वर्णाश्रमधर्मनिर्णय - वर्णव्यवस्था

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


स्वाध्यायेन जपहौर्मेस्त्रौविद्येनज्ययासुतै:
महायज्ञैश्च यज्ञैश्च ब्राम्हीयं क्रियते तनु: ॥ मनु ॥२/२८॥
[स्वाध्यायेन] अध्ययन यांच्या योगानें [ जपै:] विचार करणें करविणे, नानाप्रकारचें होम करणें, संपूर्ण वेद शब्द, अर्थ, संबंध व स्वरोच्चारसहित शिकणे व शिकविणें (इज्यया) पौर्णमासेष्टि वगैरे करणें, (सुतै:) विधिपूर्वक संतानोत्पत्ति करणें, [महायज्ञश्च] ब्रम्हयज्ञ, देवयज्ञ, पितृभक्त, वैश्चदेव व अतिथीयज्ञ, करणें (यज्ञै:श्च) अग्निष्टोमादि यज्ञ, विद्वानांचा सत्कार, संगति, सत्यभाषण, परोपकार करणें, संपूर्ण (शिल्प) विद्या शिकणें व शिकविणें व दुष्टाचार सोडून शिष्टाचारांप्रमाणें वर्तन करणें ह्या आचाराच्या योगानें [इयम्‍] ही (तनु) काया [ब्राम्हीय] ब्राम्हण वर्णाची (क्रियते) केली जाते असें मनूचें मत आह्वे व तें तुम्हाला मान्य आहे, असे असतांहि तुझी केवळ रजवीर्याच्या योगानेंच वर्णव्यवस्था कां मानता ? गुणकर्म स्वभावानुसार वर्ण मानणें हीच ऋषिपरंपरेने आलेली व्यवस्था आहे. [प्र.] काय तुम्ही परंपरेचेंहि खंडन करणार । [उ.] नाही. आर्यपरंपरा आम्ही मानतों पण तुअची कल्पित व उलटी व्यवस्था मानीत नाही. (प्र.) आमचें मत सृष्टीच्या प्रारंभापासून चालत आलेल्या वैदिक परंपरेप्रमाणे आहे व तुमचें पांच सांत पिढ्यात कोणी तरी उपस्थित केले आहे. यावरुन तुमचें उलट व आमचें मत सरळ आहे असें ठरतें. जय आईबापाप्रमाणे संतान उत्पन्न होत असतें, तर सज्जनाला दुर्जन पुत्र, दुर्जनाच्या पोटी सज्जनाची उत्पत्ति अशा तर्‍हेची स्थिति केव्हांहि दिसली नसती. ही स्थिती प्रत्यक्ष पहात असूनही तुम्हीं भ्रमांत पडत आहांत हे आश्चर्य आहे. पहा मनूने काय म्हटलें आहे.
येनास्य पितरो याता येन याता: पितामहा: ॥
तेन यायात्सतां मार्गं तेन गच्छ्न्न रिष्यते ॥ मनु ४./१७८॥
ज्या मार्गानें आई बाप, आजे पणजे गेले असतील त्या मार्गाने मुलानें जावें, मात्र तो (सतान्‍) सज्जनांचा मार्ग असला पाहिजे. सज्जन वाडवडिल ज्या मार्गानें गेले असतील त्या मार्गानें जावें, त्यांचे आचरण वाईट असेल तर त्याचा अवलंब करु नये. धर्मात्मे व सज्जन यांच्या प्रमाणें आचारण केलें असता कधीहि दु:ख प्राप्त होत नाही हे सर्व जाणतात. त्याचप्रमाणे वेदामध्ये सांगितलेला तेवढाच धर्म सनातन असून, वेदाज्ञेच्या विरुद्ध असलेला धर्म कधीहि सनातन होऊं शकत नाहीं हेंहि सर्व प्रसिद्ध आहे. जे लोक या धर्माला मानीत नसतील त्यांनी आपला पिता दरिद्री असला तर दारिद्र्यांतच राहून मिळालेली संपत्ति खुशाल फेकून द्यावी. ज्याप्रमाणे पिता दरिद्री आंधळा व कुकर्मी असला तर मुलानेंहि दरिद्री, अंध व कुकर्मी झालें पाहिजे असें नाही, तद्वतच वर्णव्यवस्थेसंबंधानें आहे. ज्या पुरुषामध्यें जे उत्तम गुण असतील त्या गुणाची वाढ करुन घेऊन दुष्ट गुणांचा त्याग करणें हें सर्वांस योग्य आहे जे कोणी रजवीर्यांच्या आधारानें वर्णव्यवस्था मानीत असतील त्यांनी असा प्रश्न विचारावा की, " जो आपला वैदिक धर्म सोडून ख्रिस्ती किंवा मुसलमान होतो, त्यांचे धर्मांतर झाल्यावरहि पूर्ववर्ण कायम राहातो की नाही ?" धर्मांतर केल्याबरोबर रजवीर्याचे शरीर बदलत नाही. असे असतांही वैदिक कर्मे सोडल्यामुळें त्यांच्या ठिकाणी पूर्व ब्राम्हणादि वर्णाचा लोप झाला असें सर्व मानतात. यावरुन हें सिद्ध होतें की, उत्तम गुणकर्माच्या योगानेच शूद्र वर्ण मानला जातो अर्थात नीच कुलांत उत्पन्न झाला तरीही जर तो उत्तम गुण-कर्म-स्वभाव यांनी युक्त असेल तर त्याला ब्राम्हण समजावें व उत्तम कुळांत उत्पन्न होऊन जो हीन कर्में करतो त्याची नीच वर्णांत गणना करावी. [प्र.]
ब्राम्हणोऽस्य मुखमासीद बाहू राजन्य: कृत:
ऊरु तदस्य अद्वैश्य: पद्‍भ्यांशूद्रो अजायत॥ यजु.३१-११:
परमेश्वराच्या तोंडापासून ब्राम्हण,बाहूपासून क्षत्रिय, ऊरुंपासून वैश्य व पायांपासून शूद्र उत्पन्न झाले. यांप्रमाणें वेदांत म्हटले आहे. ज्या प्रमाणे मुख बाहू होत नाही व बाहू मुख होऊं शकत नाही त्याच प्रमाणे ब्राम्हणाचे क्षत्रिय होऊ शकत नाहीत व क्षत्रियांचे ब्राम्हणहि होऊं शकत नाहीत असें असतांही तुझी गुणकर्मावरुन वर्ण कसें मानतां ? (उ) यावरील " ब्राम्हणोस्य" या मंत्राचा तुम्ही केलेला अर्थ बरोबर नाही. कारण त्या मंत्रांत " पुरुष" या शब्दाची पूर्व मंत्रातून अनुवृत्ति आहे. " पुरुष " शब्दाचा अर्थ " सर्व व्यापक, निराकार, परमेश्वर"  असा आहे. निराकाराला मुखादि अवयव असूं शकत नाहीत व ज्याला मुखादि अवयव आहेत तो " पुरुष" अर्थात सर्वव्यापक असूं शकणार नाहीं. (य: पुरि जगति शेते सर्व व्याप्नोति: स: पुरुष: ) परमेश्वर सर्वव्यापक असल्यामुळेच त्याला " पुरुष" असें म्हणतात व तो निराकार असल्यामुळेंच सर्वत्र व्याप्त आहे. साकार वस्तु सर्व व्यापक होऊं शकत नाही. अर्थात्‍ साकार पदार्थ सर्व व्यापक , सर्वर शक्तिमान्‍, जगताचा उत्पादक, धारक व प्रलयकर्ता, जीवांच्या पापपुण्याची व्यवस्था करणारा, सर्वज्ञ, अजन्मा, मृत्युरहित होऊं शकत नाही. ही विशेषणें निराकार परमेश्वरालाच लागूं शकतात. म्हणून वरील मंत्राचा अर्थं पुढें लिहिल्याप्रमाणे होतो अशा या सर्वव्यापि परमेश्वराच्या सृष्टीमध्यें मुखाप्रमाणे जो सर्वांत मुख्य (ब्राम्हण लक्षण) व उत्तम गुणयुक्त  असेल तो (ब्राम्हण) ब्राम्हण होय. (बाहु: । बाहूवै बलं बाहूर्वै वीर्यम्‍ । शतपथे) बल व वीर्य यांना बाहू असें म्हणतात. या बल व वीर्य यांमध्ये जो अधिक असतो तो (राजन्य:) क्षत्रिय समजावा. (ऊरु) कंबरेच्या खालचा भाग व जानुच्या वरचा भाग याला ऊरु असें म्हणतात. ऊरुंच्या बलानें जो सर्व देशदेशांतरी व्यापारासाठीं जातो व तेथें उत्तम व्यापार करुन परत येतो त्याला [वैश्य:] वैश्य असें म्हणतात. व जो (पद्‍भ्याम्‍) पायाप्रमाणें नीच असा [बुद्धिहीन] अर्थात्‍ मूर्खत्वादि गुणांनी युक्त, बुद्धिरहित, केवल श्रम करणारा असतो त्याला शूद्र असें म्हणतात. शतपथादि ब्राम्हण ग्रंथांमध्यें या मंत्राचा असाच अर्थ केला आहे. पहा:- यस्मादेते मुख्यास्तस्मान्मुखतो ह्यसृज्यन्त । इत्यादि " ज्या अर्थी हे मुख्य आहेत त्या अर्थी ते मुखापासून उत्पन्न झाले असें म्ह्ट्ले आहे. " व हें म्हणणें सयुक्तिकहि आहे. ज्याप्रमाणे सर्व अवर्यवांमध्ये मुख हें श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणें मनुष्यांमध्ये जो पूर्ण विद्वान व उत्तम गुणकर्मस्वभावानें युक्त असतो त्याला ब्राम्हण असें म्हणतात. परमेश्वर निराकार असल्यामुळें त्याच्या मुखापासून ब्राम्हण त्याच्या मुखापासून ब्राम्हण उत्पन्न झाले हें म्हणणे सर्वथा असंभवनीय आहे, हें वंध्या स्त्रीला पुत्र झाला असें म्हणण्याप्रमाणे निर्मूल आहे. जर मुखापासून ब्राम्हणाची उत्पत्ती झाली असती तर मुखाप्रमाणेच गोल गोल ब्राम्हणाचें शरीर असतें, उपादन कारणांचे गुण कार्यामध्यें येतात. याचप्रमाणे क्षत्रियांचे शरीर बाहूं प्रमाणें, वैश्यांचे ऊरुं प्रमाणे व शूद्रांचें पायांप्रमाणे असलें पाहिजे होतें. पण असें असलेलें दिसत नाहीं. बरें, जे मुखापासून झाले होते त्यांची ब्राम्हण ही संज्ञा आहे असें जे कोणी म्हणत असतील त्यांना सांगावें की, "ज्या अर्थी तुम्ही गर्भाशयांतून उत्पन्न होत आहांत व मुखापासून नाही त्या अर्थी तुम्ही ब्राम्हण नव्हे असो. वरील मंत्राचा जो आम्ही अर्थ केला त्याचप्रमाणे शतपथांतहि आहें व त्याच आधारावरून मनूमध्येंही पुढचा श्लोक आलेला आहे:-
॥ शूद्रो ब्राम्हणतामेति ब्राम्हणश्चैति शूद्रताम्‍ ॥
॥ क्षत्रियाज्जातमेवन्तु विद्याद्वैश्यातथैवच ॥
                        ॥ मनु. अ.१० । ६५ ॥
शूद्र कुलांत उत्पन्न होऊनही ज्यांच्या अंगी ब्राम्हण क्षत्रिय व वैश्य यांच्याप्रमाणें गुण, कर्म व स्वभाव असतील ते ब्राम्हण, क्षत्रिय किंवा वैश्य आहेत असें समजावें. त्याचप्रमाणें जो ब्राम्हण, क्षत्रिय किंवा वैश्य कुलांत उत्पन्न होऊन त्यांच्या वर्णाप्रमाणें गुणकर्म स्वभावानें युक्त नसेल व शूद्रांचे गुणकर्म स्वभाव त्याच्या अंगी असतील तर त्याला शूद्र असें समजावें अर्थात्‍ या कुलांत उत्पन्न झालेलेही अन्य गुणकर्मानें युक्त असले तर अन्य वर्णाला प्राप्त होतात. अर्थात ज्या मनुष्याच्या आंगी जे गुण कर्म स्वभाव असतील त्याप्रमाणें त्याचा वर्ण समजावा तसेंच ----
॥ धर्मचर्यया अघन्यो वर्ण: पूर्वं पूर्वं वर्णमापद्यते जातिपरिवृत्तौ  ॥१॥
अधर्मचर्यया पूर्वो वर्णो जघन्यं जघन्यं वर्णमापद्यते जातिपरिवृत्तौ ॥२॥
                                     आप. ध. सू.
"धर्माप्रमाणें आचरण करुन निकृष्ट वर्णांत उत्पन्न झालेला मनुष्य उच्च वर्णांत जाऊं शकतो आणि उत्तम वर्णांतील मनुष्य अधर्माचरणानें हीन वर्णाचा होतो" ज्याप्रमाणे गुणकर्म स्वभावानें युक्त असणार्‍या पुरुषाचें ते ते वर्ण समजावयाचे त्याचप्रमाणें स्त्रियांचेही समजावे. असें झाल्याने सर्व आपाआपल्या गुणकर्म स्वभावाने युक्त होऊन शुद्ध राहातील व ब्राम्हणांमध्ये क्षत्रिय वैश्य व शूद्र यासारखे पुरुष दिसणार नाहीत व क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्णही शुद्ध राहातील व त्यांच्यांत वर्णसंकर होणार नाही. असे सर्व वर्ण शुद्ध असले म्हणजे कोणत्याही वर्णाची निंदा होणार नाहीं व त्याचा अयोग्यपणाही दिसणार नाही.
प्रश्न: - समजा एकाला एकच मुलगा किंवा मुलगी आहे व ती आपल्या म्हणण्याप्रमाणें गुण-कर्म-स्वभावानें अन्य वर्णांची ठरली तर तिचा अन्य वर्णामध्यें प्रवेश होणार मग या आईबापांची सेवा कोणी करावी ? व वंशच्छेद झाल्यासारखें होणार त्याची वाट काय ?
उत्तर:- सेवाभंग किंवा वंशच्छेद होण्याची मुळींच भीति नाही; कारण विद्यासभा व राजसभा या दोन सभांच्या व्यवस्थेनें ज्यांना त्यांना आपल्या असवर्ण मुलांमुलीबद्दल स्ववर्णाला योग्य असे मुलगे किंवा अशा मुली मिळणार या पूर्वोक्त दोन सभांच्या व्यवस्थेने कांहीही अव्यवस्था होणार नाही. गुणकर्मावरुन जो वर्ण ठरवावयाचा तो कन्येचा सोळाव्या वर्षी व पुत्राचा पंचवीस किंवा छत्तिसाव्या वर्षी परीक्षा करुन निश्चय करावा. असा वर्णनिश्चय झाल्यावर ब्राम्हणाशीं ब्राम्हणीचा, क्षत्रियाशी क्षत्रियेचा, वैश्याशी वैश्येचा आणि शूद्रांशी शूद्रेचा विवाह करावा. असे सवर्ण विवाह झाले तरच स्त्री पुरुषांमध्यें परस्पर प्रीति योग्य प्रकारें राहील.
                                                        -- सत्यार्थ प्रकास चतुर्थ समुल्लास.

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP