अंगार्‍याचा उत्सव - योगमाहात्म्य

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


योग हाचि दंड इंद्रियदमना । योजिती साधना गुरुराज ॥१॥
शत्रूंच्या कंदना योग हे हत्यार । षडरि-संहार साधावया ॥२॥
दैव फ़िरवाया मृत्यु चुकवाया । देति योगाश्रया गुरुराय ॥३॥
अंतरीची वृत्ति शमन कराया । घालीति योगीं या गुरुराज ॥४॥
बलहीना लागी परमात्मप्राप्ती । नाहींच संप्राप्ति नियम हा ॥५॥
’नहि बलहीने न आत्मा’लभ्यते । ऐसेच सांगतो वेदपुरुष ॥६॥
योगे प्राप्तबल होतसे मनुजा । त्याचियाच काजा योगाभ्यास ॥७॥
अष्टांगयोग हा शस्त्र अनुपम । तेजाचे की धाम अपूर्वची ॥८॥
इंद्रिये वश होती वश होते जग । जडतांचि योग बलवान ॥९॥
बलाचिया योगे ज्ञान निर्धारत । कैवल्य प्राप्त होत ज्ञानयोगे ॥१०॥
योगाविण ज्ञान पंगूच म्हणती । म्हणोनी साधिती योगसंत ॥११॥
ज्ञान निर्धारत विश्वचि हा जीव । नाही दुजाभाव वास्तविक ॥१२॥
अद्वितीय ब्रह्म एकचि हा आत्मा । जीव परमात्मा ज्ञान बोले ॥१३॥
परि बलावीण बाघ पंगू होत । राहे भयभीत जीव मनी ॥१४॥
भय निवाराया शत्रूंते नासाया । मृत्यु चुकवाया योगशास्त्र ॥१५॥
हत्यार अपूर्व गुरु आम्हां देती । मग खंड पाडिती कामादिकां ॥१६॥
यम भीत सदा या योग दंडासी । योग्याच्या इच्छेसी मान देई ॥१७॥
योगसिद्ध नर प्रेत उठवितो । यमा ठकवितो निजबळे ॥१८॥
यमपाश फ़ोल होती योग्यापुढे । माहात्म्य हे गाढे योगीयाचे ॥१९॥
योगी पुत्र देतो ज्याच्या दैवी नाही । सकलही पाही देतो योगी ॥२०॥
पर्जन्याते पाडी चुकवी अवर्षणा । ग्रहांसही जाणा सत्ता त्याची ॥२१॥
सकळ दैवते तयाच्या स्वाधीन । योग अभ्यसन ऐसे असे ॥२२॥
सकलही सत्ता योग्या प्राप्त होत । त्रिभुवन होत मत्ता त्याची ॥२३॥
जेथे जेथे योग दंडधारी फ़िरतो । विजय पावतो तेथे तेथे ॥२४॥
आशीर्वाद त्याचा होत सामर्थ्याचा । सिद्ध त्याची वाचा सर्वकाळ ॥२५॥
चिंतिले ते होय कल्पिले साकार । ऐसे सर्व सार योगाचे की ॥२६॥
योग ईश्वरासी साधला जयासी । त्याच्या महात्म्यासी कोण जाणे ॥२७॥
तोच दत्तगुरु तोच अवधूत । वासुदेव होत तोच जाणा ॥२८॥
किमया ही आहे जो का योगदंड । सामर्थ्य उदंड तयाचे की ॥२९॥
विनायक झाला अनुग्रह गुरुचा । प्रादुर्भवे साचा वासुदेव ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP