बालकांड - लंका वर्णन
श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.
सागरात जो होता पर्वत त्रिकुट तया नाम ।
त्यावर ब्रह्मा दुर्ग बनवी होता अति दुर्गम ॥
मायावी त्या मयासुराने तया सजविले पुन्हा ।
बहुत महल कनकाचे रत्न जडवि नाना ॥१॥
अर्थ - समुद्रात एक पर्वत होता. त्याचे नाव त्रिकुट होते. त्यावर ब्रह्मदेवाने अतिशय दुर्गम असा किल्ला बनवला. मायावी मयासुराने तो पुन्हा सजवला. पुष्कळ महाल सोन्यानी मढवले व त्यावर अनेक तर्हेची रत्ने बसवली.
भोगावतिपुरी पाताली अहिकुल करी निवास ।
अमरावती स्वर्लोकी जेथे सुरेंद्र करी वास ॥
त्याहूनी होता अतीव सुंदर दुर्ग विधात्याचा ।
अति प्रसिद्ध अवनीवर होता लंका नावाचा ॥२॥
अर्थ - पाताळात भोगवती नगरीत अहिकुलातले लोक रहात होते. स्वर्गामधे अमरावती नगरीत इंद्र रहात होता. या सर्वाहून ब्रम्हदेवाचा किल्ला अधिक सुंदर होता. या पृथ्वीवर तो लंका या नावाने अतिशय प्रसिद्ध होता.
खाई खोल ती चारी दिशाना ।
वेढे सागर सकल बाजुना ॥
रत्नजडित तो सुवर्णकोट ।
अवर्णनीय कुसर अलोट ॥३॥
अर्थ - त्याचा चारी दिशाना खोल खंदक होते व सर्व बाजू सागराने वेढलेल्या होत्या. असा तो सोन्याचा कोट रत्नाने जडवलेला होता व त्यात खूप अवर्णनीय कलाकुसर केलेली होती.
मोठे मोठे वीर असुर होते तिथे रहात ।
देवगणानी ठार मारिले सकला समरात ॥
प्रेरित केले देवेंद्राने सुरजना रहण्यास ।
बनला रक्षक कुबेर तेव्हा कोटी यक्षजनास ॥४॥
अर्थ - मोठे मोठे शूर राक्षस तिथे रहात होते. त्या सर्वांना देवांनी लढाईत ठार मारले. तेव्हा इंद्राने देवांना तिथे राहण्यासाठी प्रवृत्त केले व कोट्यावधी यक्षलोकांचा कुबेर रक्षक बनला.
खबर मिळाली दशाननाला तशी कुणाकडुन ।
सज्ज करुनि सैन्य आपुले घेई गड वेढून ॥
देखूनिया बहु शूर वीर ते सवे बहुत सैन्य ।
प्राणभयाने यक्षजन ते जाती दूर पळून ॥५॥
अर्थ - ही सर्व बातमी रावणाला कुणाकडुन तरी मिळाली. त्याने आपले सैन्य सज्ज केले व गडास वेढा घातला. ते पुष्कळ शूरवीर व त्यांचे मोठे सैन्य पाहून जिवाच्या भीतीने ते यक्षलोक दूर पळून गेले.
फिरून पाही सारी नगरी तेव्हां दशानन ।
चिंता सरली जागेची तव होई प्रसन्न मन ॥
सहज सुंदर नगरी होती शत्रूला दुर्गम ।
जाणूनी हे करी दशानन राजधानी अनुपम ॥६॥
अर्थ - त्यावेळी रावणाने सर्व नगरी फिरून पहिली. त्याची जागेची चिंता नाहीशी झाल्यामुळे प्रसन्न मनाने त्याने सर्व नगरी पहिली. सहजसुंदर अशी ती नगरी शत्रूलाही दुर्गम होती. हे जाणून रावणाने तिला आपली सुंदर राजधानी बनविली.
ज्याला जेजे उचित सदन नृप देई असुरा ।
करी खुश त्या समयी रावण सकल निशाचरा ॥
करी चढाई कुबेरावरी त्यावेळी दशानन ।
विमान पुष्पक त्यांच्याकडूनी घेई जिंकून ॥७॥
अर्थ - ज्याला जे जे योग्य सदन होते त्याला ते रावण देत होता. त्यावेळी सर्व राक्षसांना त्याने खुष केले त्यावेळी रावणाने कुबेरावर हल्ला केला व त्याच्याकडून पुष्पक नावाचे विमान जिंकून घेतले.
सुख संपत्ती मिळे तयाला सेवक सेना सूत ।
जय, प्रताप, बल, बुद्धि श्रेष्ठता लाभे जगतात ॥
लाभे सकल नवे जसे तव मोह वाढे अंतरी ।
लाभ होता कांही नराला लोभ मनी वाढे परी ॥८॥
अर्थ - रावणाला त्यावेळी सुखसंपत्ती सेवक, सेना व सुतही मिळाले. जगात त्याला विजय, प्रताप बल, बुद्धी व श्रेष्ठत्वही मिळाले. त्याला बर्याच गोष्टी नवीन मिळाल्या. त्यामुळे त्याचा लोभ वाढतच गेला. मनुष्याला थोडा जरी लाभ झाला तरी त्याचा लोभ वाढतच जातो.
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2023
TOP