बालकांड - रामचरितमानस
श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.
या रचनेला मनी रचूनी महेश ठेवि मनी ।
मंगलसमयी कथा वदे ती गिरिजेला गाउनी ॥
प्रसन्न होती कथेस अपुल्या पाहुनि गौरीपती ।
'रामचरितमानस' सुनाम ग्रंथास या देती ॥१॥
अर्थ - ही रचना श्री शंकरानी मनात ठेवली व एका शुभवेळी ती पार्वतीला सांगितली व गाऊन दाखविली. ही आपली कथा पाहून शंकर मनात प्रसन्न झाले. त्यांनी या ग्रंथाचे नाव रामचारितमानस ठेवले.
रामचरितमानस वाटे बहुप्रिय मुनीजना ।
श्री शीवजीनी केलेली ही पुनीत मधुरचना ॥
त्रिविध दोष दु:खदैन्य नष्ट करी ही कथा।
कलियुगीचे सकल पाप किति कुचाली व्यथा ॥२॥
अर्थ - रामचरितमानस हा ग्रंथ मुनीजनाना फार आवडतो. श्री शंकरांनी ही पवित्र रचना केली आहे. ही कथा दु:ख, दारिद्रय व तीन प्रकारचे दोष नष्ट करते. कलियुगातील कितीतरी वाईट प्रथा, दु:ख व सर्व पाप नाहीसे करते.
संवाद सुंदर चार कथेत ।
यात मती नित रंगून जात ॥
कथा पुनीत ही तडाग सुंदर ।
घाट मनोहर संवाद चार ॥३॥
अर्थ - या कथेत चार संवाद आहेत. (भुशुडी - गरुड संवाद शीवपार्वती संवाद, याज्ञवल्क्य - भारद्वाज संवाद व संत आणि तुलसीदास संवाद) यात बुद्धी नेहमी रंगून जाते. ही पवित्र रामकथा हे सुंदर सरोवर आहे व हे चार संवाद हे याचे सुंदर घाट आहेत.
सातकांड जणू सात पायर्या मानससरोवरी ।
ज्ञानरूप नयन देखती मुदित मन भारी ॥
अगुण अगाध प्रभूमहिमा करिती जे वर्णन ।
ती रामसुयशजलाची असीम गहनताजाण ॥४॥
अर्थ - यातील सात प्रकरणे ही जणूकांही या मानस सरोवराच्या सात पायर्या आहेत. ज्ञानरूपी डोळ्यानी हे पाहून मन आनंदाने भरून जाते. असीम निर्गुण अशा प्रभूचा जो महिमा वर्णन केला जातो, तो श्रीरामाच्या सुयशरूपी पाण्याची अमर्याद खोली आहे असे जाणावे.
श्रीरामजानकी सुयश ते सलील सुधेंसम ।
तरंग सुंदर विलास वाटे उपमा त्या पाहून ॥
दाट पसरली जणू कमलिनी चौपाई सुंदर ।
काव्यकुशलता शिंपल्यात जणू मोती मनोहर ॥५॥
अर्थ - श्रीराम सीतेचे सुयश हे तलावातील अमृताप्रमाणे असणारे पाणी आहे. या ग्रंथातील उपमा पाहून या पाण्यावर लाटांचा सुंदर खेळ चालला आहे असे वाटते. यातील सुंदर चौपाया म्हणजे या पाण्यातील दाट पसरलेल्या सुंदर कमलिनी आहेत असे वाटते आणि या काव्यातील कुशलता म्हणजे जणू कांही शिंपल्यातील मनोहर मोती वाटतात.
सुकृतसमूह वाटे मजला सुंदर अलिमाला ।
वैराग्यज्ञान, विचार रूपी हंस करित लीला ॥
या काव्यातील ध्वनि वक्रोक्ति जाती आणि गुण ।
वाटे मज बहुविध त्यातिल मनोहारि मीन ॥६॥
अर्थ - संतकर्मांचे समूह हे जणूकांही भ्रमरांच्या सुंदर माला आहेत. ज्ञान वैराग्य आणि विचाररूपी हंस या सरोवरात खेळत आहेत. या काव्यातील ध्वनि वक्रोक्ती जाती व गुण हे जणू कांही या सरोवरातील विविध सुंदर मासे आहेत.
श्रीरामसीता स्वयंवराची बहु कथा मनोहारी ।
तीच सुंदर छबी उमटते जलात भवतारी ॥
अनेक विवेकी प्रश्न जणू या नावा जलातिल ।
विवेकपूर्ण उत्तर वाटे नाविक चतुर कुशल ॥७॥
अर्थ - श्रीरामसीतेच्या स्वयंवराची ही सुंदर कथा आहे. ती भवसागरातून तारणारी आहे. त्या कथेचे प्रातिबिंबीच जणू कांही यात उमटले आहे. अनेक विचारपूर्ण प्रश्न हे या सरोवरातील नावा आहेत. व विचारपूर्ण उत्तर हे जणू कांही चतुर कुशल नाविक आहेत.
बहुविध भक्ती निरूपण तथा क्षमा दम दया
वाटे मना लतिकामंडप विश्रामधाम सदया
मन निग्रह यम नियम या लातिकेची फुले ।
ज्ञानरूप फल हरिपदि प्रीती भक्तीरसाने खुले ॥८॥
अर्थ - विविध प्रकारानी केलेले भक्तीचे वर्णन व क्षमादया दम हे गुण हे लतिकांचे मांडव आहेत ते लोकांचे विश्रांतिस्थान आहे. मनोनिग्रह यम नियम हे गुणवर्णन या वेलींची फुले आहेत आणि श्रीरामचरणी प्रेम हे भक्तिरसाने भरलेले फळ आहे.
कथानंद जणू बगीचा वन ।
भारी मना सुखविहगगान ॥
माळी सुमन सिंचत सकला ।
सुलोचनातुनि प्रेमजला ॥९॥
अर्थ - या कथेतील आनंद हा जणू कांही येथील वन व बगीचा आहे. आणि या कथेच्या श्रवणाने जे सुख मनाला भारून टाकते, ते जणू कांही येथील सुखरूपी पक्षाचे गाणे आहे. निर्मल मन हा जणू कांही माळी आहे व तो आपल्या सुंदर नेत्रानी प्रेमरूपी जल शिंपीत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2023
TOP