श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय बारावा
श्रीमांगीशमहात्म्य
श्रीगणेशाय नम: ॥
हे मृत्युंजया कर्पूरगौरा । भाललोचना गंगाधरा । पंचतुंडा सर्वेश्र्वरा । पाहि मां पाहि मां ॥१॥
माझें मन अनावर । तें तुम्ही करा देवा स्थिर । भलभलते विचार । अहोरात्र येती मनीं ॥२॥
वाचेनें तुझें भजन चालत । आणि भलतीकडे जाते चित्त । देवा ! आवरी त्याप्रत । हीच आहे प्रार्थना ॥३॥
चित्ताची स्थिरता । जोवरी न झाली पार्वतीकांता । तो शास्त्राभ्यासें पढिक तोता । होईल हें खरें जरी ॥४॥
परी न कांही उपयोग झाला । शास्त्रज्ञ असून वांया गेला । अर्धांग झालेल्या शरीराला । तें जसें निरुपयोगी ॥५॥
तैशी आपत्ती मजवरी । नको आणूंस हे त्रिपुरारी । माझे चित्त स्थिर करी । भजन तुझें करावया ॥६॥
जें जें होईल मशीं ज्ञान । तें तें अनुभवाकारण । येवो हे पार्वतीरमण । तुझ्या कृपेनें जगदीशा ॥७॥
कोथलाच्या पूर्व-ईशान्य बाजूस । आहे एक स्थान विशेष । नामाभिधा आहे त्यास । औदुंबर ती ऐशी हो ॥८॥
याच औदुंबरेश्र्वरीं । वृषभस्थापना त्रिपुरारी । करिता झाला आहे खरी । आपुल्या ठायींच्या आनंदें ॥९॥
येथें व्रत वृषभेश्वर । साधकें करावें साचार । त्या व्रताचा प्रकार । येणेरीती विबुधहो ॥१०॥
सूर्य वृषभ राशीस । येतां करावें या व्रतास । अष्टमी तिथी योग्य खास । आहे आहे विबुधहो ॥११॥
त्याच श्रोते अष्टमीसी । उठून उषःकालासी । शुचिर्भूतपणेसी । शिव-उमेचें करणें ध्यान ॥१२॥
म्हणजे प्रकृतीसह शंकर । बैसले आहेत वृषभावर । आयुधानें मंडित कर । आहेत ज्या प्रभुचे ॥१३॥
ऐसा वृषभारुढ गिरिजापती । आठवोनिया भावें चित्ती । जाऊनिया तीर्थावरती । स्नानसंध्या करावी ॥१४॥
प्रभातीचें अर्ध्य द्यावे । भस्म रुद्राक्ष धारण करावे । धातूचे प्रतिक असावें । शिव-उमेचें वृषभारुढ ॥१५॥
प्रतिमा शक्तिप्रमाणें । करावी की आदरानें । आभिषेक रुद्रसूक्तानें । यथाविधी करावा ॥१६॥
पायसादि पक्वान्ने । करावी नैवेद्याकारणें । ब्राह्मणासी दक्षिणा देणें । आपुली प्राप्ती पाहुन ॥१७॥
हा विधी तीर्थावरी । करुन शिवमंदिरी । यावे पूजाया त्रिपुरारी । भवानीपती शितिकंठ ॥१८॥
नंतर यथाशक्ती सोनं । द्यावे शिवाकारणें । तेवी प्रदक्षिणा करणें । मनोभावें हराला ॥१९॥
इतका विधी झाल्यावरी । मग यावें अपुल्या घरीं । अपूप पक्वान्नें अत्यादरीं । करावी भोजन करावया ॥२०॥
शिवभक्तासहित । भोजन करावें यथास्थित । रात्री शुध्द शय्येप्रत । शयन तें करावें ॥२१॥
पुढे श्रोते दुसरे दिवशी । स्नान करुन तीर्थासी । बसावे पुराण-श्रवणासी । कांही काळ पावेतों ॥२२॥
मग शिवभक्तशा ब्राह्मणास । दान करावें प्रतिमेस । ठेवूनिया शुध्द भावास । अभ्यंतरी विबुधहो ॥२३॥
ऐसे हे वृषभव्रत । जे जे करतील त्यांप्रत । होतील अवघी सुखें प्राप्त । आयुष्य वाढेल तयांचे ॥२४॥
कैवल्याची प्राप्ती । या व्रतें होय निश्र्चिती । अखेर कायम वस्ती । होईल त्याची कैलासांत ॥२५॥
यांत संदेह कांहीच नाहीं । याच व्रतें शेषशायी । वैकुंठलोकाचिया ठायीं । सर्व वैभवा पावला ॥२६॥
विष्णू झाले शिवसमान । याच व्रतेकरुन । अमोलिक मिळाले वहान । खगराजा गरुड तो ॥२७॥
पूर्वी विश्वसेन राजासी । महातपस्वी जे वसिष्ठऋषी । त्यांनी या वृषभव्रत आहे सरसें । सर्व व्रतसमूहांत ॥२८॥
या व्रत प्रभावे करुन । नृपासी झाले त्रिकाल ज्ञान । अष्टसिध्दी दासीसमान । पुढें त्याच्या राहिल्या ॥३०॥
त्रैलोक्यांत आडविणारा । भूपा न राहिला कोणी खरा । ज्या राजाचा दरारा । बसता झाला चोहीकडे ॥३१॥
लौकिक संतती सुखोपभोग । भूपासी मिळाले चांग । अखेर श्रीउमारंग । तोही भेटला कैलासीं ॥३२॥
श्रोते विधृत राजानें । हे व्रत केलें आदरानें । त्यालाही श्रीशंकराने । सर्व कांही अर्पिले ॥३३॥
विश्वसेन राजापरी । हाही झाला अधिकारी । विधृतराजा भूमीवरी । तें किती म्हणून सांगावे ? ॥३४॥
ऐसेच एक्या ब्राह्मणानी । व्रत केलें आदरांनी । तोही त्यापासूनी । सर्व सुखा पावला ॥३५॥
हा अध्याय जे जे कोणी । भावें वाचतील प्रतिदिनीं । किंवा ऐकतील श्रवणीं । तेही पावती सर्व सुखा ॥३६॥
ऐसे वृषभव्रताचे महिमान । सांगता झाला षडानन । हे त्याचे उपकार महान । खचित झाले अवघ्यावरी ॥३७॥
श्रोते येथपर्यंत । एकतीस अध्याय झाले खचित । त्या प्रत्येकाचा सारांश ग्रथित । ये ग्रंथी केला असे ॥३८॥
तो तुम्ही अवघा ऐकिला । आतां या अष्टलिंगाला । सादर बसा श्रवणाला । ऐशी वेळ पुन्हा न यें ॥३९॥
या अष्टलिंगाची प्रदक्षिणा । एके दिवशीच करणें जाणा । ऐसे स्कंदाने मुनीना । मागे आहे कथन केले ॥४०॥
ही प्रदक्षिणा करण्याचे । दिवस दोन प्रकारचे । एक श्रावणमासाचे । वद्य अष्टमीला विबुधहो ॥४१॥
दुसरा दिवस माघमासी । आहे की शिवरात्रीसी । ऐसे स्कंदाने अगस्तीसी । कथन केले आहे की ॥४२॥
प्रदक्षिणा जन्माष्टमीस । करणें असल्या सप्तमीस । रात्री शिवमंदिरास । येऊन शयन करावें ॥४३॥
शिवरात्रीला करणें असल्यास । त्रयोदशीच्या रात्रीस । येणे भाग मंदिरास । शयन ते करावया ॥४४॥
शयन करण्याचे आधी देखा । भावे पूजावे त्रिपुरांतका । ध्यान करुन पादुका । चित्ती ठाम ठसवाव्या ॥४५॥
आणि मग प्रात:काली । नित्यकर्मे आटपून सगळी । नागतीर्थासी आंघोळी । येऊन करा शीतोदकें ॥४६॥
मग नागतीर्थाचें जल । कलशांत घेऊन सोज्वळ । आदरें पुजावा कंठनील । अमृतेश्र्वर परमात्मा ॥४७॥
मग त्यासी जोडूनी करा । प्रतिज्ञा ती ऐशी करा । की अष्टलिंगाच्या शंकरा । मी जातो दर्शनास ॥४८॥
ती करता जी जी विघ्नें । येतील देवा मजकारणें । ती ती आपल्या कृपेनें । विलया नेईं सदाशीव ॥४९॥
ऎसे प्रार्थून हरासी । यावें गुप्तलिंगासी । स्नान, दान, पूजेसी । करुनिया श्रोते हो ॥५०॥
तेथून यावे बिल्वलिंगा । आदरे पुजून उमारंगा । पुढे श्रोते जाऊन बघा । बाणलिंग आदरें ॥५१॥
या बाणलिंगानंतर । लिंग पहावे उदितेश्वर । पुढें भैरवाच्या जागेवर । जाऊन भैरव पूजावा ॥५२॥
पुढे स्तंभलिंगासी । यावें की अति हार्षी । येथें माध्यान्ह-कालासी । करावया शिवपूजा ॥५३॥
येथें करुन अल्पहार । सवेंच पहावे गौरीहर । येथे पुजून सर्वेश्वर । नैवेद्य दावा वाळूकाचा ॥५४॥
आपणही त्याचें भक्षण । अत्यंत भक्तीने करुन । सवेंच करावें गमन । औदुंबर स्थानाला ॥५५॥
तेथे येथल्याप्रमाणे । पूजादि सर्व करणें । आणि शेवटी भावभक्तीनें । गुप्तलिंगासी यावें हो ॥५६॥
ऎशी अष्टतीर्थे झाल्यावर । साधकानें यावें शिखरी । तेथे मांगीशपूजा अत्यादरी । समंत्रक ती करावया ॥५७॥
ती पूजा करुन । नागतीर्थाच्या उद्काकारण । भागीरथी समजून । शंभूस स्नान घालणें ॥५८॥
विनायक अमृतेश्वर । पुजूनिया सत्वर । व्रतसांगता त्यावर । सभ्दावानें करावी ॥५९॥
नंतर येऊनी गृहासी । भोजन पंचदंपत्यासी । करुन विविध पक्वान्नासी । अती आदरे द्यावे हो ॥६०॥
फ़ल तांबूल, दक्षणा । देऊनिया ब्राह्मणा । धरुनिया पहा मौना । आपण भोजन करावे ॥६१॥
व्रत जो करील येणेपरी क। त्याची ऋणी राहतील हरगौरी । सर्व देव त्याच्यावरी । कृपा अत्यंत करतील ॥६२॥
त्या वृत कर्त्याचा । सर्वत्र लौकिक होईल साचा । ऎसा प्रभाव या व्रताचा । आहे आहे श्रोते हो ॥६३॥
हें सारें ऎकिल्यावरी । अगस्ती स्कंदाला विचारी । हे शिवपुत्रा ! अम्हांवरी । तुझी कृपा असूं दे ॥६४॥
तूं जें काहीं सांगितर्लें । तें मी सर्व ऎकिलें । आतां सांग स्कंदा वहिलें । नागतीर्थाचे महिमान ॥६५॥
ही अष्टलिंगाची प्रदक्षिणा खरी । करील साच बरोबरी । पृथ्वी -प्रदक्षिणेची साजिरी । ये विषयीं शंका नसे ॥६६॥
हा अध्याय जे का पठती । त्यांच्या कामना पूर्ण होती । आयुष्याची वाढ ती । होईल त्यांच्या नि:सशय ॥६७॥
हें बत्तिसाव्याचें सार । तुम्हां कथिले साचार । आतां अवधान द्यावें चतुर । अध्याय तेहतीस ऎकावया ॥६८॥
स्कंद म्हणाले अगस्तीस । या नागतीर्थाचा इतिहास । शुध्द करुन चित्तास । ऎक मी सांगतों ॥६९॥
मुने ! या कोथल पर्वतावरी । येता झाला एके अवसरी । पिंगल नाग अत्यादरीं । शिवाराधना करावया ॥७०॥
श्रीमांगीशाच्या समोर । पिंगल नाग दुर्धर । वायुचा घेऊन आहार । तप करुं लागला ॥७१॥
क्वचित वाळलेली पानें । सेवावीं की पिंगलानें । ऎशा खडतर व्रताने । वाळून गेला पिंगल ॥७२॥
नुसता हाडाचा सापळा । जीव धरुन होता राहिला । तें पाहून शंकर भोळा । प्रसन्न झाला तयासी ॥७३॥
हे पिंगला माग वर । मी देण्यासी तयार । तुझ्या तपाचें ऋण फ़ार । झालें आहे माझ्या शिरीं ॥७४॥
त्याची फ़ेड करावया । मी प्रगटलो ये ठाया । सांग आतां लवलाह्या । तव मनीचें मनोगत ॥७५॥
पिंगल म्हणाला त्यावरी । हे भवभवांतक मन्मथारी । गिरिजापते त्रिपुरारी । भक्त-काम-कल्पद्रुमा ॥७६॥
ज्ञान छंद-शास्त्राचें । साकल्य व्हावे मज साचें । शिखरिणी आदिकरुन वृत्ताचे । पृथ्वी, मालिनी चामर ॥७७॥
हे शिवांनी ऐकिले म य र स त ज भ न गण कथिलें । वरदहस्त ठेविलें । पिंगलनागाचिया शिरी ॥७८॥
त्यायोगेंकरुन । यगण मगण तगण । हे आले पहा कळून । छंदशास्त्र पिंगलाल ॥७९॥
मग पिंगलाने शिवाची भली । षोडशोपचारें पूजा केली । न्यूनता कोठे न ठेविली । सर्व उपचार अर्पिलें ॥८०॥
आणि म्हणाला हे महेश । माझें नांव या तीर्थास । चालवी देवा या अवनीस । यावचंद्रादिवाकर ॥८१॥
तथास्तु शिव बोलला । पिंगल नागास आनंद झाला । गया प्रयागाहून आगळा । या तीर्थाचा महिमा असें ॥८२॥
पिंगल नागाच्या तपानें । नागतीर्थ याकारणें । म्हणूं लागले चतुर शहाणें । कवि, मुनी, दिवौकस ॥८३॥
या तीर्थी जो स्नान करी । त्याच्या पापा होय बोहरी । रोग न राहे त्याच्या शरीरी । दु:ख दैन्य निवेल ॥८४॥
शताश्वमेघाचें पुण्य । लागेल त्याकारण । जो नागतीर्थी करील स्नान । सत्य सत्य त्रिवाचा ॥८५॥
कर्जबाजारी कर्जातुन । मुक्त होती केल्या स्नान । साकडें त्याकारण । कशाचेंही ना पडेल कीं ॥८६॥
यावरी अगस्तीनी । प्रश्न केला स्कंदालागूनी । सदासर्वदा पिनाकपाणी । जेथे रमें तें तीर्थे सांग ॥८७॥
ऎसा प्रश्न ऎकिला । स्कंद त्यासी बोलता झाला । मुने ! या कोथल पर्वताला । शिवपुष्कर्णी हें तीर्थ एक ॥८८॥
हे अवघ्यांमाजी तीर्थ थोर । तें शिवमंदिराच्या समोर । याचा महिमा अपार । भागीरथीहून आगळा ॥८९॥
मुने! याच तीर्थासी । पुष्कर नामें एक ऋषी । तप करुन शिवासी । आपुला करुन घेतला ॥९०॥
तेणे शिव तोषला । पुष्करासी वर दिला । तुझें नाव जगतीतला । या तीर्थासी चालेल ॥९१॥
एक वर्ष भागीरथीसी । सतत स्नान केल्यासी । जे का पुण्य मानवासी । लाभतसे मुनीवरा ॥९२॥
तेच एक स्नानांत । पुष्करतीर्थ असे देत । जो खरा भाग्यवंत । त्यालाच स्नान घडें हें ॥९३॥
जितकी तीर्था पृथ्वीवरी । वा शिवलिंगें साजिरी । ती अवघींच आहेत सारी । या कोथल पर्वतावर ॥९४॥
शिवालयाच्या समोरी । आहे कांही अंतरावरी । अलकातीर्थ निर्धारी । राजा सर्व तीर्थाचा ॥९५॥
शंभूसाठी अलक गंगा । येथे आली आहे बघा । या कोथल नामें नगा । भूषवावयाकारणें ॥९६॥
ब्रह्महत्या, गोहत्या । स्त्रीहत्या, राजहत्या । ऎशा हत्या जाती नुसत्या । अलक गंगेच्या स्नानानें ॥९७॥
ही जागृत तीर्थे अद्यापी । अमृतवापी, देववापी । तिसरी ती ज्ञानवापी । रसकूप, ब्रह्मकूप ॥९८॥
वापी म्हणजे विहीर । जिला पाय-या साचार । यावीण जी कां इतर । त्याला कूप म्हणावें ॥९९॥
कोणतेही पुण्यकृत्य । कोथली केल्या खचित । तें निरर्थक कदा न होत । हें ध्यानांत असूं द्या ॥१००॥
त्या पुण्यकृत्याचे फ़ळ । त्यासी दे पय:फ़ेन धवल । शंभू महादेव कंठनील । सत्य सत्य त्रिवाचा ॥१॥
हा अध्याय तेहातिसावा । पूर्ण झाला येथे बरवा । आतां अवधान ठेवा । ऐकण्या चौतिसाव्यासी ॥२॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥१०३॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति द्वादशोध्याय समाप्त: ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 26, 2019
TOP