श्रीनाथलीलामृत - अध्याय २१ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
जें आदिबीज सनातन । इच्छाशक्ति प्रगटे तेथून । जियेपासून उत्पन्न त्रिगुण । वेदत्रय जाणिजे ॥१॥
रजापासोनि चतुरानन । तमोगुण तो भाळलोचन । सत्त्वस्थ तो रमारमण । पंचक छत्तीस तत्वादि ॥२॥
जें श्रुतिस्मृतींचें रहस्य । जें हरिहरांचे उपास्य । जें परब्रह्म अविनाश । तेंचि वश्य योगियां ॥३॥
तें पूर्णब्रह्म पुरातन । जें शुकसनकादिकांचें देवतार्चन । जें नारदाचें उपगीयमान । तेंचि अवश्य मुनिजनां ॥४॥
तया उपासनापरत्वें कल्पिति । शैव म्हणती पशुपति । वैष्णव ध्याती लक्ष्मीपती । शाक्त शक्ति आराध्य ॥५॥
गाणपत्य अर्चिती गजवदन । सौर ते सूर्यनारायण । वैदिक वेदनारायण । अग्निनारायण प्रत्यक्ष ॥६॥
यथाभावें भाविती जया । तोही स्फुरद होतसे तया । कल्पतरुतें कल्पना केलिया । फळें कल्पित देतसे ॥७॥
एक करिती तीर्थाटण । एक वातांबुपर्णाशन । एक वायु रोधून । प्राणायाम साधिती ॥८॥
एक प्राणापान संगतीं । सुषुम्नेचे सूक्ष्मपंथी । जीवशिवऐक्य होती । ते नाथपंथी महाराज ॥९॥
सिंधुपासाव मेघोदक । विस्तारवृष्टि पैं अनेक । परि अधिष्ठानी समुद्र एक । एकीं अनेक भासती ॥१०॥
असो गतकथाध्यायीं निरुपण । करावें सिंहावलोकन । कथारहस्यासीं कारण । श्रवणकर्ते म्हणोनि ॥११॥
आतां सर्वेंद्रियांतें करोनि श्रवण । एकाग रहस्य करा श्रवण । येणे परमार्थासी आमंत्रण । सुखासी पात्र होइजे ॥१२॥
विषयत्रासें तिरस्कार । गोपेंदूस वैराग्य निर्भर । मातेस करोनि नमस्कार । उभा ठाके पुढारी ॥१३॥
अलक्षोच्चारी भिक्षा मागत । दीक्षा निरीक्षोनि । स्वसुत । हर्ष उत्कर्ष कृतकृत्यार्थ । सुदिन भावी आजिचा ॥१४॥
परम आल्हाद मानूनि मनीं । सद्गद कंठ प्रेमाश्रु नयनीं । ऐसी माता दुर्लभ कुंभिनी । कुलोध्दारिणी होय ते ॥१५॥
आप तरोनि तारिला पुत्र । येर्‍हवीं परत्र साधूनि उध्दरी गोत्र । ऐसी जननी पवित्र । भुवनत्रयीं असेना ॥१६॥
इतर माता बहुत असती । प्रपंच करविती पुत्राहातीं । मिष्टभाषणीं तोषविती । परि काळासि देती भातुकें ॥१७॥
ऐसी नसे ते मैनावती । जगद्वंद्य महासती । जिचिये स्मरणें दोश पळती । भागीरथी पैं दुसरीं ॥१८॥
मनीं माता विचार करी । वैराग्यें असतीं बहुतांपरी । सत्य असत्य हें निर्धारी । पाहूं परीक्षा पैं आतां ॥१९॥
बोध्यबोधवैराग्य ज्ञानवैराग्य । स्मशानवैराग्य विरहवैराग्य । क्रोधवैराग्य प्रसूतिवैराग्य । प्रस्थानवैराग्य जाणिजे ॥२०॥
यांत कोणतें तें पाहूं प्रचिति । माता विचारी आपुले चित्ती । पाचारोनि पुत्राप्रति । गुह्य गोष्टी निवेदी ॥२१॥
जाऊनि यावें अंतःपुरीं । भिक्षा मागोनि सर्व नारी । पुन्हा येऊनि ये अवसरीं । गमन करणीं तीर्थांतें ॥२२॥
अवश्य म्हणोनि करी नमन । वेगीं पातला न लागतां क्षण । हेममंदिरें शोभायमान । रत्नें कोंदणीं चौफेरी ॥२३॥
कांचनबंदी अंगणीं । तिष्ठे नृपचूडामणि । अलक्षोच्चार दीर्घध्वनि । करिता झाला अवचिता ॥२४॥
ऐकोन पातल्या भूपकामिनी । कीं मेघवेष्टित सौदामिनी । जेवीं रश्मिवेष्टित सहस्त्रकिरणी । कीं रासचक्रीं श्रीकृष्ण ॥२५॥
औमा नामें पट्टराणी । मिठी घाली नृपाचरणीं । प्रार्थीतसे दीनवाणी  । बध्दपाणि भूप तो ॥२६॥
अष्टभोग शक्रासमान । त्याग करिसी निष्ठु मन । राजभोग धिक्कारोन । किमर्थ त्याग करिसी हा ॥२७॥
मृदुशय्या अरलसुमन । सुस्वरुप स्त्रिया नवयौवन । ऐसियांतेहीं त्यागून । केवीम जासी नरेंद्रा ॥२८॥
सुगंधोदकाचे सुवर्णहंस । शीतळ सिंचने नेत्रस्पर्श । स्त्रकचंदनादि विलास । त्यागोनि उदास कां होसी ॥२९॥
नागांगना देवांगना । रंभादि ललना कामांगना । तावत्‍ स्त्रियांच्या देखोनि वदना । लवविती पाती नेत्रांची ॥३०॥
ज्या कंजाक्षीचें निरीक्षण । महातपस्व्या घडे पतन । परि ऐसियांचे ह्रदय कठिण । केवीं झालें कळेना ॥३१॥
तुझिये स्मरणमात्रेकरुन । स्त्रियांसी होतसे कामविपिन । चंद्रकांतन्यायेंकरुन । द्रवती दर्शनें वल्लभा ॥३२॥
आम्ही अबळा बळहीन । तुजविण प्रिया दिसों म्लान । निर्माल्य वपु गलित म्लान । प्राणदान देइजे ॥३३॥
आमचा सर्वस्वें करुनि नाश । काय जोडिसी पुरुषार्थ यश । विश्वासघाताचें अपेश । वोझें वाहिसी मस्तकीं ॥३४॥
प्राणनाथ नरभूषणा । प्रार्थीतसों विज्ञापना । आम्हां पावूनि निधना । मग घेई सुखें संन्यास ॥३५॥
विषयविषयाची विषयवल्ली । विषयप्राय तुवां खुडिली । फळीं पुष्पीं कोमाइली । तेवीं केली परी हे ॥३६॥
जेवीं चंद्रावीण यामिनी । तेवीं तव विरहें भामिनी । कामें विव्हळ परम कामिनी । सौदामिनी जैं मेघ ॥३७॥
सुरककुशळ तूं नृपाळ । मर्म मर्मज्ञ जाणसी सकळ । इतर नर ते पशु केवळ । कामकंडूशमनार्थ ॥३८॥
अंगसंग अष्टभोग । दिव्यभोगें निवे अष्टांग । हे त्यागोन घेसी योग । प्रारब्धभोग आमुचा ॥३९॥
मूळ पाहतां आदिनाथें । काय त्यागिलें पार्वतीतें । व्यर्थ त्यागोन आम्हांतें । काय योग तो तपसिध्दी ॥४०॥
आम्हांस करवी दीक्षाग्रहण । भस्ममुद्रा भव्य भूषण । अहर्निशीं करुं तपसेवन । आवडीनें प्रभुवर्या ॥४१॥
जेवीं चितस्वरुपीं चिच्छक्ति । तेवीं अर्धांगी वसे युवती । की पुरुषी जेवी प्रकृति । छायारुपी अक्षयी ॥४२॥
सूर्यासवें जैसी किळा । कीं अग्नीसवें जैसी ज्वाळ । कीं कस्तुरीसुगंध नृपाळा । श्लाघ्य सकळां दिसे पैं ॥४३॥
की दीपासवे जैसी दीप्ति । कीं कळासंगें रोहिणीपति । तेवीं तव संगेसी प्राणपति । आम्ही वसों हा निश्चय ॥४४॥
भास्करें त्यागिलियां किरण । कीं अमृतें त्यागिलें गोडपण । मग तयांतें पुसेल कोण । गोडीवीण शर्करा ॥४५॥
जेवी जीवनावीण मीन । कीं शशीविना कमळिणी दीन । मग नृपा देत अलिंगन । जेवीं नागिणी चंदना ॥४६॥
पीन पयोधर वर्तुळ ठसे । जया शरीरीं करितील स्पर्श । परि अणुमात्र विकार लेश । अंगी नसे जयाचे ॥४७॥
सकळ कामिनी कामज्वरें । अरंबळती एकसरें । विव्हळ विकळ विरह दुस्तर । चिंतातुर सर्वही ॥४८॥
कामविकाराचें पसरिलें जाळें । मनमीन नृपाचा नाकळे । ऐसें जाणून परम व्याकुळ । प्राणहीनासारिखी ॥४९॥
मनोमृग विंधिला चापशरें । दुःखें पडतसे एकसरें । विलाप करिती दीर्घस्वरें । घात अनर्थ ओढवला ॥५०॥
नासाग्रीं ठेवोनि दृष्टि । सोऽहंस्मरणीं पडली गांठी । जीवशिवासी ऐक्यभेटी । मग सहज तुटी विषयाची ॥५१॥
रायाची पाहोन विदेहस्थिति । सदुःखित समग्र युवती । म्हणती धाव धाव गा पशुपति । ऐसे आकांतीं सोडवी ॥५२॥
नृप होवोनि सावधान । यथार्थ बोलता झाला वचन स्त्रियामात्र जननीसमान । अन्यथा नसे कल्पांतीं ॥५३॥
ऐसा परिसोनि वाक्यार्थ । भाविला जेवीं वज्रपात । किंवा मांडिला कल्पांत । तेवीं अनर्थ जाहला ॥५४॥
ललनाललामीं शिरोललाम । त्राहाटित्या झाल्या दुःखे परम । दुस्तर वोढवलें पूर्वकर्म । विरह परम नावरे ॥५५॥
अहा प्रारब्ध कटकटा । जळे सौंदर्य हव्यवाटा । विधीं नेमिलें जें अदृष्टा । दुःखवाटा भोगवी ॥५६॥
अहा राया प्राणप्रिया । कुर्वंडी सांडूं आमुची काया । केशीं झाडूं तुझिया पायां । दासानुदास विक्रीत ॥५७॥
आम्हांवेगळा निमिषभरी । स्वल्प परि वाटे कल्पवरी । ऐसें असोनि कां अंतरी । कठोर झालासि कळेना ॥५८॥
सर्वस्वघात करुन आमुचा । काय बडिवार पुरुषार्थाचा । आम्ही शरण काया वाचा । काय त्याचा हा परिणाम ॥५९॥
धाव पाव वेगीं नरकेसरी । काममातंग मत्त वैरी । मदगंडस्थळकुचविदारी । यश झडकरी घेईं कां ॥६०॥
प्रिया प्रियोत्तमा प्रियवर्धना । बोलत्या झाल्या तये क्षणा । आपुले सदना लावूनि अग्ना । घात करोनि स्वहस्तें ॥६१॥
आपुले मुखदोषेंकरुन । शुक साळया पावती बंधन । तेवीं तुवां केलें जाण । शेखीं शब्द कोणा लाविसी ॥६२॥
जळातें प्राशूनि जाय घटिका । परि झेंगटा मारिती बळें ठोका । स्वयें अपराध नये शंका । परि दुःखास पात्र झाली ती ॥६३॥
यावरी मंगळा वदे ती गोरटी । सर्व प्रियांसी होय तुटी । यांत तरी लाभ गांठी । कोणता तो नेणवे ॥६४॥
मग चंद्रावती बोले वचन । जळो हीन हें प्राक्तन । देवावरी काय रुसोन । देहप्रारब्दचि दुर्दैव ॥६५॥
विधिललाटपटाक्षर । नेमिलें नव्हे दुसरें । जाणून ऐसा विचार । होणार भोगणें प्राप्त पैं ॥६६॥
सर्वांस सांगे शशिमुखा । विरहें जळती लावण्यलतिका । कामें पसरोनि कृतांतमुखा । ग्रास केला युवतींचा ॥६७॥
ऐसें वदोनि पडे विकळ । पोटी पेटला विरहानळ । दुःखें अबळा पडती विकळ । मर्यादवेली उल्लंघी ॥६८॥
चित्रशाळेचीं जेवीं निर्जीव चित्रें । तेवीं स्त्रियांची तटस्थ वक्त्रें । सकळभार्या वृंदमात्रें । दारुप्रतिमा दिसती ॥६९॥
कंजाक्षी म्हणे तये वेळां । सर्पपप्राय अन्याय जाहला । तो नृपें पर्वतातुल्य केला । हें योग्य तुम्हां नव्हेचि ॥७०॥
भयचकित मृगस्वभाव । आणि जागृत ते सारमेय । हेही गुण स्त्रियांत असावे । तेही सेवेंत आसती ॥७१॥
आम्ही मनेंद्रियेंकरुन । काया वाचा अंतःकरण । शरणागत अनन्यशरण । तरी त्याग करणे अयोग्य ॥७२॥
आमुचा जरी अपराध झाला । तरी पाहिजे क्षमा केला । उचित अनुचित नृपाळा । सांभाळिलें पाहिजे ॥७३॥
आमुची आज्ञा न घेतां कैसी । कैसा झालासी संन्यासी । संन्यास देणें तरुणासी । सद्गुरुसी निंद्य हें ॥७४॥
चक्रवाकापरी वियोग । देवोनि केवीं घेसी योग । स्वस्त्रियांचा करोनि त्याग । हेंही अयोग्य स्वधर्मा ॥७५॥
आतां ऐकें प्राणनाथा । पदीं गुंतली बहुत आस्था । पायांवेगळें सर्वथा । आम्हां न करी राजेंद्रा ॥७६॥
नगरप्रदेशीं बांधोनि मठिका । आसमंत लावोनि पुष्पवाटिका । तेथें राहोनि नृपटिळका । अक्षयी वसो शुश्रुषे ॥७७॥
होतां स्त्रियांचा वरबळा । तुच्छ मानूनि न पाहे डोळां । अगाध वैराग्य जाहलें भूपाळा । लोहकांचन समदृष्टी ॥७८॥
मृगाक्षीईक्षण तीक्ष्णशर । घायें निर्जर होती जर्जर । परि रायाचें ह्रदय वज्र । भेद अणुमात्र नव्हेचि ॥७९॥
ऐकें नरवीर सुंदरा । चातुर्यवसंत सकुमारा । लावण्यखाणी वैरागरा । तुजवीण दारा हिंपुटी ॥८०॥
आतां प्रार्थना हेचि पायीं । वास करावा एके ठायीं । सेवा करुनि राहूं सर्वही । तेणें होईल सुख आम्हां ॥८१॥
कांचनाचा बांधोन मठ । परम सुशोभित अतिसुभट । वसूं सेवेंत नित्य निकट । राहूं सदा प्राणेशा ॥८२॥
नवरत्नांची कंथा साजिरी । मुक्ताफळांची लावूं झालरी । सुवर्णतगटीं झोळी बरी । कमंडलुपात्र हेमाचें ॥८३॥
यावरी वदे योगेंद्र निश्चिती । राजविषयांची झाली वांती । पुन्हा स्वीकार मागुती । घडेल कैसा जननिये ॥८४॥
विषय कांता कांचन । हेचि नरकाचें साधन । न चुके काळाचें अवदान । यमबंधन परिणामीं ॥८५॥
जन्म मृत्यु जरी पाही । आम्हां नसे काळत्रयीं । गुरुकृपें झाले विजयी । देहविदेही असोनी ॥८६॥
विरंचिरचित चतुर्दशभुवन । मग कासया निर्मीत नूतन सदन । पृथ्वी प्रकाश विस्तीर्न आसन । गगनमंडप उभविला ॥८७॥
सप्तसमुद्रपरिघावर्त । दीपिका शशिसूर्य प्रकाशित । मंगळतुरें मंजुळ अनुहत । अखंडध्वनि अक्षयीं ॥८८॥
अष्टदिशा स्तंभ दिकपाळ । माजीं अनळ वाहे मंजुळ । अनेक नद्यांचे प्रवाह तुंबळ । वाटिका वृक्ष सफळ ते ॥८९॥
चतुर्दिशांचीं द्वारें मुक्त । प्रतिबंध नसे किंचित । विहार क्रीडासन वसंत । पुत्रीं पुष्पीं डवरले ॥९०॥
उष्ण संतप्त होतां देख । मेघ सिंचिती मेघोदक । हेमंत ऋतूचें परमसुख । गिरिगुहादिक सुस्थळें ॥९१॥
पंचतत्वांची कंथा साजिरी । षट्‍चक ठसे अभ्यंतरी । धुनी ब्रह्माग्नि अहोरात्री । दग्ध करी कर्मातें ॥९२॥
कामक्रोध मारुन वैरी । झालों साम्राज्याधिकारी । त्रिदेश तिष्ठती जोडले करीं । सत्ता त्रिभुवनीं आमुची ॥९३॥
भूमि शय्या भुज उशी । नभचांदवा चंद्रप्रकाशीं । नक्षत्र ठसे आकाशीं । ब्रह्मांडमंडप साजिरा ॥९४॥
दिशाअवर्ण तें प्रावरण । शांति स्वस्त्रीआलिंगन । उन्मनीचें अवलंबन । निमग्न सुखे तुर्येचे ॥९५॥
बारा सोळा नितंबिनी । आणि दशक त्या कामिनी । सत्रावी ते मुख्य जननी । अखंडपाणी तोषवी ॥९६॥
करतळीं सेवून भिक्षान्न । तरुतळीं सुखे करुं शयन । किंवा पाहोनि पुलिन । इच्छानंदें विचरावें ॥९७॥
सुभगा शुभांगी बोले प्रिया । केवीं त्यागिसी आमुतें राया । तुजवीण यौवनें जाती वायां । पाहे नरवर्या भूपति ॥९८॥
विरहकांतारी त्यागिल्या कांता । कां पाहसी या आकांता । चिंतार्णवीं पडलों सर्वथा । हें दुःख स्मरतां न साहे ॥९९॥
स्त्रिया भ्रतारावाचोन । दिव्य कामिनी दिसे दीन । जेवीं स्मशानीचें भग्नभाजन । निरर्थकचि जाणिजे ॥१००॥
देवांगनातें तवांगना मान्य । चंचल सरोरुह पद्मनयन । तारुण्य लावण्य आगण्य । नवयौवन सुनन्मा ॥१॥
हाटकवर्णी तनुधारिणी । मृगशावाक्षीं गजगामिनी । जीतें देखोनि सलज्ज पद्मिनी । रत्नभूषणीं मिरवल्या ॥२॥
सुंदरी त्यागोनि दरीसेवन । गमन करिसी टाकोन भुवन । व्यर्थ लंघूं पाहसी वन । काय तें साधन नेणवे ॥३॥
ललना शृंगारवनवसंत । तदांगें श्वापदें असतीं बहुत । तूं नृप येथील रतिकाम्त । स्वेच्छें क्रीडा करी कां ॥४॥
कांता काननी कुरंगनयनी । ह्याच भावी कुरंगिणी । सलंब वेणी कृष्णसर्पिणी । मस्तकीं मणि विराजे ॥५॥
अधर बिंबफळ कीरनासिक । मंजुळ शब्दी भासें पिक । उभय स्तन ते चक्रवाक चित्तचातक घन इच्छी ॥६॥
चतुर्वर्तुळें गंडस्थळ । भुजशुंडा बाहु सरळ । मत्तमातंग ते केवळ । सिंहमध्या विराजती ॥७॥
तुंगस्तन तव करस्पर्श । वांछिती तया न करीं नैराश्य । यावरी वदे तो नरेश । तयेप्रति ते काळीं ॥८॥
पीतस्तन ते मांसग्रंथी । कनककलश तयांचें वदती । मुखीं श्लेष्मा वाहे परी भाविती । रोहिणीपति राकेंदु ॥९॥
पाहतां मळमूत्राचें स्थळ । वस्तुतः तें अमंगळ । निंद्य तें वंद्य केवळ । परमलाभ मानिती ॥११०॥
अंगनारुपें हे करंडी । मळमूत्राचीच ते हंडी । सद्वोधातें विखंडी । नरककुंडी पचवीत ॥११॥
विद्युल्लतेपरी भोग चंचळ । कीं आयुष्यवातें अभ्र वितळ । धनयौवनदारा सकळ । क्षणभंगुर असतीं ॥१२॥
आम्ही सप्ताद्वीपींचे राज्याधिकारी । भिक्षा मागूं घरोघरीं । मातृन्यायें सर्व नारी । भिक्षाभातुकें अर्पिती ॥१३॥
मग चंद्रावती बोलत । राया वदसी सर्वही यथार्थ । परि आमुचें हेंचि मनोगत । सेवेसी निरंतर असावें ॥१४॥
कोण करील चरणक्षाळण । कोण देईल क्षीरोदकपान । कोण करी सवें शयन । मनरंजन कोण करी ॥१५॥
गंगा यमुना सरस्वती । सहज चरणक्षाळणें होतीं । गृही गृहीं क्षीरोदकें देती । परम प्रीतीकरोनि ॥१६॥
कंदमूळ पर्णसेवन । किंवा वातांबु करीं प्राशन । तृणशय्या मृगाजिन । हेंचि आस्तरण आमुचें ॥१७॥
पुढें निजे कुब्जाराणी । भोग भोगूं सदा उन्मनीं । अनुहत किंगरी वाद्यध्वनि । तत्मय निमग्न रंजवीं ॥१८॥
परब्रह्मी लागतां चवी । इतर रस रुचती केवीं । विदेहस्थिति असता बरवी मग गगनांबर प्रावरणें ॥१९॥
विषयानंदाहून आनंद । अनुपम्य हा ब्रह्मानंद । सकळ सुखाचा आनंदकंद । सदा सद्बोध अंतरीं ॥१२०॥
निर्धूमअग्नीपरी वैराग्य । त्यागोनियां विषयसंग । दृढतर होवोनि योगानुराग । अभंगबोध ठसावला ॥२१॥
जयाचें वैराग्य देखोन । शुकसनकादिकां मान्य । करिती मस्तक आंदोलन । धन्य झाले कलियुगीं ॥२२॥
परेहुनि जें परात्पर । निरंजनवनीं करी विहार । जेथें नसे आपपर । तेचि स्थळ तयाचें ॥२३॥
कांता कनक राज्यासन । जेणें त्यागिलें जेवीं वमन । पुन्हा न करी तयाचें ग्रहण । मनें वीत घेतला ॥२४॥
पूर्वपुण्याचा संस्कार । म्हणोनि विषयीं तिरस्कार । न करी जो स्वीकार । तोचि ईश्वर जाणिजे ॥२५॥
द्रव्यघट दुरळवनीं लाभ झालिया न पाहे नयनीं । कीं शरण आलिया दिव्यकामिनी । परि तीते जननी भावित ॥२६॥
ऐसे निश्चयाचे पुरुश । तेचि जाणावे विष्णु अंश । ज्यांनी त्यागिला आशापाश । तेचि ईश देवाचे ॥२७॥
इहीं चिन्ही जे उद्भट । तयां भवाब्धि पायवाट । लंघोनि रजतमाचा घाट । फुटे पाहाट तुर्याची ॥२८॥
जाळोनि संचित क्रियमाण । तेचि स्वस्वरुपीं रममाण । तयांचें काय वदूं महिमान । जाणती खूण गुरुपुत्र ॥२९॥
तयां क्षुधा कोठें गेली । आणि तृषा कोठें हरपली । निद्रा कोठें अदृश्य झाली । झाली परी ऐसी हे ॥१३०॥
असो पट झाडोनि जाय नेटका । कांता कटका लावूनि चुटका । कटकटा प्रारब्धा करी सुटका । प्राण घेई कां आमुचा ॥३१॥
विरहव्याळाची विषगरळा । परम हळाहळें पडती विकळा । हळहळती सकळ वेल्हाळा । सर्व अबला तळमळती ॥३२॥
प्रलयकाळीची विद्युल्लता । कडकडोनि पडे माथां । तैसी झाली अवस्था । समस्तांस ते काळीं ॥३३॥
एक भूमीसीं मस्तक आपटिती । भडभडां अशुध्द वाहाती । एक स्वकरें केश तोडिती । धुळी घालिती आननीं ॥३४॥
एकचि वोढवला अनर्थ । कोण कोणा सावरी तेथ । म्हणती सर्वही दैवहत । कांतें त्यागिलें म्हणोनी ॥३५॥
स्त्रिया उपस्त्रियांचे उभे थवे । जेवीं कमळांतूनि भ्रमर जाये । तैसेच झालें तया पाहे । विरहघायें दुःखित ॥३६॥
म्हणती शिवपूजेंत कांहीं विक्षेप । म्हणोनि त्यागोन गेला नृप । जन्मांतरीं महत्पाप । यास्तव सकृप नव्हता ॥३७॥
धिग्‍ लावण्य धिग्‍ यौवन । धिग्‍ चातुर्य धिग्‍ गायन । धिग्‍ अळंकार धिग्‍ भूषण । धिग्‍ जनन आमुचें ॥३८॥
येरयेरांचें गळां पडती । दीर्घस्वरें रुदन करिती । विरहें विहाळल्या युवती । मूर्छित पडती पैं सैरा ॥३९॥
जेवीं मथुरे जाय भगवान । गोपी होती गतप्राण । आडव्या पडती मूर्छन । स्यंदन वेष्टिती वज्रनारी ॥१४०॥
जेवीं मायामोह त्यागून । देहांतून निघे प्राण । तेवीं कनककांता धिक्कारोन । निःस्पृह निघे गोपेंदु ॥४१॥
पुन्हा येवोनो मातृदर्शन । घेऊन करी साष्टांगनमन । उभा राहे कर जोडोन । प्रार्थीतसे ते काळी ॥४२॥
तुझिये उत्तीर्णते पाहे । काया कुर्वंडी माझी आहे । चिरकाळ चिरंजीव केला देह । तुवां माझा जननिये ॥४३॥
म्हणे जननी तव जठरीं जनन । जन्मोन झालों परम धन्य । सद्गुरुमुखें लाधलों ज्ञान । चिरंजीव मी झालों ॥४४॥
देईं आज्ञा करीन तीर्थ । हाचि माझा मनोगत । अनेक योगी सिध्दमहंत । भेटातील मजलागीं ॥४५॥
अरे योगिया परिसे वचन । संपूर्ण करीं तीर्थाटण । परि एक सांगतें तुजलागोन । भगिनीगृहीं नच जाईं ॥४६॥
आज्ञा जननीची वंदूण । विष त्यागी जेवीं वमन । पुढें करिता झाला गमन । सद्गुरुदर्शन घ्यावया ॥४७॥
तों सिंहासनीं जालंधरीं । गोपेंदु साष्टाम नमन करी । आदेश आदेश या उत्तरीं । जयजयकारीं गाजला ॥४८॥
सप्तशत कानीफशिष्य । इतर नृप करिती दास्य । सर्वांस जालंधरी उपास्य । निरालस्य सेवेसीं ॥४९॥
श्रीगुरु जालंधरी सर्वज्ञा । तीर्थाटण देईजे आज्ञा । सद्गुरुपायीं निश्चय प्रतिज्ञा । कदा अवज्ञा न घडेचि ॥१५०॥
मस्तकीं ठेविला वरदहस्त । तीर्थे करुनि येणीं समस्त । वृत्ति ठेवी निमग्न स्वस्थ । येणीं परमार्थ साधे हा ॥५१॥
आज्ञा मागोनि सत्वर । निघता झाला योगेश्वर । बोलविती नारीनर । नगरजन सर्वही ॥५२॥
जेवीं अयोध्या त्यागून । वना जाय रघुनंदन । कीं नैषध राज्य टाकून । गमन करी काननीं ॥५३॥
कीं हरिश्वंद्र युधिष्ठिर । अरण्यवासा पांडूपुत्र । गेले तेव्हां उदास नगर । दुःख दुस्तर प्रजेसी ॥५४॥
दुःखी प्रजा प्रळयाकांती । शोकसमुद्रीं सर्वही बुडती । रायास येती काकुळती । आमुची गति कायसी ॥५५॥
त्यागून सर्वत्रांची आशा । गोपेंदू रिघे अरण्यवासा । तोडून मायेचा बध्दफासा । मुक्तदशा अवलंबी ॥५६॥
देश दुर्ग दुर्धर अरण्य । ग्राम नगर नद्या पट्टण । समग्र जाय वोलांडून । स्वयें एकांग एकटा ॥५७॥
फिरत फिरत मानसगतीं । अकस्मात देखिली भद्रावती । तेथें भगिनी चंपावती । परम धार्मिक धर्मात्मी ॥५८॥
नगरप्रदेशीं आरामस्थळीं । उभा ठेला तये काळीं । पुसता झाला तये वेळीं । नगरजनांतें आवडीं ॥५९॥
या नगराचें नामाभिधान । मजप्रति करावें श्रवन । वदती भद्रावतीचें जाण । परमरमणीक असे हें ॥१६०॥
ऐसें असताम अकस्मात । चंपावतीच्या सख्या समस्त । जाण असतां विराहार्थ । तों मार्गी योगी देखिला ॥६१॥
नूतनवय परमसुंदर । सरळ नासिक आकर्णनेत्र । भस्मचर्चित सर्वगात्र । सुहास्य वक्त्र जयाचें ॥६२॥
दीर्थ नूतन जटाभार कमनीय रुप परम नागर । प्रत्यक्ष मदनाचा अवतार । तेथें उपमा कायसी ॥६३॥
सुनीळ मुद्रा तळपती श्रवणीं । काषाय मेखळा अरूणवर्णी । कुबडी कमंडलु दंड पाणीं । सोऽहंस्मरणी रंगली ॥६४॥
पाहोनि परतल्या राजसदनीं । ऐकें चंपावती श्रवणीं । नगरप्रदेशीं तीर्थाटणी । योगी एक देखिला ॥६५॥
गुणरुपें अतिसकुमार । जेवी लावण्यवती भ्रतार । धन्य जननी प्रसवली कुमर । कोण कोठील न कळेचि ॥६६॥
येरी दचकली मनीं । म्हणे वार्ता ऐकिली कर्णी । कीं गोपेंदु बंधूलागोनी । वैराग्य झालें सांप्रत ॥६७॥
तोचि किंवा दुसरा होये । तुम्हीं जाऊन या लवलाहे । पाहतां जाणवेल निश्चयें । भेटी करवा तयाची ॥६८॥
त्रैलोक्यचंद्राचा पुत्र । त्रैलोक्य झालें पवित्र । त्यागून राज्य कुळगोत्र । जेणें परत्र साधिले ॥६९॥
तो मज दावा गे साजणी । केव्हां पाहीन आपुले नयनीं । तो वोळखीन राजचिन्ही । येचि क्षणी जाणावा ॥१७०॥
सख्यांत म्हणे जा येथूनी । तंव तो अकस्मात उभा अंगणी । अलक्ष गाजवोनि दीर्घध्वनि । उभा ठाकला पैं तेथें ॥७१॥
चंपावती म्हणे योगियास । कवण स्थान कवण देश । कवण उपासना कोण उपास्य । कोन वर्ण तुमचा ॥७२॥
यावरी गोपेंदु वदे वचन । सहस्त्रदळ आमुचें निजस्थान । देश आमुचा निरंजन । निर्गुण उपास्ना आमुची ॥७३॥
वर्ण आमुचा वर्णातीत । सर्ववर्णी ओतप्रोत । तो हा निर्वाण नाथपंथ । अनाथासी नाथ करी जो ॥७४॥
कायानगर गगनगर्भी । तेथें अनुहत वाद्यांची दुंदुभी । ध्वज फडकती देदीप्य नभीं । साम्राज्याधिकारी आम्ही पैं ॥७५॥
यावरी वदे हंसगमनी । पूर्वाश्रम कोणते स्थानीं । कोन जनक कोण जननी । सत्वरोत्तरीं वदावें ॥७६॥
आतां पुससी जरी यथार्थ । गौडबंगाल देश विख्यात । कांचनपुरी स्थळ नेमस्त । त्रैलोक्यचंद्रपुत्र मी ॥७७॥
परिसोनि गोपेंदूचे शब्द । भगिनीस झाले दुःख अगाध । म्हणे तूंतें वैराग्य परमनिंद्य । खेद करी सर्वदा ॥७८॥
अहा प्राक्तन पाहा कैसें । कदा न चुके घडे आपैसें । राज्य त्यागून अरण्यवास । सदा नरेश भोगीत ॥७९॥
जयाच्या द्वादशशत भार्या । सोळा शत त्या उपस्त्रिया । राज्य त्यागूनियां वायां । वैराग्य घेसी किमर्थ ॥१८०॥
तरी बंधुवर्या राहें येथ । चंदनमठ बांधितें प्रशस्त । सुखे राहे तूं निवांत । भोग भोगी सुखाचे ॥८१॥
कैचा योग कैचा त्याग । कैचें घेसी तूं वैराग्य । भाग्य सोडोनि अभाग्य । कां दौर्भाग्य भोगिसी ॥८२॥
यापरी परिसोन उत्तर । निघता झाला अतिसत्वर । मग धावूनि धरी पदर । अंतर देऊनि मज जासी ॥८३॥
बंधुराया ऐसें न करीं । मज त्यागून जासी दुरी । कोठें पाहूं तुजला तरी । माहेर येथोनि तुटलें ॥८४॥
जेवीं धनुष्यापासोनि बाण । सुटोनि जाय न लगतां क्षण । हिंपुटी होऊन वदन । रुदन करी आक्रोशें ॥८५॥
सखिया सावरोनि धरिती बळें । परि तिचा शोकसमुद्र उचंबळे । हा हा शब्दीं पडे विकळ । तळमळ वाहे अंतरीं ॥८६॥
प्रधान करिती शांतवन । गोपेंदुचें धन्य साधन । यावत्‍ चंद्रचंडकिरण । चिरंजीव चिरकाळ ॥८७॥
आदिनाथलीलासुधा । श्रवणमननें नव्हे बाधा । दुःख दरिद्र नासे आपदा । अंती सत्पदा पावती ॥८८॥
आदिनाथलीलाग्रंथ । भैरवसद्गुरुचा वरदहस्त । तत्प्रसादें आदिनाथ । एकविंशति अध्याय वंदितों ॥१८९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP