बालकांड - रामनामाचा महिमा
श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.
रामनाम अति पुनीत वेदपुराण श्रुतिसार ।
कल्याणाचे सदन असे हे जात अशुभ दूर ॥
श्री शिव गिरिजेसह जपती हे नाम सदा पुनीत ।
राहे भरुनी रामनाम हा ग्रंथ काव्यालंकृत ॥१॥
अर्थ - रामनाम हे अतिशय पवित्र आहे. ते वेदपुराण आणि श्रुतिचे सार आहे. हे कल्याणाचे सदन आहे. याच्यामुळे अमंगल दूर निघून जाते असा याचा प्रभाव आहे. श्रीशंकर पार्वतीसह याचा नेहमी जप करीत असत. असे हे पवित्र नाम आहे. काव्य अलंकार यानी सजलेल्या या ग्रंथात रामनाम भरून राहिले आहे.
रामनामप्रती हृदयी प्रीती गिरीजेच्या देखून ।
हर्षितशिव स्त्रीभूषण उमेला करी निजभूषण ॥
जाणूनि नामप्रभाव शिव करी प्राशन जहरा ।
अमृत झाले नामप्रभावे फळ हे मिळे शंकरा ॥२॥
अर्थ - पार्वतीच्या मनात रामनामाविषयी प्रेम असलेले पाहून शंकर हर्षित झाले. स्त्रीयांचे भूषण असलेल्या उमेला त्यानी आपले भूषण केले. जगाच्या कल्याणसाठी नामाचा प्रभाव जाणून शंकरांनी कालकूट प्राशन केले परंतु रामनामाच्या प्रभावाने ते जहर अमृत झाले. हे फळ श्रीशंकरांना मिळाले.
आदिकवी मुनि वाल्मिकी जाणीत नामप्रताप ।
उलटे जपुनी रामनाम हो पुनीत नाशी पाप ॥
सहस्त्र नामसम रामनाम एक वदे महेश ।
निजपतीसह जपे भवानी सतत नामास ॥३॥
अर्थ - आदिकवी वाल्मिकी मुनीना नामाचे महत्व माहीत होते. राम हे नाम उलटे जपूनही त्यांचे पाप नाहीसे होऊन ते पावन झाले. श्रीशंकर सांगतात एक रामनाम इतर हजार नामासमान आहे. हे नाम आपल्या पतीसह पार्वती सतत जपत असते.
दोन्ही अक्षर मधुर मनोहर वर्णमाला नयन ।
स्मरण सुलभ ती वाटे सुखद भक्तांचे जीवन ॥
दोन अक्षरे जपता हृदयी लाभ होत जगती ।
प्रभुसेवा करण्यास मिले परलोकी वसती ॥४॥
अर्थ - राम ही दोन्ही अक्षरे मधुर आणि मनोहर आहेत. ती वर्णमालारूपी शरीराचे नेत्र आहेत. ही भक्तांचे जीवन आहे. सर्वांना स्मरण करण्यास सुलभ आणि सुख देणारी आहेत असे वाटते. त्यांच्या जपामुळे या जगात लाभ होतो व परलोकी वस्ती करून परमेश्वराची सेवा करण्यास मिळते.
नर नारायण सम हे सुंदर दोन्ही अक्षर भ्राता ।
जगपालक हे भक्तजनांचे नित्य रक्षणकर्ता ॥
भक्तिरुप सुंदर स्त्रीची ही अक्षर कर्णफूल ।
विश्वहितास्तव भासती ही चंद्रसूर्य विमल ॥५॥
अर्थ - ही दोन्ही अक्षरे नरनारायणसमान सुंदर बंधू आहेत. ही जगाचे पालन व भक्तांचे नेहमी रक्षण करणारी आहेत. ही अक्षरे भक्तिरूपी सुंदर स्त्रीच्या कानातील कर्णफुले आहेत व जगाच्या हितासाठी ही निर्मल चंद्रसूर्याप्रमाणे आहेत.
नामरूप गतीची असे अवर्णनीय कहाणी ।
जाणण्यास सुखदायी परी वद शकेना कुणी ॥
निर्गुणसगुणामधे होतसे साक्षी सुंदर नाम ।
चतुर दुभाषी नाम देतसे जना यथार्थ ज्ञान ॥
अर्थ - नाम आणि रूपाच्या गतिची कहाणी अवर्णनीय आहे. समजण्यास सुखद आहे. परंतु त्याचे वर्णन कुणी करू शकत नाही. निर्गुण आणि सगुणामधे नाम सुंदर साक्षी आहे आणि दोन्ही यथार्थ ज्ञान करून देणारा हा चतुर दुभाषी आहे.
तुलसा वदे जारि हवे तुला ।
बाहेर अंतरी उजियाला ॥
रामनाममणि दीप धरी ।
मुखद्वार जिभ देहलीवरी ॥७॥
अर्थ - तुलसीदास म्हणतात जर तुला बाहेर व आतही मन प्रकाशित करेल असा प्रकाश हवा असेल तर मुखरूपी दारात जीभरूपी जो उंबरठा आहे, तिथे रामनामरत्नरूपी दिवा ठेवून द्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2023
TOP