श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सातवा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे जगत्त्रयपालका । हे चंद्रशेखरा उमानायका । हे महाभय-विध्वंसका । गिरिजापते दीनबंधो ॥१॥
मांगीशमहात्म्य प्राकृतांत । आणण्याचा मी धरिला हेत । तो तवकृपें सिध्दीप्रत । जावो हीच याचना ॥२॥
याचक तुझ्या द्वारींचा । विन्मुख न गेला साचा । ऐसा इतिहास पुर्वीचा । भाललोचना तुझा असे ॥३॥
त्याची आठवण ठेवावी । दासाची आस पुरवावी । विघ्नें सारीं विलया न्यावीं । हेंच आहे मागणें ॥४॥
नाना विघ्नां नासणें । हे कांही न जड तुजकारणे । तुझे पदी पूर्णपणें । निष्ठा माझी आहे कीं ॥५॥
आतां श्रोते सावधान । कथा हे ऐका पावन । केल्या रुद्राक्ष धारण । काय होतें तें ऐका ॥६॥
जो पूर्वीचा इतिहास । स्कंदाने कथिला अगस्तीस । ताच शौनकादिक ऋषीस। सूतानें सांगितला ॥७॥
त्याचाच अनुवाद ये ठायीं । मी आतां करितो पाही । माझ्या पदरचें यांत कांही । लवमात्र नसे हो ॥८॥
हजार रुद्राक्ष शरीरावरी । जो का मानव धारण करी । तो सर्वथैव शिवापरी । आहे असे समजावें ॥९॥
श्रोते हे न घडल्यास । कंठामाजीं बत्तीस । एक असावा शिखेस । सोळा सोळा दोन्ही करीं ॥१०॥
दंडामाजी बारा बारा । तीन तीन धारण करा । ठेवूनिया आदरा । द्वय श्रवणी विबुधहो ॥११॥
हाही रुद्राक्षधारिता । शिवासमची तत्वतां । मोती पोवळे त्यांत घालितां । कांही नसे प्रत्यवाय ॥१२॥
सूर्यासी अंधार । पाहूं न शके तिळभर । तेवी जो रुद्राक्षधारी नर । त्याला पातक स्पर्शेना ॥१३॥
रुद्राक्षाचे प्रकार । सांगावे तरी कोठवर । एकमुखी, पंचमुखी, दहावर- एक म्हणजे अकरा असे ॥१४॥
मुखाची संख्या । चौदापर्यत आहे देखा । रुद्राक्षमहिमा देवादिकां । कळणें अति दुर्लभ ॥१५॥
एक नंदिग्रामाप्रती । महानंदा वेश्या होती । तिच्या नृत्यशाळेत निश्चितीं । कुक्कुट मर्कट दोघे होते ॥१६॥
महानंदाचे प्रेम फ़ार । होते कुक्कुट मर्कटावर । ती त्यांच्या अंगावर । रुद्राक्ष घाली प्रेमानें ॥१७॥
महानंदा जें भजन करी । तयी तें तिच्यासमोरी । मृदंगाच्या ठेक्यावरी । नृत्य कुक्कुट मर्कटाचे ॥१८॥
तें जेव्हां झाले मृत । तेव्हा कांही दिवस कैलासांत । रहाते झाले आनंदात । श्रीशिवाच्या सन्निधाना ॥१९॥
तेच पुढें काश्मिरीं । मनुजयोनीभीतरी । एक भद्रसेनाचे उदरी । म्हणजे तेथील राजाच्या ॥२०॥
दुसरा प्रधानापोटी आला । ते एकमेकाला । पाहून अति प्रेमाला । करुं लागले परस्पर ॥२१॥
दोघांचा एक विचार । सदा रुद्राक्ष अंगावर । धारण करिती निरंतर । विभव त्यांना आवडेना ॥२२॥
परी समूळ ना फ़ांटा दिला । जगाच्या व्यवहाराला । त्या काश्मीरी देशाला । आचरीते जाहले ॥२३॥
त्या पुण्येकरुन । सर्व सुखाते भागून । कीर्ती मागे उरवून । मोक्ष पावलें शिवकृपे ॥२४॥
आतां ऐशीच दुसरी कथा । सांगतो मी ऐका आता पुष्करदेशी एक होता । सौम्य नामे नृपवर ॥२५॥
त्याची भार्या वसुमती । सदाचारसंपन्न होती । परी ती आवडत नव्हती । सोमभुपाकारणे ॥२६॥
सोम मदांध दुराचारी । त्याचे प्रेम वेश्येवरी । घाणीला न जागा खरी । जेवीं गटारावाचून  ॥२७॥
वसुमती आली तारुण्यात । पतीची ना गांठ पडत । विषयसुख हें ब्रह्म सत्य । स्त्रियांलागी वाटतसे ॥२८॥
तयी वसुमतीने विचार केला । आपुल्या उपाध्यायपत्नीला । बोलावून कथन केला । पतीचा अवघा वृतांत ॥२९॥
काय सांगू बाई तुसी । माझ्या जन्मकहाणीसी । ताते मजला कूपासी । कां न मागेच लोटिले ॥३०॥
ज्याच्यासी लाविलें लग्न । तो माझ्याशीं भाषण । नुसतेंही न करी जाण । मग अवांतर गोष्टी कशाच्या ॥३१॥
यास उपाय कांही तरी । असल्या सांग लौकरी । मी तो करीन अत्यादरी । म्हणून तुला बोलावलें ॥३२॥
ऐसे भाषण ऐकून । बोलती झाली उपाध्यीण । चिंता न करी तुजलागून । उपाय ,एक सांगते ॥३३॥
हा घे रुद्राक्ष तुजलागुन । देतें तो तूं करी ग्रहण । हा परमादरें करुन । धारण करी देहावर ॥३४॥
ते वसुमतीने ऐकिलें । रुद्राक्षास नमस्कारिलें । आणि सवेंच धारण केलें । देहावरी तयाला ॥३५॥
तो झाले अघटित । वसुमतीच्या महालांत । येता झाला भ्रतार सत्य । दोन प्रहर रात्रीला ॥३६॥
आलिंगिलें एकमेकां । भोगू लागले सुरत सुखा । उधार हा शब्द देखा । रुद्राक्ष धारणे खपत नसें ॥३७॥
त्या वसुमतीचा भ्रतार । जो सोमनामें नृपवर । त्याने दुष्कर्मासी सत्वर । फ़ांटा दिला कायमचा ॥३८॥
अत्यंत बनला सदाचारी । शिवभक्त झाला निर्धारी । ऐशी रुद्राक्षाची थोरी । आहे ती अनुभवणें ॥३९॥
हा सोळा सतराचा । सारांश आहे साचा । त्या मांगीशमहात्म्याचा । जें स्कंद पुराणांतर्गत ॥४०॥
शंकराची नांवें अपार । शास्त्री कथिली साचार । त्यांतुन कांहीचा उच्चार । करितों ते श्रवण करा ॥४१॥
शिव, पशुपती, शंभू, शंकर । विरुपाक्ष, चंद्रशेखर । मृत्यूंजय, नीलकंठ, महेश्वर, । भव, भीम, उमापती ॥४२॥
ही नांवे ओठी जपतां । मानसीची हरे चिंता । पंचाक्षरी मंत्राची योग्यता । याठायी विशेष ॥४३॥
ॐ नम: शिवाय । हा पंचाक्षरी मंत्र होय । यासम नाही सोय । अन्य तरुन जावया ॥४४॥
त्या विषयींची एक कथा । सांगतों मी ऐका आतां । काशीपुरीचा राजा होता । वज्रबाहू नांवाचा ॥४५॥
याची कन्या कलावती । गुणसंपन्नस्वरुप होती । तिला दीक्षा दिली होती । शिवपंचाक्षरी मंत्राची ॥४६॥
कन्या आधीच गुणवान । पवित्र जिचें आचरण । सदासर्वदा करी ध्यान । श्रीपार्वतीपतीचे ॥४७॥
नम: शिवाय मंत्र वदनी । जपत राही दिन रजनी । जिच्या स्वरुपा पाहूनी । रतीही होईल लज्जित ॥४८॥
ऐशा त्या कलावतीस । पौंड्राधिपती दशरथास । दिली होती पहा खास । वज्रबाहू राजानें ॥४९॥
कलावती सदाचारी । दशरथ नव्हता तिच्यापरी । एक बकुल एक साबरी । संबंध आला घडून ॥५०॥
एक डिकेमाली एक केशर । एक गोदा एक थिल्लर । एक कथिल एक भांगार । एके ठिकाणी आली पहां ॥५१॥
दशरथ राजा एके दिवशी । बोलता झाला कलावतीसी । मोकळ्या मनानें कां तूं मशी । बोलत नाहीस रंभोरु ॥५२॥
ये दे मजला आलिंगन । मी तुझा आहे रमण । तुझ्या देहा तरूणपण । सांप्रत आहे पातलेंलें ॥५३॥
कलावती म्हणे प्राणनाथा । काय सांगू तुंम्हांस आतां । तुमचा माझा तत्वतां । संगम ना होईल सुखदायीं ॥५४॥
म्हणून सांगतें तुम्हांप्रत । तुम्ही न पडा या फ़ंदांत । मर्जी असल्या आपण त्वरीत । दुसरे लग्न करावें ॥५५॥
शिवपंचाक्षरें मंत्रे भली । माझी तनू पुनित झाला । तुमची तशीच राहिली । शिवदीक्षेवांचून ॥५६॥
सारख्यास सारखे भेटे । तेव्हाच होय सुख गोमटें । म्हणून तुम्ही माझ्या वाटे । न जावें हेंच बरें ॥५७॥
मग दशरथ बोलता झाला । हा शास्त्रार्थ न सांगे मला । तुसी अंलिंगण देण्याला । मीच योग्य असे की ॥५८॥
ऐसे म्हणुन पसरले कर । आलिंगनासी साचार । तो कांतेचे तप्त शरीर । वन्हीपरी भासले त्या ॥५९॥
आलिंगता चटके बसले । दशरथदेहा फ़ोड आले । काही सुचेनासे झाले । तेधवा की तयाला ॥६०॥
कलावती म्हणे पतिराया । तुम्ही गर्गापासुनिया । शिवदीक्षा घेऊनीया । पंचाक्षरी मंत्राची ॥६१॥
म्हणजे ही बाधा तुम्हाप्रत । होणार नाही कदा खचित । जा आतां यत्किंचित । वेळ उगा करुं नका ॥६२॥
मग दशरथराजा गर्गापाशी । येता झाला त्वरेंशी । शिवदीक्षा घ्यावयासी । पंचाक्षरें मंत्राची ॥६३॥
गर्गाचार्ये तयाला । शिवपंचाक्षरें मंत्र दिला । तो जपतांच राजाला । अति आनंद झाला की ॥६४॥
स्वगृहासी  येऊन । कांतेस देतां आलिंगन । झाले दोघांस समाधान । ते काय वर्णावें ॥६५॥
शिवपंचाक्षरी मंत्र । भावे जो का मनी जपत । त्याच्या दोषाचे पर्वत । जळतील हां हां म्हणतां की ॥६६॥
रोगी असल्या शरीर । तें उत्तम होईल साचार । निमेल भिती गंडांतर । या मंत्राच्या प्रभावें ॥६७॥
अवघ्या मंत्रसमूहात । हा शिवपंचाक्षरी मंत्र सत्य । साक्षात मेरुपर्वत । तुल्य गायत्रीच्या परी ॥६८॥
हा मंत्र जे जे जपती । त्यांना दु:ख न होय कल्पांती । ऐसे संत सांगती । आजवरी कंठरवें ॥६९॥
हा मांगीशमहात्म्याचा । अध्याय एकुणविसावा साचा ।आतां विसावियाचा । गोषवारा कथिन पुढें ॥७०॥
इति श्रीदासगणु विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥७१॥
श्रीहरिहरार्पणामस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति सप्तोमोध्याय: समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP