श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय तेरावा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे मदनदहना सर्वेश्वरा । हे पूर्णब्रह्मा गंगाधरा । कृपाप्रसाद वेगें करा । शंकरा या दासावरी ॥१॥
मी तुझें धरिले चरण । अनन्यभावेंकरुन । आतां दोषा लागून । माझ्या किमपी पाहूं नको ॥२॥
चंद्र अही असून दोषी । तूं प्रिय मानिलें व्योमकेशी । पतीतपावन नाम तुंसी । देणें योग्य होईल ॥३॥
मी महापातकी भगवंता । परी तारी तारी पार्वतीकांता । दासगणूच्या ठेवा माथां । आपला तो वरदकर ॥४॥
मग अवघेच होईल बरें । ज्ञान तेंही कळेल खरें । संशयाचे अशुभ वारें । डोके न वरी काढील ॥५॥
अगस्ती पुसे स्कंदासी । दवना कां हो शंकरासी । प्रिय इतुका हें मशीं । विशद करुनी सांगावे ॥६॥
स्कंद म्हणे त्यावर । दवना वनस्पती अती थोर । तिच्यावरी शंकर । पार्वतीपरी प्रेम करी ॥७॥
पापनाशक करी दवना । दवनाचे देई निर्वाणा । दवन्यापरी अन्य ना । वस्तू या त्रिभुवनीं ॥८॥
दमन वनस्पतीपासून । दवना झाला निर्माण । म्हणजे प्राकृतीं त्या लागुन । दवणा नांव मिळालें ॥९॥
याच्याविशी एक कथा । सांगतो मी ऎक आतां । विदयुन्माली एक होता । असूर पूर्वकालासी ॥१०॥
त्याचापुत्र गजासुर । महीवरी माजला फ़ार । घाबरले अवघे दिवंचर । गजासुराच्या भयाने ॥११॥
अवघे मिळुन हरासी । आले गा-हाणे सांगायासी । हे भगवान व्योमकेशी । समय आतांचा बिकट फ़ार ॥१२॥
गजासूर तो माजला । ताप देतसे सज्जनाला । वाली देवब्राह्मणाला । कोणी न उरला तुझ्याविण ॥१३॥
इंद्रादिक समस्त । देव झाले असती त्रस्त । या गजासूराचा अंत । शंभो तुम्ही करावा ॥१४॥
तूं देवाचाही आदिदेव । म्हणुनी म्हणती महादेव । म्हणून पहा आम्ही धांव । घेतली ही तुझ्याकडे ॥१५॥
गजासुरासी मारावें । आम्हां निर्भय करावें । अमुचे तुवां टाकावें । कानामागे मागणे हें ॥१६॥
ऎशी देवाची विनवणी । ऎकून खवळला शूलपाणी । अर्धागी ज्याच्या मृडानी । ऎसा मांगीश परमात्मा ॥१७॥
खडग घेऊन प्रखर । धांवला गजासुरावर । जेवी झडप घाली पन्नगावर । वैनतेय गरुड तो ॥१८॥
मुंडके गजासुराचें । शिवानें तोडले साचें । परी न गेले प्राण त्याचे । पुन्हा झाला पहिल्यापरी ॥१९॥
ऎसे युध्द शत वेळां । झालें त्या संग्रामस्थला । ते पाहून विष्णूला । विचार सुचला येणे रीतीं ॥२०॥
विचार करितां हरीसी । आठव झाला चित्तासी । अरे! मीच या राक्षसासी । मागें आहे वर दिला ॥२१॥
की दमनवनस्पतीविण । तुझे न कदा जातील प्राण । म्हणून हा असुर पतन । होत नाही अजूनिया ॥२२॥
आतां दमन नामें वनस्पती । मीच होतों महीवरती । ममांशाने सत्वरगती । साह्य शिवाचें करावया ॥२३॥
ऎसे म्हणून वल्ली झाला । त्याच कोथल पर्वताला । आणि साकाररुपे शिवाला । वृतांत कथिला येऊन ॥२४॥
हे देवा कंठनीला । तुंम्ही ग्रहण करा या दवण्याला । नुसता वास याचा त्याला । मारील की नि:संशय ॥२५॥
शिवाने दवना घेऊन करी । धावला गजासुराच्यावरी । त्या वासें तिरपिट खरी । उडाली गजासुराची ॥२६॥
सहन होईना त्याचा वास । प्राण झाले कासावीस । सोडूनिया देहास । जाऊ पहाती तयाच्या ॥२७॥
शेवटी दाती तृण धरुन । गजासुर आला शरण । आणि विनयानें भाषण । करु लागला येणे रीतीं ॥२८॥
हे आदि अनादि पुराणपुरुषा । परब्रह्मा मांगीशा । माझी उगीच दुर्दशा । देवा तूं करुं नको ॥२९॥
आजपासून कोणालाही । त्रास मी देणार नाहीं । परी या पर्वताच्या ठायीं । माझी वस्ती असू दें  ॥३०॥
गजशुंडा म्हणून । जें पश्चिमेस आहे स्थान । या पर्वताच्या श्रोतेजन । तेथे याला ठेविलें ॥३१॥
त्याचा असुरभाव पालटला । तो शिवाचा भक्त झाला । यासी उपमा देण्याला । प्रल्हाद एकची पुराणांत ॥३२॥
प्रल्हाद असुरकुलोत्पन्न । तैसेच गजासुराचे जनन । विदयुन्मालीपासून । असुर कुली जाहलें ॥३३॥
म्हणून हा दवना । प्रिय झाला उमारमणा । कोठवरी याच्या महिमाना । वर्णन करुन सांगावें ॥३४॥
ही विष्णूरुप वनस्पती । म्हणून मला प्रिय अती । अम्हां उभयतांत तीळरती । फ़रक नाही विबुधहो ॥३५॥
दवण्यानें अर्चन । माझे जो का करील जाण । त्यावरी मनापासून । प्रेम माझे राहील हो ॥३६॥
शुध्दपक्षांत चैत्रमासी । अष्टमी, त्रयोदशी, चतुर्दशीसी । वा पोर्णिमेसी । दवणा-अर्चन करावें ॥३७॥
तैसा इतर वेळेला । दवणा जरी कोणी वाहिला । त्यांच्याही मनकामनेला । पुरवीन म्हणे शंकर ॥३८॥
वर जे चैत्रमासाचे । दिवस ग्रथित केले साचे । त्या दिवशीं या दवण्याचें । महत्व आहे विशेष ॥३९॥
या श्रोते चारी दिवशी । उठून प्रभातकालासी । शीतोदकें पुष्कर्णीसी । आदरें स्नान करावें ॥४०॥
अभिषेककारण । घ्यावे गव्याचे शिंग जाण । हें अवघ्या पात्रांहून । श्रेष्ठ आही गणलेलें ॥४१॥
दुधाणी, दवना, धत्तुर । सपुष्प बिल्वाचे ते हार । धूपदीप कापूर । पक्वान्नें ती नैवेद्यासी ॥४२॥
ऎशी पूजा करावी । चरणी निष्ठा ठेवावी । पार्वतीपतीच्या बरवी । म्हणजे सर्व साधेल ॥४३॥
व्रतसांगतेकारण । करावें ब्राह्मणभोजन । आपुली ऎपत पाहून । द्यावी दक्षिणा याचका ॥४४॥
या कोथल पर्वती । नवनिधीही राहती । अष्टसिध्दीही वास करिती । अणिमा गरिमा इत्यादी ॥४५॥
हें दवणापूजेचें विधान । शंकरांनी कथिले जाण । देवमुनी लागून । पूर्वकाली श्रोते हो ॥४६॥
म्हणून अवघ्या देवांनी । दवंण्यानें पूजिला शुलपाणी । तैसाच मुनी भक्तानीं । चित्ती भाव ठेवूनिया ॥४७॥
महात्म या दवण्याचे । जे जे श्रवण करतील साचे । सर्व मनोरथ तयांचे । मांगीश पूर्ण करील ॥४८॥
मांगीशाचा चौतीस । अध्याय पुरा झाला खास । येथूनी पसतिसाव्यास । ऐकण्या सादर बसा हो ॥४९॥
अगस्ती म्हणे स्कंदकासी । हे कार्तिकेया पुण्यराशी । मालूर पत्र शिवासी । कां एवढे प्रिय असे ॥५०॥
स्कंद बोले त्यावर । मालूर पत्राचा महिमा फार । तो वानाया सुरवर । होतील ना समर्थ कदा ॥५१॥     
या मालूर पत्राचें । दुसरें नाव बिल्व साचें । हे अत्यंत आवडीचे । आहे पार्वती पतीच्या ॥५२॥
बिल्व पत्राचा महिमा । अगोचर आहे निगमागमा । तो सांगण्या शांतिधामा । मीही नाहीं समर्थ ॥५३॥
फ़ार पूर्वी तपाला । बैसती झाली इंदिराकमला । जी सागराची असे बाला । देवी श्रीलक्ष्मी की ॥५४॥
ती शिवप्राप्ती कारण । बैसली तपाकारण । परी तो मदनदहन । तिशी प्रसन्न होईना ॥५५॥
यांत कित्येक वर्षे गेली । मग लक्ष्मी कंटाळली । तों इतुक्यांत पातली । नारदाची स्वारी तेथ ॥५६॥
तो ब्रह्मवेत्ता नारदमुनी । ज्याची ती पवित्र वाणी । सदा रंगली हरिभजनी । जो पुत्र ब्रम्ह्याचा ॥५७॥
लक्ष्मीनें तया पाहिलें । सवेंच उठून वंदन केलें । दीन वदनें विचारिलें । नारदासी येणेरीती ॥५८॥
हे नारदा मी येथ । श्रीशंकराप्रीत्यर्थ । तप कराया अहोरात्र । आहे पहा बसलेली ॥५९॥
परी तो कंठनील पार्वतीपती । प्रसन्न झाला ना मजप्रती । त्याला काय करु युक्ती । हें ठावें असल्या सांग मला ॥६०॥
ऐसे ऐकता भाषण । नारदें केलें हास्यवदन । लक्ष्मी! वाटे तुझे ज्ञान । सांप्रत नष्ट जाहलें ॥६१॥
ज्या ज्या वस्तू शिवासी । आवडती त्या तूं त्यासी । अर्पण करितां आदरेसी । शिव प्रसन्न होईल ॥६२॥
बिल्बदल शिवाकारण । आवडें ते तूं निर्माण । करी करापासून । आपुल्या की हे अंबे ! ॥६३॥
तूं जगासी उत्पन्न केलें । मग बिल्वदलाचें कां कोडें पडलें । याचेंच अती वाटलें । मजलागी आश्चर्य ॥६४॥
तुझा पती जो नारायण । त्यानें शिवसाह्य करण्यालागुन । दवणा केला निर्माण । गजासुराच्या वेळी पहा ॥६५॥
तैसे तूंही ये अवसरीं । बिल्वपत्र निर्माण करीं । आणि वाही शिवाचिया शिरीं । म्हणजे काम होईल ॥६६॥
इंदिरेनें ते ऐकिलें । करापासुनी निर्मिलें । बिल्वपत्र श्रोते भले । आपुल्या अंगीच्या सामर्थ्य ॥६७॥
आणि परमादरें शिवासी । बिल्वपत्र वहाता सरशी । प्रसन्न झाला व्योमकेशी । वर द्यायाकारणें ॥६८॥
त्याच्याच वरें भली । लक्ष्मी संपन्नता पावली । धनाची ती होऊन बसली । आदिदेवता जगांत ॥६९॥
ऐशी बिल्वाची उत्पती । ऐकिल्यावरी अगस्ती । पुन्हां त्या स्कंदाप्रती । विचारिता जाहला ॥७०॥
हे कार्तिकेया मजकारण । सांग बिल्वाचें महिमान । आतां ऐकिलें त्याचें जनन । कसें झालें तें तव मुखें ॥७१॥
कोवळे आणि छिद्ररहित । जें कां असेल बिल्वपत्र । त्यावरी ती अत्यंत । आवडी असे हराची ॥७२॥
एक बिल्वपत्र वहातां । संतोष होऊन पार्वतीकांता । वहाणाराची सारी व्यथा । तो हरण करीतसे ॥७३॥
एक दहा शंभर । अथवा बिल्वपत्रें हजार । वा लाखोलीनें परमेश्वर । जो पूजील आदरानें ॥७४॥
त्याचे त्रिताप नाहीसें । बिल्वपत्र वहातांसरसें । नाहीसें होती महिमान ऐसें । आहे तें मी सांगूं किती !॥७५॥
पूर्वसुकृतावांचुन । ना घडे बिल्वाचें अर्चन । शिवभक्तासी पाहून । भूतें पिशाच्चें पळती कीं ॥७६॥
प्रदोष सोमवार शिवरात्रीसी । बिल्वपत्रें वहावी शिवासी । वा प्रत्येक श्रावणमासीं । लाखोली वहावी शंकराला ॥७७॥
जो कोथली येऊन । ऐसे करील शिवार्चन । त्याच्या सप्तजन्मांचें दहन । दोष होतील श्रोते हो ॥७८॥
दारिद्याचा होईल नाश । लक्ष्मीचा होईल वास । मानमान्यता जगतीतलास । त्याची वाढेल नि:संशय ॥७९॥
रोगी असल्या शरीर । तें निकोप होईल साचार । भवानीपती परमेश्र्वर । कृपा करील त्यावरी ॥८०॥
बिल्वपत्राचें महिमान । श्रुतीनीही केलें गायान । पहा हिरण्यसूक्तालागुन । म्हणजे तुम्हां कळेल कीं ॥८१॥
" वनस्पतीस्तव वृक्षोथ बिल्वः" । ऐसे वाक्य आहे पहा । तेथे भाव धरुन रहा । अभक्ती ना उपयोगी ॥८२॥
हें बिल्वपत्राचें महात्म्य जरी । वाचिलें शिवाच्या समोरी । तें फ़लद होईल निर्धारी । बिल्वपत्रासमान ॥८३॥
हें मांगीशमहात्म्याचें । सार आहे पस्तीसाचें ।  अधिक उणें झाल्याचें । क्षमा करा मजलागीं ॥८४॥
स्कंदाकारणे अगस्ती । पुन्हा असे येणेरीती । कोणती आहे सांग रीती । तीर्थ-नैवेद्य ग्रहणाची ॥८५॥
तेवी प्रदक्षिणेचें लक्षण । आणि शैवाचे ते लक्षण । तैसेच तीर्थाचे महिमान । निरुपण शैवधर्माचें ॥८६॥
हे अवघे फ़ोड करुनी । सांग स्कंदा मजलागुनी । माझी ही विनवणी । तुवां  मान्य करावी ॥८७॥
स्कंद बोले त्यावर । ऐक नैवेद्य ग्रहणाचा प्रकार । या कोथल पर्वतावर । शिवनैवेद्य भक्षावा ॥८८॥
कां कीं हरिहरांचा । वास येथे आहे साचा । अवांतर ठिकाणांचा । धर्म नाहीं येणेपरी ॥८९॥
देवी जी चंडी तिला । जो कां असेल दाविला । नैवेद्य बुधहो भला । तो सेवन करुं नये ॥९०॥
चंडी, अघोरा, कराला । या जरी देवी झाल्या । तरी त्या नैवेद्य ग्रहणाला । योग्य ना शास्त्र सांगे ॥९१॥
उमा पार्वती मृडानी । लक्ष्मी, इंदिरा, कमललोचनी । यांच्या नैवेद्यालागुनी । दोष नाही सांगितला ॥९२॥
शिव नैवेद्य प्रतिदिनी । जो भक्षण करील त्या लागुनी । पूर्वजन्माचे ज्ञान झणीं । नि:संशय होईल ॥९३॥
शिजविलेल्या अन्नाचा । नैवेद्य ब्राह्मण क्षत्रियांचा । मात्र शूद्रादिकांचा । नाही नाही उपयोगी ॥९४॥
शूद्र, चांडाल, अंत्यजांनी । जे शिजविलें त्यापासुनी । श्रीपार्वतीपतीच्या मनीं । आनंद नाहीं होणार ॥९५॥
त्याचा परिणाम उलट होईल । तो रौरव नर्का जाईल । हालअपेष्टा भोगील । सत्य सत्य त्रिवाचा ॥९६॥
त्यांनी शिवाकारणें । कोरडें अन्न समर्पिणें । याची अनंत कारणें । आहेत ती नको येथ ॥९७॥
आतां बाणाच्या आकाराची । जी लिंगे असतील साची । वा हेम अथवा पार्‍याचीं । रत्न स्वयंभू विबुधहो ॥९८॥
या पांची लिंगाचा । नैवेद्य ग्रहण करणें साचा । त्यासी ना लागायाचा । दोष कदा येतुलाही ॥९९॥
हें शिवनैवेद्यग्रहण सत्य । चांद्रायण प्रायश्चित्तावत । हेच इतर दोषाप्रत ।नाशेल कीं विबुधहो ॥१००॥
साविधीनें लिंगाप्रत । जें कां घातलें उदक सत्य । त्या उदका जो प्राशीत । त्याची पापें भस्म होती ॥१॥
तें तीन वेळा घ्यावें । हेही लक्षांत ठेवावें । या तीर्थसेवनें बरवें । होईल भक्ताचें नि:संशय ॥२॥
हा नैवेद्यसेवनाचा विधी । सांगता झाला कृपानिधी । जो का आदीअनादी । शंभू महादेव विबुधहो ॥३॥
शिवाचे स्नानोदक । जो शिरी धारण करी देख । त्याला पुण्य नि:शंक । जान्हवीस्नानाचें लाधेल की ॥४॥
पूजा सर्वोपचारांसहीत । करावी होऊन प्रेमभरित । पुढे जानू टेकून दोन्ही हात । जोडून वंदन करावें ॥५॥
आणि म्हणावें ऐशा रीती । हे पाहि मां दक्षिणामूर्ती । त्याचा मंत्र येणे रीती । आहे तो अवधारा ॥६॥

आवाहनं न जानामि पूजां चैव तथैव च ।
क्षमस्व देवदेवेश मांमगीकुरु शंकर ॥१॥

ऐशी प्रार्थना झाल्यावर । उदक सोडावें सत्वर । बिल्वपत्राचा करुन आदर । हातामध्यें घ्यावे त्या ॥७॥
आणि हाताच्या तळव्यानें । स्पर्श लिंगाकारणें । करुनिया वदनें । नमं त्रिवार म्हणावे ॥८॥
ऐशीच प्रार्थना ब्राह्मणांनी । सद्योजातं मंत्रांनी । करावी आणि इतरांनी । नम: शिवाय म्हणावें ॥९॥
मग शिवाकारण । प्रदक्षिणा कराव्या तीन । नंतर उदक घेऊन । अभिषेकाचें करामध्यें ॥११०॥
’अकालमृत्युहरणं ’ हा मंत्र म्हणून । करावे तीनदा प्राशन । साधकानें विबुधहो ॥११॥
साधकें शिवनिर्माल्याचें । अवघ्राण करणें साचें । तरीच सार्थक जन्माचे । झाले त्याच्या म्हणावें ॥१२॥
आतां सांगतो शैवधर्मा । ते परीस तूं शांतिधामा । मुनिवर्या उत्तमोत्तम । हे अगस्ती महाऋषी ॥१३॥
शिवपदी  निष्ठा पूर्ण । अंगा विभूतीचें भूषण । सर्व शरीरे धारण । जो करी रुद्राक्षा ॥१४॥
बिल्वपत्रानें हमेशा । जो कां पूजी महेशा । वृत्ती ठेवून शांतता । रुद्राध्यायाचा जप करी ॥१५॥
नैवेद्य आणि तीर्थग्रहण । केल्याविना ना जाय दिन । जयाचा त्या लागुन शैव ऐसे म्हणावें ॥१६॥
पठण या अध्यायाचे । जो जो करील तयाचे । महादोष जन्मांतरीचें । भस्म होतील क्षणांत ॥१७॥
ब्रह्महत्या, स्त्रीहत्या । गुरुहत्या, बालहत्या । पितृहत्या मातृहत्या । भातृहत्या इत्यादी ॥१८॥
ऐशी महापारकें सारीं । भस्म होतील सत्वरी । जो हा अध्याय पठण करील । भावभक्तीनें आपुल्या ॥१९॥
हें छ्त्तीसाचे आहे सार । याचा करावा विचार । हट्टाने अविधी प्रकार । केव्हाही करूं नये ॥१२०॥
दोष कसले असले जरी । जो या अध्यायाचे पठण करी । त्याचीं तीं दुरितें सारी । जातील भस्म होऊनिया ॥२१॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥१२२॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति त्रयोदशोध्याय समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP