मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत| अध्याय २० वा श्रीनाथलीलामृत प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २० वा नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. Tags : adinathagorakshanathaआदिनाथगोरक्षनाथ अध्याय २० वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ नमो आदिनाथ प्रणववोंकार । जो निजशक्तीचा निजवर । जेथून प्रगटे चराचर । विश्वविस्तार तेथूनी ॥१॥जें विश्वाद्य वेद्य आद्य । जें विष्णुविरंचीचें आराध्य । तें सनकादिकां परमवंद्य । तेंचि साध्य गुरुपुत्रा ॥२॥वेदांती म्हण्ती निर्गुण । मीमांसक म्हणती कर्मकारण । नैयायिक म्हणती ईश्वर पूर्ण । सर्वकर्ता हाचि पैं ॥३॥कपिलाचार्य सांख्यशास्त्री । प्रकृतिपुरुष वदती वक्त्री । भाष्यकार शब्दकुसरीं । अर्थगौरवें स्तविताती ॥४॥पतंजली योगप्रसिध्द । योगमार्ग दाविती विशद । तो हा नाथपंथ अगाध । जगदोध्दारा प्रगटला ॥५॥पूर्वाध्यायीं कथा निश्चितीं । कानीफनाथाची उत्पत्ति । ते निवेदिली यथामति । श्रोतयांप्रति आवडीं ॥६॥असो सच्छिष्यांत चूडारत्न । कानीफनाथ परम सगुण । शोध करी गुरुचा अनुदिन । चतुर्दशभुवनें शोधिली ॥७॥परि ठायीं न पडे सद्गुरुमूर्ति । जेवी विश्वरुपीं शोधिली श्रुति । तन्न तन्न नेति नेति । परि न पवती निर्गुणीं ॥८॥गुहागव्हारें गिरिकंदरीं । कानीफ शोधी जालंधरी । वने उपवनें घोरांदरीं । मठमंदिरीं दिसेना ॥९॥चतुर्दिशा दिगंतरीं । देवदेउळें निरखिलीं नेत्रीं । सरोवरें गंगातीरी । नदनद्याही पाहिल्या ॥१०॥अराम रमणी तीर्थक्षेत्र । वापी कूप तडाग विचित्र । सुस्थळें शोधिली सर्वत्र । परी अणुमात्र वार्ता न लभेचि ॥११॥यावरी कानीफ योगेश्वर । सवें सेना शाहीसंभार । पांच सहस्त्र राजेश्वर । सांप्रदायी सेवेंत ॥१२॥गजस्कंधीं दुंदुभिघोष । हय हिंसती परमोत्कर्ष । उच्चैःश्रव्याचे गोत्रपुरुष । सालंकारी असती ॥१३॥मदोन्मत्त दुर्मद हस्ती । विवेकांकुश आकर्षती । ज्ञानविज्ञान चवरें डोलती । द्विभागेसीं सतेज ॥१४॥दहा सहस्त्र भद्रजाति । जेवीं जावडे ऐरावती । कनकालंकार मिरवती । घंटानादें सुशब्दीं ॥१५॥पंचसहस्त रहंवर । दिव्य पताका ध्वज सुंदर । केतु सुप्रभ दिनकर । उदय दिसती वळीनें ॥१६॥सुवर्ण तगटीं सूर्यपानें । आतपत्रछत्र विराजमान । कलश कविगुरु ते उणे । आणिते झाले स्वदीप्तीं ॥१७॥रत्नपाखरा अनर्ध्यदीप्ति । पयःफेनधवल अंगकांति । मनपवनाहून गतीं । वारु उफाळती आकाशीं ॥१८॥रत्नदंडी वेत्रधर । अनेक आयुध शस्त्रधर । लघुयंत्रादि ध्वजधर । पदाती वीर चालती ॥१९॥पुढें गाती बंदीजन । नाथमहिमा गुणवर्णन । गायक सुस्वर गायन । राग उपराग भार्या ॥२०॥एक स्त्रीसंगाचा करोनि त्याग । राजाऐश्वर्य सप्तभोग । सुवैभवें राजयोग । इंद्रभोग भोगीत ॥२१॥मृगमद केशर हरिचंदन । सुगंधमाल्यांवर भूषण । मुक्ताहार विराजमान । मुकुट कुंडलें मिरवलीं ॥२२॥शैलीशृंगी पदमेखळा । कोटिमदनांहूनि आगळा । रत्नएकावळी रुळे गळां । नक्षत्रप्राय गमती पैं ॥२३॥सायुज्यतेचे चवर डोली । आरुढले असती तये काळीं । चंद्रवर्णी चवरे सुढाळी । ढाळिताती द्वयभागीं ॥२४॥सेनासिंधु अतितुंबळ । फुटला भासे अतिविशाळ । जान्हवीचें देखोनि जळ । संगम होऊं पाहतसे ॥२५॥रम्यरमणीय सुस्थळवन । निर्मळ प्रवाह गंगाजीवन । तटीं निबिड वृक्षघन । पत्री पुष्पीं डौरले ॥२६॥चंपकवृक्ष चूत चंदन । पोफळी बकुळी रातांजन । कपित्थ अश्वत्थ द्रुमार्जुन । अशोक कांचन डोलती ॥२७॥देवदार मांदार सुंदर आवळी । निंब दाळिंब बदरी कर्दळी । औदुंबर केतकी परिमळी । दशदिशा कोंदल्या ॥२८॥पादपांचा उपल्पव । प्लवंगमाचा हावभाव । विहंगमाचा गौरव । तये स्थळीं होतसे ॥२९॥पुष्पवाटिके सुगंथसुमन । भासे जसें नंदनवन । दशदिशा परिमळेंकरुन । दमदमीत भरियेल्या ॥३०॥पाहोनि भागीरथीचा तटाक । वाडेंकोडें उतरलें कटक । धरोनि मर्यादेची अटक । सुखकारक तें स्थळ ॥३१॥सुवर्णपटाची उभविली शिबिरें । जडितकळस वरी साजिरे । उंच मंडप एकसरें । सुवर्णस्तंभी दीर्घ पैं ॥३२॥डोलती मुक्ताफळाचे घोष । हिरियांचे झळकती राजहंस । मुक्तें आननी सुप्रकाश । विद्युत्पताका फडकती ॥३३॥काषाय झेंडे हटचोहाटी । नानावस्तूंच्या बैसल्या थाटी । व्यवसायाच्या परिपाठी । घेणें देणें होतसे ॥३४॥तों अकस्मात तये संधीं । गोरक्ष पातले कैवल्यउदधि । गंगातटाकीं त्रिशुध्दी । येते झाले अनायासें ॥३५॥द्वैत मुळीं न भेटे कोठें । यास्तव गोरक्ष विचरती एकटे । मागें पुढें घनदाट । अद्वैत निघोत असे पैं ॥३६॥आम्रतरुची सघन छाया । गोरक्ष बैसले तया ठाया । निगुढ एकांत पाहोनियां । स्वइच्छेनें असती ॥३७॥अच्युत डौरले पत्रीं फळीं । घमघमीते सुपरिमळीं । पीतारक्त परिपक्व सफळी । विशाळवर्तुळ सुरस पैं ॥३८॥वसंतऋतु होतां प्राप्त । वनश्री होय ऋतुस्नात । सुरस फळांतें प्रसवत । परमविष्ट रसाळ पैं ॥३९॥शुककोकिळ अनुवादती । तुच्छ आम्हां अमरावती । त्रिदशही सुवास इच्छिती । तयां प्राप्ति नव्हेचि ॥४०॥गंगे तव दर्शनातमुक्ति । ऐसेई वदे नारदउक्ति । स्नानपानाचा महिमा किती । हरिहर होती स्वयें ते ॥४१॥भीष्ममातेचा प्रवाह अमूप । दर्शनें जळती त्रिविधताप । पुण्य अगण्य गणनेचें माप । सहस्त्रशीर्ष नव्हेचि ॥४२॥तंव कानीफशिष्य ते अवसरीं । येते झाले जान्हवीतीरीं । तयांनी गोरक्ष देखिला नेत्रीं । नमस्कारिती सर्वही ॥४३॥तिही वंदोनि कानिफातें । बोलते झाले बध्दहस्तें । आम्ही देखिलें योगियातें । स्वर्धुनीतटीं पैं आतां ॥४४॥वामदेव की बादरायण । याज्ञवल्क्य कीं वसिष्ठ जाण । शुक होय की मत्स्येंद्र । जालंधरीच भासतो ॥४५॥ऐकोन सुवार्तेचे शब्द । कानीफ मानी परमानंद । सवें घेऊन शिष्यवृंद । येता झाला दर्शना ॥४६॥देदीप्यमूर्ति देखिली नयनीं । जेवीं उदेला वासरमणि । भस्म मेखळा काषायवसनी । शैलीशृंगी विराजे ॥४७॥आकर्णनेत्री मुद्रा श्रवणीं । जेवीं तळपे सौदामिनी । आदेश आदेश वदती वदनीं । परस्परेसीं ते वेळीं ॥४८॥एक उमापति एक रमापति । एक चंद्र कीं गभस्ति । एक उशना एक वाचस्पति । तेवीं भासती उभयतां ॥४९॥रिक्तपाणी न घ्यावें दर्शन । म्हणोन ऊर्ध्वकरीं अवलोकन । वनश्री जननी म्हणोन । भिक्षा देणें मजप्रति ॥५०॥अमृतोपम आम्र सुरस । कानीफ म्हणे अर्पी भिक्षेस । आजि प्राप्त झाला धन्य दिवस । अतिथी भिक्षा देईं कां ॥५१॥जननीपुत्र हो या रे आतां । ऐसें कानीफ जंव बोलता । तंव वृक्षींहून वृष्टि तत्वतां । होती झाली आपैसी ॥५२॥असंख्य तरुंची असंख्य फळें । पडतीं झाली तत्काळ । सिंदूरवर्ण परमरसाळ । रक्तपीत सुरंगी ॥५३॥कानीफ फळें अर्पुनी । म्हणे सफळ झाले आजिचे दिनी । कृतार्थ झाले सिध्ददर्शनीं । सुदिन दिन आजिचा ॥५४॥फळांचा करावा स्वीकार । तेनें मी होईन श्रेयस्कर । म्हणोन करी नमस्कार । वारंवार गोरक्षा ॥५५॥मनें वोळखून मन । जाणते झाले अंतःकरण । यासी सिध्दीचा दुरभिमान । व्यर्थ वोझें वाहतसे ॥५६॥म्हणे सर्वांस द्यावा गुरुप्रसाद । तोषवावे शिष्यवृंद । ऐसें म्हणोन विविध । फळें वोपिती सर्वांसी ॥५७॥आज्ञापितां ऐसें वचन । सर्वही करिते झाले ग्रहण । त्वचाबीजातें त्यागून । पान केलें सुरसचि ॥५८॥गोरक्ष वदे कानिफातें । उच्छिष्टबीज त्यागिलें येथें । हें नेऊन जेथींचे तेथें । लावी वेगीं सुजाणा ॥५९॥येरु म्हणे हें कैसे घडे । देठीं सुटलें केवीं जडे । गोरक्ष म्हणे याचा विघड । करणें श्लाघ्य नव्हे पैं ॥६०॥तूं जरी गुरुपुत्र होसी । फळें लावीं जेथींचीं तैसीं । ऐसें ऐकोनि मानसीं । उपाय कांहीं सुचेना ॥६१॥यावरी कानीफ बोले वचन । तुम्ही लावा मी पाहीन । मग करिते झाले कृपावलोकन । दीनबंधु दयाळू ॥६२॥जननीपुत्र होई ये वेळीं । तुम्ही जावें पूर्वस्थळीं । आज्ञापितां तये काळीं । बीजत्वचा मिसळती ॥६३॥सांचल होतां पक्षियांपरी । उड्डाण करिती ते अवसरीं । वृक्षीं झोंबती ते एकसरीं । सर्वत्र नेत्रीं पाहती ॥६४॥कीं त्या पीयुषरसाच्या कुपिका । असंख्य लागल्या वृक्षीं देखा । सनभ झाल्या तरुशाखा । भारे देखा तयांचे ॥६५॥कानीफ चमत्कारोनि मनीं । हा विधि विष्णु की शूळपाणि । न कळे ईश्वराची करणी । बहुरत्ना वसुंधरा ॥६६॥गोरक्ष पुसती गुरु कवण । कवण मुद्रा कवण आसन । आणि पंथाचें कवण लक्षण । विविध करोनि सांगिजे ॥६७॥कोण कळा कोण ध्यान । नादबिंदूचें कवण स्थान । कोण जप कोण स्मरण । हें निवेदन मज करीं ॥६८॥कोणता ग्रास कोणतें सुख । कवण तें पान कवण तें मुख । काय जाळून केली राख । हेंही अवश्य निरोपी ॥६९॥कवण दंड करी धारण । झोळी कोणती केली ग्रहण । कोणती कथा कोणती कौपीन । शैली शृंगी कोणती ॥७०॥कोणती मुद्रा कोणतें पात्र । कोणती धुनी अहोरात्र । निशिदिनीं स्मरतां कोणता मंत्र । आणि स्वतंत्र कोण तो ॥७१॥कोणता योगिया विटाळ । कोणता भास भासेल अखिळ । कोणता त्याग असे अढळ । सांगें प्रांजळकरुन ॥७२॥यावरी कानीफनाथ वदत । सद्गुरु जालंधरी समर्थ । अलक्षमुद्रा जे विख्यात । मूळबंदी आसन जें ॥७३॥सर्वाद्य जो नाथपंथ । साधकां दावी जो परमार्थ । त्याचे लक्षणाची मात । अनिर्वाच्य जाण पैं ॥७४॥योगकळा जे सत्रावी । तेचि योगिया पान करवी । हातहटवटी चोजवी । सत्रावी जे निजजनीं ॥७५॥पश्चिममार्गी आमुची गति । अनुहतनाद अनुदिनीं होती । ऊर्ध्व दृष्टि सहजस्थिति । सोऽहं निश्चिती जपे सदा ॥७६॥पिंडपिंडाचाही ग्रास । हा तों नाथसांप्रदायी दंश । सुख जाणा अविनाश । उन्मनीरहस्य जाण पां ॥७७॥लंबिका अवलंबोनि सत्वर । ब्रह्मरंध्रीचा जो पाझर । करोनि नीरपान निरंतर । काकीमुखातें वोळखी ॥७८॥अहंपणा जाळून केली राख । सर्वांगी चर्चिली सुरेख । सबाह्य वैराग्य तेणें चोख । अजपा अवश्य माळाही ॥७९॥बोधदंड वसविला हातीं । झोळी तेचि सारी मुक्ति । पंचतत्त्वीं विराजती । तेचि मेखळा साजिरी ॥८०॥सिध्दासनाची कौपीन । तुर्या शैली विराजमान । अर्धमात्रा शृंगी गहन । यथानुभवें कथियेली ॥८१॥हंससोऽहं मुद्राश्रवणी । सद्बोधपात्र वसे पाणीं । सोऽहंस्मरणी आननीं । सदा ब्रह्मास्मि वर्तत ॥८२॥ब्रह्माग्नि प्रदीप्त सर्वकाळ । तेचि धुनी प्रज्वळित अनळ । अविद्येचा आम्हां विटाळ । सदा सोवळें अनुश्रुत ॥८३॥ब्रह्मैव सत्य हा चिदाभास । जगन्मिथ्या आभास । ओतप्रोत ब्रह्म अविनाश । सदा संचरलें सबाह्य ॥८४॥मनोलय वासनात्याग । हेंचि योगियाचें सौभाग्य । हें नसतां दौर्भाग्य । तरी केवीं पावती स्वरुपा ॥८५॥॥नवद्वारीं फिरोन फेरी । भ्रमरगुहा दशमद्वारीं । तेथें सद्गुरु जालंधरी । ब्रह्मरंध्री गुहा ते ॥८६॥यावरी कानीफ पुसे सगुण । गुह्य ते प्रगट करोन ज्ञान । कोण सद्गुरु पंथखूण । निरोपण करणें उचित ॥८७॥कवण योग मुद्रा कोणती । कवण पंथ कोठें स्थिति । कोठें कोणकोणाची गति । नाद होती पैं कोठें ॥८८॥कोणतें ब्रह्म कवण ते ज्योति । काळ कोण विद्या कोणती । कोठें मनपवन सामावती । हें निश्चितीं सांगावें ॥८९॥नादबिंदूंचें स्थान कवण । कोन कळा काय लक्षण । कैसें करावें कल्पसाधन । काय दमन करावें ॥९०॥यावरी गोरक्ष देती उत्तर । जो अधऊर्ध्वाहून पर । जो रुप देखें अगोचर । तोचि मत्स्येंद्र सद्गुरु ॥९१॥आदिनाथापासोन प्रवाहे । भवानी भगीरथ यंत्रे लाहे । तोचि सदय मज पाहे । तोचि संदर्प मजलागी ॥९२॥जेथें जीवशिवाचा संयोग । तोचि निगमपंथ योगसांग । मुद्रा खेचरी मीन मार्ग । त्रिकुटी स्थिती आमुची ॥९३॥मनपवनाचे संगती जाण । सहस्त्रदळीं होतसे गमन । तेथें हे अनुहतवाद्य अनुदिन । अहं ब्रह्म स्वयेंचि ॥९४॥ज्योति पुससी परंज्योति । कळा चित्कळा मात्रा शक्ति । मनपवन ब्रह्मरंर्ध्री स्थिति । नादबिंदू स्थान तें ॥९५॥ओघ पीयूष दशमद्वारीं । लंबिकामार्गे जो पान करी । तोचि चिरंजीव कल्पवरी । ते कल्पासन बोलिजे ॥९६॥निग्रहकरोनि इंद्रियदमन । सर्वोत्कृष्ट हे साधन । तूं तरी ऐश्वर्यसंपन्न । वैराग्य लक्षण नव्हे हें ॥९७॥भववैभवीं वैराग्य सांग । केवीं घडे हा वज्रयोग । घृतकुंभाग्निसंयोग । कैसें घडे हें सांग पां ॥९८॥कासया योग्या वैभवराज्य । योगिया त्रैलोक्य साम्राज्य । ऐहिक सुखा होती सज्ज । परमलाज योगिया ॥९९॥यावरी जालंधरीचा कुमर । देता झाला प्रत्युत्तर । वृत्ति गुरुपदीं निरंतर । वैभवत्रय मग कैचें ॥१००॥विदेह सदेह राज्य करी । परि अलिप्त राहे निजांतरीं । जेवीं शय्यागमनीं जाय नारी । अळंकारवैभवीं आरक्त ॥१॥जळीं पद्मपत्र दिसे लिप्त । पाहूं जातां तें अलिप्त । हा नाथघरींचा मंत्र गुप्त । गुरुकृपें प्राप्त होतसे ॥२॥जितेंद्रिय ब्रह्मचारी । तोचि अतींद्रिय निर्धारी । जो निर्लोभ निजांतरीं । तेथें सिध्दि तिष्ठती ॥३॥दग्धपटघडी जैसी । उकलितां न ये परि जैसी । मग इंद्रियादि तैसीं । भस्मतुल्य भासतीं ॥४॥तापसयोगिया विषयलाज । तरी मल्लाळदेशींचा मत्स्येंद्रराज । स्त्रीभोग भोगिती सहज । हें काय योग्य योगिया ॥५॥परिमळा आणि चंद्रकळा । जेवीं शचीभोग आखंडला । तेवी भोगी सुखसोहळा । मत्स्येंद्रचंद्रा लांछन ॥६॥स्वधर्म हा योगाचरण । परधर्म हा दुराचरण । याचि मार्गे करावें विचरण । विहिताचारें वर्तावें ॥७॥यावरी गोरक्ष तया वदती । दोष लाविसी नाथाप्रति । जो अव्यक्त न ये व्यक्ती । निर्मळ स्फटिक ज्यापरी ॥८॥स्फटिकास होतां उपाधिसंग । उपाधीसवें भासे तदंग । वस्तुतां होय तो निःसंग । संग रंगाविरहित ॥९॥सर्वरसभोक्ता दिनकर । आणि सर्वभक्ष वैश्वानर । तैसेचि जाण योगेश्वर । शुभाशुभ कर्मे नातळती ॥११०॥पावक सर्वभक्ष परि पवित्र । तैसा निर्दोष श्रीमत्स्येंद्र । दुर्वास करी निराहार । साठी खंडया भक्षोनि ॥११॥कृष्णें भोगिल्या बहुत नारी । परि तो अलिप्त ब्रह्मचारी । तैसीच आहे हेही परी । निर्धारेंसीं जाण पां ॥१२॥आपुलें न जाणें गृहलांछ्न । पराचे पाहे दोषगुण । नाथघरींचें पाहसी न्यून । धन्य धन्य रे गुरुपुत्रा ॥१३॥तूं भोगिसी सर्व संपत्ति । आणि गोपेंदूनें जालंधराप्रति । अश्वमळमूत्रगर्ती । निक्षेपिलें पापिष्ठें ॥१४॥सद्गुरु भोगी दुःखापदा । तूं भोगिसी सकळ संपदा । परि आम्हां लाविसी शब्दबाधा । हें काय योग्य तुजप्रति ॥१५॥ऐकोनि गुरुवार्ता शब्द स्पष्ट । कानीफ दाटला सद्गदकंठ । नेत्राश्रु स्त्रवती पटपट । रोमांच उठती सर्वांगीं ॥१६॥कानीफ बोले यावरी । अविनाश माझा जालंधरीं । यावत्पृथ्वीचंद्रार्कवरी । चिरंजीव चिरकाळ ॥१७॥पुन्हा गोरक्ष देती उत्तर । जो अधऊर्ध्वाहून पर । जो रुपें वेषें अगोचर । तो श्रीमत्स्येंद्र जाणिजे ॥१८॥जेवीं देवांमाजी देवेंद्र । कीं नगरामाजीं नरेंद्र । की खगांमाजी खगेंद्र । योगियांत मत्स्येंद्र जाणिजे ॥१९॥कानीफ म्हणे असावा लोभ । मम शब्दाचा न यावा क्षोम । पुनर्दर्शनाचा लाभ । समारंभे देईजे ॥१२०॥परस्परें हेचि खूण । मत्स्येंद्रा आणावें आपण । मीही जालंधरीलागून । नाथमेळयास आणितों ॥२१॥कानीफें करुनी वंदन । गोरक्ष देती आलिंगन अन्योन्य असावी विभिन्न । आदेश म्हणोनि जातसे ॥२२॥गोरक्ष दक्षिणे करिती गमन । कानीफ जातसे उत्तर लक्षून । सेबासमुदाय सवे घेऊन । प्रस्थानभेरी गाजल्या ॥२३॥ राजे उठावले भारी । म्हणती लुटुन आणुं कांचनपुरी । गोपेंदु तये अवसरीं । धरुन आणूं गुरुआज्ञें ॥२४॥वीर उठिले बळियाढे । सद्गुरुकृपेचें बळ गाढें । म्हणती कृतांत काय आम्हांपुढें । मशक बापुडें गोपेंदु ॥२५॥एक वदती प्रतिज्ञोत्तरीं । पालथी घालूं कांचनपुरी । मोठा म्हणविता धनुर्धारी । त्रैलोक्यचंद्रपुत्र तो ॥२६॥तरी आज रणरंगणीं । युध्दचातुर्य तीक्ष्णबाणीं । महायोध्दा ऐकिला श्रवणीं । तो आज लोचनीं पाहूं पैं ॥२७॥कोणी बोलती ऐका वचन । विचारधैर्य हें बुध्दिलक्षण । सामदामदंडभेदन । हे विचक्षण राहाटली ॥२८॥मग कानीफ क्रोधयुक्त बोले । कर्म तया फळासी आलें । गुरुहत्या केली खळें । मृत्यु सबळ आणिला ॥२९॥समर्थासी करितां विरोध । तरी परिणाम केवीं शुध्द । महद्दोष कृतापराध । बध्द तो मुक्त कैसेनि ॥१३०॥अनुचित आरंभिलें कर्म । स्वजनासी वैर करी परम । प्रमदा विश्वासी नेम । मृत्युद्वारें चत्वारी ॥३१॥सर्पफणीचिये छाये । मूषक केवीं सजीव राहे । कीं व्याळपुच्छीं पडतां पाय । तरी अपाय रोकडा ॥३२॥सिंहमुखीं घालितां हात । तो केवीं वाचे निवांत । तैसा आपलाच केला घात । विषप्रचीति पाहिली ॥३३॥जो महाराज जालंधरी । पूर्णब्रह्म लीलावतारी । तो न बुडे न जळे न तुटे शस्त्री । निजानंदरुपी अक्षयी ॥३४॥जेवीं भाद्रपदचतुर्थीसी । न विलोकी शशीमुखासी । तेवीं गोपेंदुवदनासी । न पाहें मी सर्वथा ॥३५॥तो गुरुअपराधी परमपातकी । त्यांचे नाम न घ्यावें मुखीं । दृष्टी देखतां क्रोध पावे कीं । भस्म होईल क्षणांत ॥३६॥परि विचार एक असे आणिक । मैनावतीतें होईल दुःख । स्वात्म भगिनीतें आवश्यक । तीतें वार्ता जाणवूं ॥३७॥शिष्टाई सच्छिष्य सुबुध्दु । आधीं पाठवोनि करावा बोधु । ना तरी चातुरंग सेनासिंधु । युध्द सत्राणें होईल ॥३८॥जयंतीनाथ अतिनेचका । शब्दकुशळ धूर्त बोलका । तया बोधून शतमूर्खा । शिक्षा लावी पैं ऐसी ॥३९॥शिष्यपंचक प्रेरिलें तेथें । इकडे शुभचिन्ह मैनावतीतें । वामनेत्र बाहुस्फुरणातें । वारंवार होतसे ॥१४०॥सभागर्भी अकस्मात । येते झाले जयंतीनाथ । देदीप्यमान पांचही आदित्य । उदय पावले पैं जैसे ॥४१॥जटामंडित दंडपाणि । भस्मभूषित काषायवसनीं । शैली शृंगी मुद्रा श्रवणीं । मृगाजिनें शोभलीं ॥४२॥उभयभागीं सभाजन । उभे तिष्ठती कर जोडून । राव करी साष्टांग नमन । परि आशीर्वाद वचन न देती ॥४३॥नृपें आणिले कनकासन । अर्ध्यपाद्यादि पूजन । तेंही सर्वथा न करिती ग्रहण । परमद्रोही आग्रही ॥४४॥तयाची निरखोन सक्रोध दृष्टि । सारक्तता नेत्रपुटीं परम भयाभीत झाला पोटी । विस्मित साशंक होतसे ॥४५॥राव म्हणे कवणापराध । तोचि मजसी करावा बोध । बुध्दितर्का न लभे शोध । किमर्थ क्रोध निजदासा ॥४६॥मग म्हणे नृपाधमा । नेणून नाथप्रतापमहिमा । भस्म होऊनि जासी धामा । वैवस्वताचे ये वेळी ॥४७॥अरे कृतघ्ना मळिना मूर्खा । काळिमा लाविली पूर्वजमुखा । कृतापराधी दुर्जना मशका । चेष्टा केली श्रेष्ठाची ॥४८॥असंख्य घेऊन दळभार । पातला जालंधरीचा कुमर । कृतांतही न ये समोर । ब्रह्मांड जाळील पैं ऐसें ॥४९॥कोपी तरी जमदग्नि । शापी तरी दुर्वासमुनि । तपी विश्वामित्रचि मानी । अग्निसम तेजस्वी ॥१५०॥केलें कर्म फळासी आलें । दुष्कर्म पुढें उभें ठाकलें । काळें बोलावणें पाठविलें । तें कैसें फिरेल माघारा ॥५१॥जेवीं शमीकऋषीचे शिष्य । सांगूं पातले मृत्युभविष्य । परीक्षितीनें परमाआयास । यत्नें जीव संरक्षी ॥५२॥सप्तमदिवसाचा नेमिला नेम । तेवी वोढवलें तुझें कर्म । सकळ नरांत तूं अधम । दुष्ट राहाटी राहाटसी ॥५३॥आज जरी येत क्षमेचें कारण । तरी तूं मैनावतीचा पुत्र म्हणून । नाही तरी तात्काळ मरण । तुज येतें निश्चयें ॥५४॥सरला आयुष्याचा संशय । केलासी महत्पातक समुदाय । कृतापराधें झाला अपाय । विचारें पाहें मानसी ॥५५॥राजमदें उन्मत्तपणें । दुष्ट आचरलास दुष्टाचरणें । आतां घेई याचें उसणे । सर्वथा अन्य नव्हे हें ॥५६॥जेणें केलें विषप्राशन । तेचि मृत्युचें आमंत्रान । तो तंव तत्काळ पावे मरण । येथें संशय कासया ॥५७॥महत् अपराध्द कैसा वाचे । येथें न चले देवत्रयाचें । करीं सार्थक देहाचें । तेणें सुख परत्रीं ॥५८॥खटांग आणि पुरंजन । इही साधिलें जें साधन । तेंचि आचरे तूं आचरण । सार्थक करी देहाचें ॥५९॥शुकमुखें सप्ताहा परीक्षिति । परिसून परत्र पावला भूपति । सत्संग साधून ऐसे रीती । अंतकाळ सत्काळ घालवी ॥१६०॥ कानीफ वडवाग्नीचिये पुढे । नवनीत राव तूं बापुडें । पडिलास काळरुद्राचिये दाढे । येथून कैसें वाचसी ॥६१॥परशधरें मातृकैवार । निःक्षत्री केली मही निर्वैर । कीं जन्मेजय सर्पवैर । सूड घेत पितयाचा ॥६२॥राक्षससत्र पाराशर । करिता जाला ऋषीश्वर । तैसाचि दिसे हाही प्रकार । महाअनर्थ होईल ॥६३॥कंठ झाला सद्गद । नेत्राश्रु परमखेद । मौनमुद्रें थोकला स्तब्ध । गात्री स्वेद दाटला ॥६४॥राव भयाभीत मानसीं । रोमांचस्फुरण सर्वांगासी । कृतापराध स्मरण मानसी । अधोवदन विलोकी ॥६५॥इकडे कानीफ येऊनि उपवनी । शिष्य प्रेषिता झाला दोनी । तिहीं येऊनि राजसदनीं । राजजननी वंदिली ॥६६॥आदेश करोनि अन्योन्य । मैनावती सद्भावें अनन्य । म्हणे आजिचा दिवस परम धन्य । दुःख दैन्य विघडलें ॥६७॥जेवीं जानकीशुध्दी मारुति । तेवीं पातल्या नाथमूर्ति । निशी क्रमतां गभस्ति । उदया येतसे ज्यापरी ॥६८॥स्वागत क्षेम पुसोनि तया । म्हणे कानीफ असती कवणे ठाया । कैं देखेन तयाचे पायां । तो स्थानापन्न गुरुच्या ॥६९॥जो भवरोगातें धन्वंतरी । पंचभूतांचा पंचाक्षरी । ऐसा सद्गुरु जालंधरी । कैं दृष्टी देखेन मी ॥१७०॥प्रपंचसमुद्रीं सद्गुरुनौका । पार करिती हेचि लोका । परि आज तिमिर झाले लोकां । सद्गुरुकारणें नेणती ॥७१॥भववैभवापासोनि झडकरी । सोडवी ऐसा जालंधरी । हा निश्चय दृढ अंतरीं । सदा निर्धारी असे पैं ॥७२॥स्मरारिनाथ म्हणे माते । वदसी तितुकें होय सत्य तें । परि तव पुत्रें जालंधरीतें । कूपी टाकिलें नेणसी ॥७३॥ऐकोनि पडिली निचेष्टित । उभयपक्षी झालें विपरीत । तंव वदे स्मरारिनाथ । विचार करी जननिये ॥७४॥८॥तो महाराज सर्वज्ञ । जाणी भूत भविष्य वर्तमान । तयासी कैचें जरामरण । तो सनातन अक्षयी ॥७५॥परि तव पुत्राचें होईल कैसें । येणें उद्विग्न मी मानसीं असें । उभयपक्षीं घेई यश । ऐसें करी सुजाणें ॥७६॥कानीफनाथांतें जाऊन शरण । पुत्राचें चुकवी जन्ममरण । येणें इहपरत्र म्हणती धन्य । कीर्ति जघन्य अक्षयी ॥७७॥सभा विसर्जोनि राय । भयाभीत होवोनि विनय । मातृदर्शना शीघ्र जाय । सद्गद होय कंठ पैं ॥७८॥मनीं म्हणे ही महासती । शापूनि भस्म करील मजप्रति । असो कुपुत्र मी निश्चितीं । कुमाता ते नव्हेचि ॥७९॥मातेसी दंडप्राय दंडवत । करिता झाला नृपनाथ । मग वंदोनि कामारिनाथ । बध्दहस्तें ठाकला ॥१८०॥यावरी वदे नाथकामारी । कूपीं निक्षेपिलें जालंधरी । भला रे भला ये अवसरीं । परम पुरुषार्थ देखिला ॥८१॥अघटित केलें दुराचरण । आतां तूं होसी म्लानवदन । भूचरीमुद्रा अवलंबोन । मौनव्रत धरियेलें ॥८२॥राज्यमदें मदोन्मत्त । मदांध होवोनि झालासी भ्रांत । कर्म केलें अनुचित । याचें आतां फळ भोगी ॥८३॥जेवीं द्वारी आणिला तस्कर । अधोवदनी चिंतातुर । तैसा गोपेंदु नृपवर । स्वापराधें लज्जित ॥८४॥मग उठोनियां तत्काळ । मैनावती जाय उतावेळ । नेत्रें वोहोनियां सजल । शिबिकायानी बैसली ॥८५॥कानीफ असतां उपवनीं । तेथें पातली नृपाळजननी । चरणीं ठेवूनि सदृढ मूर्ध्नि । आदेश आदेश वदतसे ॥८६॥म्हणे अद्य मे सफलं जन्म । अद्य मे सफलं कर्म । अद्य मे सफलं धर्म । अद्य मे सफलं तप ॥८७॥वरचेवरी मौळ धरोन । सप्रेम देतसे आलिंगन । प्रार्थीतसे मधुर वचन । नगरासन्निध चलावें ॥८८॥अवश्य म्हणोनि तदोत्तर । सुरस देखिलें नदीतीर । वेगळीं असतीं सरोवरें । तुंबळ भरिलीं जळानें ॥८९॥माजीं रातोत्पळें श्वेतोत्पळें । पीतोत्पळें सहस्त्रदळें । वरी फिरती अळिकुळें । गुंजारव सुशब्दें ॥१९०॥तटीं कर्पूर कर्दळी आवळी आम्र । पत्री सफळित झाली नम्र । जेवीं कुळीना भाग्य येतां समग्र । विनय असती ज्यापरी ॥९१॥न्यग्रोध पारिजात बकुळी । निंबें नारिंगें बदरी पोफळी । खिरिणिया डवरिल्या पत्री फळीं । जेवीं सफळित श्रीविद्या ॥९२॥तटीं पुष्पवाटीकेची थाटी । नाना सुगंध सुमनें गोमटीं । घमघमीत सुवास चोहटी । अष्टही दिशा कोंदल्या ॥९३॥मालती मोगरे मांदार । जपाकुसुम शेवंती शतपत्र । चंपक केतकी कल्हार । अनेक सुमनी वाटिका ॥९४॥किंक शुक चक्रवाक । काक बदक जवादि बिडाळक । कस्तुरीमृग सुगंधादिक । नंदनवनचि तें केवळ ॥९५॥कोकिळा स्वर आलापिती । मयूर स्वानंदे नृत्य करिती । साळया सुशब्दें संवाद्ती । वृक्षी किजबिजिती पिंगळे ॥९६॥जेवीं सामान्य नरा ऐश्वर्य संपत्ति । येतां तया विकार होती । तेवीं मर्कटें वांकुल्या दाविती । मार्गस्थातें विनोदें ॥९७॥असो दुजें मानससरोवर । तया तटी उभविलें शिबिर । विद्युत्प्राय ध्वजफडत्कार । दुरितापदा धिक्कारिती ॥९८॥असो महंत उतरले नृपाळ । नगर वेष्टूनियां सकळ । सेनासमुद्र कल्पांत काळ । महाप्रळय ज्यापरी ॥९९॥प्रजा प्रधान भयाभीत । म्हणे वोढवला प्रळय कल्पांत । ईश्वरें योजिला हा अनर्थ । कैसें होईल कळेना ॥२००॥परचक्र हें चक्रापरी । वेढिली असे कांचनपुरी । नेणवे काळचक्रापरी । कृतांतवक्त्रीं पडियेलों ॥१॥प्रारब्धें रचिला अपाय । तेथें न चले बुध्दीचा उपाय । ईश्वर करील तरणोपाय । तरीच रक्षण पैं आतां ॥२॥राव परम घाबरला । म्हणें कल्पांत आज वोढवला । आतां शरण जावें सद्गुरुला । मग हो तरी भलतैसें ॥३॥होणार न राहे अन्यथा । सर्वही असे मृत्युपंथा । मृत्यु न चुके सर्वथा । आजि अथवा शतवर्षा ॥४॥विगतअभिमान होऊन । नृप कानीफातें जाय शरण । पादचारी विनयसंपन्न । जाता जाला ते समयीं ॥५॥निकट एकटा टाकूण कटक । पुढें चमके नरनायक । पृथ्वीतटी ठेवी मस्तक । कनकदंड पैं जसा ॥६॥कीं विषमकाळ येतां कठिण । टाकून पळती आश्रितजन । तैसें कानीफभयेंकरुन । गोपेंदु येत एकटा ॥७॥कानीफ म्हणे तुझें नाम । कोणें ठेविलें मूर्ख परम । आणि केले निद्य कर्म । व्यर्थ शिणविली जननीं त्वां ॥८॥अपर त्रैलोक्य चंद्रभूप । त्याचए उदरीं तूं पापरुप । तव मुखावलोकनें होय संताप । आतां घेई शाप पैं माझा ॥९॥परमभय पावूनि चित्ती । अभय वोपी म्हणे मैनावती । वारंवार मस्तक क्षिती । ठेविती झाली तेधवां ॥२१०॥यावरी मैनावती वदे वचन । कृतापराधी आलिया शरण । यासी स्वहस्तें करावें दंडण । परी मृत्यु हस्तीं न द्यावा ॥११॥तंव कृपेचे सफ्ळ वृक्षी । कृतांत कायेतें भक्षी । तरी स्वहस्तें तयासि शिक्षी । ब्रीद नुपेक्षी आपुलें ॥१२॥नाथकेसरीचें बाळ । कैसें मारील जंबुककाळ । मग तुम्हातें दीनदयाळ । कोन म्हणेल त्रिलोकीं ॥१३॥अनन्यभावें पातल्या शरण । न धरितां तयाचा अभिमान । मग तुम्ही कैसेन पतितोध्दारण । अपकीर्ति त्रिलोकी ॥१४॥मैनावतीची देखोन ग्लांति । ह्रदयीं द्रवले करुणामूर्ति । मग योजिते झाले तदा युक्ति । नृपसंरक्षणार्थ ते वेळीं ॥१५॥म्हणे निद्रिस्त कीं समाधिस्थ । योगी समर्थादि दैवत । पिशाच आणि नृपनाथ । क्षोभती जागृत करितांही ॥१६॥तरी जननीच्या प्रतिमा । धातुमूर्ति अपार प्रतिमा । लोह ताम्र रजत हेमा । आणवी अप्रतिमाकरोनी ॥१७॥पारडीं घालुनी पालटा । तव तनयाचा भागवाटा । तया लावूण हव्यवाटा । तव पुत्रवपूतें रक्षितों ॥१८॥नंतर करविले चाअ पुतळे । पुत्रवपुतुल्य सुढाळे । कांहीं न्य़ून नसे तिळतुल्य । सुरेख सायुध समसाम्य ॥१९॥साळंकार माल्यांबरभूषण । मृगमद सुगंध स्त्रकचंदन । मुक्तावतंसा विराजमान । दुजा नृपनंदन भासला ॥२२०॥श्रीगोरक्ष संकेत संकेतीं । मैनावतीतें धरुनि हातीं । गुरुचे स्थळीं ते स्थळाप्रति । कानीफ नेती तेथ पैं ॥२१॥अश्वमळमूत्र अद्रिसमान । खनन करोनि पृथ्वीसमान । धरादेवीस देऊनि सन्मान । मान देऊनि पूजिली ॥२२॥गोमय लिंपोनि पवित्र । कुंकुम सडेही पवित्र । रंगमाळा चित्रविचित्र । शोभायमान रेखिल्या ॥२३॥सलंब रोविले कर्दळीस्तंभ । मंडप उभविले चुंबित नभ । प्रकाशमय अतिसुप्रभ । दिव्य पताका डोलती ॥२४॥लोहपुतळा कूपापुढें । करोनि नृप पाठीं दंडे । कानीफ म्हणे वाडेंकोडें । आदेश करी गुरुतें ॥२५॥आदेश उच्चारोनि प्रथम । कूपांतूनि पुसती कोण नाम । गोपेंदु नामें मी अधम । भस्म होसी म्हणतसे ॥२६॥धुम्र उठोन निघती ज्वाळा । धडधडां जळे तो पुतळा । जन आश्चर्य पाहती डोळां । अद्भुत महिमा नाथाचा ॥२७॥जेवीं लोहाचा करोनि भीम । वृकोदरा रक्षी स्वस्तिक्षेम । लोहप्रतिमा करुनि भस्म । गोपेंदु तेवीं रक्षिला ॥२८॥कीं अर्क आच्छादूनी सुदर्शन । संरक्षिला जेवीं तो अर्जुन । कीं गोकुळीं गोवर्धन उचलोन । व्रजौकसांतें संरक्षी ॥२९॥रुद्रें केला मदन दहन । कीं मुचकुंदविवरीं काळयवन । तेवीं लोहपुतळा दुग्ध होऊन । भस्म झाला क्षणार्धे ॥२३०॥ताम्रपुतळा तयापाठीं । ठेविते झाले कूपानिकटीं । पाहून राजा भयाभीत पोटीं । परि मुखीं आदेश उच्चारी ॥३१॥गुरु कोण ऐसें पुसिलें । येरें गोपेंदु नाम जाणविलें । भस्म होईल इही बोले । तो प्रळयाग्नि धडकला ॥३२॥रजत राजमुद्रा ठेविली सांग । राजा उभा तयामागें । आदेश उच्चार करी मग । कूपांतूनि कोण पुसतसे ॥३३॥येरु म्हणे त्रैलोक्यचंद्रतनय । ऐकोन म्हणती भस्म होय । तत्काळ कर्पूरन्याय । जन विस्मित होतसे ॥३४॥नंतर सुवर्नाची राजमूर्ति । उभी केली यथानिगुती । पृष्ठी तिष्ठता झाला नृपति । आदेशोक्ति वदतसे ॥३५॥पुसते झाले आहेस कोण । म्हणे मी गोपेंदु या अभिधान । गुरु देती प्रतिवचन । दग्ध होईं अविलंबें ॥३६॥बध्द पाणि तो नरेश । सद्गुरुतें करी आदेश । पुसती तया कोण आहेस । म्हणे दासानुदास गोपेंदु ॥३७॥ऐकोनि वदती जालंधरी । कैसा वांचलासि अद्यापिवरी । चिरंजीव चंद्रार्कवरी । चिरयुष्य होऊं दे तुझें ॥३८॥मग एकचि झाला जयजयकार । अलक्ष आणि आदेशोच्चार । नमस्कार करोनि वारंवार । प्रदक्षिणाही घालिती ॥३९॥जेवीं जलधिबुंथी त्यागून मित्र । कीं कोशांतूनि देदीप्य शस्त्र । कीं गवसणीं काढितां पाशुपतास्त्र । प्रकाशमय दिसे पैं ॥२४०॥कीं उदयाद्रीहूनि अंबरमणि । देदीप्योदय सहस्त्र किरणीं । तैसा जालंधरी कूपांतूनी । निघतां प्रभा कोंदली ॥४१॥अंबरी अमरादिकांच्या थाटी । विमानयानी देवकोटी । करिते झाले सुमनवृष्टि । आनंदोदधि उचंबळे ॥४२॥होती उल्हाटयंत्राचें शब्द । दुंदुभीनें ब्रह्मांड कोंदे । तुरे वाजतीं मंगळवाद्यें । सुस्वर गाती गायक ॥४३॥नृत्यांगनांचें नृत्य होत । बंदीजन ते कीर्ति वर्णित । ऋषि आशीर्वाद देत । देकर देती अतिथीतें ॥४४॥स्तुतिस्तोत्रीं स्तवन करिती । गज रथीं शर्करा वांटिती । सुवासिनी अक्षय्यवाणें करिताती । म्हणती नृपति वांचला ॥४५॥राज्यालयीं आणिले नाथ । दिव्य सिंहासन रत्नखचित । वरी आरुढविले गुरुनाथ । पूजासाहित्य आणविलें ॥४६॥षोडशोपचारें पूजन । करिता जाला नृपनंदन । अनर्ध्यरत्नी अभिषेकून । स्त्रकचंदनें करोनी ॥४७॥मैनावतीचे करांजुळीं । रत्नें अर्पी पुष्पांजळी । मस्तक ठेवी चरणकमळीं । प्रेमाश्रु जळीं सिंचित ॥४८॥वेदघोष करिती विप्र । मंगळ मंजुळ तुरें सुस्वर । सभा गर्जती जयजयकार । नादें अंबर कोंदलें ॥४९॥कृतार्थ होऊनि अंतःकरण । राजा प्रार्थी कर जोडून । काया वाचा आणि मन । समर्पण केलें स्वामीतें ॥५०॥विगत झाला देहाभिमान । वैराग्योद्भव बळसंपन्न । पश्चात्तापसंभव मन । सद्गद कंठ दाटला ॥५१॥पाहतां हा नैश्वर्य देह । चिरकाळ मानी हे विषय । अकाळकाळ काळभय । मृत्युअपाय ते नेणती ॥५२॥प्रपंचतरुचीं फळें गोमटीं । होती दुःखप्रद अतिशेवटी । स्वल्पसुख परि ती ओखटी । तुटी पाडिती स्वसुखातें ॥५३॥सघन अभ्राची शीतळ छाया । क्षणिक भासे जातसे विलया । तैसी गृहधनसुतजाया । मोहमाया लटकी ही ॥५४॥कैचा राजा कैचा रंक । जगदाभास मिथ्या माय्क । प्रपंची मानुनी सुखकौतुक । व्यर्थ गुंतलो भवपाशी ॥५५॥त्राहे त्राहे सद्गुरु समर्था । मां पाहे पाहे कृपावंता । पुरे पुरे ही प्रपंचव्यथा सोडवीं आतां येथुनी ॥५६॥ऐसें प्रार्थितां नृपाळ । यावरी वदती दीनदयाळ । या वैराग्यांत काय फळ । श्रम केवळ पावसी ॥५७॥अनंत्त तपाचिये अंतीं । तैं नरदेही झालासे नृपति । याचें फळ सुखसंपत्ति । वैराग्यविपत्ति बहुसाळ ॥५८॥विषयविलासी तव वासना । विकारमन्मथाच्या वेदना । व्यर्थ त्यागिसी विव्यांगना । चंद्रानना स्त्रियांतें ॥५९॥त्यागोनियां राजवैभवें । आणि चिरकाळ दुःख भोगावें । या वैराग्याचें काय घ्यावें । सुखी असावें प्रपंची ॥२६०॥ यावरी वदे नृपनाथ । त्रिविधतापें मी संतप्त । मज कासया हें विषयघृत । नवज्वरिता वावडें ॥६१॥मज न गमे राज्य सौभाग्य । मनें इच्छिलें वैराग्य भाग्य । सर्वस्वाचा करोनि त्याग । योगानुराग मज असे ॥६२॥देवोनि विषयभातुक । ठकवी माता जेवीं अर्भक । तेवीं झकवितसां मज कौतुक । परि निःशक शरण मी ॥६३॥विषयत्रासें वश्य अवश्य । शरण पातलों निरालस्य । अहर्निशीं करीन दास्य । सेव्य सेवा स्वामीची ॥६४॥होणार न चुके बलोत्तर । पुर्वसुकृताचा संस्कार । दुर्बुध्दि होतसे तदनुसार । सत्ता स्वतंत्र तुमची ॥६५॥यावरी म्हणती सद्गुरुनाथ । तूं तरी अससी विषयासक्त । कैसेनि घडे परमार्थ । अनर्थ कारक इंद्रियें ॥६६॥मनातें विषयांचा सहवास । तोचि इंद्रियांतें अवश्य । तेणे होतसे बुध्दिभ्रंश । नाशकर्त्री वैराग्याचा ॥६७॥विषय आवडी तुझिया मना । तावत्पूर्वी ते वासना । विरहस्मृति दुःखवेदना । नाश करिती वैराग्या ॥६८॥इंद्रियांचा विकार शांत । तें वैराग्य निभ्रांत । वृत्ति शांत तया विश्रांत । शांत होती निश्चय ॥६९॥योग तेथें नसे भोग । भोग तेथें वसे रोग । रोग तेथें दुःख सांग । कैचें वैराग्य मग तेथें ॥२७०॥मैनावती म्हणे गुरुवर्या । पदीं कुर्वाळीन माझी काया । दीक्षानुग्रह करोन तनया । या भवभयातें हरावें ॥७१॥जयासी देहाभिमान सुटला । तोचि प्रपंची विटला । सदा निजबोधें दाटला । कोंदाटला निजसुखें ॥७२॥धन्य धन्य तेचि जननी । पुत्राच्या सोडवी जन्मश्रेणी । चिरंजीव करावें ये मेदिनीं । ऐसी जननी दुर्लभ ॥७३॥मातृआज्ञा होतां सवेग । सर्वस्व करी त्याचा त्याग । तत्काळ घेऊन वैराग्य । वस्त्रें भूषणें टाकिलीं ॥७४॥मुकुट कुंडले टाकिली सैरावैरा । झुगारिला मोतियांचा तुरा । त्यागून दिव्य पीतांबरा । भस्म शरीरा चर्चिलें ॥७५॥ निश्चय देखून उभयांचा । हेलावला सिंधु दयेचा । पुसते झाले गुरु त्रिवाचा । त्याग सर्वाचा म्हणोनी ॥७६॥काया वाचा मनाची आर्त । स्वामी संतापलों शरणागत । उपदेश देऊन परमार्थ । नाथपंथ दाखवावा ॥७७॥शुध्द देखूनि अंतःकरण । करिते झाले पीठ स्थापन । आच्छादोनि उन्मनी वसन । दिव्यमंत्र दिधला ॥७८॥नेत्रीं सूदलें मुद्रांजन । तव पाहे निधान निरंजन । तेथें आमनाचे रंजन । योगीजन जाणती ॥७९॥जेथें अनुहताचे दशविध शब्द । सुस्वर मंजुळ सोलीव नाद । सुप्रभ शशिसूर्य अनेकवृंद । अशब्द सुख तेथिचें ॥२८०॥नाथदीक्षा शैली शृंगी । मुद्रा भस्म भव्य अंगी । गोपेंदु राजा होऊनि योगी । योगमार्गी निघाला ॥८१॥सर्वस्वाचा करोनि त्याग । तिरस्कारोनि विषयभोग । गोपेंदुनें घेतला जोग । वैराग्य अंगी बाणलें ॥८२॥राज्याधिकार धिक्कारोन । स्वअंगें योग स्वीकारुन । ऐश्वर्य नैश्वर्य जाणून । देह गेह मिथ्याही ॥८३॥परमरमणीक नाथदीक्षा । झोळी घेऊन मागे भिक्षा । कर्मा अकर्मा लावोनि शिक्षा । योगपक्षा अनुसरला ॥८४॥झाला एकचि जयजयकार । अलक्ष शब्द वारंवार । आदेश आदिपुरुष उच्चार । स्वयें नृपवर करीतसे ॥८५॥आधींच लावण्याची सीग । त्यावरी घेतला जोग । स्वरुप पाहून विटे अनंग । जाळी अंग आपुलें ॥८६॥हा अध्याय करितां श्रवण मनन । तुटे जन्ममृत्यूचें बंधन । एकाग्र देतां अवधान । बोधसंपन्न होतसे ॥८७॥कथारहस्य सुखदायक । पंचमहादोषांसी दाहक । सदा परिसती पुण्यश्लोक । परमादरें करुनी ॥८८॥कथा श्रियेचा शृंगार । इतिहासरुपें अळंकार । श्रवणद्वाराचे करोनि नेत्र । उलट मुद्रें पाहावें ॥८९॥केवळ कथा गंगारुप । श्रवणें जळती त्रिविधताप । वैराग्ययुक्त पश्चात्ताप । होय मुमुक्षु क्षणार्धे ॥२९०॥हा अध्याय होय विसावा । श्रांत विश्रांत हा विसावा । पठणमात्रें बोधवैभवा । स्वसुख राणिवा पावती ॥९१॥पुढें कथा परम गहन । सर्व सुखाचे आयतन । ह्र्न्मांदुसीं करा जतन । निजधन ठेवणें ठेविजे ॥९२॥सुरस नाथलीलाग्रंथसागर । गोपेंदुआख्यान परम नागर । जें कैवल्य सुखाचें सुखागार । कीं वैराग्यनगर बोधाचें ॥९३॥श्रीमत् आदिनाथलीलाग्रंथ । गोपेंदुआख्यान जगविख्यात । भैरवपदीं आदिनाथ । विंशति अध्यायीं वंदिला ॥९४॥इति श्रीमन्नाथलीलामृत ग्रंथ । संमत सिध्दसिध्दांत । श्रवण करोन साधुसंत । विंशति अध्याय गोड हा ॥२९५॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP