अंगार्‍याचा उत्सव - वासुदेव-चरित्र-सार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


दिवस आज नाथा पुण्यस्मरणाचा । भजन पूजनाचा दिन आज ॥१॥
अहोरात्र तुझ्या चिंतनी रहाणे । चरित स्मरणे तुझे आज ॥२॥
ज्या ज्या कांही गोष्टी चरित्री घडल्या । आठवणे भल्या आज आम्हां ॥३॥
विचार करणे यथानुक्रमाने । रहस्य जाणणे त्यांतील की ॥४॥
सार काय आम्हां त्यातील सेवणे । बोध काय घेणे आपुल्याला ॥५॥
मार्मिक विचार ह्रदयी करणे । त्यापासोनी घेणे धडा आम्हां ॥६॥
चुकते आमुचे आचरणांत काय । फ़लप्रद होय काय आम्हां ॥७॥
याचीच करणे मीमांसा आम्हांला । शिकवण मनाला काय असे ॥८॥
कैसे बालपण कैसे तरुणपण । कैसे वार्धक्यपण गुरुजींचे ॥९॥
काय काय केले आचार गुरुनी । दाविले वर्तुनी आम्हांलागी ॥१०॥
त्याचीच करणे मनापाशी फ़ोड । संशयाची फ़ेड करायासी ॥११॥
आदर्श ठेवणे गुरुचरित्राचा । बनाया साचा निजाचार ॥१२॥
उत्तम कुलांत वरिष्ठ वर्गात । झाले प्रादुर्भूत वासुदेव ॥१३॥
घराणे वैदिक पूर्ण शुभाचार । अतिथि-सत्कार जया घरी ॥१४॥
ब्रह्मचर्य बारा वरुषे पाळिले । मौजी होतां भले गुरुजींनी ॥१५॥
यथाशास्त्र केले श्रुतींचे अध्ययन । नियम पाळुन आश्रमाचे ॥१६॥
वेदमंत्र सिद्ध शुभाचारे झाले । अनुभवा आले तेव्हा लोकां ॥१७॥
पुढे केले शास्त्र अधिगत देवे । सांगचि बरवे अध्ययन ॥१८॥
ज्योतिष वैद्यक केले अध्ययन । केले आचरण चांद्रायण ॥१९॥
व्रत उपवास प्रायश्चित्तादिक । आचरिली निक गुरुराये ॥२०॥
ऐशी मन:शुद्धी साधोनी आचारे । काळ शुभाचारे युक्त केला ॥२१॥
ब्रह्मचर्य जाणा पूर्ण अविप्लुत । तेज झळकत सूर्यासम ॥२२॥
ऐशीयाच योगी केला सुविचार । गुरुमुनि साचार मनि आणिती ॥२३॥
उपासनेविण नोहे साक्षात्कार । नोहे अधिकार परमार्था ॥२४॥
नृसिंहवाटिका देवे आदरिली । दत्तसेवा भली करायासी ॥२५॥
गुरुविण नोहे सिद्ध उपासना । म्हणोनी दयाघना प्रार्थिताती ॥२६॥
उपासना मंत्र स्वप्नांत मिळाला । दत्तजींनी केला अनुग्रह ॥२७॥
तेव्हांपासोनिया उपासना भली । गुरुंनी चालविली अत्यादरे ॥२८॥
श्रुति शास्त्र आणि व्रत प्रायश्चित्त । संस्कृत यांनी चित्त प्रथमची ॥२९॥
त्यावरी मिळाली शुभ उपासना । देवांनी दर्शना लाभविले ॥३०॥
मंत्र पुरश्चरण यथाशास्त्र केले । सिद्धपण आले तेणे आंगी ॥३१॥
उपासना मंत्र ऐसा सिद्ध होतां । योग पढवितां होय दत्त ॥३२॥
योगसिद्धी झाली देवाच्या कृपेने । मग झाले सांगणे लग्न घरी ॥३३॥
विवाहासी योग्य आतां तूं झालासी । गृहस्थाश्रमासी आचरावे ॥३४॥
नये ते की मना देवाचे सांगणे । वादास करणे झाले तेव्हां ॥३५॥
समजूत दत्तदेवांनी घातली । विवाहासी केली मति सिद्ध ॥३६॥
अनुकूल भार्या प्राप्त तेव्हां झाली । दत्तकृपे भली सद्गृहिणी ॥३७॥
गृहस्थाश्रम प्राप्त देवे करविला । योग साधविला अग्निसेवा ॥३८॥
यथाशास्त्र आश्रम पालन करवीले । संतान जाहले वासुदेवा ॥३९॥
तीर्थाटनमिषे दांपत्य बाहेर । काढी देववर निजकृपे ॥४०॥
मार्गी मग झाले दत्ताचे विचारणे । आतां काय येणे मजपाशी ॥४१॥
वासुदेवे मग कथियेली आस । घेणे मज संन्यास देवराया ॥४२॥
मग भार्या नेली, नेले ते संतान । तोडीले बंधन दत्तराये ॥४३॥
वर्ष छत्तिसावे गृहस्थाश्रम पूर्ण । घडले आचरण शोभन की ॥४४॥
मग दत्तदेव स्वये संन्यासाते । देती वासुदेवाते कृष्णेमाजी ॥४५॥
प्रेषोच्चार दिला स्वये दत्तजींनी । गुरु दाखवोनी दिधला त्यां ॥४६॥
दंड कोणापासोनी घ्यावयाचा त्यांनी । प्रेमे दत्तजीनी कथियेले ॥४७॥
आजपासोनियां करा जगदुद्धार । फ़िरा अवनीवर लोकांसाठी ॥४८॥
पावन कराया जन लोक आतां । उपासना वर्ता संन्यासाने ॥४९॥
अनुग्रह करा शरणागतांसी । द्या उपासनेसी केली आज्ञा ॥५०॥
दत्ताज्ञेन मग दंड संपादिला । सकलां दाविला भजनमार्ग ॥५१॥
नाही मठ धाम एके ठायी वास । विना चातुर्मास कोठेही तो ॥५२॥
चातुर्मासापुरते एके ठायी राहणे । इतर फ़िरणे जगत्सारे ॥५३॥
दंड कमंडलु नेसाया लंगोटी । अंगी भगवी छाटी सामुग्री ही ॥५४॥
खाकेमाजी झोळी त्यांत दत्तमूर्ति । जवळि संपत्ति ऐसी जाणा ॥५५॥
ग्रंथलेखन केले शास्त्र प्रकाशिले । याग करवीले अध्यक्षत्वे ॥५६॥
षट्‍कर्माचा केला उपदेश जनां । मार्ग उपासना पढविला ॥५७॥
जो जो कोणी कांही पढायासी येई । गुरु मूर्ति देई शिक्षण त्या ॥५८॥
शिकवी योग कोणा कोणा श्रुतिशास्त्र । कोणालागी शस्त्र शिकविती ॥५९॥
जेथे जाती तेथे मार्ग भजनाचा । सुविरुढ साचा करिताती ॥६०॥
दत्तउपासना विशेष विस्तारिली । जगती प्रसारिली वासुदेवे ॥६१॥
ज्याचे ज्याचे मनी जो जो कांही काम । तो तो पूर्णकाम पुरविती ॥६२॥
कोणासी औषध कोणासी ज्योतिष । जैसा ज्या विश्वास तैसे योजिती ॥६३॥
कोणा मंत्र देती भाष्यार्थ सांगती । कोणा पढविती वेदांताला ॥६४॥
कोणासी उपाय शास्त्रीय लौकीक । देती गुरु निक वर्तन हे ॥६५॥
ऐसी उपासना प्रसिद्ध करुनी । लोकां अनुग्रहोनी सिद्ध-कार्य ॥६६॥
सिद्धार्थी ते होती आनंद संवत्सरी । नर्मदेच्या तीरी वासुदेव ॥६७॥
गरुडेश्वरी काया अर्पिती नर्मदेसी । आपण स्वरुपाशी मिसळले ॥६८॥
दत्तरुप झाले चरित्र हे भले । पाहिजे ठेविले दृष्टीपुढे ॥६९॥
यांतोनिया सार काढोनियां घेणे । अधिकाराप्रमाणे आचरणे ॥७०॥
विनायक म्हणे ऐसे पुण्यस्मरण । चरित्र वर्णन केले कांही ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP