मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत| अध्याय २ रा श्रीनाथलीलामृत प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २ रा नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. Tags : adinathagorakshanathaआदिनाथगोरक्षनाथ अध्याय २ रा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ जय जय वेदवंद्या त्रिभुवनसुंदरा । मायाचक्रचाळका लीलावतारा । भक्तमानसचकोरचंद्रा । करुणासमुद्रा श्रीहरि ॥१॥शंखासुरें वेद हरिले ॥ तुवां मत्स्यरुपातें धरिलें । समुद्रमंथनीं कूर्मे रक्षिलें । वाराह प्रसिह्द अवतारें ॥२॥प्रल्हादास्तव नरहरि । कयाधूकांतातें विदारी । वामन होऊनि बळी द्वारीं । याचक होसी निर्धारें ॥३॥मातृकैवारें परशधरें । निक्षत्री केली मही वीरें । सूर्यवंशीं रघुवीरें । दशानन संहारिला ॥४॥गोकुळीं झाला श्रीकृष्ण । कंस चाणूर मर्दन । वसुदेवदेवकीस मुक्त करोन । उग्रसेन स्थापिला ॥५॥कुलींत बौध्दावतार । यास्तव झाला अनाचार । कलंकी पुढें होणार । धीर न धरवे प्रजेतें ॥६॥तोंपर्य़ंत उल्कापात । होतसे आतां निभ्रांत । जरी होसी कृपावंत । तरी स्थिति बरवी सर्वांची ॥७॥विधि म्हणे कर्मलोप । कलींत झालें महत्पाप । जरी होसी तूं सकृप । अवतार घेसी तरी बरें ॥८॥स्वयें साधूंचे कैवारें । सगुणस्वरुप अवतरे । अधर्म निवटोनि एकसरें । गोब्राह्मण रक्षी तूं ॥९॥धर्म स्थापक दुष्टमर्दना । तूं अवतरसी जनार्दना । पापदमना धर्मवर्धना । सत्सुखसदना तूं ॥१०॥ऐसें ऐकोनि करुणावचन । वदता झाला मधुसूदन । साधुवेषें अवतरोन । भूभार हरीन मी स्वयें ॥११॥विबुध गर्जती जय जय शब्दें । ब्रह्मांड कोंदे प्रतिशब्दें । महाऋषि भक्तवृंदें । वंदिते झाले विष्णूतें ॥१२॥कमलोद्भव कमलारमण । निर्जरासह पाकशासन । यक्षादि गंधर्वगण । येते झाले कैलासा ॥१३॥मणिमय सिंहासनीं त्रिनेत्र । पयःफेनधवल पंचवक्त्र । आम्नाय स्तुतिस्तोत्र । सदा वर्णिती जया ॥१४॥कैसास ते कैवल्यप्राप्ति । निर्जर विमानीं भाविती । कोटिचंद्रदीप्ति । शुभ्रकांति शोभला ॥१५॥चारी दिशेस चार पुरुषार्थ । पूर्वद्वारीं अमरनाथ । दक्षिणदिशे प्रेतनाथ । पश्चिमेवरुण विराजे ॥१६॥उत्तरदिशेचा अधिपति । वैश्रवण जया म्हणती । तो परमप्रिय पशुपति । इष्ट आराध शिव तया ॥१७॥अष्टदिशे अष्टभैरव । अष्टौ दिकपाळ अष्टभाव । अष्टसिध्दि सभैरव । अष्टवसु तिष्ठती ॥१८॥अकरा रुद्र द्वादश गभस्ति । नवग्रह नवविध भक्ति । नक्षत्रें सदेह बैसती । श्रृतिस्मृतिपुराणे ॥१९॥सजा राग भार्या छत्तीस । राग उपराग सदेह विलस । चतुर्दश विद्या रुपस । सप्तस्वर ते सदेह ॥२०॥सप्तकोटी मंत्र प्रसिध्द । आणिक नवविध । नाना वल्ली मंत्र औषध । स्त्रियारुपें गच्छती ॥२१॥नारद तुंबर विद्याधर । सनक सनंदन सनत्कुमार । अष्टनायिका सुंदर । नृत्य करिती सभेंत ॥२२॥वसिष्ठ विश्वामित्र बादरायण । भृगु अंगिरा दधीची जमदग्न्य । गौतम भारद्वाज कुंभोद्भव जाण । बकदाल्भ्य इत्यादि ॥२३॥मार्कंडेय उपमन्यु कपिलसिध्द । नवनाथ चौर्यांशी सिध्द । मत्स्येंद्र गोरक्षही प्रसिध्द । अगाध प्रताप जयांचा ॥२४॥शुक वामदेव दत्तात्रेय । अठ्ठ्यांशीं सहस्त्र ऋषिवर्य । सर्व आले मुनिवर्य । शिवदर्शनातें आनंदे ॥२५॥यक्ष गुह्यक पादोदर । शेष वासुकी तक्षक समग्र । हाहाहूहू आणि किन्नर । कैलासशिखरीं येताती ॥२६॥सिध्द साधु निर्जर ऋषि । योगि हटयोगी तापसी । जे समाधिस्थ बद्रिकाश्रमासी । भविष्य जाणोनि पातले ॥२७॥कैस कैलासी कैवल्यदानी । कैवारी पाहिला निर्जरगणीं । कळिमळविध्वंसक शूळपाणी । कंजज पुरंदरे निरखिती ॥२८॥कोटिचंद्र्कळादीप्ति । तेवी शंकर अंगकांति । पंचानन द्विपंचहस्तीं । सायुध कुरंग मिरविले ॥२९॥व्याघ्रचर्मपरिधान । द्वितीय गजचर्मप्रावरण । मुंडमाळा भस्मलेपन । इंदु भाळीं सुप्रभ ॥३०॥कर्पूरगौर गौरीरमण । नीलग्रीव सुहास्य वदन । अंधकमर्दन त्रिलोचन । पन्नगभूषित भूषणीं ॥३१॥त्रिशूळपाणी पिनाकधर । खट्वांगडमरुमंडितकर । जटाकलाप गंगाधर । आम्नायां पार न लागे ॥३२॥आदिपुरुष ईशान्येशा । व्योमकेशा श्रीमहेशा । जगन्निवासा विश्वेशा । तूं अविनाश शाश्वता ॥३३॥विश्वाद्या विश्वेश्वरा । विश्वसृज्या विश्वंभरा । विश्वरुपा विश्वोध्दारा । विश्वरक्षका तुज नमो ॥३४॥बालार्क ओळीनें पंक्ति । निरभ्री जेवीं उदया येती । तैसे छ्त्रध्वज मिरविती । शिवमस्तकीं सतेज ॥३५॥कंजज निर्जर जयजयकार । वेद स्तविती महारुद्र । अनेक शास्त्रें स्तुतिस्तोत्र । हर हर घोषें गर्जती ॥३६॥वामांकी मृडानी । अर्धांगी सुप्रभ भव्य भवानी । आदिशक्ति व्यापिनी । नारी नटेश्वर वदती पैं ॥३७॥गजानन षडानन । वीरभद्र बळिवर्धन । काळभैरव काळदमन । नंदिकेश्वर विराजे ॥३८॥चंड प्रचंड शिवगण । कीर्तिमुखें सत्किर्तिवर्णन । आदरें चामरें ढाळोन । पार्श्वभागी तिष्ठती ॥३९॥जय जयाजी त्रिपुरांतका । जय जयाजी कलिमलनाशका । काय पाहासी कलिकौतुका । सुखकारका दयाळा ॥४०॥भवभयहारका भवानीवरा । भस्मभूषित भाळनेत्रा । भेदतमनाशका भास्करा । भद्रकारका शिव भर्गा ॥४१॥हर हर हर भवसंहारा । हर हर हर ईशान्येश्वरा । हर हर हर शिवशंकरा । हर हर हर मां पाहे ॥४२॥शिव शिव मंगलनामा । शिव शिव तूं कैवल्यधामा । शिव शिव हा प्रेमा । शिव शिव शब्दीं अखंड ॥४३॥शिवसिंधुस्तुतिमंथनीं । अमर आवेशले अपार स्तवनीं । पीयूष अभयवरदवाणी । सुधा विबुधां लाभलें ॥४४॥मत्स्यरुप हा मत्स्येंद्र । गोरक्ष जो विष्णु अवतार । धरील स्वयें इंदिरावर । मदंश आचार्य सत्वर । पुढें होईल जाण पां ॥४७॥मत्स्येंद्र वदे पंचानन । तुम्ही पुढें शीघ्र जाऊन । जनांते सन्मार्गी लावून । जगदोध्दार करावा ॥४८॥नृप मदांध होऊन पूर्ण । विषयासक्त मदिरापान । नसे गुरुसांप्रादायी ज्ञान । त्यांते बोधून उध्दरीं ॥४९॥मी होईन आचार्य शंकर । नास्तिकांचा करुन संहार । धर्मस्थापक अवतार । माझा होईल निश्चयें ॥५०॥ऐसें वदोनि अपर्णारमण । परम संतोषले अमरगण । जयजयकारें हरहरस्मरण । नमन करिती साष्टांगीं ॥५१॥पुन्हा वदे पशुपति । कलीची झाली अतिप्रवृत्ति । मी अवतरेन निवृत्ति । निवृत्तिधर्म स्थापीन ॥५२॥विष्णु होईल ज्ञानेश्वर । सोपान होईल चतुर्वक्त्र । मुक्ताई चित्कळा सुंदर । मुक्तिपंथदायक जे ॥५३॥तंव श्रोते करिती प्रश्न । मत्स्येंद्रोत्पत्ति करी कथन । जी जी अवश्य वदोन । यथामति अनुवादूं ॥५४॥कोणे एके अवसरी । कैलासीं ध्यानस्थ मदनारी । समीप असे गौरी । विचार करी मनांत ॥५५॥ध्यान झाले विसर्जन । उमा विनवी कर जोडून । कोणाचें करितां जपध्यान । हें निरोपा मज स्वामी ॥५६॥तुम्ही सर्व देवांचे आराध्यदेव । देवाधिदेव महादेव । असोनि भासे मज अपूर्व । सदा ध्यान कवणाचें ॥५७॥मी अर्धांगी असोनि तुम्हांपासी । आणि कापटय करितां मजसीं । जटाजूटीं स्वर्धुनीसी । मज न कळतां ठेविलें ॥५८॥हे काय जी श्लाघ्य तुम्हांतें । मी असोनि अर्धांगाते । मज सांगावें निरुतें । कृत्रिम हें टाकोनी ॥५९॥शंकर वदे गिरिजेप्रति । नसतेंच पुससी मजप्रति । असोनि अन्योन्यप्रीति । तरी निश्चितीं द्वैत कां ॥६०॥हें तूं न पुसें मज । स्त्रियांसी न वदावें गुज । गुह्याद्गुह्य नसे सहज । अवाच्य निज हें असे ॥६१॥जो निष्कळंक नित्यानंद । जो निष्प्रपंच निर्द्वद्व । निरामय निःसंग अभेद । निराभास निर्गुण ॥६२॥जें परेहुनि परात्पर । अवाच्य वाचे अगोचर । चराचरीं संचलें साचार । त्याचा विचार पुससी तूं ॥६३॥जें अलक्ष्य लक्ष्यातीत । जें अजपा जपातित । नामा अनामातीत । गुणातीत स्वरुप जो ॥६४॥डोळ्यांवीण पाहाणें । श्रवणांवीण परिसणें । करांवीण देणें घेणें । चाखणें रसनेवीण पैं ॥६५॥चरणावीण करी गमनें । वदनेवीण बोलणें । अक्रिये क्रिया करणें । अकर्तेपणें कर्तृत्व ॥६६॥हे निर्गुणाचे भूषण । देहातीताचें लक्षण । सर्वाधराचें प्रावरण । निराधारी वर्तत ॥६७॥जे चहुं शून्याहूनि पर । क्षरातीत अक्षर । सर्वसाक्षी निरंतर । अपार पार नेणवे ॥६८॥जे सर्वांहूनि अतीत । वस्तु जे परिच्छेदरहित । व्याप्त परिपूर्ण ओतप्रोत । सर्वव्यापक परि वेगळा ॥६९॥अज अजित अव्यय । अचल अढळ ज्योतिर्मय । पूर्ण परब्रह्म अद्वय । अस्तो दयावीण पैं ॥७०॥जें परंज्योति परब्रह्म । अनाम नाम परंधाम । परेहुनि परंकाम । योगी वर्म जाणती ॥७१॥जें चिच्छक्तीचें वैभव । जें परात्पर शिव । सबाह्य भरलें विश्व । तेंचि सेव्य मज असे ॥७२॥तेंचि माझें आराध्य दैवत । अनंत ब्रह्मांडें इच्छें निर्मित । जें अखंड अव्यय शाश्वत । ध्यान ध्यात तेंचि मी ॥७३॥चिदाब्धीचे बुद्बुद । अनेक ब्रह्मांडे विशद । तेंचि ब्रह्मास्मि सोऽहं शब्द । सदा जपतों तयातें ॥७४॥ऐसें परिसोनि उत्तर । भवानीस भासे चमत्कार । म्हणे मृगनाभी सुंदर । कस्तुरीतें मी नेणे ॥७५॥कृपा करोनि दयार्णवा । उपदेश सत्वर मज द्यावा । जें निजगुज पुरातन ठेवा । साठवा कर्णपुटांत ॥७६॥गिरिजे वदलीस बरवें । उपदेशस्थळ निगूढ असावें । उपदेशितां पंचतत्त्वें । ब्रह्मौव होतीं सर्वही ॥७७॥मग सुमनयानी आरोहन । करिता झाला पंचानन । मग गिरिजासहवर्तमान । क्षिरार्णवातें पातलें ॥७८॥क्षीराब्धिरत्नें पैल पुलिन । एकांती कांतेसहवर्तमान । तेथें सुवर्णन्यग्रोध निर्मून । स्नान भवानी करीतसे ॥७९॥तें निर्विकार निर्जन । उन्मनीचें निकेतन । जें कैवल्याचें आयतन । सघन प्रकाश शीतळ ॥८०॥जे तुर्येचें विहारस्थळ । जें उन्मनीवल्लीचें फळ । ते समाधिस्थान केवळ । अचळ अढळ निर्मळ जें ॥८१॥सायुज्यतेचें सौभाग्य । तें शंकरस्थ्ळ वैराग्य । तें योग्यांचे निजभाग्य । उदया येत ते स्थळ ॥८२॥तेव्हां हिमनगजावर । धरी आदिनाथ अवतार । चतुर्भुज मनोहर । त्रिशूल डमरू हस्तकीं ॥८३॥विशाळ भाळ आकर्ण नेत्र । भस्मलेपन चारुगात्र । काषायमेखळा सुंदर । अर्धचंद्र मस्तकीं ॥८४॥दोहों भागीं मुद्रा श्रवणीं । उपदेशग्रहणी सोमतरणी । गुप्त राहिले तये स्थानी । आत्मसार्थका निजहेतू ॥८५॥कटितटीं वज्रकौपीन । शैली शृंगी नाथभूषण । व्याघ्रचर्म मृगाजिन । वज्रासनीं बैसले ॥८६॥सौंदर्ये मदन किंवा चंद्र । शिवा सौंदर्यी तत्पर । सांडणें करोनि शरीर । दग्ध होय निजांगे ॥८७॥मुखशशी निरखून । इंदु होय लज्जायमान । षोड्शकळा त्यागून अर्ध राहे शिवमौळी ॥८८॥अनंतरविप्रकाशघन । असंख्य विद्युल्लता एकवटून । चपळा चपळत्व त्यागून । प्रकाशमान स्थिरावली ॥८९॥गंगासागरसंगम होतां । स्नान सारी जगन्माता । पर्तोनि येतां मागुता । श्रीआदिनाथ वंदी ॥९०॥संकल्पविकल्पातीत मन । गिरिजे होई सावधान । धन्य धन्य आजिचा दिन । महत्सधन तुज लाभे ॥९१॥तूं माझी अर्धांगवासी । आतां प्रतारणा काय तुजसी । एकाग्र होऊनि मानसी । परिसीं मंत्रराज हा ॥९२॥न्यासमुद्रा पद्मासनीं । करी ती मैनाक भगिनी । उन्मनीवस्त्रें आच्छादोनि । मंत्रश्रवनीं प्रगटवी ॥९३॥वाजती अनाहताचे तुरे । प्रकाश कोंदे एकसरें । तेथें आपपर दुसरें । भेद नुरे सर्वथा ॥९४॥योगसिध्दि प्रगटोन । भ्रूसंकेतेंकरोन । विदेह उपरती होऊन । उन्मनीसंगे जातसे ॥९५॥अपर्णा जाय पर्णावया । प्रणव ओंकारी प्रणव प्रिया । तेथें ओंपुण्येकरोनियां । तुर्यालग्ना लावितसे ॥९६॥सामरस्याचे बोहल्य़ावरी । शिवशक्ति साजिरी । अभेद जेवीं सिंधुलहरी । लवणजळन्यायेसी ॥९७॥जेवी दीप आणि ज्योति । किरणे आणि गभस्ती । कीं चंद्र आणि दीप्ती । अभेदें असती ज्यापरी ॥९८॥पुष्प तेथें सुगंध । वाद्य तेथेंचि नाद । कीं सुख तेथें आनंद । अभेदपणें वर्तत ॥९९॥नृप तेथें ऐश्वर्य । स्वरुप तेथें सौंदर्य । कळा तेथें चातुर्य । गांभीर्य समुद्री वसतसे ॥१००॥इकडे कथा वर्तली कैसी । अमर पातले कैलासासी । गण गंधर्व यक्ष ऋषि । शिवदर्शनासी पातले ॥१॥प्रदोषसमयीं दर्शनोद्देष । वंदनातें पातले त्रिदश । सिंहासनीं नसे महेश । विबुध आश्चर्य करिताती ॥२॥शिवगणां पुसती निर्जर । कोणे कार्या गेले त्रिनेत्र । गण वदती शिवचरित्र । ब्रह्मादिकां नेणवें ॥३॥पुष्पकीं पार्वतीरमण । एकांता गेले न लगतां क्षण आम्ही राहिलों शिवाअज्ञेन । ये स्थळीं जाणिजे ॥४॥तों वैकुंठी गेला ब्रह्मनंदन । वार्ता पुसे रमारमण । कोठें काय वर्तमान । निवेदन करी मज ॥५॥येरु वदे विमानयानी । आरुढोनि गेली शिवभवानी । क्षिरसमुद्रपैलस्थानी । जातां नयनी देखिले ॥६॥धन्य धन्य आजिचा दिवस । उमेसी होत उपदेश । संधि साधून ह्रषीकेश । अविलंबें जावें तुम्हीं ॥७॥रमाह्र्दयारविंदमिलिंद । शिवमहिमा जाणोन मुकुंद । येता झाला आनंदकंद । क्षीरार्णवी ते काळी ॥८॥गुप्तरुपें मधुकैटभारी । प्रवेशता झाला मगरोदरी । नीलकंठही क्षीरसागरी । जाणून गुप्त राहे निजांगें ॥९॥उपदेशीत हिमनगबाळी । सावध म्हणे चंद्रमौळी । हुंकार दिधला ते वेळीं । मगरोदरीं विष्णूनें पै ॥११०॥प्रतिशब्द परिसोन । चमकला त्रिलोचन । देवी समाधि विसर्जोन । सावध झाली ते वेळी ॥११॥मग वंदी आदिनाथ । मी कृतार्थ झालें सनाथ । धन्य दैव परमार्थ । स्वार्थ साध्य जाहला ॥१२॥अंबिकेस वदे हेरंबतात । कोण दुजे जागृत तेथ । प्रतिशब्द हुंकार देत । असे गुप्त नेणवे ॥१३॥तेव्हा विनवी भवानी । तुम्ही भरोनि उरलां त्रिभुवनी । स्थावर जंगम पाषाणी । पिणाकपाणि मज भासे ॥१४॥तुम्ही सर्वांत व्यापक । एक असोनि भासे अनेक । जैसें भांगारी कनक । कैलासनायक तेवीं तुम्ही ॥१५॥चराचर विश्व शिवमय । सर्वात व्याप्त सबाह्य । आतां बहु सांगूं काय । भेद ग्राशिला सर्वही ॥१६॥पार्वतीस म्हणे धूर्जटी । क्षीरसमुद्रकल्लोळतटी । मीन गुप्त पाहे दृष्टी । जाय निकटीं ईभगमने ॥१७॥ऐसें बोलतां त्रिनेत्र । गुप्त झाला राजीवनेत्र । शिवमायेचें विचित्र सूत्र । ते अतर्क्य सुरवरां ॥१८॥उमा पाहे अवलोकून । तो पडिला मीन केतन । कंजाक्षी करी कवळोन । शिवासन्निध आणीतसे ॥१९॥माझी क्रोधभयेंकरुन । गुप्त झाला जनार्दन । पडिला मीन स्तब्ध जाण । उपदेश देऊं ययातें ॥१२०॥आदिनाथें केला अलक्षोच्चार । आदेश देत प्रत्त्युत्तर ल। जेवी कोशांतूनि दिव्य अस्त्र । दैदीप्यमान निघतसे ॥२१॥मस्तकीं ठेऊनि अभयकर । निघे सदीप्त दिव्यसुंदर । पुरुष सकुमार कुमर । मकरोदरापासोनि ॥२२॥जेवीं क्षीराब्धीपासोन । निष्कळंक दिसे रोहिणीरमण । कीं अभ्रांतूनि चंडकिरण । जलदबुंथी त्यागोनी ॥२३॥स्वरुप सौंदर्य डोळस । कमनीय निमासुर रुपस । सहस्त्र मीनकेतनांस । अंगुष्ठ सरी न पवती ॥२४॥मासामाजी मार्गशीर्षमास । शुध्द पक्ष गुरुवारास । श्रवण नक्षत्र निशीं माध्यान्हास । मत्स्येंद्रनाथ अवतरले ॥२५॥मेघगिरी गडगडाट । देवदुंदुभि संघाट । मत्स्येंद्रनाथ झाले प्रगट । वृंदारक पुष्पें वर्षती ॥२६॥जो नाथपंथासी अंकुर । सांप्रदायवृक्ष सुंदर । योगदीक्षेच्या पत्रीं संभार । अनुभवपुष्पीं डंवरला ॥२७॥झाला मत्स्योदरापासोन । मत्स्योदरनाथ म्हणोन । ॐकारस्वरुप त्रिलोचन । स्वयें अवतार घेतसे ॥२८॥क्षीराब्धीचे ऐलतटीं । तिष्ठती निर्जरांच्या थाटी । जय जय शब्दाचे बोभाटी । भुवनत्रय गाजलें ॥२९॥देव गंधर्व सर्व । नाथचरित्र पाहती अभिनव । ऐलतटीं समुच्चय समुदाव । देव गंधर्व तिष्ठती ॥१३०॥शिवगौरीसह मत्स्येद्र । येते झाले ऐलतीर । तो तिष्ठती तेथें सुरवर । सुमनवृष्टि करिताती ॥३१॥अनंत ब्रह्मांडें शिवच्छेन । निर्माण होती न लगतां क्षण । दिव्यमंडप उभारिला जाण । मुक्त झालरी डोलती ॥३२॥त्रिदश करिती जयजयकार । पुष्पवृष्टि वारंवार । म्हणती मत्स्येंद्र शिव अवतार । विश्वोद्धारीं प्रगटला ॥३३॥उमा रमा शची सावित्री । अनुसूया अरुंधती हेमपात्रीं । अक्षयवाणे घेऊन करीं । आरक्ताक्षता शिंपिती ॥३४॥हंसयानीं चतुरानन । गरुडारुढ मधुसूदन । परस्परें भ्रूसंकेतेंकरुन । खूण जाणती अन्योन्य ॥३५॥शंकर वदे रमापति । महत्साधनें केली युक्ति । त्रिदश मर्म नेणति । धन्य साधन साधिलें ॥३६॥क्षीराब्धीचें क्षीरामृत । जगन्माया स्वयें वाढीत । महत्प्रसाद निर्जर भाविक । लाभ मानिती सर्वही ॥३७॥तेथे अप्सरादिकांचें नृत्य । रंभा तिलोत्तमा मेनका सत्य । किन्नर गंधर्व आलापीत । समारंभ जाहला ॥३८॥मत्स्येंद्ररुप मनोहर । देव निरखिती वारंवार । जेवी कमळामोदीं भ्रमर । रुंजी घाली सप्रीतीं ॥३९॥प्रदीप्त दीप दिव्यदीप्ति । तेवीं भासे अंगकांति । आकर्ण नेत्र तळपती । सरळ नासिक साजिरें ॥१४०॥नक्षत्रप्राय दशनश्रेणी । अधररंग माणिक्यवर्णी । मुद्रा तळपती दैदीप्य श्रवणीं । चंद्रसूर्यासारिख्या ॥४१॥विशाळ वक्षस्थळ बाहु सरळ । मेखळावेष्टित कटिमंडळ । वज्रकौपीन अचळ अढळ । चरणयुगुळीं पादुका ॥४२॥जो ब्रह्मज्ञानाचा कल्पवृक्ष । योगसिध्दि देणार दक्ष । जयाचें अलक्षीं सदा लक्ष । स्वयें विरुपाक्ष अवतरे ॥४३॥साळंकार अमौल्यमणी । तडिदंबरें अरूणवर्णी । शैली शृंगी नाथभूषणी । वीरगुंठी मस्तकीं ॥४४॥विभूति भूषित गात्रीं । कक्षे झोळी सुवर्णपात्रीं । अलक्षोच्चार सदा वक्त्रीं । स्वयें त्रिनेत्री अवतरला ॥४५॥शंकर कृपादृष्टीं पाहोन । स्वअंकी प्रीतीने घेऊन । मस्तक करोनि अवघ्राण । उपदेश देत तयाते ॥४६॥खेचरी मुद्रेचा संकेत । गोरच करी आदिनाथ । मौळी ठेवोनि वरदहस्त । भिक्षाटनीं अज्ञापी ॥४७॥उमा महेश्वरचरणीं साष्टांग पदीं ठेवोनि मूर्ध्नि । वर देई शूळपाणी । जगदोध्दार करी कां ॥४८॥मतस्येंद्ररुपडें रुपराशी । रंभा आणि मिश्रकेशी । कामाभिलाषे सक्त मानसीं । ते शक्र जाणे ते वेळीं ॥४९॥रंभेस वदे पुरंदर । पाहिला कामदृष्टीं मत्स्येंद्र । शाप घेई साचार । जन्म घेई भूमीवरी ॥१५०॥शापोक्ति होतांचि थोर । रंभा झाली भयातुर । मग प्रार्थी विनयोत्तर । उ:शाप द्यावा आमुतें ॥५१॥तों वदे उःशापवाणी । मत्स्येंद्रसंगे उध्दार होऊनि । याल स्वपदी निर्वाणी । निश्चयेसीं जाण पां ॥५२॥मल्लाळदेशी राज्याधिकारी । उभयतां जन्माल सुंदरी । चंद्रकळा नामें निर्धारी । नाथ मत्स्येंद्र भेटती ॥५३॥तुम्हांसही होय अंगसंग । त्यासी कराल विषयभोग । तुमचा उध्दार होईल मग । गोरक्षमत्स्येंद्रदर्शनें ॥५४॥मत्स्येंद्रातें पंचवदन । आज्ञापिती भिक्षाटन । तिही लोकी तीर्थाटण । करोनि येई मागुता ॥५५॥बध्दहस्तें करी आदेश । मत्स्येंद्रनाथ स्वयंप्रकाश । स्तुत्युक्त श्लोकांश । तेंचि परिसोत श्रोते हो ॥५६॥आदिनाथं गुणातीतं निरालंबस्वरुपिणम् । षड्दर्शनं नमामि त्वां नाथपंथप्रदर्शकम् ॥१॥भस्मचर्चितसर्वांग कर्णमुद्रासुभूषितम् । शैलिकाषायसंवीतं ध्यायेत्तं नाथसद्गुरुम् ॥२॥यापरी आदिनाथध्यान । स्तवूनि करी साष्टांग नमन । पुन्हा जगन्माता वंदोन । सन्निध जाऊन बैसत ॥५७॥जननी म्हणे रे स्नेहाळा । माझ्या मत्स्येंद्रा बाळा । कुरवाळूनि मुखकमळा । वेळोवेळां चुंबीत ॥५८॥भवानी पाहे अवलोकून । वारंवार मत्स्येंद्रआनन । षडानन गजानन । तैसा तूं प्रिय मज ॥५९॥आज्ञा वंदोनि ते क्षणीं । निघाला मत्स्येंद्रमुनि । शिवगौरी नमुनी । जाता झाला अतिवेगें ॥१६०॥वृषभध्वज विमानयानीं । गगनीं जाय त्वरेंकरुनि । मनपवनवेगाहूनि । गमन करी पुष्पक ॥६१॥क्षीरोदक टाकोनि मागें । पुष्पक जाय अतिवेगें । मृडानी असे वामभागें । तो जळीं अपूर्व देखिलें ॥६२॥हिमनगजा पाहे अधोमौळी । क्षारसिंधु देखिला ते वेळीं । कमळपत्रीं बाळ जळीं । प्रवाहित देखिले ॥६३॥चर विमान केले स्थिर । देवी पाहे हर्षे थोर । तंव म्हणे श्रीशंकर । काय लक्षिसी कौतुकें ॥६४॥पाहा स्वामी चंद्रमौळी । बाळ वाहातसे ये काळीं । सुकुमार तनु सांवळी । कोण कोणाचें कळेना ॥६५॥मग म्हणे पशुपति । समुद्रपुत्र हा निश्चितीं । जालंदर तोचि व्यक्ति । शेषावतारी अवतरे ॥६६॥ पातंजळी प्रसिध्दीसी । अवतरतसे मेदिनीसी । त्यासी आणावें मजपासीं । उपदेशदीक्षेकारणें ॥६७॥भवानी आणीतसे शिवाजवळी । स्वहस्तें त्यातें कुरवाळी । अभयकर चंद्रमौळी । ठेविता झाला तात्काळ ॥६८॥हस्त स्पर्शितां जाण । दिव्यदेह सकुमार होऊन । शिवचरणीं मस्तक ठेवून । म्हणे त्राहि मां पाहे ॥६९॥जैसा हेळी ये उदयाचळीं । तें पळ डाळवृध्दि होय ते वेळीं । तेवीं जालंदरी तेय वेळीं । वयें कुमार जाहला ॥१७०॥विमान जातसे गगनोदरीं । हर्षे निर्भर जालंदरी । जाता झाला झडकरी । उत्तर दिशा लक्षोनी ॥७१॥पातले बदरिकाश्रमासी । निकट नारायणाआश्रमासी । वंदोनि आदिनारायणासी । केदारातें नमिलें ॥७२॥चौर्यांशी सिध्द नवनाथ । भेटले तेथें मत्स्येंद्रनाथ । अनेक योगी समस्त । अनुष्ठानें करिताती ॥७३॥मानससरोवरजीवनीं । स्नान करी मीनकेतनी । कैलासीं ये शिवदर्शनीं । प्रत्यही नेम तयाचा ॥७४॥शिव सांगती पार्वतीप्रति । गुरुगीता यथानिगुती । केदारकल्पादि सिध्दांतीं । मत्स्येंद्र तेथें परिस तूं ॥७५॥शिवमहावाक्य विवरण । मत्स्येंद्रा लाभले संपूर्ण । मानूनियां कृतकल्याण । स्वानंदी निमग्न जाहले ॥७६॥मत्स्येंद्रा वदे मदनारी । तुवां सत्वर जावें पुढारी । सवें गोरक्ष निर्धारी । तो स्वयें विष्णु येईल ॥७७॥पुढें कलियुगीही जाण । अंशअवतार होती निर्माण । परिसें तें कोण कोण । विविध नामें सांगतों ॥७८॥गोपेंदु तो होय मदन । कानीफ तो अंगिरानंदन । मीन उद्भवे गजवदन । उशना चर्पटी जाणावा ॥७९॥चतुरानन चौरंगीनाथ । भृंगी संभवें भर्तृहरि नेमस्त । गोरक्ष सांगेल परमार्थ । चिरकाळ चिरंजीव करील ॥१८०॥वीरभद्रांश विक्रम । शककर्ता पराक्रम । सत्कीर्तिविषयीं त्रिविक्रम । यश सोज्वळ जयाचें ॥८१॥ तो भर्तृहरीचा कनिष्ठानुज । परोपकारी विजयी ध्वज । भविष्य होईल शेषात्मज । शालिवाहन शककर्ता ॥८२॥गोरक्ष प्रताप करील बहुत । भूपाळ उध्दरील अगणित । तुझ्या सेवेसीं होईल रत । अनन्यभावेंकरोनि ॥८३॥मीही वाराणसीवास । करीन तारक उपदेश । स्वपदीं नेईन जीवमात्रांस । पातका त्रास देवोनी ॥८४॥कृतयुगीं पुष्कर तीर्थ । त्रेतायुगी नैमिषारण्य विख्यात । कुरुक्षेत्र द्वापरांत । कलींत गंगा श्रेष्ठ पैं ॥८५॥मग गंगेसी सांगे गौरीपति । तुवां जावें सत्वरगति । स्नानपानदर्शनें निश्चितीं । त्रिविधतापीं उध्दरी ॥८६॥सर्व तीर्थासी आज्ञा प्रमाण । पावन करा जागा येथून । गंगा वदे विनयवचन । प्रार्थोनियां महेशा ॥८७॥स्वामी आज्ञापिला अर्थ । मान्य करिती सर्व तीर्थ । परि त्यांचें एक मनोगत । आज्ञा होतां विनविते ॥८८॥तंव वदे कैलासनाथ । काय आशंकित तुमचें चित्त । तें सांगावें मनोगत । जें कां अपेक्षित तुमचें ॥८९॥तीर्थे वदती तदोत्तरीं । महत्पातकें पृथ्वीवरी । पंचमहादोषाधिकारी । त्यांतें मुक्त करुं पैं ॥१९०॥परि या दोषांचा आम्हां स्पर्श । अळुमाळ लागतां लेश । त्या पातकांचा नाश । केला पाहिजे स्वामियां ॥९१॥कलींत कळिमळ अघ दुःसह । आम्ही सुस्नात मलापह । परी अंतःकरण शुध्द नव्हे । गुरुमंत्रावांचोनि पैं ॥९२॥शंकर म्हणे परिसा सर्व । त्याचा आहे उपाव । तारकोपदेश मी सर्वस्व । अविमुक्तक्षेत्री देतसे ॥९३॥जुनाट निज गुह्य प्राप्त । मत्स्येंद्र गोरक्ष प्रदीप्त । जगदोध्दारानिमित्त । उपदेश करिती पृथ्वीवरी ॥९४॥पुढे होईल श्रीशंकर । धर्मस्थापक धरीन अवतार । नंतर विष्णुभक्त वैष्णव वीर । पराक्रमी होतील ॥९५॥नामस्मरण कीर्तन प्रगट । मननशीळ बळियाढे उद्भट । जनांस भजनमार्ग सधट । वाट दाविती मोक्षाची ॥९६॥जगाच्या पातकेंकरुन । तुम्ही झाला जरी मळिण । शुध्द व्हाल साधुदर्शनें । निश्चयेंसी जाण पां ॥९७॥पाप ताप दैन्य पाही । साधुदर्शनें नुरे कांही । देही असोनि विदेही । अक्षयपद पावती ॥९८॥तरी तुम्ही निर्भयमन । सत्वर करोनियां गमन । जडजीवांतें पावन । उध्दार करा तयांचा ॥९९॥ऐसें शंकर अभयोत्तरीं । तीर्थे तोषली अंतरीं । नमस्कारोनि सत्वरीं । स्वस्थ स्वस्थळां जाती पैं ॥२००॥शिव वदे रे सकुमारा । नित्य कासया येरझारा । करी सत्वर जगदोध्दारा । विचरें तूं भूमंडळीं ॥१॥अवश्य करी आदेश । गौरीतें नमीतसे । संतोषोनि व्योमकेश । आज्ञा देता जाहला ॥२॥तेथोनि निघे मत्स्येंद्रयती । सनातन ऋषि मार्गी येती । परस्परें वंदिती । वामदेवासी भेटले ॥३॥ते पुसती मत्स्येंद्राप्रति । गमन करितां कोणे आर्ती । येरु वदे पार्वतीपति । आज्ञापिती तीर्थातें ॥४॥आम्हां शिवाआज्ञेवरुन । करावें लागे तीर्थाटण । मग वदती ऋषिजन । तुम्हां तीर्थे कासया ॥५॥तुम्ही तीर्थाचे तीर्थरुप । वायां कासया साक्षेप । तुम्ही स्वयंभु ज्योतिस्वरुप । संकल्पविकल्पांवेगळें ॥६॥ जो शुचिष्मंत शुध्दमन । सर्वाभूती ईश्वर पूर्ण । आपपर ज्यास समान । तीर्थे वंदिती तयातें ॥७॥मननिग्रह इंदियहटीं । वज्रासन योगाचे नेहटीं । तेथें जान्हवी वसे निकटीं । तीर्थे असती त्यापासीं ॥८॥यापरी वदोन महर्षिजन । मत्स्येंद्र देती प्रतिवचन । पिंडब्रह्मांड ऐक्यस्थान । आमुचें गमन उभयतांत ॥९॥पिंडी तीर्थे असतीं । तेचि ब्रह्मांडाची स्थिति । उभयलोकीं जी योगगति । योगियांनी वर्तावें ॥२१०॥कृतार्थ होऊनि परस्पर । निघते झाले नाथ मत्स्येंद्र । ऊर्ध्वगतीनें सत्वर । बदरिकाश्रमीं पातले ॥११॥पुढील कथेचा इतिहास । अमृतातें पैज घेतसे । संतांचा दासानुदास । प्रार्थीतसे सलगीनें ॥१२॥गोरक्षोत्पत्ति सुरस । श्रवण करावी सावकाश । एकाग्र करोनि मानस । श्रोता वक्ता उभयतां ॥१३॥संमत सिध्दसिध्दांतग्रंथ । अमनस्क गुरुकल्पखंड गुप्तार्थ । वामदेव अपर्णानाथ । स्वयें सांगती योगातें ॥१४॥आदि श्रीमन्नाथलीलास्वर्धुनी । आर्त श्रोतयां प्राप्त पर्वणी । सुस्त्रात श्रवणमननपणीं । निजध्यासीं असावें ॥१५॥कीं हा नाथलीलासुधेचा सागर । त्यांत रहस्य मीन मत्स्येंद्र । स्वानंदाचा दाटला पूर । प्रेमभरतें लोटलें ॥१६॥इति श्रीमन्नाथलीलामृतग्रंथ । श्रवणें पुरती मनोरथ । भैरवपदीं आदिनाथ । द्वितीयोऽध्याय कथियेला ॥२१७॥संमतिश्लोक ॥२॥ ओव्या ॥२१७॥ N/A References : N/A Last Updated : February 06, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP