श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय आठवा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे जगत्रयपालका । हे चंद्रशेखर उमानायका । हे महाभय- विध्वंसका । गिरिजापते दीनबंधो ॥१॥
मांगीशमहात्म्य प्राकृतांत । आणण्याचा मीं धरिला हेत । तो तव कृपें सिध्दीप्रत । जावो हीच याचना ॥२॥
याचक तुझ्या द्वारीचा । विन्मुख न गेला साचा । ऐसा इतिहास पूर्वीचा । भाललोचना तुझा असे ॥३॥
त्याची अठवण ठेवावी । दासाची आस पुरवावी । विघ्नें सारी विलया न्यावीं । हेंच आहे मागणे ॥४॥
नाना विघ्नां नासणें । हे कांही न जड तुजकारणें । तुझे पदीं पूर्णपणें । निष्ठा माझी आहे की ॥५॥
या कोथलाच्या उत्तरेसी । अमृतेश्र्वर लिंग परियेसी । अमृतेरुपे व्योमकेशी । स्वयमेव जेथें प्रगटला ॥६॥
येथे कार्तिकमासात । सोमवार पर्वणी प्रीत्यर्थ । शीतोदकानें तीर्थात । प्रभातीं स्नान करावें ॥७॥
भस्म रुद्राक्ष धारण । भावें सविधि करुन । ओम नम: शिवाय म्हणून । जप सारखा करावा ॥८॥
उपास करावा त्या दिवशीं । तें अशक्य असल्यासी । अल्पाहार स्वास्थ्यासी । करावा निज देहाच्या ॥९॥
रुद्रानुष्ठानें करुन । शिवाचें करणें अर्चन । सहत्र बिल्वदलें अर्पण । करावीं पार्वतीपतीला ॥१०॥
सुगंधीत पुष्पे आणावीं । ती सदाशिवाला वहावी । त्यातलें त्य़ांत पांढरी घ्यावीं । सुमने उत्तम मार्ग हा ॥११॥
प्रभुला प्रिय आहे दवना । तो भावें वहावा उमारमणा । आसनीं धरुन ध्यानधारणा । एकाग्रतेनें करावी ॥१२॥
अस्त मानालागुन । घालावी ब्राह्मण सवाशीण । तया उमामहेश्वर कल्पून । दक्षिणसहीत पूजावें ॥१३॥
आगममार्गाला अनुसरुन । करावें मग भोजन । असत्य न करणें भाषण । निज वाणीनें कदाही ॥१४॥
ऐसे हे वृत सोमवार । जो कार्तिकमासीं करील नर । त्यावरी कृपा करील फ़ार । पार्वतीपती परमात्मा ॥१५॥
कथा येविषयींची । सांगतों मी आतां साची । विराट नामें तस्कराची । ती आदरें श्रवण करा ॥१६॥
हा विराट नामें तस्कर । अत्यंत होता पापी नर । ज्याचा भूमीस झाला भार । ऐसा चांडाळ महा तो ॥१७॥
तो एकदां करुन चोरी । वेश्येच्या जाऊन लपला घरीं । तो मागून आले अधिकारी । तपास त्याचा करावया ॥१८॥
त्या भयें तो तस्कर । पळून गेला साचार । एक अरण्य भयंकर । होते तेथे राहिला ॥१९॥
तेथेंही तयाला । सुस्थल न मिळे रहाण्याला । होता पर्जन्य आधीच पडला । अकालीं त्या काननांत ॥२०॥
तेथे खावया न मिळे अन्न । तो सोमवारचा होता दिन । विराटानें भक्षण । केले कंदमुळ्यांचे ॥२१॥
तेथें त्याला प्रभातीं । सर्पदंश झाला निश्चितीं । प्राण निघून गेल्यावरती । कलेवर पडलें धरणीला ॥२२॥
तों  त्या विराट यमदूत । घेऊन चाललें यमलोकांत । तों मध्यंतरीं मार्गात । ऐसे घडून आले कीं ॥२३॥
विराटासी अनायासें । सोमवार तो घडलासे । हें समजल्यासारखें । शिवदूत आले न्यावया ॥२४॥
यमदूतापासून । शिवदूतांनीं हिसकावुन । विराटाचा घेतला प्राण । तेणे यमदूत संतापलें ॥२५॥
ते जाऊन यमापाशीं । जी कां घडली पंथासी । हकिकत ती साकल्येंसी । सांगते झाले यमाला ॥२६॥
मग तात्काळ येऊन शिवगणाला । यमाजी भास्कर भेटता झाला । आणि तुम्ही विराटाला । कां नेतां हें विचारिलें ॥२७॥
गण म्हणाले त्यावर । या विराटाचा घडला सोमवार । त्यानेंच त्याचा परिहार । झाला सर्व पातकांचा ॥२८॥
अमृतेश्वराचिये अरण्यासी । मृत्यु आला या विराटासी । म्हणुन कैलासा तयासी । नेणें आम्हां भाग आलें ॥२९॥
ऐसा वृत्तांत ऐकिला । यमधर्म परत गेला । विराट कैलासी राहिला । सोमवार व्रताच्य़ा पुण्यानें ॥३०॥
हा कार्तिक सोमवार । आहे राजराजेश्वर । सकल व्रताचा साचार । येविषयीं शंका नसे ॥३१॥
अनायासे सोमवार  घडला । त्या विराट तस्कराला । तेणे हा लाभ झाला । अचानक तयासी ॥३२॥
मग जो संकल्प करुन । शिवचरणीं लक्ष ठेवून । अमृतेश्र्वराचें दर्शन । घेईल कार्तिकी सोमवारा ॥३३॥
त्याच्या पुण्या काय बघणें । जेवीं बावनकशी सोनें । सोमवारकर्त्यासी विघ्नें । बांधू न शकतीं यत्किंचित ॥३४॥
आतां गुप्तलिंगाची । कथा ती सांगतों साची । ती श्रवण करायाची । वेळ तुम्ही दवडू नका ॥३५॥
अगस्तीनें स्कंदापासून । जें जें कांहीं ऐकिलें जाण । तें तें अवघें कल्याण । करावया जगताचें ॥३६॥
सत्पुरुषांची हीच रीती । ते जगाच्या बर्‍यास्तव झटती । स्वार्थाकारणें जागा ती । नाहीं त्यांच्या चरित्रांत ॥३७॥
या कोथल पर्वतावरी भलें । जें गुप्तलिंग मागें कथिलें । त्याचें महत्व आगळे । ते तुम्हीं श्रवण करा ॥३८॥
धनराशी कारण । जयी ये सविता नारायण । तेव्हा गुप्तलिंगी तीर्थात स्नान । अवश्यमेव करावें ॥३९॥
आर्द्रा नक्षत्राचे वरी । हे करावें तत्वतां । या चांद्रव्रताची योग्यता । विशेष ऐसे कथिलें की ॥४०॥
याच व्रताकारण । आर्द्रा म्हणती सूज्ञ । त्याचें पहा विधान । येणेरीतीं आहे कीं ॥४१॥
आर्द्रा नक्षात्राचे वरी । गुप्तलिंगास जावे सत्वरी । भगवान नटेशाचे अंतरीं । भावें ध्यान करावें ॥४२॥
समंत्रक पूजा करुन । उपचार अवघे अर्पून । आठ दिवे लावुन । भोवतीं ठेवणें हराच्या ॥४३॥
मूग घालून खिचडी । करावी अती तांतडी । गूळ घालून रोकडी । पोळी करावी विबुधहो ॥४४॥
चटण्या भाज्या कोशिंबिरी । पक्वान्नें असावीं नानापरी । दहीभाताचा अखेरी । नैवेद्य शिवा दावावया ॥४५॥
प्रहर दिवसाचे आंत । नैवेद्य नटेशाप्रत । दावून दहा ब्राह्मण पूत । जेवावया घालावे ॥४६॥
उमेप्रीत्यर्थ सवाशीण । आदरेसीं पुजून । तिलाही द्दावे भोजन । ब्राह्मणाचिये परी ॥४७॥
तांबुल विडा दक्षणा । ऐशी करावी समाराधना । तेणें शंकराच्या मना । अती आनंद होईल ॥४८॥
या व्रतप्रभावानें । मुक्तकेश मुनीनें । पाहिले प्रत्यक्ष डोळ्यानें । शिवाचे तांडवनृत्य ॥४९॥
योगयोगेश्वर पतंजलीनीं । हें चांद्रव्रत केलें जाणी । तैसे कर्कोटक नागांनी । हेंच व्रत केले असें ॥५०॥
विपुल नावाचा ब्राह्मण । हे चांद्रव्रत करुन । कैलासासी जाऊन । पहाता झाला तांडव तें ॥५१॥
आणि परत येऊन भूमीवरी । विविधसुखें भोगून अखेरी । सायुज्ज मुक्ती साजिरी । झाला कैलासी पावता ॥५२॥
आतां बिल्व तीर्थाची कथा । सांगतो मी ऐका आतां । वृश्चिक राशीस सूर्य येतां । उमामहेश्वर व्रत करावें ॥५३॥
बिल्वतीर्थी येऊन । आरंभी करावें स्नान । सविधि भस्म धारण । आसनीं बैसून करावें ॥५४॥
दंडी मनगटीं कंठांत । शिखा आणि कर्णाप्रत । भाव ठेवूनी चित्तांत । रुद्राक्ष धारण करावें ॥५५॥
उमामहेश्वराची । प्रतिमा करावी सोन्याची । वा चांदी तांब्याची । पूजा कराया कारणें ॥५६॥
ताम्र कलशीं स्थापना । उमामहेश्वराची करणें जाणा । अत्यंत करुनी शुध्द मना । अर्चन केलें पाहिजें ॥५७॥
वेदवाणीनें अभिषेकधारा । प्रतिमेवरी आदरें धरा । ज्यायोगें दु:खपसारा । होईल की हो निरसन ॥५८॥
नंतरी नाना पक्वान्ने करून । नैवेद्द करावा समर्पण । पंधरा ब्राह्मणां लागून । भोजन द्दावें अत्यादरें ॥५९॥
तितक्याच असाव्या सवाशणी । त्या न मिळाल्यास त्या ठिकाणीं । एक तरी घालूनी । पूजा सांग करावी ॥६०॥
गोग्रास द्दावा गाईस । अन्न आल्या अतिथास । थोडेंबहूत देण्यास । नाही ऐसें म्हणू नयें ॥६१॥
बिल्वतीर्थी हें व्रत । साधकें करावें सत्य । तेणें भगवान उमानाथ । नि:संशय प्रसन्न होईल कीं ॥६२॥
येथें तृणबिंदु नामक अंधाला । व्रतप्रभावे लाभ झाला । सतेज द्दुष्टी आली त्याला । उमामहेश्वरकृपेनें ॥६३॥
तैशीच एक द्विजकामिनी । जिचा भ्रतार मरोनी । गेला असतां आली घेऊनी । उमामहेश्वरकृपेनें ॥६४॥
या बाईनें हे व्रत तें । बिल्वतीर्थीं केले होतें । तेंच तिच्या कामातें । येते झाले तरुनपणीं ॥६५ ॥
भ्रतार मरतां आक्रोश । करुं लागली विशेष । तों आठव झाला तियेस । उमामहेश्र्वर व्रताचा ॥६६॥
हे अजातीता, शंकरा । भीमा, उमामहेश्वरा । लहानपणीं शिंगणापुरा । बिल्वतीर्थी मी व्रत केलें॥६७॥
त्याच व्रतकर्तीला । हा प्रसंग प्राप्त झाला । हीच कांरें तुझी लीला । शिंगणापुरनिवासीया ॥६८॥
उमामहेश्वर व्रताचा । शात्री कथिल्या प्रकारचा । प्रभाव असल्या सत्य साचा । माझा पती उठेल ॥६९॥
ऐशी बाई बोलतां । वाहकाच्या खांद्यावरता । तिरडीवर तत्वतां । पती बैसला उठून ॥७०॥
ऐसे तेधवां पाहून । चकित झाले अवघे जन । बाईच्या आनंदा लागून । पार नाही राहिला ॥७१॥
ती नाचूच लागली । निजपतीच्या गळा पडली । म्हणे तुमची हरण केली । गंडांतरभिति शिवानें ॥७२॥
खरोख्ररीच कलियुगांत । शंभुमहादेव हात सत्य । देव हे कळलें मजप्रत । या आपुल्या येण्यानें ॥७३॥
मागें साध्वी सावित्रीनें । यम संतुष्ट प्रार्थनेने । वश करुन पतीकारणें । आपुल्या घेऊन आली कीं ॥७४॥
तैशीच ही दुसरी । गोष्ट झाली भूमीवर । मदन-दहन काय न करी । आपुल्या भक्ताकारणें ॥७५॥
याच व्रतें करुन । पुत्र इंद्र लागून । जयंत नामें सुलक्षण । होता झाला बिबुहहो ॥७६॥
कामधेनू वसिष्ठासी । याच व्रतें मिळाली खाशी । अनुष्ठान बिल्वतीर्थासी । केल्या त्याचें न जाय वांया ॥७७॥
या व्रतें चित्रांग भूपासी । मान मिळाला इंद्रलोकासी । तेथे भोगून उर्वशीसी । परत आला मृत्यूलोका ॥७८॥
येथें बहुत कालपर्यंत । त्यांनी राज्य केलें सत्य । मुलाचे हाती राज्यसूत्र । देऊन गेला कैलासा ॥७९॥
तेथे सायुज्यमुक्ति पावला । या व्रताच्या प्रभावाला । शेषही ना वानायाला । समर्थ होईल श्रोते हो ॥८०॥
एक सुधर्मा नांवाचा ब्राह्मण । असता झाला बुध्दिहीन । वाणीच्या ठायीं तोत्रेपण । पूर्ण भरलें जयाच्या ॥८१॥
कांहीच कळेना तयासी । तो वैतागून जिवासी । फ़िरत फ़िरत बिल्वतीर्थासी । येता झाला कोथलावर ॥८२॥
तेथें पुष्कळजणांनी । हें व्रत केलें आदरांनीं । तें त्यांनी पाहूनी । आपणही व्रता बैसला ॥८३॥
यथासांग व्रत केलें । वाणीचे तोत्रेपण गेलें । बुध्दिमालिन्य निमालें । अनुपम वक्ता झाला कीं ॥८४॥
वेदवेदांगपारंगत । प्रवीण अवघ्या शास्त्रांत । आसमंत भागी अतोनात । कीर्ती त्याची पसरली ॥८५॥
तों त्या देशीच्या राजांनी । असामान्य विद्वत्ता पाहूनी । द्विज सुधर्म्या लागूनी । अपरंपार द्रव्य दिलें ॥८६॥
मुलेंबाळें होऊन । तो सुधर्मा ब्राह्मण । करिता झाला अखेर गमन । शिवलोकाकारणें ॥८७॥
तेथे हरानें तयाला । गणाचा अधिपती केला । ऐसा अमोलिक लाभ झाला । व्रतप्रभावें सुधर्म्यासी ॥८८॥
सिंधुसेन राजाही । ऐसाच उध्दरुन गेला पाहीं । उमामहेश्वर व्रताचा कांई । प्रभाव वर्णन करावा ? ॥८९॥
या सिंधूसेन राजाचें । दायादानें राज्य साचें । हरण केले कायमचें । भूपा दिले हाकून ॥९०॥
सिंधुसेन काननांत । फ़िरु लागला दीनवत । श्रीमंताला नर्क वाटत । ही गरीबी श्रोते हो ॥९१॥
ज्या राजाच्या भोवतें । चाकर पहा उभे होते । त्याचीं कामें करण्यातें । आतां उलट झाले कीं ॥९२॥
कोणी न राहीला नौकर । पलंग गिरद्दा गेल्या पार । सिंधुसेन भूमीवर । वृक्षातळी निजतसे ॥९३॥
कशीबशी वल्कलानें । तनू झांकावी राजानें । कंदमुळे आलीं करणें । भक्षण त्या भूपाला ॥९४॥
पूर्वीची स्थिती आठवून । राजा शोक करी दारुण । तों अगस्ती त्या भेटले जाण । काननामाजी अचानक ॥९५॥
अगस्तीसी पाहतां । सिंधुसेन घाली दंडवता । म्हणे महाराज सांगा आतां । कष्ट हे भोगणे किती दिवस ॥९६॥
अगस्ती बोले त्यावर । राजा किमपी न सोडी धीर । तुझें राज्य साचार । परत मिळेल तुजलागीं ॥९७॥
तें परत मिळवावयासी । मी उपाय सांगतों ऐक तुसी । तूं कोथल पर्वतासी । शीघ्र गमन करावें ॥९८॥
त्या कोथल पर्वतावर । एक बिल्वतीर्थ आहे थोर । तेथे उमामहेश्वर । हें व्रत सशास्त्र करावें ॥९९॥
या व्रताच्या प्रभावानें । तुझें राज्य तुजकारणें । मिळेल , आतां शीघ्र जाणें । तूं बिल्वतीर्थासी ॥१००॥
ते ऐकून बिल्वतीर्था । सिंधुसेन आला तत्वता । सशास्त्र झाला आचरिता । उमामहेश्वर हें व्रत ॥१॥
राजा आधीच सज्जन । त्यांत महादेवाचें दर्शन । झालें असे त्याकारण । त्या बिल्वतीर्थावरी ॥२॥
शंकराने कुबेराला । सिंधुसेनाच्या दायादाला । पदच्युत करण्याचा हुकूम केला । मुद्दाम समोर आणून ॥३॥
शिवाज्ञा वंदून शिरीं । कुबेर दायादाचे वरी । धाविन्नला सिंहापरी । करकरा दांत खाऊन ॥४॥
अवघे राज्य हरण केले । दायादा यमसदनी पाठविलें । सिंधुसेनासी बसविलें । समारंभे गादीवरी ॥५॥
आणि म्हणाला जातो आतां । हे सिंधुसेना नृपनाथा । तुं प्रिय झालास पार्वतीकांता । उमामहेश्र्वर व्रताने ॥६॥
त्या हरानें कामगिरी । सोपविली होती माझ्यावरी । ती आज झाली पुरी । तुझे राज्य तुला दिलें ॥७॥
हा राजा सिंधूसेन । बहूत वर्षे राज्य करुन । गेला कैलासलोका लागून । शिवाराधना करावया ॥८॥
हें एकवीस बावीसाचें सार कथन केले अहो चतुर । याची सरी न येणार । कोणत्याही व्रताला ॥९॥
ऐसे बिल्वतीर्थाचे महिमान । जो का करील भावे पठण । त्यांच्या पारकांचे निर्मूलन । होऊन सर्व सुख पावेल तो ॥१०॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥१११॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु॥  इती अष्टमोध्याय समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP