मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत| अध्याय १ ला श्रीनाथलीलामृत प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय १ ला नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. Tags : adinathagorakshanathaआदिनाथगोरक्षनाथ अध्याय १ ला Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥मूर्धान्मायगुरोः पदं भगवतश्वोंकारसिंहासनम् । सिध्दाचारसमस्तवेदमथनं षट्चक्रसंचारणम् ।अद्वैतस्फुरणप्रसादरमणं पूर्णप्रभाशोभितम् । शांतं सद्गतिदायकं भज मनश्वैतन्यचंद्रोदयम् ॥१॥ॐ नमो जी आदि परात्परा । सर्ववंद्या अगोचरा । वेदप्रतिपाद्या निर्विकारा । आदिवंद्या जगत्पते ॥१॥तूंचि गणेश चित्समुद्र । तरंग ब्रह्मास्मीति साचार । तेचि ब्रह्मतनया सुंदर । मूळमाया प्रकृति जे ॥२॥तूं आदिमायेचा नियंता । त्रिगुणात्म देव निर्मिता । अनंत ब्रह्मांडें रचिता । तूंचि होसी सर्वदा ॥३॥जगन्मंगल मंगलमूर्ति । मंगळनामीं मंगळकीर्ति । मंगळाधीशा मंगळस्फूर्ति । मंगळप्रदा मंगळा ॥४॥जयजयाजी गजवदना । सुत्सुखसदना विघ्नकदना । बिबुधवंदना शिवनंदना । दासानुमोदना तूं होसी ॥५॥अरुणसंध्यारागवर्ण । गजानना तुझे कोमल चरण । रुणझुणीत पदभूषण । शुभ्रवसन शोभलें ॥६॥विशाळ दोंद चतुर्भुज । हसतभूषणांकित सतेज । परशांकुश तेजःपुंज । मुक्तमाळा डोलती ॥७॥ह्रदयपदक चंद्रापरी । मुक्ताक्षेणिया नक्षत्रसरी । शुंडा सरळ साजिरी । गंडस्थळें मिरवतीं ॥८॥मणिमय मुकुट झळाळ । रत्नश्रेणी फांकती किळ । इंद्रनीळ मुकुटीं तेजाळ । दुर्वांकुरें विखुरलीं ॥९॥सर्वांगी सिंदुर चर्चिला । अरुणोदयरंगी रंगला । भाळी स्त्रकूचंदन शोभला । मृगमदतिलक त्यावरी ॥१०॥द्वितीयांबर शुभ्र तगट । तडित्प्राय लखलखाट । कंठी नागबंध सुभट । एकदंत झळके पैं ॥११॥गजास्याचें पाहोनि तांडव । तोषोनि प्रसन्न अपर्णाधव । टाळ घेती सकळ देव । उभे ठाकती तत्पर ॥१२॥ऐसी तूं वरद मूर्ति । वर देई ग्रंथाप्रति । सदयह्र्दय तूं गणपति । म्हणोनि प्रार्थी अनन्य ॥१३॥श्रीमान् सिध्दिबुध्दिरमण । प्रसन्न झाला मजकारण । अभय देऊनियां पूर्ण । ग्रंथ करवी मज हस्तें ॥१४॥आतां वंदूं वेदजननी । ब्रह्मचित्कळा ब्रह्मास्मि ध्वनि । ते प्रकृति प्रणवरुपिणी । शारदावेष अवगमी ॥१५॥हंसगमनी हंसवाहिनी । हंससोऽहंस्वरुपिणी । अहंसोऽहं भास दोन्ही । नाशी जननी माझी हे ॥१६॥कुंदेंदुतुषारहारधवल । शुक्लांबरधारिणी सोज्वळ । वीणापुस्तक करयुगल । लीलाकमल हस्तकीं ॥१७॥पद्मासनी पद्मनयनी । पद्मपद्मि पद्मभूषणी । पद्माननी पद्मोद्भवनंदिनी । पदपद्मीं मूर्ध्नी ठेवितों ॥१८॥शुभ्र अळंकार शुह्र वसन । शुभ्र आसन शुभ्र भूषण । शुभ्र सौंदर्य शुभ्र वहन । शुभ्र यश तव असे ॥१९॥ब्रह्मा विष्णु शंकर । त्रिदशसह पुरंदर । तूंतें वंदिती निरंतर । वंद्य वंदून तिष्ठती ॥२०॥तुझें ऐकोनियां गायन । देव दानव तल्लीन । किन्नर गंधर्व अप्सरा मौन । धरोनि तिष्ठती तव सेवे ॥२१॥तव पादपद्म जेथें पडे । वसंतवृंद सुरवाडे । रुंजी घालितों वाडेकोडे । तुझें रुपडें अनुपम्य ॥२२॥तुझी कृपादृष्टि कल्पतरू । मी होईन सुरगुरु । दरिद्री लाभे सुवर्णमेरु । जन्मांध परीक्षी रत्नातें ॥२३॥यावरी नमूं वागेश्वरी । शब्दब्रह्मसिंधुलहरीं । तूं चहूं वाणींची ईश्वरी । ग्रंथाभिमान तुज असे ॥२४॥माझी जडबुध्दि विध्वंस करी । सुरसाळ वदवी वैखरी । काय न करिसी तूं निर्धारी ॥ जगन्माये तुज नमो ॥२५॥आतां जिव्हाग्री बैस निरंतर । श्रोतयां विद्वज्जनां पाहुणेर । मजकरवीं तूंचि देणार । श्रवणशृंगार लेववी ॥२६॥जननी तुझ्या अभयें करुन । श्रोतयां देत आमंत्रण । न्यूनपणाचा अभिमान । भार तूंतें असे पैं ॥२७॥आतां वंदूं श्रीगुरु भैरव । तुझे वाक्यामृतें गौरव । अनेक जीवांचे रौरव । नाममात्र चुकवी जो ॥२८॥तो सद्गुरुनाथ समर्थ । त्याचे प्रसादें की कृतार्थ । मम मानसमनोरथ । बैसोनि सारथ्य करी तो ॥२९॥ज्याची समुद्रवलयांत कीर्ति । मी काय वर्णूं अल्पमति । स्वस्वार्थाचे आर्ति । करी स्तुति यथाबुध्दि ॥३०॥तो सदगुरु भैरवाख्य मूर्ति । माता माझी आदिशक्ति । तो आदिपुरुष प्रकृति । माता पिता वंदिली ॥३१॥आधीं सुवर्ण वरी सुगंध । पिता तो गुरु प्रसिध्द । ज्याचें सामर्थ्य अगाध । भूमंडळी जाणती ॥३२॥जो अद्वेष्टा भूतमात्रीं । मातृवत् मानी परस्त्री । हेम लोष्ट समान नेत्रीं । सबाह्यदृष्टि सारखी ॥३३॥क्षमाशांतीचा समुद्र । अघसंहरणीं प्रतापरुद्र । दयेचा शीतळ चंद्र । धैर्यत्व धर्ता धरोपम ॥३४॥योगसाधनाचा मेरु । औदार्यविषयीं कल्पतरु । निर्लोभ माझा सद्गुरु । ग्रंथतरु वाढवी जो ॥३५॥आतां वंदूं कुळदेवता । श्रीमार्तंड भैरव तुळजा समर्था । त्यांसि विनयें शरण जातां । अभय ग्रंथ तयाचा ॥३६॥याव्री वंदितों ऋषिजन । वाल्मीक दिव्यांश भगवान । वेदांतनिपुण पुराण । ग्रंथकर्ते वंदितों ॥३७॥मीमांसाजैमिनी वसिष्ठ । गौरमादि शिष्ट । सांख्यशास्त्र -कपिल वरिष्ठ । दंडप्राय वंदितों ॥३८॥पतंजलि सहस्त्रशीर्ष । वदला स्वयें शेष विशेष । भाषाचातुर्य-उत्कर्ष । विशेष सिंधूसारिखा ॥३९॥गौडपाद श्रीआचार्य । श्रीधर आणि विवरणाचार्य । टीकाकारांत चातुर्य । भर्तृहरि प्रणामी ॥४०॥मुद्गल रघुनाथपंडित । ज्यासी पावन गंगा करीत । जयदेव जगविख्यात । अष्टपदीं पैं गाती ॥४१॥प्राकृतांमाजीं आचार्य । मुकुंदराज ग्रंथवर्य । विवेकसिंधूचें ऐश्वर्य । जयत्पाळचि लाधला ॥४२॥जो षड्गुण-ऐश्वर्य भगवाअन । तो महाराज श्रीकृष्ण । गीता स्वयें उपदेशून । विजय करवी जयातें ॥४३॥निर्वाणसमयीं उध्दव बोधिला । दीनवत्सला बाध आला । म्हणोनि अवतार धरिला । ज्ञानेश भगवान श्रीविष्णु ॥४४॥गीतार्थ हा गूढ फार । करी उघड ज्ञानेश्वर । छ्प्पन्न भाषेचा संभार । अर्थ चतुर जाणती ॥४५॥श्रीशुक सांगती परीक्षिती । श्रीमद्भागवत निगुती । परि जगदोध्दाराचे आर्ति । एकनाथ अवतार ॥४६॥एकनाथें एकादशावरी । टीका केली सविस्तरीं । रामायण रुक्मिणीस्वयंवरीं । आर्त पुरतई आर्ताचे ॥४७॥कवनकुशळ मुक्तेश्वर । परमरसाळ भारत सुंदर । नवरसांचें मंदिर । चतुर तेथें विसांवती ॥४८॥रामदासें निजबोध । प्रसिध्द केला दासबोध । ज्याचा महिमा अगाध । शिवाजीसी लाधला ॥४९॥पंडितांमाजी अग्रगण्य । वर्णिताती वामन । अर्थगौरवचातुर्य कवन । दासोपंतही महान् प्रसिध पैं ॥५०॥तुळसीदास रामायण ग्रंथ । तद्देशभाषामथितार्थ । नाभाजी संतचरितार्थ । पूर्वभाषा अपूर्व ॥५१॥श्रीधरकवि नाझरेकर । रामकृष्णविजय परिकर । पांडवप्रताप शिवलीला सुंदर । केले ग्रंथ तयांनीं ॥५२॥महीपतिबावा भक्तिरस । भक्त-इतिहास अतिसुरस । भक्तचरित्रें असमास । वर्णिते झाले आवडी ॥५३॥ ब्रह्मांडातें गवसणी । घालवेल काळेंकरुनी । सत्पुरुषमहिमावाग्वाणी । मौन राहे श्रेष्ठाची ॥५४॥वसिष्ठें दर्भे धरिली धरणी । सूर्यरथीं छाटी समतरणी । साक्षी शेष वासरमणी । आणिता झाला प्रतापें ॥५५॥येकीं केशवेंकरोनि अपांपती । ज्ञानेशें चालविली भिंती । वेद वदवी पशूहातीं ॥ अगाध कीर्ति जयाची ॥५६॥एकनाथें पितर आणिले । नामयानें देऊळ फिरविलें । अनेक चरित्रांतें दाविलें । महानामी महान ॥५७॥काय न करिती महापुरुष । प्रत्यक्ष केला स्त्रीचा पुरुष । महिमा ज्याचा उत्कर्ष । शेष अशेष होतसे ॥५८॥एके दिवशीं तुळसीदास । आनंदें असतां मठास । तंव चरित्र वर्तलें कैसें । तें उल्हासें निवेदी ॥५९॥कोणी स्त्री शय्यागमनीं । जातसे ते कामिनी । साळंकारवस्त्राभरणी । दर्शना येत तयाचे ॥६०॥येरी करी नमन । सौभाग्यपुत्रवंती म्हणोन । आशीर्वाद ऐसा वदून । नकळत वचन बोलिले ॥६१॥येरी वदे विनयोत्तरीं । मानसिक कीं जन्मांतरीं । शय्यागमनार्थ निर्धारी । जातसें मी स्वामिया ॥६२॥जासी तरी कायसी खंती । कुणप आणवी सत्वरगती । तात्काळ उठवी स्वहस्ती । दीनवत्सल म्हणोनी ॥६३॥अघटित घडे एक वेळ । सोमसूर्यमंडळ । हेंही निश्वळ परि चळ । न चळे वचन साधूचें ॥६४॥नसतां प्रारब्ध संचित । नवें निर्मिती साधुसंत । जे आलिया शरणागत । अघटित देती तयांसी ॥६५॥ऐसें माहात्म्य जाणोन । संतांसि आले शरण । देऊनि मज कृपेचें दान । पोसणा म्हणवी तुमचा ॥६६॥संत-श्रोतयां विनवणी । विनयपदीं मूर्ग्धी । सभागर्भी आवाहनीं । तुम्हांसी पै ॥६७॥काया वाचा मी किंकर । आज्ञाधारक पादुकाधर । मुद्रांकित सेवाधिकार । असें तत्पर स्वामीचे ॥६८॥तुम्ही विद्वज्जन श्रोते । माझें वाक्य करा सरतें । अरुष शब्दें तुम्हांतें । प्रार्थित असें निजभावें ॥६९॥मुद्रांकित प्रसादमुद्रा । मुद्राभिमानी गुरुनरेंद्रा । मोलें उणीं पत्र परि मुद्रा । अभद्र भद्रा करीतसे ॥७०॥अनुग्रहठसा ठसाऊनी । ठसावी श्रोतयां श्रवणीं । ठसे विविध पद्यरचनीं । ठसावी हे श्रोतियां ॥७१॥मानससरोवरवेष्टित । मरालश्रेणी विराजित । तैसे श्रोते तुम्ही समस्त । असमास तेथें बैसलां ॥७२॥रत्नपरीक्षे परीक्षक । तुम्ही महान पुण्यश्लोक । जीववस्तूचे ग्राहिक । अमौल्य मौल्य जाणती ॥७३॥जीर्णकवि संत महान । त्यांसी मागून भिक्षादान । सुरस चरित्र पक्वान्न । अन्नछत्र श्रवणाचें ॥७४॥विचारश्रेष्ठ ज्ञानसंपन्न । बुध प्रबुध्द विद्वज्जन । भगवद्भक्तिपरायण । श्रवण -मनन जाणते ॥७५॥अगाध तंतु गुणवर्णन । वोवी वोविली सुमनें सुमन । प्राकृत छंदांत गुंफोन । मनोहर श्रोतियां ॥७६॥कर्णभूषित भूषण । मुक्तकथा वर्ण सुवर्ण । यथामति करावें ग्रहण । श्रवणीं श्रोतियां अर्पितों ॥७७॥कथानुसंधान सूत सुंदर । नसे गीर्वाण रेशमी वस्त्र । सबाह्य घडी पदर । महाराष्ट्रपद धडोती ॥७८॥ग्रंथलीला महदाकाश । उड्डाणीं व्यासादि हंस । पारावार न पवे त्यास । तेथें मशक मी किती ॥७९॥नाना कवि नाना मति । नाना युक्ति । नाना भक्त नाना भक्ति । नाना ग्रंथी वर्णिले ॥८०॥मी तो मतिमंद आळसी । मज हस्तें ग्रंथ करविली । पिपीलिका कनकाद्रीसी । उचलील कैसी सांग पां ॥८१॥टिटवीचे चंचूपुटीं । समुद्र कैसा घोटवेल घोटी । अकाश सांठवण पात्रपेटी । कोठोनियां आणावें ॥८२॥कर्ता करविता गुरु समर्थ । मूर्खहस्तें करवी ग्रंथ । वानराहाती रघुनाथ । लंका घेत साह्य पैं ॥८३॥माझें मुख्य निमित्त करुन । करिसी आपुलें गुणवर्णन । शिशुहस्तेकरुन । माता भोजन करवित ॥८४॥विजयादशमी विजयदिन । सर्व करिती सीमापूजन । अपटा शमी आणिती सुवर्ण । येरयेरां देताती ॥८५॥ सीमोल्लंधनाचे सुवर्ण । नोहे त्या म्हणेल कोण । बाजारीं द्रव्य देईल कोण । तोल मोल त्या कैंचे ॥८६॥तैसें तुमच्या अभयेंकरुन । नाही तरी मज पुसे कोण । मस्तकी हस्त म्हणोन । मान्य होय जगातें ॥८७॥तुम्हां श्रेष्टांचे अभयवचन । निर्भय झालें अंतःकरण । अजा सिंहाश्रयेकरुन । आरुढे गजमस्तकीं ॥८८॥प्राकृतकविप्रसादोत्तरे । प्रसाद भाऊनि वक्त्रें । कृपायुक्त परिसिजे श्रोत्रें । सर्वच श्रोतयां वंदितों ॥८९॥बिल्व तंदुळ जळ । भावें पूजिती पयःफेनधवले । कनकपुष्पीं जाश्वनीळ । विमल भावें पूजिती ॥९०॥शुध्द द्वितीयेचे दिवशीं । आबालवृध्द वाहाती दशी । काष्ठदीपिकें दिनकरासी । वोवाळावें पैं जैसें ॥९१॥गंगोदकें गंगेप्रती । अर्ध्य पाद्य अर्पिती । तेविं शब्दसुमनें तुम्हांप्रती । तुमचें तुम्हां अर्पितों ॥९२॥छंद घेवोनि अर्भक । मागतसे प्रसादभातुकें । श्रोते म्हणती निके । ग्रंथ कौतुकें करी हा ॥९३॥साधु वदती वक्तयालागून । तृप्ति झाली आमंत्रणें । आतां करवी कथामृतपान । श्रवणपात्रीं वोगरी ॥९४॥तेव्हां अष्टभाव दाटून । सद्गद कंठ रोमांचस्फुरण । प्रेमाश्रु स्त्रवती जीवन । प्रत्यंग अंगीं नमीतसे ॥९५॥महाप्रसाद ते वेळी । मग शकुनग्रंथी बांधिली । तुमचे अभयोक्तीनें ग्रंथवल्ली । डवरली सपुष्प फळें ॥९६॥तुमचे कृपें अभयोत्तरीं । जी जीं शब्दी शब्दोत्तरीं । आतां निर्भय बाह्मांतरीं । निःशक मन जाहलें ॥९७॥मनोवाजी धांवे सैरा । यास्तव आवरुन वाद्गोरा तुमची प्रार्थना हरित चारा । गुंतोनि राहिलों पाहें पां ॥९८॥आतां आलस्य निद्रा नासिजे । ग्रंथ भावार्थे परिसिजे । संतापातें विसरिजे । श्रवण कीजें साधकीं ॥९९॥श्रोतियांतें नवरस सुरस । श्रवणीं परिसा इतिहास । सर्व सुखाचा सारांश । भोळे भाविक लाभती ॥१००॥नूतन कवन म्हणून । अव्हेरितील विचक्षण । गुरुआज्ञेवरुन । प्रवर्तलों या ग्रंथीं ॥१॥स्वयंभू काय होय शिव । पूजूं नये काय पार्थिव । तसा ग्रंथार्थी भेदभाव । धरुं नय सर्वथा ॥२॥मार्कंडेय शिवार्चनीं । पार्थिवी प्रकटे शूळपाणी । दंड करोनि दंडपाणी । बिरुदाभिमानि दासांचा ॥३॥शब्दब्रह्म आब्रह्मस्तंब जाण । प्रणवापासोनि गीर्वाणवर्ण । छप्पन्नभाषादि वर्ण । कविजन ग्रंथी वर्णिती ॥४॥धेनु असती अनेकवर्ण । दुग्धामाजी नसे भिन्न । तसे महाराष्ट्र गीर्वाण । अर्थपूर्ण येकचि ॥५॥आतां असो हा विस्तार । सांप्रत झाला बौध्दावतार । कलींत प्रवर्तला अनाचार । यास्तव अवतार साधूंचा ॥६॥जगदोध्दारानिमित्त । कलींत अवतरती सिध्दसंत । यासि प्रमाण श्रीमद्भागवत । श्लोकार्थ श्रोती परिसावा ॥७॥कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायणाः कृतादिषु प्रजा राजन् कलाविच्छन्ति सम्भवम् ॥कृतयुगापासोन । महर्षि करिती अनुष्ठान । कलींत व्हावें आम्हां जनन । घडेल भजन या हेतु ॥८॥नाना यातींत अवरतोन । भजनी लावूं सर्व जन । होऊं नारायणपरायण । इच्छा होती तयांची ॥९॥आतां असो ह विस्तार । कलींत झाला बौध्दावतार । स्वधर्मलोप अनाचार । म्हणोनि साधु अवतरती ॥११०॥पूर्वी जे दैत्य मदोन्मत्त । मदांध जन्मले बहुत । देव द्विज साधु दुःखित । पुन्हा उद्भवत असुर ॥११॥युगपरत्वें सज्जन दुर्जन । पुनःपुन्हा संभवोत । जळमाळान्याय फिरवोन । येती जाती मागुती ॥१२॥दुर्मद दैत्य दुराचारी । युगायुगी पिडिती भारी । दश अवतार धरोनि मुरारि । दुष्ट असुरां निवटिले ॥१३॥द्वापर सरतां श्रीकृष्णमूर्ति । निजधामा गेला श्रीपति । कलिराज्याची प्रवृत्ति । होती झाली अनायासें ॥१४॥राक्षस होती ब्रह्मराक्षस । यक्षयक्षिण्या बहुवस । झोटिंग महिषासुर तामस । पिशाचसृष्टि उद्भवली ॥१५॥मुंजे मारके ग्रह दुर्धर । समंध समंधें अतिक्रूर । धुमस घालिती निर्भर । यवनपिशाच माजले ॥१६॥भूंतांमाजीं नृपवर । अग्निवेताळ अतिक्रूर । धुमस घालिती निर्भर । भयानक भयभीति ॥१७॥सप्तअप्सरा जळवासिनी । सटवीत्रय मायाराणी । जाखनी शाकिनी डांकिणी । पिशाचश्रेणी त्रासिती ॥१८॥साबरी मंत्र मंत्रचळ । उच्छिष्टचांडाळी कुश्विळ । चेटक नाटक इंद्रजाळ । कवटाळ मुष्टीकरण ॥१९॥कुश्वितमंत्रेंकरुन । उग्रदेवते करी दीन । वीरनृसिंह हनुमान । भैरववीर बोलती ॥१२०॥एक स्मशान जागविती । एक प्रेतासनीं बैसती । एक वटयक्षिणी साधिती । यवनबीर इत्यादि ॥२१॥विद्यामदें मस्त झाले । पाखंड थोतांड उभविलें । नास्तिकांचें प्राबल्य झालें । मत स्थापिती भलतेंचि ॥२२॥मद्यमासांचें सेवन । भ्रष्टाभ्रष्ट आचरं । वर्णसंक्दर माजवून । स्वधर्म बुडविला ॥२३॥षड्दर्शनांची सिराणी । सत्त्वस्थीं धर्म सांडिला जनीं । राजस तामस आचरणीं । निद्यमार्ग स्थापिती ॥२४॥श्रवण मनन अध्ययन । अर्चन वंदन दास्य भजन । कीर्तन शास्त्रपठण । देवदर्शन नावडे ॥२५॥यवनांचें राज्य झालें । गोब्राह्मण त्रासले । गोहिंसक मार्गघ्न झाले । भारें डोले कुंभिनी ॥२६॥ऐसी कलीं दुराचारी । दुराचरणें पृथ्वीवरी । तेणें पीडिली धरित्री । धेनुरुपें वदतसे ॥२७॥कमलोद्भवा सावित्रीवरा । रसातळा जातसे धरा । दुराचरणी डांगोरा । भुवनत्रयीं न समाये ॥२८॥विधि ललाटपटलेखना । परिसी ही विज्ञापना । भार झाला साहवेना । सोसवेना पातक हें ॥२९॥अभक्ष्यभक्ष्य पीतापीत । अगम्या गमन करीत । वेदबाह्य मतें स्थापीत । पाप अद्भुत जाहलें ॥१३०॥विरंची वदे वसुंधरे । तूं पीडिलीस दुष्टभारें । पूर्वीच योजिलें रमावरें । स्वस्थ राहें स्वस्थानीं तूं ॥३१॥विधि म्हणे अविधिनाशार्थ । अवधि नसे अवतार होत । खेद न धरावा मनांत । निर्भय अभय तुज असे ॥३२॥हें वदोनि पृथ्वीतें । विधि पातला वैंकुंठातें । निर्जर पुरंदर देखिले तेथें । परम संतोष मानिती ॥३३॥ग्रंथ भवार्णवीचें जहाज । भावघन सधन सहज । अमौल्य वस्तु तेजःपुंज । श्रोतयांतें अर्पितों ॥३४॥कथा पवित्र सुरस सुधा । भवरोगाची नाशी बाधा । दुरित जाय आपदा । अचल संपदा पावेल ॥३५॥पवित्र मंदाकिनीचें उदक । हेमपात्रीं मृण्मयादिक । ते रीतीं होय पुण्यकारक । पुण्यश्लोक वंदिती ॥३६॥तुम्ही सर्वज्ञ देखणे । द्वेष नसे वर्णावर्ण । अभेद चंडकिरण । तिमिर नेणे कदाही ॥३७॥शूर्पन्यायें त्यजिजे दोष । ग्रंथार्थ घ्यावा सारांश । गुणग्रहण उत्तम पुरुष । पल्लोरीसम कूजन तें ॥३८॥तुम्ही साह्य होणे मजप्रति । अगाध न धरवे धरिलें चित्ती । जेविं वानरांचे हातीं । सेतु बांधवी रघुवीर ॥३९॥सिंधुजळ अंजुळी न साठे । ब्रह्मांड नुचली अळिका नेटें । तुम्ही शेष होवोनि गोमटे । साह्य होणें मजप्रति ॥१४०॥वारंवार काय म्हणावें । न लगे श्रोतयां कडसावें । क्षारोदक मेघस्वभावें । मिष्ट करणें प्राप्त पैं ॥४१॥क्षिप्रेनें काय विनवावें । मजप्रति गोड करावें । शर्करेनें मेळवावें । हें काय लागे सांगणें ॥४२॥सुरस आदिनाथलीलामृत ग्रंथ । श्रोतयां अमरां अमृत । अभाविक जे नवज्वरित । क्षीर वावडें नावडे ॥४३॥भैरववरप्रसादेंकरुन । आदिनाथ निमित्त करुन । सुरस कथा वदवी आपण सूत्रधार तो स्वयें ॥४४॥श्रीमन्नाथलीला सुरस । पुढें रसाळ इतिहार । श्रवण करीत सावकाश । प्रथमोऽध्याय गोड हा ॥१४५॥संमतिश्लोक ॥१॥ ओव्या ॥ १४५ ॥ N/A References : N/A Last Updated : February 06, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP