अंगार्याचा उत्सव - गुरूः साक्षात्परब्रह्म
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
तारीख २६-६-१९३०
गुरुविण नाही कोणालागी गति । देवही सेविती गुरु तरी ॥१॥
इंद्राला जे मोठेपण प्राप्त झाले । सेवनेच भले गुरुजीच्या ॥२॥
ज्ञाने श्रेष्ठपण ज्ञान गुरुपाशी । म्हणोनी तयासी नत होई ॥३॥
मोठेमोठे झाले आजवरी विख्यात । कृपेने समस्त गुरुजीच्या ॥४॥
गुरुविण नाही अन्य तरणोपाय । म्हणोनियां पाय धरा त्याचे ॥५॥
किती झाला भक्त वाचाळ पंडित । वेदांत बोलत किती जरी ॥६॥
गुरुविण नाही तया पक्केपण । गुरुविण शीण व्यर्थ जाणा ॥७॥
विधि हरिहर गुरुसी सेविती । आम्हां काय गति पामरांना ॥८॥
ठेवोनियां श्रेष्ठ-जन-विहित मार्ग । पुढती तूं वाग माझ्या मना ॥९॥
ऐसा मनामाजी धरुनीयां बोध । चालवावा शोध गुरुजीचा ॥१०॥
खरी तळमळ जेव्हां लागे चिंत्ता । तेव्हांच तो सत्ता गुरु स्थापी ॥११॥
आपण प्रगटे स्वये त्याच्यापुढे । प्रेम असे गाढे गुरुपाशी ॥१२॥
आपणचि बळे देतो अनुग्रह । फ़ेडितो संदेह अंतरीचे ॥१३॥
न कळत त्याला उपदेश देतो । बोध प्रकाशीतो ह्रदयांत ॥१४॥
सहज नाशी तम प्रकाश पडत । तेजास चढत चित्त भारी ॥१५॥
तेजोमय चित्त तयाचे करीत । सूर्य प्रकाशत जैसा कांही ॥१६॥
धगधगति अग्नि जैसा प्रज्वळीत । तेजोमय होत गुरुभक्त ॥१७॥
निजकृपेची तो मग पाडी छाया । प्रगटि तो काया निजगुरु ॥१८॥
दाटे चित्तामाजी शीतळ ती छाया । ज्योत्स्ना उपमाया योग्य नाही ॥१९॥
जैसी मेघामधि चमले विद्युल्लता । तैशी तयां चित्ता अनुग्रही ॥२०॥
पेटत रहात ज्वाला-माला कुला । उपमा ज्योतिला जगी नसे ॥२१॥
तेजोवंत परी बहुत शीतल । अत्यंत मृदुल वर्ततसे ॥२२॥
भरोनि अमृत जाणाती राहिली । ऐशी प्रकाशली ज्योत चित्ती ॥२३॥
तया ज्योतीमध्ये हंसत मुख दावी । रुप प्रगटवी सगुण तो ॥२४॥
सगुणाची छाया आनंदाची सीमा । स्वये पूर्ण कामा असे सदा ॥२५॥
न कळतची ऐसा प्रगट तो होतो । शीतल उभारीतो निजच्छाया ॥२६॥
अग्नि सूर्य चंद्र यांचीच वनविली । अमृते निर्मिली जशी कांही ॥२७॥
मूस सुगंधाची मूर्ति माधुर्याची । समाप्ति सुखाची जिचे ठायी ॥२८॥
पराकाष्ठा जणुं असे सार्थकतेची । प्रगटतसे साची गुरुमूर्ति ॥२९॥
इतरांस काय त्याचा अनुभव । ज्याचा शुद्ध भाव नाही झाला ॥३०॥
गुरुदर्शनाचे सुख अनुपम । दु:खासि विराम सहजचि ॥३१॥
मग उपदेश स्वामी चित्तीं देतो । तेथे परिस्फ़ुरतो ज्ञानमूर्ति ॥३२॥
तेथे मंत्र देतो भविष्य सांगतो । समाधि लावीतो निजठायी ॥३३॥
ज्याचा त्यासी असे हा सुखानुभव । याचा कोणा भाव सांगू येना ॥३४॥
जनी करिती वेडा गुरुमहाराज । करिती निर्लज्ज भक्तालागी ॥३५॥
लौकिकांतुनी त्या बाहेर काढिती । स्वये रमविती निजठायी ॥३६॥
अत्यंत शांतीचा समय प्राप्त होतो । कोणा वर्णवतो निजवाचे ॥३७॥
म्हणुनि करणे गुरुचे भजन । गुरुंचे पूजन सर्वकाळी ॥३८॥
अहोरात्र तया नित्यची सेवणे । त्याची कीर्ति गाणे सदोदित ॥३९॥
त्याच्याठायी होणे मग्न आम्ही सदा । थांबणे न कदा जाणावे की ॥४०॥
जीवितावधि हा योग भजनाच । साधायाचा साचा आम्हालागी ॥४१॥
यास्तव समारंभ करणे आम्हांसी । करणे उत्सवासी गुरुजीच्या ॥४२॥
भजन पूजन प्रेमे आदरणे । सावधान होणे गुरुठायी ॥४३॥
लौकिकाची सांड करणे आम्हांसी । सांडणे लज्जेसी मुळीहुनी ॥४४॥
पतिसुख कैसे मिळेल नारीला । धरीत लज्जेला भोगकाळी ॥४५॥
नरदेह जाणा भोगाचा समय । सेवूं गुरुराय निर्लज्ज्त्वे ॥४६॥
करोनियां ऐसा आम्ही सुविचार । भजूं रमावर सदाकाळ ॥४७॥
कोणी ढोंगी म्हणो आम्हांसी नाटकी । आम्हां अटक की मुळी नाही ॥४८॥
एकची अटक गुरुसेवकासी । कधी न भजनासी सोडावे की ॥४९॥
काया वाचा मन त्रिकरण अर्पून । चित्तांत रंगून भजणे की ॥५०॥
आम्ही वेडे असो आम्ही खुळे असो । अज्ञानी की असो आम्ही जाणा ॥५१॥
लौकीकाच्या गोष्टी वेड्याच्या समान । कृपा-विलोकन दत्तजीचे ॥५२॥
आम्ही त्या प्रभुच्या कृपेची लेकरे । प्रेमाच्या निकरे भजतो की ॥५३॥
प्रेम हे आंधळे प्रेम असे खुळे । किती उचंबळे आम्हाठायी ॥५४॥
विनायक झाला बहु सद्गदित । प्रेमची लोटत अपरंपार ॥५५॥
==
आज्ञा मागणी
आज्ञा द्यावी महाराज । आपुल्या पुजेचीये काज ॥१॥
पादुकाते उचलावया । स्नानादिक त्यां घालाया ॥२॥
उपचार समर्पाया । सकळ सोपस्कार व्हाया ॥३॥
आज्ञा द्यावी गुरुराया । आज्ञा द्यावी दत्तात्रेया ॥४॥
आज्ञा द्यावी वासुदेवा । पाहुनी आमुच्या भावा ॥५॥
आज उत्सवाचा दिन । वार्षिक हा दयाघन ॥६॥
तुझ्या कृपे आनंदाचा । प्राप्त झाला असे साचा ॥७॥
म्हणोनियां तुज पूजूं । प्रेमभरे आम्ही सजूं ॥८॥
कार्य सोपस्कर व्हावे । आशीर्वचनाते द्यावे ॥९॥
अनुग्रह आम्हां व्हावा । गुरुराया दत्त देवा ॥१०॥
गरुडेश्वर माणगांव । येथे आणावे ते गाव ॥११॥
आणा येथे नर्मदेसी । नाथा आपुल्या कार्यासी ॥१२॥
स्वये येथे प्रगटावे । पूजन करवोनी घ्यावे ॥१३॥
न्यून कांही न पडावे । कार्य सोपस्कर व्हाव ॥१४॥
आमुचे हित की साधावे । कल्याणची सदा व्हावे ॥१५॥
विनायकाचा तूं गुरु । वासुदेव कल्पतरु ॥१६॥
==
आज्ञा मागणी
तरी आतां आज्ञा द्यावी । मजवरी कृपा व्हावी ॥१॥
आहे चरणी शरण । आहे घेतले दासपण ॥२॥
तरी आतां कृपा करी । प्रगटावे साक्षात्कारी ॥३॥
विनायक तुज शरण । करी यास आज्ञापन ॥४॥
==
गुरु: साक्षात्परब्रह्म
मार्गदर्शक तो गुरुविण नाही । जावे लवलाही शरण त्या ॥१॥
गुरुपाशी विद्या गुरुपाशी कला । गुरु सामर्थ्याला देत असे ॥२॥
गुरुपाशी सिद्धि ऐश्वर्य त्याचेनी । गुरु मोक्षदानी सर्व दाता ॥३॥
इह परत्रासी सद्गतिचा दाता । गुरु भयदाता विघ्नहर्ता ॥४॥
गुरु कल्पतरु गुरु सुरेश्वर । गुरु हा आधार ब्रह्मांडाचा ॥५॥
स्वर्ग मृत्यु आणि पाताळींचा राजा । गुरु महाराजा विश्वपति ॥६॥
कैलासीचा शिव वैकुंठाधिपति । सत्य लोक पति गुरुदेव ॥७॥
विधि हरिहर एकवटली मूर्ति । तीच गुरुमूर्ति जाणावी की ॥८॥
त्रिगुणात्मक देव शुद्ध सत्व भाव । त्याचे मी वैभव बोलूं काय ॥९॥
जगताचा पति प्राणांचा तो प्राण । आत्माराम पूर्ण ब्रह्मांडाचा ॥१०॥
गुरु हे साधन गुरु हेच साध्य । गुरु हे आराध्य सकलांचे ॥११॥
गुरु हा सोबती गुरु प्राणसखा । गुरु पाठिराखा सकलांचा ॥१२॥
गुरु हे चेतन गुरु हे प्राणन । गुरु हे जीवन त्रैलोक्याचे ॥१३॥
गुरु हेच अन्न गुरु हाच अत्ता । गुरुचीच सत्ता अतृत्वाने ॥१४॥
गुरु प्रजापति गुरु हे अव्यक्त । ब्रह्म व्यक्ताव्यक्त गुरु एक ॥१५॥
गुरु सूर्य चंद्र नक्षत्र आणि तारा । सकळ पसारा गुरु एक ॥१६॥
बुद्धिचा जो बोध बुद्धिचे विज्ञान । जे का विद्योतन गुरु जाणा ॥१७॥
गुरु परमार्थ गुरुच की स्वार्थ । गुरु अथानर्थ जगामाजी ॥१८॥
गुरु हा संसार गुरु हेचि सार । गुरु जे असार तेही तोच ॥१९॥
गुरु हा विचार गुरु अविचार । विचारा विचार गुरु सर्व ॥२०॥
गुरु हा विवेक गुरु अविवेक । गुरु जाणा निक सर्व कांही ॥२१॥
गुरु परब्रह्म गुरु हाच मोक्ष । गुरु सर्वसाक्ष सर्वदृष्टी ॥२२॥
जन्म मृत्यु गुरु रोग भोग गुरु । द्वन्द्व प्रतिकारु गुरु जाणा ॥२३॥
गुरुविण कायसे या जगतांत । सर्व परिस्फ़ुरत गुरु एक ॥२४॥
जे जे कांही जाणा विश्वांत भरले । ज्ञान देत भले गुरुसम ॥२५॥
ज्याचा ज्याचा घडे आम्हांसी आश्रय । ज्ञानद ते होय अनुभवी ॥२६॥
वस्तुज्ञान देती विषयां बोधिती । भोग शिकविती ज्ञानचि की ॥२७॥
इंद्रियांचे स्पर्श जे कां विषयांसी । विषय ज्ञानासी प्रगटीती ॥२८॥
भोक्तृत्वकर्तृत्व सकळ ज्ञानमय । ज्ञानानेच होय अनुभव ॥२९॥
सुखदु:ख जाणे तोच अनुभव । ज्ञानाचाच भाव सर्व कांही ॥३०॥
विश्वज्ञानात्मक गुरु ज्ञानमय । म्हणोनियां होय गुरुमय ॥३१॥
ब्रह्मांड हे गुरु याचीया कारण । जेथे तेथे जाण असे गुरु ॥३२॥
विचार्वंतालागी भेटतसे गुरु । भवांबुधि पारु करी त्यासी ॥३३॥
ज्यासी लागे जाणा श्रीगुरुची आस । भेटतसे खास त्यास गुरु ॥३४॥
विनायक म्हणे हेच उपनिषद । यांत ते विशद गुरुज्ञान ॥३५॥
==
वासुदेव पुण्यतिथीचे दिवशी काय करणे ते
शुक्रवार ता. २७-६-१९३० ( सकाळी पूजेपूर्वी )
आज दिन तुझ्या जाण पुण्यतिथिचा । आम्हां पुण्याईचा थोर असे ॥१॥
आनंदाचा दिन दिन पर्वणीचा । दिन प्रसादाचा थोर आज ॥२॥
वैकुंठ भूवरी आज ते येतसे । देव प्रगटतसे साक्षात्कारे ॥३॥
आज दर्शनाचा दिन हा भेटीचा । आज मंगलाचा वासर की ॥४॥
आजचा दिवस जाणा तीर्थरुप । जळतसे पाप भोळे लोकां ॥५॥
चित्त मळ होत आज प्रक्षाळित । चित्त प्रकाशत शुद्धरुप ॥६॥
चित्त शोधनाचा दिवस अपूर्व । उठे भक्तिभाव आज दिनी ॥७॥
आज ह्रदयांत होत आविर्भूत । दत्त आम्हां होत वासुदेव ॥८॥
आज या स्थानाचा प्रबोध दिवस । महिमा विशेष जागे आज ॥९॥
आज वासुदेव स्वये प्रगटत । आशिर्वाद देत भजकाला ॥१०॥
आज दिन आहे वासुदेव स्मृतिचा । आठव तयाचा करणे की ॥११॥
आज करणे आम्हां अल्प अनुकरण । भजन पूजन उपासना ॥१२॥
त्यानी जे जे केले आम्हांसाठी भले । थोडे अनुकारिले पाहिजे की ॥१३॥
भजन पूजन भिक्षा समारंभ । अमृताचा लाभ जयालागी ॥१४॥
त्याचा अनुकार अल्पसा करणे । प्रसाद वाटणे भाविकांस ॥१५॥
उपहाराचा की प्रसाद वाटणे । गरुडेश्वर स्मरणे आज दिनी ॥१६॥
स्मरण नर्मदेचे स्मरण गरुडाचे । स्मरण दैत्याचे करणे आज ॥१७॥
स्मरण शंकराचे तैसे माणगांबाचे । टेंभे सत्कुलाचे स्मरण की ॥१८॥
स्मरण करणे गुरुसेवकांचे । स्वामि वासुदेवाचे स्मरण करणे ॥१९॥
ज्याचा ज्याचा केला संबंध वासुदेवे । त्यांचे प्रेमभावे स्मरण की ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020
TOP