अंगार्‍याचा उत्सव - वासुदेव समाधिस्थ झाले

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


वासुदेव द्त्तरुप । आज झाले निजरुप ॥१॥
आनंदनाम संवत्सर । जेष्ठ महिना होता थोर ॥२॥
झाला होता अतिसार । मळ-प्रक्षालन थोर ॥३॥
सकळ धुवोनी काढिले । शरीर स्वामिनी आपुले ॥४॥
शुद्ध केला निज देह । सांडीयेला सर्व संदेह ॥५॥
योग अवलंबोनीयां । शक्तिवंत केली काया ॥६॥
नर्मदेसी गेले पायां । तीर्थी धुविली निजकाया ॥७॥
पद्मासन घालोनीयां । एकाग्र दृष्टी करोनीयां ॥८॥
स्वामी निजानंदी मग्न । निजस्वरुपी झाले लग्न ॥९॥
अमावस्या टाकीयेली । प्रतिपदा तिथी घेतली ॥१०॥
मध्यरात्र समयासी । सोडियेले निजकायेसी ॥११॥
ब्रह्मार्पण तनू केली । दत्तरुप मूर्ति ठेली ॥१२॥
==
आज्ञा मागणी

आज्ञा द्यावी महाराज । आपुल्या पुजेचीये काज ॥१॥
पादुकांते उचलवया । स्नानादिक त्यां घालाया ॥२॥
उपचार समर्पाया । सकळ सोपस्कार व्हाया ॥३॥
आज्ञा द्यावी दत्तात्रेया । आज्ञा द्यावी अत्रितनया ॥४॥
आज्ञा द्यावी वासुदेवा । आज्ञा द्यावी द्त्तदेवा ॥५॥
पूजनाचा आज दिन । करणे नाथ आज्ञापन ॥६॥
प्रथम पूजा करयासी आज्ञा देई तूं प्रेमेसी ॥७॥
कृपादृष्टी मज पाहणे । मजलागी शुद्ध करणे ॥८॥
मजठाय़ी संचरावे । मजलागी बळ द्यावे ॥९॥
माझे हाती करवा कार्य । श्रीगुरुराज दत्तात्रेय ॥१०॥
गरुडेश्वराहूनी विभूति । पाठविली त्वां श्रीपति ॥११॥
पूजन झाले तुमचे देवा । श्रीगुरुराजा वासुदेवा ॥१२॥
विभूतिचे झाले पूजन । आम्ही केली विभूतिग्रहण ॥१३॥
तेव्हा पासुनियां देवा । करितसो या उत्सवा ॥१४॥
वार्षिक दिन तोच आज । प्राप्त झाला महाराज ॥१५॥
याच कार्यासाठी देई । आज्ञा मज गुरुमाई ॥१६॥
प्रथम करणे पूजन । मग उच्छिष्ट भोजन ॥१७॥
मग प्रदोष पूजन विभूतिचे मग पूजन ॥१८॥
ऐसा तुमचा उत्सव द्त्ता । पूर्ण करा प्रगट सत्ता ॥१९॥
आज्ञा द्यावी आरंभाया । आतां मज श्रीगुरुराया ॥२०॥
आम्हां ठायी संचरावे । सकळ वळ आम्हां द्यावे ॥२१॥
नाथा येथे प्रगटावे । पूजन करवोनि घ्यावे ॥२२॥
स्वये घ्यावी सकळ पूजा । सोपस्कार महाराजा ॥२३॥
उणे कांही येथे नसो । सकळ समृद्धता असो ॥२४॥
आम्हांसाठी द्त्तात्रेय । करवी आतां निजकार्य ॥२५॥
केले प्रथम मंगलाचरण । आतां धरिले तुझे चरण ॥२६॥
तूज करितो नमन । केले विश्वासी वंदन ॥२७॥
विश्वात्मक तूंच देव । सकळ तूझेच वैभव ॥२८॥
तव नमितो चरणांसी । नमन घ्यावे दयाराशी ॥२९॥
नमुनीयां तुजलागी । ध्याउनियां अंतरंगी ॥३०॥
आशीर्वाद मी मागतो । चरणी शिर हे ठेवितो ॥३१॥
अंगिकारा या दासाला । गुरुराया श्रीदयाळा ॥३२॥
विनायक तुमचा दास । आतां कराजी आज्ञेस ॥३३॥
==
प्रसाद याचना

आतां द्यावा नाथा प्रसाद ताटींचा । घास अमृताचा द्यावा स्वामी ॥१॥
अमृतमय आम्हीं बनुनी रहावे । तुझ्या कृपे व्हावे अमृताचि ॥२॥
जन्ममरण जावे आमुचे हरुनि । आमुच्या वदनी अमृत घाला ॥३॥
पुत्रवत्सल माता जेवि की बालका । घोस घाली मुखा वात्सल्याने ॥४॥
क्षुधा आणि तृषा लया याची जावी । बालकास यावी पुष्टी तुष्टी ॥५॥
प्रेमाचाची घांस मुखी त्या घालित । आरोग्य इच्छित बालकाचे ॥६॥
तैसे आमुच्या मुखीं अमृत घालावे । निरामय करावे आम्हांलागी ॥७॥
आमुचे कृतदोष सकळ नष्ट व्हावे । आमुचे साधावे परम हित ॥८॥
अपेयांचे पान अभक्ष्य भक्षण । प्रायश्चित जाण होवो तया ॥९॥
याचसाठी देई आम्हांते उच्छिष्ट । जे का यज्ञ-शिष्ट सर्व असे ॥१०॥
सकळ यज्ञांचे जे का पुण्य जाण । त्याचेच प्रापण व्हावे आम्हां ॥११॥
यज्ञ-शिष्ट अन्न त्याची थोर थोरी । त्रैलोक्यामाझारी दुर्मिळ ते ॥१२॥
याचसाठी द्यावा आम्हाते प्रसाद । अमुचा विषाद लया जावो ॥१३॥
शोक भय जावो मोह लय पावो । आमुचे परम होवो कल्याणचि ॥१४॥
तुझीये झोळींतूनी काढूनीया देई । भक्ष्य जे का होई परमान्न ॥१५॥
विनायक म्हणे प्रसाद घ्यावया । आज्ञा दत्तात्रेया आतां द्यावी ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP