वर्णाश्रमधर्मनिर्णय - क्षत्रियधर्म
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
क्षत्रियांच्या धर्माबद्दल मनुमहाऋषि म्हणतात की,
॥ प्रजानां रक्षणं दानमिज्याध्ययनमेवच ॥
॥ विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासत: ॥१॥ मनु.१ श्लोक.८९
अर्थ :- प्रजाचें रक्षण करणें, अर्थात् नीतीनें प्रजाला सर्व प्रकारांनी पुत्रवत् यथार्थ पालन करणें " दान देणे " अर्थात सुपात्र, वर्णाश्रमाच्या अनुसार चालणार्या संन्याशांना अथवा ब्राम्हणांला अथवा ब्रम्हचार्यांना अर्थात् विद्यार्थ्यांना अन्न वस्त्र पुस्तकें इत्यादि देऊन विद्यादान देणें. यज्ञ करणें अर्थात् अग्निहोत्रादिनैत्यिक आणि नैमित्ति यज्ञ करणें. अध्ययन करणें अर्थात दीर्घकालपर्यंत ब्रम्हचर्य आश्रमामध्यें राहून वेद आदि धर्म शास्त्रें पढणें आणि जुगार मद्यपान, नृत्य, स्त्रीसंभोग इ. विषायांविषयीं वारंवार आसक्ति नसणें. ही संक्षेपाने क्षत्रियांचीं कर्मे अर्थात् धर्म होत. ।१।
याचप्रमाणे श्रीकृष्णानीं भगवत्गीमध्ये म्हटले आहे की,
॥ शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं, युद्धेचाप्यपलायनम् ॥
॥ दानमीश्वर भावश्च, क्षात्रकर्म स्वभावजम् ॥२॥ म.अ.१८ श्लोक ४३
अर्थ व टीका: - " शौर्य" म्हणजे पराक्रम. ज्या योगानें दुसर्याचें मनावर स्वत:च्या मोठेपणाचा ठसा उमटतो त्यास तेज म्हणावें अथवा कोणाही पुढेंहि दीन अथवा डरपोक न होणें अर्थात् संग्रामादिमध्ये प्रतापयुक्त राहाणें; ’धृति’ म्हणजे धैर्य अथवा धारणा. शास्त्राची अथवा युद्धक्रियेची व शत्रूच्या क्रियेच्या प्रतिक्रियेची धारणा हीच क्षत्रियाची धारणा होय. ( अथवा अनेक क्लेश व संकटे प्राप्त झालीं तरीही धैर्यानें युद्ध, म्हणजे शास्त्र वादामध्यें कुशल) दूतकार्य, न्याय, आणि विचार वगैरेंमध्ये चतुर आणि बुद्धिवन्त होणें. ) "युद्धे चाप्यपलायनम्" याचा अर्थ असा कीं युद्धांत पाठ दाखवून पळून न जाणें. अर्थात युद्धांमध्ये सदा प्रवृत्त राहाणें, अर्थात शत्रूला भिवून पळून न जाणें " दान " म्हणजे उदार होऊन प्रजांस विद्या अर्थात ज्ञान दान देणें. "ईश्वरभाव" म्हणजे ईश्वराचे ठायीं निष्ठा आत्मज्ञान युक्त असावी अथवा असा परमेश्वर सर्वांवर दया ठेवतो व पक्षपात न करितां पित्यासमान धर्म आणि अधर्म करणार्यास यथायोग्य सुख आणि दु:खरुप फल देतो व आपले सर्वज्ञत्वादि प्रभावानें सर्वांचा अंतर्यामी राहून सर्व प्राणीमात्राचें चांगले आणि वाईट कर्माचा साक्षी होतो. त्याचप्रमाणे क्षत्रिय राजाचें कर्तव्य आहे. कीं, त्याने आपल्या गुप्त दुताचें [हेराचे] द्वारां प्रजा तथा राजासंबंधानें काम करणार्या नौकरांचे चांगले किंवा वाईट कर्म जाणणें, आणि पक्षपात सोडून न्यायाचे द्वारा यथायोग्य दुराचारी लोकांना दंड शिक्षा देणें. तथा प्रजा अथवा राजांतील नोकरामध्यें जे उत्तम, धार्मिक पुरुष असतील त्यांची यथायोग्य उन्नति करणें, हें सर्व क्षत्रियाचें स्वभावसिद्ध कर्म होय. ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP