श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सहावा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे अघनाशका गिरिजावरा । मम गा-हाणें ऐका जरा । मी पारलों तुमच्या द्वारा । कर जोडून अत्यादरें ॥१॥
माझ्या मनींच्या सकल होता । तूं पुरवावें उमानाथा । अवघीं विघ्नें संहारिता । तूंच होईल पार्वतीपते ॥२॥
हें मांगीशाचे पुरानण । प्राकृतीं आणावें म्हणून । मागतों तुला वरदान । दासगणू हा सदाशिवा ॥३॥
त्यांतून पूर्वीपासून । मीं तुझे धरिले चरण । म्हणून मजला करीं न । कष्टी हे देवदेवा ॥४॥
तूं मोठमोठयांचे आर्त पुरविले । मग माझेच काय कोडें पडलें । तें सांग सांग आतां वहिलें । पार्वतीच्या परमेश्र्वरा ॥५॥
माझे दुर्गुण पाहू नको । निष्ठूर कदापी होऊं नको । चिंतेत मला ठेवूं नको । हेंच आहे मागणें ॥६॥
स्कंदास पुसे अगस्ती । या कोथलाची उंची रुंदी किती । हें सांगावे सत्वरगती । मजला हें कार्तिकेया ॥७॥
स्कंद म्हणे त्यावर । हा दक्षिणकैलास साचार । ज्याचें नांव कोथलगिरिवर । सध्या आहे ख्यात जगीं ॥८॥
रुंदी उंची पर्वताची । आहे विशेष प्रकारची । ती न मोजता यावयाची । व्यावहारिक मापानें ॥९॥
या पर्वताचे महिमान । कलियुगीं अत्यंत जाण । उमेसहित भगवान । कलींत याच ठायीं राहिला ॥१०॥
येथे जो निष्ठा ठेविती । त्यांना अवघेच देव पावती । कां कीं निर्जरांची आहे वस्ती । सांप्रत या पहाडावर ॥११॥
श्रृंगी, भृंगी, षडानन । नंदी, वीरभद्र, गजानन । तैसेच अवघे मरुदगण । शिवास्तव येथे राहिले ॥१२॥
भैरव, दिक्पाळ अवघे । येथेंच सांप्रत आहे बघें । हें वर्णन नाहीं उगें । अनुभवून पहा तें ॥१३॥
दुर्वादिक अवघ्या शक्ति । तैशाच अवघ्या चारी मुक्ती । इंद्र जो कां शचीपती । चंडेश्र्वर, वृषेश्वर ॥१४॥
कामधेनू, नाग, गरुड । येणें अलंकृत हा पहाड । पयस्विनी तीर्थ गाढ । याच कोथलपर्वतीं ॥१५॥
पर्वताच्या मध्यावरी । पंचमुखानें त्रिपुरारी । बैसला सिंहासनावरी । पदनतास तारावया ॥१६॥
आयुधानें मंडित । ज्या हराचे आहेत हात । ऐसा महंकाल कालातील । शंभूमहादेव साच कीं ॥१७॥
अगस्तीनें पृच्छा केली । ही साधारण माहिती झाली । आतां पृथकपणें सांगीतले । पाहिजे तूं सारी कथा ॥१८॥
ऐसे ऐकुन बोलला । स्कंद अगस्ती रुषीला । कोथलाच्या पूर्वेला । जो पहाड आहे कीं ॥१९॥
तेथें देवांचा भूपती । इंद्र प्रचारी ज्याला म्हणती । तैसे बारा मल्हार निश्चितीं । अश्वत्थामा आणि कमला ॥२०॥
शिवाराधना करावया बसले असती येऊनिया । अग्निदिशोचिया  ठाया । वीरभद्र विराजत ॥२१॥
भैरव अवघे दक्षिणेसी । बसले शिवाच्या सहाय्यासी । आतां ऐक नैरत्येसी । वास शिवभक्त असुरांचा ॥२२॥
कोथलाच्या पश्चिमेला । सुब्रह्नाण्य आहे बैसला । आपुल्या सैन्येंसह अंबेला । मनामाजीं आठवीत ॥२३॥
दुर्गादेवी वायव्येला । महंकाल उत्तरेला । महाशास्ता बैसला । ईशान्य दिशेला लक्षूनी ॥२४॥
जयीं प्रलयाची वेळा येईल । तेव्हां हा पर्वता कोथल । उंच उंच होत जाईल । हें ध्यानी असूं द्दा ॥२५॥
परी तो अभक्ताप्रत । दिसणार नाही किंचित । पर्वतीं असणा-यांसहीत । पावेल वैकुंठ कैलासा ॥२६॥
म्हणजे या कोथलाची च्युती । होणार नाहीं कल्पांतीं । येथे जे का वास करिती । ते महतभाग्याचे ॥२७॥
या कोथली राहून । भगवान हा उमारमण । भक्तांचे करितो संरक्षण । आणि शासन कीं दुष्टाला ॥२८॥
या शंकराचा अधिकार । सर्वाहूनी अती थोर । हे अवघे चराचर । आहेत त्यांचे स्वरुप कीं ॥२९॥
याच्यात सत्तें वाहे वारा । याच्याच सत्तें दिनकरा ।प्रकाश मिळे साजिरा । पर्जन्य याच्याच सत्तेनें ॥३०॥
पंचभूताला पाही । यावीण दुसरी गती नाहीं । ऐशी याची महती कांई । तुला सांगूं मुनिवरा ॥३१॥
या अध्यायाचे पठण । जो जो करील प्रेमेंकरुन । तो अल्यायु असल्या जाण । त्याचें आयुष्य वाढेल कीं ॥३२॥
रोगी असल्या शरीर । तें निकोप होईल साचार । भीती जी का गंडांतर । ती अवघी निमेल कीं ॥३३॥
मनीशा त्या पूर्ण होती । शंभूची या केल्या भक्ती । याची पहा प्रचीती । उगीच नांवे ठेवूं नका ॥३४॥
चवदा पंधरा ऐसे दोन्ही । अध्याय संपले या ठिकाणीं । ही माझी सेवा पिनाकपाणी । मान्य करो सर्वदा ॥३५॥
पुढे शौनकादि रुषी समस्त । इतिहासज्ञ जो कां सुत । पुसते झाले तयाप्रत । येणेरीती विबुधहो ॥३६॥
हे पुराणज्ञ सूता । तूं अम्हांसी होय सांगता । जी स्कंदानें सारी कथा । अगस्तीला सांगितली ॥३७॥
त्या कथेचे ऐसे सार । तें ऐका हो श्रोते चतुर । अगस्ती जो मुनीवर । त्यासी स्कंद ऐसें म्हणे ॥३८॥
हे अगस्त्या ऐक ऐक । भस्मरुद्राक्ष-महात्म्य देख । हा कोथलपर्वत नि:शंक । सर्व सुखाची खाण असे ॥३९॥
शिवार्चन करण्याचे । प्रकार बहूत साचे । त्यातून कांही प्रकारचें । रहस्य सांगतों मी तुला ॥४०॥
समंत्रक भस्मलेपन । तैसें रुद्राक्षाचें धारण । शिवाचे नामोच्चारण । व्रत राजादि शिवरात्र ॥४१॥
ध्यान धारणा शिवाची । कोण्यारीतीनें करावयाची । तैशी शिवाच्या वैभवाची । महती जगीं काय आहे ॥४२॥
हें क्रमवार मी कथन । करितों तें करी श्रवण । ज्या श्रवणें पाप दहन । होईल जन्मजन्माचें ॥४३॥
तीन प्रकारचे भस्म आहे । उत्तम, मध्यम, कनिष्ठ पाहें । गाईच्या शेणाचें होये । सहजची उत्तम ॥४४॥
भस्म म्हणण्याचें कारण । इतुकेंच आहे यालागून । जे दोषांचे करी दहन । अंगास स्पर्श होतांची ॥४५॥
भस्म जो का धारण करी । जादुटोणा त्याच्यावरी । न चालतसे निर्धारी । भस्माचिया प्रभावें ॥४६॥
जो धारण करी विभूती । त्यासी न होय भानामती । विघ्नें तया पळती । रानोमाळीं मोकाट ॥४७॥
शरीराचिये ठायीं विभूती लावण्याची पाही । पंधरा स्थानें आहेत हीं । ती ठेवा ध्यानांत ॥४८॥
भाल, लल्लाट, नाभी, छाती, । मस्तक हें त्याच रीती । मुख कंठ आणि जंघा ती । समंत्रक भस्म लावणें ॥४९॥
भुजा ,कर, पाठ, मान । तेवीं पार्श्वभाग जाण । गुह्य आणि वदन । ऐसे भाग शरीराचे ॥५०॥ ज
जाबाल शरुती भीतरी । ही कथा कथिली सारी । ती साधकाने अत्यादरी । केली पाहिजे अवलोकन ॥५१॥
जलांत भस्म मिसळूनी ।त्याचे त्रिपुंड्र ठिकठिकाणी । लावणें पर्मादरांनी । शरुतिस्मृतीच्या आधारें ॥५२॥
भस्म हें भूमीवरी । अज्ञानाचा नाश करी । आणि सुखदायक सर्वतोपरी । ही विभूती आहे हो ॥५३॥
जेव्हा पूर्वकल्पांत । महाप्रलय झाला खचित । तयीं वटपत्रावरी सत्य । विष्णू ते राहिले ॥५४॥
तयीं दिगांबररुपें खरा । शिव प्रगटला साजिरा । त्यांनी विभूती हरीचे करा । दिधली कीं प्रथमतां ॥५५॥
ती हरीनें घेऊन । लल्लाटी केली धारण । थोडी मुखात घालून । पाहू लागला त्याकडे ॥५६॥
तो हा चंद्रशेखर भगवान । दिसला हरीलागून । ऐसे आहे महीमान । श्रोते या विभूतीचें ॥५७॥
विष्णू म्हणे शिवासी । तूं कोणत्या सांग कामासी । आला आहेस मजपाशीं । याचना ती करावया ॥५८॥
शिव बोले त्यावर । अरे! ब्रह्म जें निर्गुण निराकार । तें मीच आहें साचार । तूं अससी शक्ति मम ॥५९॥
त्या माझ्या शक्तीप्रत । प्रकृती म्हणती व्यवहारांत । ब्रह्मांड रचण्या आहे खचित । तुझी माझी अवश्कता ॥६०॥
म्हणून तूं स्त्री व्हावें । साह्य माझें करावें । तुझें कर्तुत्व मला ठावें । कैसे आहे अगाध तें ॥६१॥
ऐसे बोलता दिगंबर । विष्णूनें केला नमस्कार । तात्काळ झाला सुंदर । स्त्री पहा ते ठायां ॥६२॥
प्रकृती-पुरुषाच्या संगमात । पुरुषाचें तें पडलें रेत । त्यामुळे अकस्मात । प्रकार एक घडून आला ॥६३॥
स्त्रीवेष टाकून । प्रकृती बनले नारायण । परी संगमाची खूण । अवशेष तैशीच राहिली ॥६४॥
नाभी-कमलापासून । एक कमल झालें उत्पन्न ।ज्या कमलें पंचवदन । ब्रह्मा उत्पन्न जाहला ॥६५॥
हें पाहिलें भैरवांनी । तो राग आला त्यांच्या मनीं । त्यांनी फ़रश फ़ेकुनी । पंचमाशिर तोडिलें ॥६६॥
मज वाटलें येणे रीतीं । जे भैरव कोपले चित्तीं । तों त्याच्या पांच मुखांप्रती । पाहुन परम रागावले ॥६७॥
भैरवा ऐसे वाटलें । पांच मुखाचे आहेत भले । यजमान आमुचे शिव वहिले । त्याची बरोबरी हा करतो कां ? ॥६८॥
पंचवदनें हराविण । कोनास नसावी म्हणून । भैरवाने तोंडुन । मुख त्याचे टाकिलें ॥६९॥
ब्रह्मा चार मुखाचा । अखेरपर्यंत राहिला साचा । असो एक्या ब्राह्मणाचा । अंत झाला सर्पदंशें ॥७०॥
तो वीरभद्रांनी । श्रोते याच विभूतींनीं । सर्प विषातें उतरवोनी । सजीव त्यास केले हो ॥७१॥
मागे नामदेव नामें मुनी । झाले होते महाज्ञानी । तया भक्षण्यालागूनी । राक्षस एक धाविन्नला ॥७२॥
तों घडलें अघटित ।वामदेव अंगीची विभूती सत्य । राक्षसाच्या शरीराप्रत । लागती झाली दैवबळें ॥७३॥
तो त्या राक्षसाचा । असुरभाव पालटला साचा । तैशा अगणित दोषांचा । नाश झाला भस्मबळें ॥७४॥
पूर्वी द्रविड देशांत ।एक महान पातकी होता खचित । त्याचा द्विजवंशांत । जन्म झाला असें कीं ॥७५॥
त्याच्या हातून सारीं । पातके घडली भूमीवर ।त्याची गणती कोण करी । साक्षात तो पापागार ॥७६॥
तो जेव्हां मरण पावला । तयीं त्याच्या देहाला ।पौरांनीं बांधून दोरीला । फ़रफ़रा ओढीत नेलें कीं ॥७७॥
आणि गांवाबाहेरी । एक्या कुश्चल जागेवरी । दिला टाकून सत्वरीं । मग काय विचारतां ?॥७८॥
तत देह ते अवसरीं । मांस- भक्षकां झाली खरी । मेजवानीच साजिरी । गीध, काक, आनंदले ॥७९॥
त्यांत एक आला श्वान । भस्मामाजीं लोळून । मांस कराया भक्षण । कावळे गिधाडांच्यापरी ॥८०॥
तो श्वान बसला छातीवरी । त्या प्रेताच्या निर्धारी । तनू अवघी हुंगिली सारी । मांस कोठें तें पहावया ॥८१॥
त्यायोगे ऐसे झालें । श्वान अंगीचें लागलें । भस्म त्या प्रेता भलें । जेणे मुक्त झाला तो ॥८१॥
भस्म लागतां क्षणीं । शिवदूत गेले घेऊनी । यमदूताच्या पासुनी । कैलासाकारणें ॥८३॥
कोणत्याही रितीनें । भस्म शरीराकारणे । लागतां त्याचें पूर्णपणें । फ़ळ पदरी पडे कीं ॥८४॥
ऐसा हा भस्म महिमा । ऐक तूं द्विजोत्तमा । ज्या श्रवणें विरामा । सारे प्राणी पावतील ॥८५॥
श्रोते या ठायाला । अध्याय सोळा पूर्ण झाला । आतां आरंभ सतराव्याला । आहे तो श्रवण करा ॥८६॥
इति श्रीदासगणू विरचित । मांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । श्रीहरिहराची प्राप्ती ती ॥८७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति षष्ठोध्याय: समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP