बालकांड - असुराना वरदान

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


पुलस्त्य कुली जरि घेत जन्म ।
निर्मल पावन कुल अनुपम ॥
परि असे तया भूदेव शाप ।
झाले सकल ते पापरूप ॥१॥
अर्थ - पुलस्त्य ऋषींच्या कुलामधे रावणाने जन्म घेतला. कुल अतिशय पवित्र, निर्मल व अनुपम असे होते. परंतु त्या कुलाला ब्राह्मणांचा शाप लागल्यामुळे त्या कुलातील सर्वजण पापी राक्षस झाले.

तीन बंधु ते विविध प्रकारे करती बहु साधना ।
अती उग्र तप वर्णन त्याचे कुणी करू शकेना ॥
कठिण साधना पाहून त्यांची येई तिथे विधाता ।
मागा वर मी प्रसन्न आहे वदला वरदाता ॥२॥
अर्थ- - रावण, कुंभकर्ण व बिभीषण या तीन बंधूनी अनेक प्रकारे खूप उग्र तपश्चर्या केली. तिचे कुणी वर्णनही करू शकत नव्हते. त्यांची ती कठीण साधना पाहून ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. ''मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. आपण वर मागावा.'' असे त्यांना म्हणाले.

पकडुनी पदा दशानन करी विनंती ब्रम्ह्याला ।
हे जगदीश्वर परिसा आता माझ्या वचनाला ।
द्यावा हा वर मानव अथवा वानर सोडून ।
कुणिही मारूदे परी न यावे कधी अम्हा मरण ॥३॥
अर्थ - रावणाने ब्रम्हदेवाचे पाय धरले व त्यांना विनंती केली, जगाच्या परमेश्वरा आता माझे मागणे ऐकावे. आपण मला वर द्यावा, ज्यामुळे मानव अथवा वानर सोडून इतर कुणाकडूनही मला मरण येऊ नये.''

वदले शंकर ब्रम्ह्याने अन्‍  मीही दिधला वर ।
''एवमस्तु तप केले बहु प्रसन्न तुमच्यावर ॥
जाती कुंभकर्णा जवळ ते जगदीश्वर ज्ञानी ।
तया देखुनी होई विस्मय ब्रम्हाजीच्या मनी ॥४॥
अर्थ - शंकर पार्वतीला म्हणाले, ''मी आणि ब्रम्हदेवानीही रावणाला तसा वर दिला.'' ''आपण कठीण तप केल्यामुळे आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आहोत आपल्या इच्छेप्रमाणे होईल.'' असे म्हणून रावणाला वर दिला. नंतर ज्ञानी जगदीश्वर कुंभकर्णाजवळ गेले. त्याला पाहून ब्रम्हदेवांना आश्चर्य वाटले.

करी विचार करेल जरी हा खळ नित आहार ।
होउन जाईल तरि हा सारा उजाड संसार ॥
तशी प्रेरणा सरस्वतीला देती बदला मती ।
मागत निद्रा सहा मास तो, असुर ब्रह्माप्रती ॥५॥
अर्थ - कुंभकर्णाबद्दल ब्रम्हदेवांनी असा विचार केला, हा दुष्ट जर नेहमी असाच आहार घेईल तर हे सर्वजग उजाड होऊन जाईल. त्यांनी स्वरस्वतीला त्यांची बुद्धी बदलावी असे संगितले. कुंभकर्णानी सहा महीने मला झोप मिळावी, असा ब्रम्ह्याजवळ वर मागितला.

भेटाया जाती ब्रह्मा विभीषणा ।
माग सुता वर वदती त्याना ॥
प्रभुपदकली देह विसावा ।
द्या अनन्यनिर्मल प्रेमाचा ठेवा ॥६॥
अर्थ - नंतर ब्रम्हदेव विभीषणाकडे गेले व त्याला वर मागा असे सांगितले. विभीषण म्हणाले, ''परमेश्वराच्या चरणकमली मला विसावा मिळावा व भगवंताच्या अनन्यप्रेमाचा ठेवा मला मिळावा.''

निघून जाती ब्रह्मदेव त्या देऊनि वरदान ।
अति आनंदे सदनि परतले ते अनुज तीन ॥
मयासुराची तनुजा होती सुंदर मंदोदरी ।
लावण्यवती ललनामधे ती शिरोमणी नारी ॥७॥
अर्थ - त्याला तसा वर देऊन ब्रह्मदेव निघून गेले व ते तिघे बंधू अतिशय आनंदाने आपल्या सदनी गेले. मयासुराची मुलगी मंदोदरी अतिशय सुंदर होती. सुंदर स्त्रियामधे ती सर्वांत जास्त सुंदर होती.

विवाह करी दशाननाशी मुलीचा मयासुर ।
जाणे मनी असुरांचा होईल तोही राजेश्वर ॥
प्रसन्न होई देखुनी सुंदर ललना दशानन ।
विवाह करी बंधुद्वयाचे सदनी परतून ॥८॥
अर्थ - मयासुराने तिचे लग्न रावणाबरोबर केले. हा रावण सर्व राक्षसांचा राजा होईल हे त्याने ओळखले होते. ती सुंदर मंदोदरी पाहून रावण प्रसन्न झाला. आपल्या सदनी परतल्यावर त्याने आपल्या दोन्ही बंधूंचे विवाह केले.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP