अंगार्‍याचा उत्सव - दत्तदासांची महती

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


समर्थ आम्ही दास सदा श्रीगुरुचे । आम्हां ऋद्धिसिद्धिचे सहाय की ॥१॥
लक्ष्मी ही होय आम्हां सहायकर्ती । आम्हां तो श्रीपती सहाय सदा ॥२॥
आम्हापाशी वसे नित्य अन्नपूर्णा । तृप्ती अंत:करणा आमुचीया ॥३॥
आम्ही सदा धन्य पुण्यचि जाणावे । आम्हां सिद्धी पावे जेथे तेथे ॥४॥
विजया लक्षुमी सदा आम्हांपाशी । सेविती आम्हांसी सर्व देव ॥५॥
जेथे जेथे जातो भक्त श्रीगुरुचा । जयजयकार साचा तेथे त्याचा ॥६॥
इंद्रहि पूजितो शेषही पूजितो । सकळां पूज्य होतो गुरुभक्त ॥७॥
जेथे गुरुभक्त तेथे धर्मजय । अधर्मा प्रलय तेथे जाणा ॥८॥
जेथे गुरुभक्त विजय सत्याचा । प्रसार भजनाचा तेथे जाणा ॥९॥
ऐशी आहे प्रौढी गुरुसेवकाची । तेथे उपमेची वस्तु नाही ॥१०॥
जेथे गुरुभक्त सर्वचि आनंद । तोच सुखकंद जाणावा की ॥११॥
भाग्य हे भक्ताचे मग त्या गुरुचे । वानी कोण वाचे सांगावे की ॥१२॥
आम्हां भय मृत्यु मुळीच बाधेना । दैत्य ते पीडिना आम्हांलागी ॥१३॥
आमुच्या पुढे पाप उभेच राहिना । कर्म ते बांधीना आम्हांलागी ॥१४॥
आम्ही बद्ध नोहे सदा विनिर्मुक्त  । आमुचे असक्त मन सदा ॥१५॥
देह वाणी मन पुण्यचि आमुची । तुलना आमुची नाही कोणा ॥१६॥
ऐशी ये योग्यता आम्हां गुरुभक्तां । गुरुपादसक्तां सर्वदाच ॥१७॥
परि आम्ही मने उगीच दु:खी होतो । यश विसरतो गुरुजीचे ॥१८॥
असुनि श्रीमंताचे करितो जीकिर । दीनपणे थोर दावितसो ॥१९॥
दीन हीन आम्ही विकल्पे अध्यासितो । तेणे गमावितो भाग्य सारे ॥२०॥
थोरामोठ्यांची की आम्ही हो माणसे । उणे कांही नसे आम्हांलागी ॥२१॥
तरी उगीच आम्ही दरिद्र सांगतसो । इतरां आर्जवीतसो भलतेपरी ॥२२॥
असुनी श्रीमंत बनतो चाकर । मिळवितो भाकर  सायासाने ॥२३॥
देवाचीये घरी उणे काय असे । अन्नपूर असे मूर्तिमंत ॥२४॥
परिपूर्ण भोग सकळ ऐश्वर्य । असूनी अनार्य आम्ही होतो ॥२५॥
धर्मासी सांडितो सत्यासी त्यागितो । भलता धरीतो संग आम्ही ॥२६॥
भलता पोषाख आम्ही चढवितो । भलत्या वश होतो अकारण ॥२७॥
असुनीयां भाग्य अभाग्य जोडीतो । परिपाक होतो ऐसा उलटा ॥२८॥
म्हणोनी शरण होवोनी देवासी । नित्य तत्स्मृतासी जागवावे ॥२९॥
आपुला अधिकार दर्जा की आपुला । विसर मनाला न पडो द्यावा ॥३०॥
आमुचे खुळेपण देवासी बांधते । हीनत्व आणिते समर्थासी ॥३१॥
आम्ही नोहे रंक न बोलो दीनवाणी । आम्हां चक्रपाणी यजमान ॥३२॥
सकळही देता आम्हां भगवान । इतर धनवान कां सेवावे ॥३३॥
विनायक म्हणे जातीचे श्रीमंत । आम्ही भाग्यवंत गुरुभक्त ॥३४॥
==
आज्ञा मागणी

प्रसादाते सेवावया । आज्ञा द्यावी गुरुराया ॥१॥
तुमच्या ताटींचे उच्छिष्ट । संत म्हणती यज्ञशिष्ट ॥२॥
त्याचे ग्रहण करावया । दुरिताते हरावया ॥३॥
रोग भोग हरावया । थोर पुण्य प्राप्त व्हाया ॥४॥
देई महा-प्रसादाते । करोनीयां सत्कृपेते ॥५॥
भाग्य आमुचे वाढवाया । यशप्राप्ती आम्हां व्हाया ॥६॥
अज्ञान आमुचे जावया । ज्ञान आम्हां प्राप्त व्हाया ॥७॥
तेज आमुचे वाढवाया । हीनपणा सर्व जावया ॥८॥
श्रेष्ठपण यावयासी । आम्हां द्यावे जी आज्ञेसी ॥९॥
आनंदाने बहुमाने । करुं ग्रहण भक्तीने ॥१०॥
देवांसीही हे दुर्लभ । ऐसा याचा असे लाभ ॥११॥
अन्न आहे परमोत्कृष्ट । ब्रह्मचि ते जाणा इष्ट ॥१२॥
विशेष तुमचा प्रसाद । म्हणोनि श्रेष्ठ ते वरद ॥१३॥
श्रेष्ठ धन्य पुण्य ऐसे । प्राप्त होय भाग्यसरिसे ॥१४॥
ज्याचेपाशी भाग्य थोर । त्यासी लाभ हा निर्धार ॥१५॥
अभाग्य येथे तो बघेना । अमृत हे तो जाणेना ॥१६॥
त्यासी न वाटे हे परमान्न । करितसे उपेक्षण ॥१७॥
आम्हां काय त्यासी करणे । आम्हां प्रसादास घेणे ॥१८॥
म्हणोनि आम्हां द्यावा । कृपायोग आम्हां व्हावा ॥१९॥
अमृताचे पान भोजन । आम्हां द्यावे दयाघन ॥२०॥
विनायक म्हणे नाथ । कृपा करावी समर्थ ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP