अंगार्‍याचा उत्सव - वासुदेव-चरित-सार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शनिवार ता. ६-७-१९२९

जयजयकार तुझा गाजत जगती । थोर थोर गाती तुझे यश ॥१॥
आज आर्यावर्ती त्वदीय उत्सव । करिती वासुदेव भक्तजन ॥२॥
कोण पुण्यतिथी संकल्पे करिती । कोण आदरीती भक्तीभावे  ॥३॥
भजन पूजन तुझे करिताती । यश वर्णिताती तुझे देवा ॥४॥
कोणत्याही मार्गे तुजला स्मरता । कृतज्ञा जाण होती तुझे दास ॥५॥
ब्रह्माण्डासि केला तुवां उपकार । धर्मसंप्रसार केला तुवां ॥६॥
दत्त-भजन-मार्ग लोकांसि दाविला । जयजयकार केला दत्ताचाच ॥७॥
दत्त-उपासना जगा पढविली । आचरुनी दाविली स्वये तुवां ॥८॥
वर्णाश्रम-धर्म सकळ पाळिले । व्रतादिक केले सर्व कांही ॥९॥
प्रायश्चिते तुवां दुर्घट आचरिली । काया कष्टविली कितीतरी ॥१०॥
सकळ तीर्थ क्षेत्रे पायी फ़िरलासी । विद्या संपादिलीसी पूर्णत्वाने ॥११॥
द्त्तसाक्षात्कार करुनि घेतला । प्रत्यक्ष दिसला दत्तदेव ॥१२॥
किती तरी ग्रंथ लिहिले वासुदेवा । महिमा वानावा तव कैसा ॥१३॥
प्राकृत संस्कृत प्रबंध लिहीले । लोकां शिकविले ब्रह्मज्ञान ॥१४॥
भक्ति ज्ञान आणि विरक्ति परिपूर्ण । दिधली शिकवण जगतासी ॥१५॥
जिकडे तिकडे केला नाम जयजयकार । वेदधर्माचार प्रस्थापिला ॥१६॥
आचार्य शंकराचा दुजा अवतार । म्हणती साचार तूजलागी ॥१७॥
कर्म की संन्यास कारण मोक्षाचे । रहस्य तूं साचे वदलासी ॥१८॥
सन्यास घेवोनि लोकसंग्रह केला । शरणागतांला तारियेले ॥१९॥
व्याधिग्रस्त येवो येवो चिंतातूर । कल्याण साचार केले त्याचे ॥२०॥
ज्या ज्या अर्थासाठी जो जो कोणी आला । त्याचा पुरविला कार्यभाग ॥२१॥
धर्माने चालावे देवासि भजावे । हे त्वा वासुदेव शिकविले ॥२२॥
असुनि संन्यासी मूर्तीचे पूजन । प्राकृत भजन केले तुवां ॥२३॥
नित्य भजनांते करुनि दाविसी । लोकालागी देसी हेचि सार ॥२४॥
ऐशी तुझी नथा नवी शिकवण । शास्त्रांचे प्रमाण दावुनियां ॥२५॥
कर्म की सन्यास रहस्य यांतिल । आचरुनी केवळ दावियेले ॥२६॥
जरी ज्ञान झाले सांडूं नये भक्ती । अशी तुझी उक्ती जेथे तेथे ॥२७॥
इंद्र तरी तोही भजतो गुरुसी । भजतो देवासी सांगतोसी ॥२८॥
जरि ज्ञानी झाला तरिही भजन । सोडिले न जाण नित्यत्वेंसी ॥२९॥
कृतघ्न तो होतो जो न भजे देवा । तुवां ऐशा भावा शिकविले ॥३०॥
कुडीमध्ये प्राण तोवर सेवावे । कधी न सोडावे भजनासी ॥३१॥
वेदांत गुरु आणि ईश्वर हे सेव्य । भजावे कर्तव्य तुझे त्यांसी ॥३२॥
ऐशी शिकवण तुझी ज्ञानीयांसी । सांगसी विप्रांसी वाक्यज्ञ तूं ॥३३॥
प्रथम ज्ञानप्राप्तिसाठी त्यां भजावे । पुढे त्यां सेवावे कृतज्ञत्वे ॥३४॥
कृतघ्न जो त्यासी दोष की अनंत । तयासि प्रायश्चित नसे शास्त्री ॥३५॥
कृतघ्नता दोषपरिहारासाठी । सोडावी न दिठी सेवावे त्या ॥३६॥
ऐसा उपदेश त्वदीय आम्हांसी । करणे भजनासी रात्रंदिन ॥३७॥
विनायक म्हणे तोच मार्ग मज । प्रिय गुरुराज अत्यंतची ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP