श्रीनाथलीलामृत - अध्याय २३ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीमत् आदिनाथ जगन्मंथला । जगद्गुरु पयःफेनधवला । जगदोध्दारा जाश्वनीळा । जगजीवना जगदात्मया ॥१॥
तूं परब्रह्म परात्परा । प्रणवरुपा परमेश्वरा । परंज्योति त्रितापहरा । पुराणपुरुषा विश्वाद्या ॥२॥
तूंचि चिन्यम चैतन्यघना । चिदाकार चिद्रूप निर्गुणा । चराचरचरिता चरितविहीना । अचळ अढळ निरुपम तूं ॥३॥
सिंहावलोकनावलोकन । गोरक्ष कानीफसंवादवचन । अन्योन्यवचनें ज्ञानसंपन्न । तें निरुपण निरोपिलें ॥४॥
गुरुदर्शनाची धरोनि आर्त । गोरक्ष पातले दक्षिणपंथ । तेचि मार्गी अकस्मात । चर्पटीनाथ भेटले ॥५॥
आदेश म्हणोनि करी नमन । गोरक्ष देती प्रतिवचन । आदिपुरुषीं आदेश म्हणून । क्षेमालिंगन देतसे ॥६॥
क्षेम कल्याण कुशळ । गोरक्ष पुसती तये वेळ । नाथकृपें करोनि अढळ । चिरकाळ निमग्न चित्सुखें ॥७॥
कोठोनि येणे कोठोनि गमन । चर्पटि विनवी कर जोडून । मत्स्येंद्रयोगें उत्कंठ मन । मल्लाळदेशीं जातसों ॥८॥
नमन करोनि उठाउठीं । गमन करीतसे चर्पटी । इकडे गोरक्ष समुद्र निकटी । येतें झाले स्वइच्छे ॥९॥
लंकेस जातां रघुवीर । लिंग स्थापिलें रामेश्वर । भोळानाथ भवानीवर । जो स्मरहर त्रिपुरारी ॥१०॥
गोरक्षें वंदिले चरणारविंद । अलक्ष आदेश वदून शब्द । जो आदिनाथ सच्चिदानंद । प्रत्यक्ष प्रगट पैं झाले ॥११॥
सप्रेमप्रेमें आलिंगिलें । गोरक्षआनन कुरवाळिलें । क्षेमकल्याण त्या पुसिलें । ह्र्दयीं धरिलें आवडीं ॥१२॥
वत्सा स्नेहाळ भला भला । नाथसांप्रदाय दर्शन केला । असंख्य बोधिले भूपाळां । दीक्षा देऊनि आपुली ॥१३॥
जे राजमदें मदोन्मत्त । ऐसें उपदेशिले त्वां नृपनाथ । त्यांचा चुकवून जन्ममृत्यु । योगमार्ग लाविलें ॥१४॥
गोरक्ष ठेविती मस्तक चरणीं । तोषोनि वर देत पिनाकपाणि । अखंड राहे सोऽहंस्मरणीं । योगतरणि तूं एक ॥१५॥
आज्ञा वंदोन निघे शीघ्र । तंव सेतुबंधी वायुपुत्र । तयाचा परिसोन भुभुःकार । जाय सत्वर पैं तेथें ॥१६॥
घालुनियां पद्मासन । मारुति करी रामस्मरण । गोरक्ष तया अवलोकून । काय वचन बोलत ॥१७॥
गोरक्ष म्हणे वातात्मजा । रामस्मरणी निश्चय तुझा । परि तूंचि राम की राम दुजा । मज निवेदी कपींद्रा ॥१८॥
तंव तो वदे अंजनीनंदन । पूर्ण प्रतापी रघुनंदन । राक्षसाचें करोनि कंदन । रावण बाणें मारिला ॥१९॥
तो महाराज दाशरथी राम । श्यामसुंदर मेघश्याम । त्याचे पदीं निःसीम नेम । तो श्रीराम भजतों मी ॥२०॥
तो श्रीराम घनसावळा । किरीटकुंडलें कटी मेखळा । कांसे कसिला पट पिवळा । डोळस सकुमार साजिरा ॥२१॥
धीर वीर अचळ ठाण । विलसे करी धनुष्यबाण । सरळ नासिक नेत्राकर्ण । सुहास्य वदन जयाचें ॥२२॥
वामांकी जानकीं पवित्र । सेवे तिष्ठती भरत सौमित्र । शत्रुघ्न धरी सुवर्णछत्र । तो राजीवनेत्र श्रीराम ॥२३॥
जेणें निवटिले खरदुषण । तो रघुवीर रविकुळभूषण । नामें तारिलें जड पाषाण । सेतुबंधीं अद्यापि ॥२४॥
बंधमुक्त केलें विबुध । प्रतापमार्तंड तो अगाध । तोचि रघुवीर स्वतःसिध्द । वेदवंद्य श्रीराम ॥२५॥
जो महाराज अयोध्याधीश । ध्याती अहर्निशीं त्रिदश । तेची माझे परम उपास्य । निर्दोष यश जयाचें ॥२६॥
जो परब्रह्म अवतार । लीलाविग्रही जानकीवर । तया स्मारणीं अहोरात्र । सदा सादर गोरक्षा ।\२७॥
यावरी वदे प्रत्युत्तर । परिसे मारुति सविस्तर । जें परब्रह्म निरंतर । नसे आपपर तयातें ॥२८॥
एकमेव द्वितीयं नास्ति । ऐसी वदे वेदश्रुति । तया म्हणती सीतापति । हेचि आश्चर्य वाटतें ॥२९॥
जें अव्यक्त वर्णरहित । जें ढवळें सावळें रंगरहित । जें नामरुपा होय अतीत । नामरुप मग कैचें ॥३०॥
मुळी रुपचि जया नसे । तेथें नाम असेल तें कैसें । अरुपातें रुप नसे । तरी नाम असे कैसें तें सांग पां ॥३१॥
जें निर्द्वद्व निर्गुण । तरी तो कैसा मारिला रावण । उदकी तारिले पाषाण । तरी जळावरी पृथ्वी कीं ॥३२॥
म्हणसी राम कीम परब्रह्म । तरी जानकीवियोगें जें वनीं भ्रमें । वृक्षगुल्मांस देत क्षेम । न कळे वर्म कैसे तें
तूं नामरुपातें विसरून । कैसें करिसी नामस्मरण । परात्पर जें निर्गुण । ते वर्णव्यक्ती न येचि ॥३४॥
पुन्हा वदे वायुतनय । एक तत्त्वमस्यादि निश्चय । अहं ब्रह्मास्मि स्फुरण होय । तेंचि पाहे चिच्छक्ती ॥३५॥
परब्रह्म तो रघुनंदन । इच्छ्दाशक्ति ते जानकी जाण । उभयापासाव झालें त्रिगुण । पंचतत्वी ब्रह्मांड ॥३६॥
पंचवीस छत्तिसांचा उभारा । कारण होय चराचरा । राम आडंबर पसारा । एक रघुवीरापासोनि ॥३७॥
अनंत ब्रह्मांडांच्या श्रेणी । सत्तारुपें वोविल्या गुणी । तोचि राघव चापपाणि । वेद्पुराणी आतर्क्य ॥३८॥
मागुती वदे मत्स्येंद्रसुत । पिंडब्रह्मांड हें स्वप्नवत । स्वस्वरुपी राहें निवांत । स्वयें रघुनाथ होऊनी ॥३९॥
अभेदभक्तियोगेंकरुन । स्वयेंचि राम होई आपण । विसरोनियां मीतूंपण । सोऽहं शब्दी असावें ॥४०॥
सोऽहंराम हें निजगुज । हें गुजाचेंही निजबीज । स्वानंदसुखाचें सुखभोज । सदा राहे कपिवरा ॥४१॥
वसिष्ठें कथिला योगवासिष्ठ । योगगर्भ कथिला उत्कृष्ट । रघुवीरा निवेदिला तो तूं स्पष्ट । स्वयें जाणसी मारुति ॥४२॥
जाणून नेणता कैसा होसी । विचार करी निजमानसी । स्वयें श्रीराम तूंचि होसी । वृथा झकविसी मजप्रति ॥४३॥
मीनविहंगपिपीलिका । कपिमार्ग तुझा कपिनायका । त्या तूं भोगिसी आत्मसुखा । मजसी शंका कां धरिसी ॥४४॥
ऐकोनि गोरक्षमुखींचा बोल । परम संतोषला अंजनीचा बाळ । येती स्वानंदसुखाचे डोल । आंदोलवी पैं मस्तक ॥४५॥
सवेंचि वदे हनुमान । मी आत्मत्वातें विसरून । व्यर्थ नाडलो देहाभिमान । मीतूंपण द्वैताचें ॥४६॥
अनेक जन्मीचें सुकृतातीं । तैंचि भेटे श्रीगुरुमूर्ति । तेणें प्राप्त आत्मस्थिति । निश्चयेसी जाणिजे ॥४७॥
नामाचे गुरु असती बहुत । परि त्या दुरोनि करावा प्रणिपात । रुपातें मदनुग्रह व्यर्थ । ऐक रघुवीरनाथ पै माझा ॥४८॥
ते श्रीराघवचरनारविंद । तेंचि समाधिसुखस्वानंद्द । तेथें मनोन्मन अभेद । भेदानुवाद नसे पैं ॥४९॥
तो सद्गुरु रविकुळभूषण । तेणे निवेदिलें अध्यात्मज्ञान । तूंचि आम्हां मुख्य जाण । दुजेपण असेना ॥५०॥
कैचें नाम कैचें रुप । अवघें संचलें चिद्रूप । नामरुपाचा साक्षेप । व्यर्थ कासया वाहासी तूं ॥५१॥
सावध होऊनि पाहें चित्तीं । आत्मा तूंचि गा निश्चितीं । महावाक्यबोधाची प्रचीति । तदात्मवृत्ति असों दे ॥५२॥
महावाक्य सकळांसी आश्रय । श्रुति म्हणे आत्मा तूंचि स्वयें । त्याच वचनीं धरोनि निश्चय । ब्रह्मादि कीटक व्याप्त ॥५३॥
तोंचि तूं असि पदीं लीन । हें तत्त्वमस्यादि वचन । बुध्दि बोधूनि सीतारमण । निजपदीं आपुल्या ॥५४॥
कर्म जें न पवे प्रजेतें वर्धन । त्याग पावे महावाक्य खूण । वर्मा नेणूनि करिती साधन । वृथा शीण तयांतें ॥५५॥
जैं सद्गुरुकृपेची सघनवृष्टि । तैंचि लाभ गा उठाउठीं । मग सबाह्य आत्मदृष्टि । भास सर्वही मावळे ॥५६॥
जगदाभास तो तूंचि जाण । याचा साक्षी दुजा कोण । दुजा कोण तुजवीण । सद्गुरुवचन हेंचि पैं ॥५७॥
मृण्मयाची कुंभघागरी । तेवीं विभाग भाविती नरनारी । जेवीं मृत्तिका कारण खरी । उपादान बहुविध ॥५८॥
वस्तुतां पाहतां एक कनक । अळंकारीं भासे अनेक । तेवीं जगदाकार मायिक । विस्तारलें ज्यापरी ॥५९॥
सुवर्णाचा म्हाळसारमण । आणि सुवर्णाचेंचि केलें श्वान । परि सुवर्णी नसे भिन्नपण । तेवीं अभिन्न जगदात्मा ॥६०॥
बाळा बागुलभयाची भीती । मुळीच नसे तरी कायसी खंती । कृषीवळ बुजणें उभविती । तया बुजती वनचर ॥६१॥
कीं रज्जूवरी भासे व्याळ । शुक्तिके दिसे रजत बहळ । मृषा मृगें मृगजळ । अईनभ्रांतीं भ्रमताती ॥६२॥
गुंजांचा वैश्वानर । मानून बैसती वानर । तेवीं विषयसौख्य मानूनि नर । वृथा पामर भुलती ॥६३॥
स्वप्नीं देखती सिंहव्याघ्र । गज राक्षस सर्प भयंकर । पोठीं लागती एकसर । हातां जागृति निष्टंक नृप स्वयें ॥६५॥
तैसा तूंचि आत्मा स्वयमेव । परि मी जीव भाविसीं स्वयें । तूंचि व्याप्त अंतर्बाह्य । व्यर्थ भ्रमें नाडसी ॥६६॥
जिव्हा मुखीं असे कीं नसे । ऐसें बोलतां येतसे हसें । जिव्हेवीण बोलसी कैसें । मूर्खता येत बोलतां ॥६७॥
तूं आपुलें सत्तें देखासी । आपुले सत्तें ऐकसी । आपुले सत्तें विचरसी । परि तूं नेणती आपणां ॥६८॥
तूं स्वशरीरातें व्याप्त होसी । रोमरोमांतेंही जाणसी । परि मी कोण हें न जाणसी । विसरलासी पैं कैसा ॥६९॥
त्रिविधतापें जे पोळले । कामक्रोधें आहळले । ते विषयसुखास गुंडाळले । तेच नाडले परमार्था ॥७०॥
कांहीं न केलें साधन । दुराशेनें इच्छित धन । पुत्र कलत्र प्रपंच सदन । गुंतोनि व्यर्थ राहिले ॥७१॥
जेवीं भ्रमलेपणें बुध्दि । विसरोनियां स्वात्मशुध्दि । मीचि नव्हे म्हणे त्रिशुध्दि । भ्रमोपाधिकारोनि ॥७२॥
कीं शुकाचेनि अंगबळें । नळिकायंत्रीं अधोमौळ । होऊनि होतसे व्याकुळ । भ्रमें केवळ पावत ॥७३॥
अट्टाहासें शब्द करी । परि उडावें हें न ये अंतरीं । मी बांधलों निर्धारीं । म्हणोनि अव्हेरी धैर्यातें ॥७४॥
त्या देहलोभाचे पदीं शृंखळा । मी दृढ बांधलों नसें मोकळा । संशयाचा खोडा पडिला । तेणें नाडले बहुतचि ॥७५॥
तैसा हा मुक्तचि असे । परि व्यर्थ बध्द मानीतसे । अज्ञानाचें भरिलें पिसें । तेणें नाश सर्वस्वा ॥७६॥
जैं सद्गुरुकृपेचा वरदहस्त । तैचिं ब्रह्मीचें साम्राज्य समस्त । पावून स्वानंद भोगीत । द्वैतवार्ता असेना ॥७७॥
कार्याची स्थिति कारणीं । जेवी गारा भासती जीवनी । सवेंचि लीन तये क्षणी । भास जाय विसरोनियां ॥७८॥
जेवीं काश्मीराचे निकेतनीं । उदय उदेलें असंख्य तरणि । तेवीं आत्मप्रभेची उघडली खाणी । सद्गुरु नयनी चोजवी ॥७९॥
अंतर्बाह्य भरोनि पूर्ण । मग उरे साक्षित्वेंकरुन । सदा स्वानंदी निमग्न । वृत्ति निवृत्तीं होऊनी ॥८०॥
अनेक नद्यांचे प्रवाह । सिंधुमिळणीं सिंधूचि होय । तैसा प्रत्यक सबाह्य । निजात्मवृत्तीं वर्तत ।\८१॥
नसे कर्ताकार्यकारण । पृथ्वी चरतां निस्त्रैगुण्य । मग विधिनिषेधाचें कारण । सर्वथा जाण असेना ॥८२॥
मग उर्वतीत देहप्रारब्ध । जेवी पटघडी वस्त्र दग्ध । तो जीवन्मुक्त स्वतःसिध्द । निंद्यवंद्या नातळें ॥८३॥
एक स्वजारविहार कामिनी । सुरतश्लेष्मा प्रिय मानी । उभयचेतकचेष्टक एकपणीं । अन्योन्यसुखें एक पैं ॥८४॥
तो साक्षित्व त्रिगुणासी जाणत । तोचि द्रष्टा अवस्था त्रयातीत । तों चातुर्याचा देखून प्रांत । त्या प्रिय प्रत्यय उन्मनीं ॥८५॥
तत्त्वाचें तत्त्व तेंचि कारण । त्या महत्तत्त्वाश्रयेंकरुन । कां तूं ते न जाणसी खूण । असोनियां तोचि तूं ॥८६॥
अविद्येची निशा पडली । तरीच चक्रवाकें विघडलीं । ज्ञानोदयकपाटें उघडलीं । तेणें जोडले सत्सुखा ॥८७॥
जेवीं अग्निस्फुल्लिंगेंद्करुन । दग्ध होय तमतृण । कीं सिध्दोदकीं बिंदुपतन । द्वैतपण मग कोठें ॥८८॥
पृथ्वीसी प्रमाण सूर्यकिरण । कीं आकाश घठमठीं व्याप्त पूर्ण । कीं तंतुपटाची जाणे खूण । तेवीं रघुनंदन मी स्वयें ॥८९॥
तरी आजि उदेला धन्य दिवस । मज भेटला नाथपुरुष । स्वानंदसुखाचा उत्कर्ष । तुझेनि झालों गोरक्षा ॥९०॥
तूं नाथपंथाचा कुलावंतस । तूं स्वस्वरुपीं सदा समस्त । त्यागूनियां आशापाश । गोइंद्रियां संरक्षिलें ॥९१॥
यावरी गोरक्ष वदती शब्द । कासया बोलसी हा उपरोध । ऐक्यमिळणीं हा अनुवाद । मग सहज खुंटला ॥९२॥
जीवीं जीवाचे ऐक्यसंधी । तेचि आत्मत्वीं दृढसमाधि । जेवी शर्करा समरस दुग्धीं । अभिनव गोडी पैं जैसी ॥९३॥
तेवीं गोरक्ष आणि मारुति । उभयसंगमी विशेश प्रीति । कीं गंगायमुनासरस्वती । तीर्थराज प्रयाग हा ॥९४॥
मग म्हणे लंकादहन । गोरक्षा असावें अनुदिन । सात्समागम इच्छित मन । तुजवीण आन असेना ॥९५॥
लवनिमिष किंवा पळ । सत्संगतीनें जातां वेळ । सत्समागमाचें अगाध फळ । किती म्हणोनि सांगावें ॥९६॥
मज नामरुपीं जडली प्रीति । आंगी बाणली आत्मस्थिति । स्वदेही ओळखिला रघुपति । मीतूंभ्रांति उडालि ॥९७॥
होतां स्वात्मानुभवीं अनुमान । तो प्रत्यक्‍ प्रगटे परिच्छिन्न । रघुवीरकृपें सम्यकज्ञान । सोऽहंरामीं वोळखी ॥९८॥
जेवी कीटकभृंगीन्यायें । अभ्यासे तेही होती स्वयें । तेवी झालें मज पाहें । स्वात्मसुख जोडलें ॥९९॥
मग म्हणे मत्स्येंद्रसुत । तूं होसी सर्वज्ञ समर्थ । तुझेनि दर्शनें मनोरथ । पूर्ण झाले हरिवरा ॥१००॥
महान तत्त्ववेत्ता तूं मारुति । कृष्णमुखींची गीता उक्ति । श्रवण केली यथानिगुती । तूं ब्रह्मनिष्ठ ब्रह्मांडीं ॥१॥
तरी येच विषयीं इतिहास । श्रोतीं परिसावा सारांश । युध्द झालें अष्टादश । दिवसपर्यंत भारती ॥२॥
विजयध्वजीं विजयध्वज । विजयसाह्यार्थ वातात्मज । तंव धनंजयातें गीतागुज । गरुडध्वज स्वयें बोधी ॥३॥
हरिवर ध्वजकीं करी श्रुत । तेथें तो स्वयें श्रवण करीत । एवं कृष्णार्जुन हनुमंत । जाणसी गुह्यार्थ गीतेचा ॥४॥
असो युध्दाची होऊन समाप्ति । मारुति गेला स्वस्थळा प्रति । नमस्कारोनि अंजनी सती । बध्दहस्तीं तिष्ठत ॥५॥
जननी वदे लंकादहना । तूं क्षेमकल्याण कीं नंदना । कोठें गेलासी कवण कारणा । कळवी मज साद्यंत ॥६॥
म्हणे कुरुक्षेत्रीं कौरवभार । आणि समुच्चयीं पंडुपुत्र । मज साह्यार्थ साचार । सुभद्रावर नेतसे ॥७॥
पुन्हा वदे अंजनी जननी । युध्द कैसें झालें समरांगणीं । रामरावण लंकेलागुनी । कीं देवदानव देवीचें ॥८॥
तदोत्तर वदे हनुमान । मी सर्वथा कांहीच नेणें । मी गीतार्थ केला श्रवण । समाधिस्थ पैं होतों ॥९॥
माता म्हणे रे त्रिशुध्दि । साह्यार्थ गेलास जयाचे युध्दीं । युध्दीं केवीं लागे समाधि । हें आश्चर्य मज वाटतें ॥११०॥
मारुति म्हणे तें निजगुह्य । तुज निवेदितों आज पाहे । युध्दी श्रीकृष्णधनंजय । गीतासंवाद पैं केला ॥११॥
मी आणि अर्जुनचक्रपाणि । चवथा रथीं नसे कोणी । त्या ब्रह्मरसाची सिराणी । अवचट सुख दुर्लभ ॥१२॥
जें देवकीवसुदेवातें चोरिलें । जें नंदयशोदेसीही झकविलें । जें बळिभद्रातें चुकविलें । तें साधलें अर्जुना ॥१३॥
शेष इंदिरा संनिधनिकटीं । परि त्यासीही न वदे गुह्यगोष्टी । तो धन्य धन्य धनंजय किरीटीं । स्वात्मसुखा लाधला ॥१४॥
ऐकोन माता देत उत्तर । तरी पुत्रा केवीं जगदोध्दार । पुढें केली हा दुर्धर । त्यांत तरणोपाय कोणता ॥१५॥
यावरी बोले प्लवंगोत्तम । परिसीं जननी भविष्यनेम । अंशावतारी होती परम । हरिहर स्वयें अवतरती ॥१६॥

भविष्यति स एवाग्रे शैवः शंकरविग्रहः । ततो हरेरंशभूतो ज्ञानदेवो महायशाः ॥१॥
आचार्याधिकतामेतत्‍ गीर्वाण्या न वदेत्स्वयम् । वेदज्ञः सर्वशास्त्रज्ञः सर्वज्ञोऽपि महायशाः ॥२॥


पुढें होतील अवतार । स्वधर्मस्थापक विग्रहशंकर । ते टीका करिती गीतेवर । परमगूढ गीर्वाण ॥१७॥
म्हणोन जगदोध्दारास्तव । विष्णु होईल ज्ञानदेव । गीर्वाण न वदे स्वयमेव । जो वेद वदवी पशुहातीं ॥१८॥
गीतेवरी करिती टीका । ते ज्ञानदेवी लौकीकीं आख्या । छप्पन्न भाषेची सुवेलिका । पत्रीं पुष्पीं सफळित ॥१९॥
ते मुमुक्षुपक्षाची फळदायिनी । जे मोक्षपदाची आदिजननी । जे सकळ श्रेयाची स्वामिणी । जे कामदुधा आर्ताची ॥१२०॥
जे सकामाची कामेश्वरी । जे योगसिध्दीची योगेश्वरी । जे जगज्ज्ञानेश्वरी । जे ईश्वरी चित्कळा ॥२१॥
इतर टीका गीतेवरी । परि ते ज्ञानेश्वरीची नेणवे सरी । कीं श्वापदांमाजीं केसरी । बरोबरी न पावती ॥२२॥
गीताश्लोक किंवा पद । व्यासोक्त गीतामाहात्म्य अगाध । महिमा वर्णिला विविध । जो परमवंद्य त्रिभुवनीं ॥२३॥
गंगा गीता म्हणती समान । परि वेगळें महिमान । तरी प्रत्यक्ष कासया प्रमाण । पदमुख ऐक्य केवीं ॥२४॥
मुखापासाव झाली गीता । पादापासाव गंगा पाहतां । या उभयांसी साम्यता । केवीं येईल सांग पां ॥२५॥
एवं गीता सर्वाम्त श्रेष्ठ । भावभावार्थ करितां पाठ । अंती प्राप्त त्या वैकुंठ । स्वयें विष्णु होय तो ॥२६॥
आदिनाथलीलाग्रंथी । जो विजयरथीं स्थिरसारथी । तोचि बैसोनि हे मनोरथीं । ग्रंथार्थी साह्य पैं ॥२७॥
आदिनाथलीला सुरस सबाह्य । नवरससुखाचें सुखालय । प्राप्त जनां सुगमोपाय । श्रवनाभिप्राय तोषवी ॥२८॥
तेविसावा अध्याय उपेंद्र । भद्रकारक सदा सुभद्र । अघसंहारप्रतापरुद्र । की वीरभद्र पैं दुजा ॥२९॥
आदिनाथलीलाग्रंथ अद्वय । भैरव सद्गुरुचा वरदविजय । तत्पदीं ठेवूनि निश्चय । आदिनाथ वंदितसों ॥१३०॥
श्रीमत्‍ आदिनाथलीलाग्रंथ । श्रवणें पुरती मनोरथ । तेविसाव्यांत परम परमार्थ । प्राप्त होय सर्वदा ॥१३१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP