बालकांड - देवतावंदन

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौ्पाया यांचा मुक्त अनुवाद.


श्रीगजानन करीतोवंदन ।
शारदेस तुलसीचे वंदन ।
अक्षर अर्थ समूह निर्माती ।
रस छंदाही करी शुभद ती ॥१॥
अर्थ - हे गजानन मी तुला वंदन करतो. हे शारदे मी तुलसीदास तुला वंदन करतो तू अक्षर अर्थसमूह, रस व छंद निर्माण करणारी व सर्वांचे कल्याण करणारी आहेस.

श्री उमा शंकरांना वंदन ।
श्रद्धा विश्वासरूप आपण ॥
निजमनि राही श्री भगवाना ।
सिद्ध न देखे तव कृपेविना ॥२॥
अर्थ - श्रीपार्वती व श्रीशंकरांना मी वंदन करतो. आपण श्रद्धा व विश्वासरूप आहात. मनात राहणार्‍या आत्मारामाला आपल्या कृपेशिवाय सिद्धजनही पाहू शकत नाहीत.

ज्ञानमय ते नित्यरूप ते ।
शंकररूपी गुरूना वंदन ॥
चंद्रवाकडा परी तव शिरी ।
करितो आश्रय म्हणून पावन ॥३॥
अर्थ - ते ज्ञानमय आहेत, नित्यरूप आहेत. अशा शंकररूपी गुरुना मी प्रणाम करतो. चंद्र जरी वाकडा असला तरी आपल्याला शिरावर आश्रय करतो, म्हणून तो पाबन झाला आहे.

उत्पत्ती स्थिति संहारिणी ।
कल्याणमयी क्लेशहारिणी ॥
करितो वंदन सीताजीला ।
श्रीराम प्रियतमा पदाला ॥४॥
अर्थ - उत्तपत्ती स्थिति व संहारकर्तो अशी ती सीता आहे. तशीच ती कल्याणमयी व क्लेशहारिणी आहे. अशी श्रीरामाची प्रियतमा श्री सीतेच्या चरणी मी वंदन करतो.

सर्वश्रेष्ठ भगवान राम ।
तव अधीन हे विश्वसकल ॥
ब्रह्मदेवता असुरगण ।
मायेने वश जन सकल ॥५॥
अर्थ - भगवान राम सर्वश्रेष्ठ आहेत. हे सर्व जग त्यांच्या अधीन आहे. ब्रम्हदेव देवदेवता व असुरगण हे सर्वजण मायावश झाले आहेत.

सीताराम गुणग्राम शुभवन ।
विहरती वाल्मीकी हनुमान ॥
विशुद्ध विज्ञानी कवीश्वर ।
कवीवराला वंदन सादर ॥६॥
अर्थ - श्री सीताराम यांचे गुणसमूहरूपी मंगलवनात श्री वाल्मीकी व हनुमान विहार करतात. त्या विशुद्ध विज्ञानसंपन्न कविश्वराना व कपीश्वराना मी आदराने नमस्कार करतो.  

वंदन गुरुपदपद्म परागा ।
सुवासिक सरस अनुरागा ॥
संजीवनीचे चूर्ण सुंदर ।
नाशी भवरोग परिवार ॥७॥
अर्थ - श्री गुरूंच्या पदकमलपरागाना मी वंदन करतो. हे रजरुपी पराग सुंदर सुगंध तसेच अनुरागरूपी रसांनी पूर्ण आहेत. ते संजीवनी मुळीचे चूर्ण आहेत. ते संपूर्ण भवरोगाच्या परिवाराचा नाश करणारे रजकण आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP