बालकांड - पुत्रकाम यज्ञ
श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.
वनचर देह धरीत भूवरी त्याकाली ते सुर ।
बल पराक्रम त्यांचे ठायी विलसे अनिवार ॥
गिरि तरूनख आयुध त्यांचे शूरवीर असती ।
वाट पाहती देव हरीची कपिरूप धीरमती ॥१॥
अर्थ - त्यावेळी ते सुऱजन पृथ्वीवर वनात राहणार्या पशूंचा देह धारण करीत होते. शक्ती व पराक्रम त्यांच्याजवळ अतिशय दिसून येई. पर्वत वृक्ष व नखे ही त्यांची आयुधे होती. ते शूरवीर होते. ते वानरांचे रूप धारण केलेले धीरबुद्धीचे देव भगवंताची वाट पहात होते.
अवधपुरी राजा दशरथ रघुकुल शिरोमणी ।
विदित होते वेदानाही नाम तव जनमनी ॥
धर्मधुरंधर राजा ज्ञानी तो सकल गुणनिधी ।
भजत मनी तो शारंगपाणी त्यात रमत बुद्धी ॥२॥
अर्थ - अयोध्या नगरीत रघुकुलातील श्रेष्ठ राजा दशरथ राज्य करीत होता. वेदही त्याचे नाम जाणत होते. जनातही तो प्रसिद्ध होता. दशरथराजा हा धर्माचे रक्षण करणारा, ज्ञानी व सर्वगुणांचा ठेवा होता. तो नेहमी मनात शारंगपाणीचे संकीर्तन करीत असे. त्यातच त्याची बुद्धी रमलेली होती.
कौसल्या आदि प्रिय तव कांता ।
आचारणी त्या बहुत पुनिता ॥
पतिसहमत विनीत अती ।
हरीपद कमली दृढ प्रिती ॥३॥
अर्थ - कौसल्या व त्याच्या इतर स्त्रिया या आचरणाने अतिशय पवित्र होत्या. त्या अतिशय नम्र व पतीच्या मताप्रमाणे वागणार्या होत्या. परमेश्वराच्या पदकमली त्यांचे दृढ प्रेम होते.
असा एकदा होई नृपती दु:खी अती मनात ।
विचार येई त्याच्या हृदयी नाही मजला सुत ॥
त्वरीत जाई महीपती तो अपुल्या गुरुसदनी ।
अति विनयाने करी वंदना राजा गुरुचरणी ॥४॥
अर्थ - असाच एकदा राजा दशरथ अतिशय दु:खी झाला होता. त्याच्या मनात असा विचार आला की आपल्याला मुलगा नाही. म्हणून तो लगेच गुरूंच्या घरी गेला व अती विनयाने त्याने गुरुजीना नमस्कार केला.
दु:ख मनीचे सारे वदला नृपती गुरुजीना ।
समजावी वाशिष्ठमुनी नानाविधी तव मना ॥
धीर धरी चार पुत्र तुज होतिल रे नृपती ।
बहु प्रासिद्ध त्रिलोकी हरतिल भक्तांची भीती ॥५॥
अर्थ - आपल्या मनातील सर्व दु:ख राजाने गुरुजीना सांगितले. अनेक प्रकारानी वाशिष्ठ मुनिनी त्यांची समजूत घातली. ते म्हणाले, हे राजा तू धीर धर. तुला चार पुत्र होतील. ते त्रैलोक्यात अतिशय प्रसिद्ध होतील. भक्तांच्या मनातील भीती नष्ट करतील.
वशिष्ठ वदती शृंगिऋषींना त्या मंगल समया ।
पुत्रकाम शुभयज्ञ करविती त्यांच्यासह राया ॥
बहु देती आहुती भक्तिमनाने अग्निदेवामुनी ।
हविषान्न घेउनी करी प्रकटले प्रभू अग्नी ॥६॥
अर्थ - त्या मंगलवेळी वाशिष्ठ ऋषींनी शृंगिऋषींना बोलावले व त्यांचासह राजाने पुत्रकाम नावाचा मंगलयज्ञ केला. मुनींनी अतिशय मनोभावे अग्निदेवाला आहुति दिल्या. त्यावेळी हातात प्रसाद घेऊन अग्निदेव तेथे प्रकट झाले.
नृपा दशरथा, मुनि वशिष्ठ विचारीत मजला ।
सिद्ध जाहले सकल काम तव अग्निदेव वदला ॥
घेऊन पायास जाई सदनी या मंगल समया ।
देई वाटुनी यथायोग्य ते भाग करुनि राया ॥७॥
अर्थ - अग्निदेव म्हणाले, 'हे राजा वाशिष्ट मुनि मला विचारीत आहेत म्हणून सांगतो. तुझे सर्व मनोरथ सफल झाले आहेत. या मंगलमयी हा प्रसाद घेऊन तू तुझ्या सदनी जाऊन योग्य तो भाग करून तुझ्या स्त्रियांना वाटून दे.
पावक होती मग अंतर्धान ।
सकल सभेला समजाऊन ॥
परमानंदी मग्न भूपती ।
हर्ष न मावे त्यांच्या चित्ती ॥८॥
अर्थ - नंतर अग्निदेव सर्व लोकांना समजावून अदृश्य झाले. त्यावेळी राजा अतिशय आनंदात मग्न झाला. त्याच्या मनात आनंद मावेनासा झाला.
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2023
TOP