्वामींनी केले तीर्थाटन । एक वर्ष कालावधी ॥स्वामी जाती उत्तरेस । पाहती केदारनाथास ।नमस्कार करिती बद्रिनारायणास । हिमालयातील वास्तव ।अत्यंत थंड वारे वाहती । अंगारवरी फक्त कौपिन असती ।*दिशा हेच वस्त्र पांघरती । महायोगी दत्तस्वामी ॥दिनभर असे अनशन । फक्त करिती जलपान ।न घेती एकही अन्नकण । महातपस्वी दत्तस्वामी ॥झाडे असती घनदाट । अतिशय कठीण वाट ।परिस्थिती असे बहु बिकट । हिंस्र श्वापदांची संचार ॥ऐसे कठीण प्रसंग । परि स्वामी दत्तनामी दंग ।दिसे फक्त भक्तीरंग । दत्तस्वामींच्या मुखावरी ॥दत्तस्वामी हिमालयात । अनेक चमत्कार पाहत ।सिद्धयोग्यांची दर्शने होत । विविध गुहेत दत्तस्वामींना ॥हजारो वर्षांपासून । समाधीत राहून ।सिद्ध बसले ध्यान लावून । दत्तस्वामी पाहती तयांना ॥जमिनीपासून अधांतरी । सिद्ध बैसती आसनावरी ।काही राहती वृक्षांभीतरी । अगम्य असती ह्या गोष्टी ॥दत्तस्वामींचेसुद्धा दर्शन । ह्यातील काही सिद्ध घेऊन ।साक्षात दत्तात्रेयांसी पाहून । नतमस्तक होती ॥दत्तस्वामी साक्षात दत्तात्रेय । जैसी पात्रता तैसे दर्शन होय ।तीर्थयात्रा हिमालय । करुनी स्वामी येती स्वस्थळी ॥माहूरक्षेत्री पुनरागमन । मनी आले करावे दत्तध्यान ।रेणुकामातेचे घेऊन दर्शन । केले सर्व तीर्थस्थानदत्तशिखरावरी एकांतस्थान । बैसले घालून स्थिरासन ।सुरू झाले दत्ताचे ध्यान । मंत्र अष्टाक्षरी जपोनी ॥श्रीसद्गुरू हरिदास । ह्यांनी दिलेल्या दत्त मंत्रास ।श्रद्धेने करिता ध्यानास । श्रीदत्तगुरु भेटतील ॥परंपरा संत एकनाथांची । जाणीव सामर्थ्याची ।आवर्तने मंत्रजपाची । करिती स्वामी एकांती ॥ ३ ५॥जिथे अनुष्ठान करिती । हिंस्र पशू फिरती ।घनदाट झाडे असती । चहूबाजूंनी तेथे ॥दत्तशिखरावरी जाण्यास । पाऊलवाट नसे खास ।संतांचा असे निवास । भरती परंपरेतील तेथे ॥बारा वर्षे केले तप । व्यत्यय आणिती ताप आप ।दत्तगुरुंच्या समीप । ध्यानी असती स्वामी ॥दत्तगुरू विचार करिती । केव्हढी शिष्याची भक्ती ।प्रगट व्हावे ह्याच्या पुढती । परंपरा घेऊनी आपली ॥परंपरेतील सिद्धांस । घेऊ दे शिष्याच्या दर्शनास ।ओळख होईल जनांस । सिद्ध परंपरेची त्या वेळी ॥ ४०॥आणि तो उगवला सुदिन । प्रगटले अत्रिनंदन ।रूप मलंगाचे घेऊन । स्वामींपुढती तेधवा ॥स्वामींच्या मस्तकावरी । हातातील छडी ठेऊनी बरी ।म्हणती वत्सा उघड तरी । तुझे नेत्र आता ॥ध्यान पावले भंग । उजळले स्वामींचे अंतरंग ।रोमांचित झाले अंग । मलंग दत्तप्रभूंसी पाहुनी ॥श्वेत अश्व विशाल असे । त्या अश्वात विश्वरूप असे ।ब्रह्मांड सामावलेले दिसे । स्वामींना त्या अश्वामध्ये ॥त्या अश्वाच्या पुढती । जनार्दनस्वामी उभे असती ।केशरी श्वेत पताका त्यांचे हाती । एकनाथही दिसती तेथे ॥ ४५ ॥यदु अलर्क मागुती । मलंग स्वामींसी सेविती ।तयांसी चवऱ्या ढाळिती । ऐसे दृश्य पाहती स्वामी ॥जैसे निळोबांस्तव तुकोबा आले । शबरीगृही श्रीराम पातले ।तैसे स्वामींसाठी नाथ आले । कलियुगात सदेह पुनश्च ॥मलंगप्रभू वदले स्वामींसी । काय हवे आता तुजसी ।स्वामी वदले द्यावे पादुकांसी । पुनीत करावे दत्तराया ॥छडी अन् प्रसाद पादुका । मलंगप्रभू देती विवेका ।ठेऊनी पादुका मस्तका । आनंदभरित होती स्वामी ॥नाथ महाराज सांगती । परंपरेची देती माहिती ।ज्ञानपटाची महती वर्णिती । ज्ञानेश्वरी असे आधार ॥ ५० ॥स्वामी करिती स्तुती । आत्मानंद पावती ।स्वस्वरूपी लीन होती । स्तुतीपर पद म्हणती ॥॥ पद ॥दत्त माझे गुरू मलंग अवतार । दाविती मजला पैलतीर ।मज पामरासी दर्शन देती । होऊनी आरूढ अश्वावरती ॥अलर्क यदु अन् जनार्दन । संत एकनाथ देती दर्शन ॥प्रसाद पादुका पवित्र ही छडी । भवबंधनाचे पाश तोडी ॥॥ ओवी ॥सर्वांच्या चरणावरती । स्वामी मस्तक ठेविती ।त्यानंतर अंतर्धान पावती । परंपरेसहीत मलंगप्रभू ॥हा अध्याय जो वाचेल । दत्तासी तो आवडेल ।श्रीसद्गुरुंची कृपा होईल । करितो वैभव नमन ॥५३॥इति श्रीसद्गुरूसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते द्वितीयोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP