श्रीनाथलीलामृत - अध्याय १४ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय आदिनाथ गुणातीता । निरालंबा उमाकांता । स्मशानवासिया अव्यक्ता । तुझी सत्ता अगम्य ॥१॥
पुराणपुरुषा दिगंबरा । सच्चिदानंदा कर्पूरगौरा । अर्धनारीनटेश्वरा । तुझी लीला अगम्य ॥२॥
सप्तपाताळीं पदांगुष्ठ । एकवीस स्वर्गी तुझा मुगुट । आब्रह्मस्तंभ विराट । स्वरुप तुझें संपूर्ण ॥३॥
चंद्रमा तुझें मन । चक्षू सूर्यनारायण । बुध्दि तुझी चतुरानन । अंतःकरण श्रीविष्णु ॥४॥
मुखीं वसे अग्निस्थान । पंचप्राणीं वसे पवन । क्रोध जयाचा उमारमण । दिशा श्रवण पैं तुझ्या ॥५॥
जिव्हा जयाची होय वरुण । कृतांत तो दाढा दर्शन । पाणी जयाचे शचीरमण । समुद्रसरिता नाडी पैं ॥६॥
पर्वतशिखरें होय अस्थि । मांस तें गा मही निश्चिती । रोमावळी त्या वनस्पति । ते विराटमूर्ती वंदिली ॥७॥
जयाचे इच्छाशक्तीपासून । उभारिलें हें त्रिभुवन । अनंत ब्रह्मांडें एकावळीनें । रुंडमाळा गळां पैं ॥८॥
तुझे सत्तेचा विस्तार । प्रगटविसी चराचर । अनेक धरुनि अंशावतार । पृथ्वीतें संरक्षिसी पैं ॥९॥
ऐका श्रोते सावधान । पुण्यश्लोकाचें महदाख्यान । इतिहासरुपें परमपावन । श्रवणमनन करावें ॥१०॥
एके दिवसीं स्वर्गभुवनीं । सिंहासनीं पाकशासनी । रंभादि तिलोत्तमा नृत्यगायनी । रंजविती शक्रातें ॥११॥
सभे बैसले सुधापानीं । ऋषिमहर्षि उभयश्रेणी । गणगधर्व बध्दपाणि । सेवे तिष्ठती यक्षादि ॥१२॥
तंव एक वोढवे अद्भुत । तेथें काय वर्तलें अकस्मात । तो वीर्यगंधर्व इंद्रसुत । मिश्रकेतें खुणावी ॥१३॥
तो नेत्रसंकेत निरखून नयनीं । परम क्षोमला सहस्त्रनयनी । सक्रोध होऊन अधर दशनीं । रोविता झाला सकोपें ॥१४॥
म्हणे गंधर्व असोन तूं गर्दभ । अपराधशिक्षा हो रासभ । कृतापराधाचा हाचि लाभ । खरयोनींत जन्मसी ॥१५॥
परम भयभीत होऊन पोटीं । पुरंदरचरणीं घाली मिठी । कळवळोनि कृपादृष्टीं । अवलोकिता जाहला ॥१६॥
कृपें द्रवला वज्रपाणि । उःशाप दे वरदवाणी । द्वादश वर्षे स्वर्गस्थानीं । स्वस्थानाते पवसी ॥१७॥
जेवीं यंत्रमुखी गोळा उसळे । नभीं नक्षत्र जेवीं कोसळे । कर्मभूमीत येऊन मिसळे । सहस्त्र चपळेसारिखा ॥१८॥
जंबुद्विपीं जंबुनगरीं । कुलालशाळें ते अवसरीं । रासभादी सहस्त्रवरी । तेथें येऊन थोकला ॥१९॥
पाहा प्राक्तन परम गहन । गंधर्वासी झालें स्वर्गपतन । स्वर्गसुखा च्युत होऊन । खरयोनी पावला ॥२०॥
असो तये नगरींचा भूभुज । चक्ररथ नामें तेजःपुंज । तयासी एकचि झाली आत्मजा । सुशीळा नाम तियेचें ॥२१॥
परमसौंदर्य विलोलनयनीं । हरिमध्या गजगामिनी । जीतें देखोनि मीनकेतनी । तन्मय होऊनि नृत्य करी ॥२२॥
मासपक्ष होतां कांही । गंधर्व असे कुलालगृहीं । एके दिवसीं निशीसमयी । मनुष्याऐसा बोलत ॥२३॥
अरे कुंभकर्त्या ऐक वचनीं । निरोप प्रभूसी सांग जाउनी । तुझी कन्या लावण्यखाणी । आमुचे रासभा अर्पिजे ॥२४॥
ऐसें प्रत्यहीं मध्यान्हरात्रीं । कुलाल ऐके नित्य श्रोती । परि न बोलोचि तो वक्त्री । दुर्घट साहस म्हणोनि ॥२५॥
येरू मनीं म्हणे घडेल कैसें । नृपासन्निध बोलूं कैसें । होणार जें आपैसीं । सहज दिसोन येईल ॥२६॥
परि कोणा न सांगे हा मंत्र गुप्त । स्वजनादिक असती आप्त । अघटित केवीं घडेल प्राप्त । अप्राप्त विचारें करोनी ॥२७॥
म्हणे सूर्य आणि खद्योत । सुकर आणि ऐरावत । भणग आणि नृपनाथ । समान केवीं होतील ॥२८॥
वायस आणि हंसिणी । कीं वोहळ आणि स्वर्धुनी । किंवा श्वपच आणि श्रुतिवाणी । जोडा केवीं घडे हा ॥२९॥
हिंग आणि कस्तूरी । की गलितकुष्टिया राजकुमरी । कीं रासभातें दिव्य नारी । योग्य युग्म नव्हे ती ॥३०॥
ऐसे बोलूं जातां तेथें बोल । राजा दंड मातें करील । तूं पशु होऊनि राहसील । एकीकडे बापुडें ॥३१॥
यापरी ऐकोनि आला कोप । म्हणे नेणसी तूं महत्प्रताप । कायसें मशक नृप । भस्म करीन नगरातें ॥३२॥
विषप्रचीति पाहसी सत्वर । तरी पाहे माझा चमत्कार । गंधर्वमाया परमदुर्धर । तंव गृहा अग्नि लागला ॥३३॥
प्रज्वलित ज्वाला गगन चुंबित । प्रचंड धडकला अकस्मात । मग पाहून बहु बोभात । प्रळय आकांत देखिला ॥३४॥
सकोपें पेटला ज्वाळामाळी । कुलालमुखीं घाली धुळी । म्हणे धांव गा चंद्रमौळी । रक्षी येथूनि आमुतें ॥३५॥
गंधर्व म्हणे ऐक कुलाला । प्रचीति पाहिलीस कीं हे डोळां । सांग जाऊनि भूपाळा । तरीच विघ्न निरसेल ॥३६॥
कुलाल होऊनि सद्गदित । रासभाचे पाय धरीत । तेव्हांच अग्नि शांत । पूर्ववत होतसे ॥३७॥
गंधर्वमाया परमगहन । अणुमात्र न दिसे दग्धचिन्ह । येरें आश्चर्य मानून । स्तब्ध झाला मनांत ॥३८॥
कुलाल उठोनि प्रातःकाळीं । साद्यंत निवेदी नृपाजवळी । मुखीं घालून करांगुळी । आश्चर्यवार्ता परिसत ॥३९॥
राजा करी मनीं विचार । न कळे ईश्वराचें चरित्र । तरी तया अटक घालूं दुर्धर । मग जाणवेल आपैसें ॥४०॥
कुंभकर्त्या म्हणे राजेश्वर । तयासी निवेदी प्रत्युत्तर । हें सुवर्णाचें केलिया नगर । तरीच घडे सर्वही ॥४१॥
तरी हे सुभट नेटकी हाटकवर्णी । कन्या गोरटी चतुर पद्मिणी । देईन हे लावण्यखाणी । नसे वचनीं अन्यथा ॥४२॥
रायातें करुनि नमन । कुलाल करी तेथूनि गमन । सत्वर पातला स्वसदन । नृपवचन निवेदी ॥४३॥
रजनी होतांच तो द्वितीय प्रहर । तत्काळ झालें सुवर्णनगर । माडिया मंदिर गोपुर । हुडे चहूंकडे दिसती ॥४४॥
नगरी ते होय वधूची जननी । म्हणोनि शृंगारिली बहुसन्मानी । अगाध गंधर्वाची करणी । सुवर्णनगरी ते केली ॥४५॥
लंका कीं हे द्वारका । सर्वास पडिली संशय शंका । आश्चर्य झालें नगरलोकां । स्वप्नआशंका पैं घेती ॥४६॥
एक चढती माडियागोपुरीं । समग्र पाहती सुवर्णपुरी । राजा मनीं विचार करी । म्हणे अवतारी प्रगटला ॥४७॥
संतोष संशय व्याप्त होऊन । परि राजा झाला वचनाधीन । म्हणे ब्रह्मसूत्र प्रमाण । अन्यथा नव्हे माझेनि ॥४८॥
यद्यपि शुध्द परि लोकविरुध्द । येणें कुळीं न लागे बाध । काय करुनि याचा खेद । देहप्रारब्ध चुकेना ॥४९॥
असो होणार भविष्य जें संचिती । त्याची कायसी करावी खंती । न कळे ईश्वराची गति । प्रारब्धसंगतीं वर्तावें ॥५०॥
रासभलांछ्न मानूनि चित्ती । कन्या नेमिली तयाप्रति । सुशीळा संतोषूनि प्रीतीं । म्हणे तोच पति पै माझा ॥५१॥
लग्नसोहळा अतिगजर । समारंभ झाला दिवस चार । परि राजकांता चिंतातुर । होती झाली ते वेळां ॥५२॥
पतिव्रता सुशीळा सुंदरी । ते पतीसी ठेवी स्वमंदिरीं । निद्रा करवी सेजेवरी । सेवा करी स्वहस्तें ॥५३॥
भ्रतार कुरुपातें देखूनी । हेळसिती इतर कामिनी । तारुणलावण्यसंपन्न गुणी । त्या वश्य दास्या अवश्य ॥५४॥
तैसी नव्हे सगुणवेल्हाळा । सुशीला नामें परम सुशीळा । तिचा निश्चय फळासी आला । झाला वृत्तांत ऐका तो ॥५५॥
जेवीं अभ्रांतूनि प्रगटे भास्कर । कीं समुद्रांतूनि रोहिणीवर । गवसणींतूनि वासवी अस्त्र । प्रदीप्त दीप्ति ज्यापरी ॥५६॥
त्वचा त्यागूनि निघे भुजंग । कीं मीनकेतनांतूनि अनंग । तैसा रासभ देहांतून सांग । पुरुष देदीप्य प्रगटला ॥५७॥
विशाळ भाळ आकर्ण नेत्र । सरळ नासिक सुहास्य वक्त्र । कमनीय तनु चारुगात्र । कीं कृष्णपुत्र पैं दुजा ॥५८॥
मुकुटकुंडलें कटिमेखळा । गौरवर्णी तेजागळा । सुवास वसनीं दीप्ति चपळा । प्रकाश फाकला मंदिरीं ॥५९॥
कीं स्वर्गदेवता नरपुतळा । सत्पुण्यें पातला भूतळा । परम हर्षली अबळा । गळां माळ घालीत ॥६०॥
चरणयुगुळीं मौळ ठेवून । म्हणे कृतार्थ जन्म झालें धन्य । षोडशोपचारें करी पूजन । सद्भावेंसी विनटली ॥६१॥
तांबूल देतां करकंकण । झणत्कारें कामविपिन । होतां देतां आलिंगन । चुंबनमैथुनीं मिसळती ॥६२॥
सुरतयुध्दईं वीर्योदकीं । कामें कामिनी केली सुखी । स्मरहत होऊनि विलोकी । अधोवदनी सलज्ज ॥६३॥
सुशीळाशुक्तिपात्रीं पतन । वीर्य स्वात्योदकीं जीवन । तेणें मौक्तिकपुत्ररत्न । संभव पावे ते काळीं ॥६४॥
संपूर्ण झालिया अंगसंग । तों अरूणोदयीं आरक्तरंग । उदय उदेला दिनप्रसंग । अनंगरंग वितळे ॥६५॥
गंधर्व म्हणे वार्ता गुप्त । गुह्य न बोलें राहें स्वस्थ । तरीच सुख चिरकाळ प्राप्त । प्रगटतां स्वार्थ न पावसी ॥६६॥
अवश्य म्हणोन लागे पायीं । गंधर्व झाल गर्दभदेही । आश्चर्य देखूनि ते समयीं । मातृगृहीं जातसे ॥६७॥
पंचरात्रपर्यंत । कांचन नगर झाले समस्त । नंतर होऊन पूर्ववत । विस्मित होती जन सर्व ॥६८॥
नगरीं गुजगुजती सर्व । राजकन्या लाधली भ्रतार । एक म्हणती असेल सुंदर । तरीच जोडा पाहिला ॥६९॥
एक बोलती प्रत्युत्तर । आम्ही देखिला तिचा वर । एक म्हणती झाली रात्र । खर नर की नेणवे ॥७०॥
नाहीं देखिली वरवरात । रात्रींच नेला तो मिरवत । एक म्हणती राहा निवांत । श्रेष्ठ गोष्ट न वदावी ॥७१॥
असो गर्भसंभव उत्तरोत्तर । जेवीं धवलपक्षी निशाकर । कीं सत्पात्री कृतोपकार । कीर्ति विस्तरे ज्यापरीं ॥७२॥
एके दिवसीं राजपत्नी । कन्येस लक्षी गर्भाचिन्ही । एकांतां नेऊनि गौप्यवचनीं । पुसती झाली सुतेतें ॥७३॥
ऐकून न देच उत्तर । तेणें माता चिंतातुर । हे कुळलांछनी दिसे समग्र । कुळाभिमानी न दिससी ॥७४॥
व्यर्थ आलीस माझिये पोटीं । काळिमा लाविला राज्यमुकुटीं । मज दिससी परमकपटी । कापटयरीती जाणसी ॥७५॥
सांगूं जरी मातेप्रति । तरी पतिआज्ञा भंग होती । ऐसें जाणूनियां चित्तीं । दृढ निश्चिती राहे ती ॥७६॥
क्रोधे उठोन गेली जननी । येरी पातली आपुले भुवनीं । यावरी प्रवर्तता रजनी । स्वामीसेवनीं तत्पर ॥७७॥
एकांत देखूनि कांतकांता । व्याभिचारवृत्तांत निवेदी वार्ता । कुळलांछनी तुमची दुहिता । कुलक्षणी जन्मली ॥७८॥
पुरुषसंगावीण गर्भवती । जनलौकिकीं उपहासिती । यावरी वदता जाला नृपति । स्त्रीचरित्र नेणवे ॥७९॥
उभयतां जाती तिचे सदनीं । गुप्त तिष्ठोनि पाहतीं नयनीं । गवाक्षद्वाराचे संधानीं । अवलोकिती जाहलीं ॥८०॥
चोरदृष्टीं राव पाहत । तों रासभदेहांतूनि अकस्मात । पुरुष प्रगटला अत्यद्भुत । तेजोमय तेजस्वी ॥८१॥
सौंदर्य पाहून सुंदर । चकित होतसे नृपवर । मनीं भूप करी विचार । देव किन्नर नेणवे ॥८२॥
राव संतोषोनि पोटीं । म्हणे धन्य ही कन्या पोटीं । ऐसा वीर न देखों दृष्टीं । भुवनत्रयीं पाहतां ॥८३॥
परम लाभ मानूनि मनीं । राजा पातला राजभुवनीं । स्त्रियेसी सांगे आज्ञावचनीं । प्रगट वार्ता न कीजे ॥८४॥
प्रत्यही भोगी दिव्य भोग । रात्रींत होतसे उभयसंग । त्यागूनियां सर्व संग । सदा अनुराग पतीचा ॥८५॥
तों नवमास भरतां पूर्ण । पुत्र जन्मला परम सगुण । दुजा भासे रतिरमण । अतिडोळस सकुमार ॥८६॥
भूपभुवनीं दिव्य सोहळा । दिव्यमंडप उभविला । राव परम संतोषला । म्हणे राज्यास अधिकारी ॥८७॥
परमानंद झाला नगरीं । पूर्णकुंभेंसी येती नारी । शर्करा वाटिती घरोघरी । गजारुढ होऊनी ॥८८॥
मंगळतुरीं मंगळगाणीं । मंगळप्रद सुवासिनी । हरिद्राकुंकुम सौभाग्यवर्धनी । स्त्रकचंदनीं पूजिती ॥८९॥
ध्वजपताका स्तंभकर्दळीं । रंगमाळा भूमंडळीं । भांडार फोडोनि ते वेळीं । याचकजन सुखी केले ॥९०॥
जातकर्मादि नामाभिधान । ज्योतिषी रायासी वदती वचन । हा पराक्रमी सुशीळानंदन नामाभिधान भर्तृहरि ॥९१॥
समुद्रवलयांकित मेदिनी । पालाणील सत्तावसनीं । ज्याचें नां घेतां वदनीं । पुनीत होती जडजीव ॥९२॥
एक संवत्सर लोटल्यावरी । परम पराक्रमी तिचे उदरीं । पुण्यश्लोक ते अवसरीं । अंशावतारी जन्मला ॥९३॥
जेवीं कुरुकुळीं प्रतापी भरत । प्रयत्नविषयीं होय भगीरथ । कीं रामसेवेंत निरत भरत । भर्तृहरी सुश्रूषे सादर पैं ॥९४॥
विक्रम ठेविलें नामाभिधान । जो पराक्रमें प्रतिअर्जुन । शककर्ता सकळकळानिपुण । सर्वज्ञ भूपाळ भूलोकीं ॥९५॥
स्वरुपें चंद्र कीं मदन । त्याहूनि लावण्यही शतगुण । समरभूमीसम संधान । परोपकारी नेटका ॥९६॥
असो तिसरेनि गर्भवती । कुमरी जन्मली मैनावती । तिचें स्वरुप देखून रति । विस्मित चित्ती होतसे ॥९७॥
परम पवित्र जन्मली कन्या । धन्य भूलोकीं होय मान्या । सत्कीर्तिध्वज उभवी जघन्या । कुलोध्दारिणी होय ते ॥९८॥
पुन्हा चतुर्थ गर्भसंभव । पुत्र झाला सुभटवीर्य । लावण्यसद्गुणी तो अपूर्व । पुत्रत्रय जाणिजे ॥९९॥
पाहा बुध्दिकर्मानुसारिणी । राजपत्नी विचारी मनीं । रासभकलेवर दग्ध करोनी । जामाता प्रत्यक्ष करावा ॥१००॥
कन्येस नकळत मंदिरीं । एकांत ते मध्यरात्रीं । गंधर्वक्रीडेंत सक्त कुमरी । रासभकलेवर जाळिलें ॥१॥
असो झालिया द्वादश वर्षे । तंव तो शक्र विमान प्रेरीतसे । सुशब्द होती घंटाघोषें । अप्सराकिन्नरेंसी जाण पैं ॥२॥
गंधर्व म्हणे सुशीळेप्रति । मी जातों स्वर्गाप्रति । तूं राहून सुनिश्चितीं । कन्यापुत्र सांभाळी ॥३॥
येरी परिसोन वचन । सदृढ धरिती झाली चरण । मी न राहे स्वामीवीण । स्वयें गमन करीतसें ॥४॥
पदारविंदीं होऊनि षट्‍पद । सुधारस सेवीतसे आमोद । प्राण त्यागोनि अभेद । ज्योतींत ज्योत सरली पैं ॥५॥
गिरिजासमुद्रसंयोग । संगम तो सिंधुसंग । तैसाचि झाला हा प्रसंग । जेवी तरंग जीवनीं ॥६॥
गंधर्व गेला स्वर्गालयीं । सुशीळादेह पडिला मही । भूप आणि भाजा तये समय़ीं । शोक करिती आक्रोशें ॥७॥
शांतविती प्रजाप्रधान । परि रायाचें दुश्चित मन । विचार करिती सर्वजन । राज्य द्यावें भर्तृहरीतें ॥८॥
व्रतबंध करोन सत्वर । वेदविशारद झाले कुमर । धनुर्विद्यादि समग्र । अभ्यास केला तयांनीं ॥९॥
चतुर्दशविद्यापारंगत । चौसष्ट कळा आंगी वसत । एवं सकळगुण मंडित । होते झाले त्रिवर्ग ॥११०॥
सुदिनी केला पट्टाभिषेक । स्थापिते झाले प्रतापार्क । युवराज्यीं विक्रम देख । सेनापति सुभट तो ॥११॥
चतुरंग चमू करोनि सिध्द । प्रस्तान भेरी दुंदुभिशब्द । तेणें नृपातें होऊनी बोध । बध्दहस्त पैं येती ॥१२॥
मांडलिक राजे समस्त । हतवीर्य होऊनि शरण येत । करभार घेऊनि असंख्यात । सेवेसी तिष्ठती अक्षयीं ॥१३॥
शिबिरें उभविलीं नगरप्रदेशीं । राव निघे सुमुहूर्तेसी । जेवीं शक्रनंदन वनासी । जाता होय ज्यापरी ॥१४॥
कनकदंड शुभ्रचामरें । मकरबिरुदें दीप्तछत्रें । सुवर्णदंडी एकसरे । वेत्रपाणी धांवती ॥१५॥
राव निघाला नगरांतून । करिता झाला अश्वारोहण । आश्वासीत प्रजाजन । करसंकेतेंकरुनी ॥१६॥
सेनासमुद्रबळ तुंबळ । उचंबळूं पाहे मर्यादवेळ । खळबळिलें भूमंडळ । वीरदळभार देखोनी ॥१७॥
जेवीं उदयास येतां सहस्त्रकर । लपोन जातिं नक्षत्रें सर्व । तेवीं सर्वही नृपवर । पादाक्रांत पै होती ॥१८॥
पुढें जाऊन वीर विक्रम । युध्द केलें घोर परम । अद्भुत केला पराक्रम । शत्रू जिंकिले प्रतापें ॥१९॥
तैसेंचि पुढें जाय दळभार । वेढिते झाले अवंतीनगर । युध्द झालें घोरांदर । बळें नगर घेतलें ॥१२०॥
तेथील राव चंद्रसेन । तोही पातला अनन्य शरण । तया रक्षिला आपुला करुन । आप्तभावें भाविला ॥२१॥
मग घेतलें महाकाळदर्शन । नृप करी स्तुतिस्तवन । जय जय श्रीउमारमण । आम्नाया पार न कळेचि ॥२२॥
भाळलोचन भालचंद्रा । त्रीतापशमना प्रतापरुद्रा । करूणार्णवा करूणा समुद्रा । भद्रकारका जगद्गुरु ॥२३॥
यापरी परिसोनियां स्तवन । विरुपाक्ष झाला सुप्रसन्न । लिंगांतूनि वरदवचन । राज्य करीं तूं येथीचें ॥२४॥
महा प्रसाद सर्वथा । म्हणोनि ठेवी पदीं माथा । तथास्तु म्हणोनि तत्त्वतां । निघता झाला तेथुनी ॥२५॥
राजमुद्रा पाहून सर्व । म्हणती प्रतापी हा अभिनव । यास शोभे राज्यवैभव । योग्य होय राज्यासी ॥२६॥
प्रजा पौरज क्षेत्रस्थ । वैदिक पंडित श्रेष्ठ समस्त । सिध्दमुनि आणि संन्यस्त । राजदर्शना येती पैं ॥२७॥
कळापात्रें गुणिजन । गायक गाती सुस्वर गायन । वारांगनांचें होत नर्तन । आणि कीर्तन साधूंचें ॥२८॥
शिवप्रासादादि विष्णुमंदिरीं । पूजाद्र्व्य षोडशोपचारीं । दीपनैवेद्य ते अवसरीं । पूर्वीहूनि चालवी ॥२९॥
पूजक सेवकांची वेतनें । ब्राह्मणांसी वर्षासनें मठ वाटिका संस्थानें । वर्धमान करीतसे ॥१३०॥
देशोदेशीं गेली हाक । जाती राजमुद्रांकित सेवक । राजदर्शना प्रजालोक । उचित घेवोनि धांवती ॥३१॥
अनुकूळ काळाचें महिमान । पादाक्रांत शत्रु लीन । सेवा करिती होऊन दीन । लाभ होती पदोपदीं ॥३२॥
यावर मागध देशींचा नृपवर । सिंहसेनाख्य राजेश्वर । तयाची सुता अतिसुंदर । नाम जिचें पद्माक्षी ॥३३॥
करभारसह कन्यारत्न । समर्पण करी प्रीतीकरुन । चार दिवस सोहळा संपूर्ण । होता झाला ते ठायीं ॥३४॥
जेवीं रुक्मांगदावरी मोहिनी । रायाचे स्वधर्मा पाडिली हानी । तेवीं रायास पाडिली मोहिनी । नागस्वरीं फणी जैसा ॥३५॥
चंचळकटाक्ष चंचळगती । परमचंचळ जिची स्थिति । चंचळ हालवी नेत्रपातीं । चंचळ स्वभाव पैं तिचा ॥३६॥
सदा मोकळें वक्षस्थळ । अंचल सरसावी सर्व काळ । जळांत्त विलोकी मुखमंडळ । कुळलांछ्नी होय ते ॥३७॥
वारंवार मुखीं पदर । सलज्ज सुचवी वक्रनेत्र । निरिया बांधी वरच्यावर । कुळलांछनी होय ते ॥३८॥
परपुरुषा करी एकांत । पातिव्रत्य मिरवी लोकांत । सहचर जारिणींत सदा रत । कुळलांछनी होय ते ॥३९॥
भ्रतार पाहुन ऐश्वर्यवान । प्रीतीं प्रियकरीं संभाषण । बाह्यात्कारें परि लक्ष अन्य । कुळलांछनी होय ते ॥१४०॥
परपुरुषीं निरत निरंतर । भ्रष्टाभ्रष्ट करी अविचार । प्रपंच दावी बाह्यात्कार । कुळलांछनी होय पैं ॥४१॥
सदा निजे जे परगृहीं । मिष्टान्न एकटी भक्षी गृहीं । असोनि पदार्थ म्हणे नाहीं । कुळलांछनी होय ते ॥४२॥
दुर्मुख सदा भ्रुकुटीग्रंथी । प्रत्युत्तरीं शिणवी पती । कुशब्दीं परम त्रासवी ती । त्रासरुपी पतीतें ॥४३॥
भ्रताराचें पाहे न्यून । वैर करी रात्रंदिन । वैरियां सांगे पैशून्य । ते कुळलांछनी होय पैं ॥४४॥
असो पुढें होणार । त्याचा कायसा विस्तार । नृप स्त्रैण झाला थोर । तिचे छंदे वर्तत ॥४५॥
राव भोळेपणें नेणे । म्हणे सुखे प्रिय प्राणाहुन । क्षण न निरीक्षितां चंद्रवदन । वाटे अमावास्या आज पैं ॥४६॥
कटु वृंदावन आरक्रफळ । कीं काळसर्पाची गरळ निर्मळ । भ्रांता वाटे जळ सोज्वळ । परी काळकूट ज्यामाजी ॥४७॥
औंदुबराचें सुमन । कीं श्वेतकाक नव्हे दर्शन । मत्स्या न देखूं चरण । तेवीं स्त्रीह्र्दय न कळेचि ॥४८॥
तीसी नाना विलास सुरत । ( कामांध होऊनि करी नित ) । नाना अळंकार भूषणें देत । शृंगारशतक मत करी ॥४९॥
सर्वज्ञ चतुरश्री नृपवर । केलें शृंगारशतक सुंदर । अर्थ घेती पंडित चतुर । मर्मज्ञ जाणती मर्मातें ॥१५०॥
एवं रायासी प्रियपत्नी । वल्लभा आवडे प्राणाहूनी । तीतें भोग भोगी अनुदिनीं । परम आवडे नृपातें ॥५१॥
यावरी मद्रदेशींचा राजेश्वर । त्याची कन्या परम सुंदर । विक्रमातें देऊनि सैंवर । योग्य वधूवरें दिसती ॥५२॥
मग गौडबंगालियाचा राजनंदन । त्रैलोक्य चंद्र नामाभिधान । तयासी मैनावती गुणरत्न । दिधलें लग्न लावोनि ॥५३॥
तयातें आंदण देत अद्भुत । गज वाजी शिबिका रथ । दासदासी देऊन उचित । देत प्रीतीनें भूपति ॥५४॥
सुरथ रायाची वधू सगुण । सुभटें केलें पाणिग्रहण । यथाविधी करुन लग्न । आंदण दिधलें जामाता ॥५५॥
धनें वसनें बहु सन्मान । संतुष्ट केले याचकजन । निर्धन ते झाले सधन । कीर्ति वर्णिती रायाची ॥५६॥
यथाकाळीं वृष्टिपर्जन्य । सुभिक्ष समृध्दि धनधान्य । दुःख दरिद्र आणि दैन्य । देशांतूनि पळालीं ॥५७॥
विपुळ देती धेनु क्षीर । नगरीं नसती जार तस्कर । स्वधर्मे असती नारीनर । विप्र वेद पठती ॥५८॥
सदा वृक्ष सफळ फळती । कोकिला सुशब्दें कूजती । साळया पूर्वपक्ष करिती । रावे देती उत्तरें ॥५९॥
ऐसें असतां एके दिवसीं । विक्रम प्रार्थी अग्रजासी । पृथ्वीप्रदक्षिणा करावी ऐसी । इच्छा मनीं उदेली ॥१६०॥
आज्ञा झालिया जाईन । शीघ्र येतसे परतोन । यावरी भर्तृहरि दे वचन । सत्वर येईं गुणज्ञा ॥६१॥
सवें चतुरंग सेना घेऊन । विक्रम करी तेथून गमन । माडिये गोपुरें वंळघोन । नरनारी पाहती ॥६२॥
सुवर्णसुमनें असंख्यकोटि । स्त्रिया वोपिती रायाचे मुकुटीं । पौरजांच्या उभ्या थाटी । रावा दृष्टी पाहावया ॥६३॥
विक्रम वोळवीत प्रजानन । सदुःखित अंतःकरण । राव म्हणे जावें परतोन । शीघ्र येईन निश्चयें ॥६४॥
पुढें जातां देखिलें उद्यान । परमरमणीक शोभायमान । वृक्ष निबिड सफळ सघन । जळ तुंबळ तडागी ॥६५॥
कासारतटीं एक शिवालय्ब । आणि तेथें दुजें शक्तिआलय । राव दर्शनोद्देशें एकटा जाय । तंव आश्चर्य देखिलें ॥६६॥
देवीपुढें दिव्य पुरुष एक । सालंकारी परि भग्न मस्तक । पाहोनि नृप साशंक । होता झाला ते वेळीं ॥६७॥
मग खड्ग घेऊन हाती । ग्रीवेंत मारी दृढनिघातीं । सकृप होऊनि भगवती । हस्त धरी नृपाचा ॥६८॥
कां करिसी तूं प्राणत्याग । मन इच्छीत वर माग । राव म्हणे हा कोण सांग । पुरुष मृत्यु पावला ॥६९॥
शक्ति म्हणे ऐक सकळ । केरळ देशींचा हा भूपाळ । याचे शत्रु असती सबळ । राज्य घेतलें तयांनी ॥१७०॥
यानें करुन अनुष्ठान । परी प्रत्यक्ष मी न दे दर्शन । यास्तव मस्तक आपटून । प्राण देत मजवरी ॥७१॥
राव म्हणे वो त्रिपुरसुंदरी । याविषयीं कां कठोरंतरी । देवी वदे रे अवधारी । आयुष्यभानु सरला पैं ॥७२॥
नसे दैवीं राज्यासन । यास मी देऊं तरी कोठून । आणि आयुष्याचा अस्तमान । होता मरण पावला ॥७३॥
राव म्हणे वो विश्वजननी । माझें आयुष्य दे यालागोनी । मी जातसें मृत्युभुवनीं । याचेनि पालट जगदंबें ॥७४॥
अपर्णा म्हणे नृपनाथ । न्यग्रोधत्वचा न लागे अश्वत्था । कलीत कर्ता तोचि भोक्ता । नसे अन्यथा सुजाणा ॥७५॥
राव म्हणी वो जगदंबें । तूं ब्रह्मांडमंडपीं आरंभ स्तंभे । काय न करिती शिववल्लभे । घडिसी मोडिसी ब्रह्मांडें ॥७६॥
नमो प्रणवरुपिणी परंज्योती । तूंच स्वरुपाची चैतन्यशक्ति । तुझें त्रिगुण असे व्यक्ति । देवत्रयासी निर्मिसी ॥७७॥
अनंतब्रह्मांडांची माळा करीं । सदा जपसी त्रिपुरारिसुंदरी । तूं चिदचिन्मयलहरी । वस्ती अभिनव पैं तुझी ॥७८॥
या ब्रह्मांडकरंडामाझारीं । तुझीच सत्ता योगेश्वरी । तंव प्रतापाची वर्णीता थोरी । तरी एक वैखरी माझी पैं ॥७९॥
तूं सर्वस्थित्यंतकारिणी । जगन्माते श्रीभवानी । त्रिदश येती लोटांगणीं । तुझा महिमा नेणवे ॥१८०॥
तूं सदय ह्रदय जाणोन । जननी तूंते आलो शरण । मंगळमाहेश्वरी तवाभिधान । तरी सुमंगळ करी कां ॥८१॥
मग सदय सुधेची स्वर्धुनी । बोलती सकृप पाहे नयनीं । तंव उठता झाला तयेक्षणी । चकित लोचनीं पाहतसे ॥८२॥
देवता पावली अंतर्धान । राजपुत्र उघडी लोचम । तंव पुरुष देखिला देदीप्यमान । राजचिन्ही मंडित ॥८३॥
अकाळमृत्यूची घोर निद्रा । कोणे जागविला सांग नरेंद्रा । तूंच दिससी प्रतापरुद्रा । करुणसमुद्रा मज गमे ॥८४॥
परि कळला पाहिजे नाममंत्र । श्रवण इच्छिती तारकमंत्र । अज्ञानतिमिरी प्रगटतां मित्र । बोघें पवित्र होईल ॥८५॥
तंव देवालयीं तपस्वई होता । तेणें निवेदिली सकळ वार्ता । मग धांवून चरणीं ठेवी माथा । मी उत्तीर्ण कैसेनि ॥८६॥
पंचैते पितर वदे श्रुति । परि तेही तव सरी न पवती यास्तव मौनेंच निश्चितीं । पदी मस्तक ठेविलें ॥८७॥
बहुत झाले चक्रवर्ति । मागें गेले पुढें होती । परि परदुःखवेदना जाणती । ऐसा विरळा असेल ॥८८॥
यापरी परोपकारी त्रिजगती । नसे भूत ना भविष्यति । परदुःखीं दुःखवे चित्तीं । एक विक्रम कलियुगीं ॥८९॥
असो राजपुत्र म्हणे राया । मस्तकी हस्त ठेवीं सदया । तुझा दासानुदास होऊनियां । अक्षयीं वसेन सेवेंत ॥१९०॥
मज राज्यासी काय कारण । जेणें चुकविलें अकाळमरण । पुनर्जन्मासी कारण । तूंचि झालासी दयाळा ॥९१॥
विक्रम पुसे नाम काय । म्हणे सुकेतन नामें हाचि देह । मग तयास देऊनि अभय । राज्य करवीन तुज हाती ॥९२॥
अवश्य म्हणी ते वेळां । सुकेत स्यंदनारुढ केला । सेवकां आज्ञापिता झाला । सेवा करणें पैं याची ॥९३॥
दुजे रथीं करुन आरोहन । विक्रम करी तेथूनि गमन । सवें घेऊन चतुरंग सैन्य । दळभारेंसी निघाले ॥९४॥
बळियाढे पराक्रमी वीर । तयांचें वेढिते झाले नगर । युध्द करिती घोरांदर । परम अवेशेंकरुनी ॥९५॥
वीरवर वोळती सकळ । द्णाणिले भूमंडळ । वाणीं जर्जर केले सकळ । प्रळयकाळ वोढवे ॥९६॥
परमयोध्दे सबळसंपन्न । शत्रु सजीव आणिला धरुन । जयवाद्याघोषें भरले गगन क। ध्वज उभविला कीर्तीचा ॥९७॥
शत्रुचें करुन शासन । सुकेता देत । छ्त्रसिंहासन । द्विजांसी देऊनि धनवसनें । पत्रे प्रेषीत नृपातें ॥९८॥
विक्रमपत्रिका मुद्रांकित । पाहून शत पादाक्रांत । म्हणती विक्रमाचे विक्रीत । त्याचे स्थापीत असो पैं ॥९९॥
विक्रम आम्हां शक्रापरी । पत्रिका वंदिते झाले शिरीं । करभारें दळभारीं । दर्शन उद्देशें येती ते ॥२००॥
हें भर्तृहरिविक्रमाख्यान । परमामृत परमपावन । पुढें रसाळ अनुसंधान । एकाग्र श्रवण करावें ॥१॥
आदिनाथलीला सुरस । हेंचि नर्मदातीरविशेष । पारायणें तपेंचि निर्दोष । स्वयें महेश ते होती ॥२॥
तप करिती नर्मदेतटी । मृत्यु व्हावा जान्हवीनिकटीं । कुरुक्षेत्री दानें पुण्यकोटि । तया शेवटी मुक्ति पैं ॥३॥
तयेंत असती जे पाषाण । तितुके होती भाळलोचन । भावें करितां स्नानपान । करी ते पावन निश्चयें ॥४॥
हा ग्रंथ नर्मदेंतील वर्ण । तितुके होती उमारमण । पारायणश्रवणमननसुमन । अर्चनें शंकर संतुष्टे ॥५॥
श्रीमतआदिनाथलीलाग्रंथ । सद्गुरु समर्थ भैरवनाथ । तत्प्रसादें आदिनाथ । प्रथमोऽध्यायीं नमीतसे ॥६॥
आदिनाथलीला क्षीराब्धिग्रंथ । भर्तृहरीचें चरित्र प्राप्तामृत । श्रोते सुरनर प्राशन करीत । अकाळमृत्यु नाशक जें ॥७॥
हा अध्याय परमपावन । हें चतुर्दशविद्येचीं आयतन । चौदा चक्रें की चतुर्दशभुवन । कीं चतुर्दशग्रंथीं अनंत हा ॥८॥
चतुर्दशविद्या अध्याय सज्ञान । हें भर्तृहरीचें आख्यान । श्रोता वक्ता करी पावन । अगाध महिमान याचें पैं ॥२०९॥


References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP