वर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


॥ अलब्धं चैव लिप्सेत लब्धं रक्षेत्प्रयत्नत: ॥
॥ रक्षितं बर्धयेच्चैव वृद्धं पात्रेषु नि:क्षिपेत्‍ ॥१॥ मनु. अ. ७ श्लो. ९९
॥ अलब्धमिच्छेद्दंडेन लब्धं रक्षेदवेक्षया ॥
॥ रक्षितं वर्धयेद्‍वृद्ध्या वृद्धं दानेन नि:क्षिपेत्‍ ॥२॥ मनु. अ. ७ श्लो. १०१
॥ बुध्वा च सर्वं तत्वेन परराजचिकीर्षितम्‍ ॥
॥ तथा प्रयत्नमातिष्ठेद्यथात्मानं न पीडयेत्‍ ॥३॥ मनु. अ. ७ श्लो. ६८
अर्थ:- राजा, राजसभा [ व इतर पुरुषार्थी लोक ] यांनी अलब्ध वस्तूची प्राप्ति करुन घेण्याची इच्छा धरावी, प्राप्त झालेल्याचें प्रयत्नानें रक्षण करावें; रक्षित पदार्थांचे वाढ होईल अशी योजना करावी व वाढलेल्या धनाचा विनियोग, वेद विद्याप्रचार, धर्मप्रचार विद्यार्थ्यांला सहाय्य, वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी उपदेशक पाठविणें असमर्थ व अनाथ जे असतील त्यांचे पालन इत्यादि योग्य कृत्यें करण्यांत करावा. हे चार प्रकार करणें हेच आपलें उद्देश्य आहे असें समजून व आळस सोडून यांचें नित्य अनुष्ठान करीत असावें. दुसर्‍याला दण्ड करुन अप्राप्त वस्तु प्राप्त करुन घ्यावी, तीवर नित्य देखरेख करुन प्राप्त झालेल्याचें रक्षण करावें, व्याज वगैरे उपायांनी तिची वृद्धि करावी, व अशा रीतीनें बाढलेल्या द्र्व्यादि पदार्थांचा विनियोग दुसर्‍यांला पूर्वोक्त कामांत सयाय्य करण्याकडे करावा. ॥१॥
राजा व सर्व सभासद यांनी दूतादि साधनांच्या योगानें दुसर्‍या राजांचा अभिप्राय यथार्थ जाणून असा प्रयत्न करावा की, त्या राजांपासून आपणांस त्रास न होईल. ॥३॥
॥ अमाययैव वर्तेत न कथश्चन मायया ॥
॥ बुद्ध्येतारिप्रयुक्तां च मायां नित्यं स्वसंवृत: ॥४॥ मनु. अ. ७ श्लो. १०४
॥ नास्य छिद्रं परो विद्याच्छिद्रं विद्यात्परस्य तु ॥
॥ गूहेत्कूर्म इवाड्गानि रक्षेद्विवरमात्मन: ॥५॥ मनु. अ. ७ श्लो. १०५
॥ बकबच्चिन्तयेदर्थान्‍ सिंहवच्च पराक्रमेत्‍ ॥
॥ वृकवच्चावलुम्पेत शशवच्च निनिष्पतेत्‍ ॥६॥ मनु. अ. ७ श्लो. १०६
॥ एवं विजयमानस्य येऽस्य स्यु: परिपन्थिन: ॥
॥ तानानयेद्वशं सर्वान्‍ सामादिभिरुपक्रमै: ॥७॥ मनु. अ. ७ श्लो. १०७
अर्थ:- निष्कटीपणानें सर्वांबरोबर व्यवहार करावा. कोणत्याही प्रकारचें कपट करूं नये, आपलें रक्षण व्हावें म्हणून नित्य दक्षतेनें शत्रूनें केलेल कपट जाणावें. आपली छिद्रें अर्थात्‍ आपली निर्बलता शत्रूला समजूं देऊं नये; पण शत्रूची मात्र आपण समजून घ्यावी. ज्याप्रमाणें कांसव आपली अंगे झांकून ठेवितो; त्याप्रमाणेंच आपली छिद्रें व वर्मस्थानें गुप्त ठेवावी. ज्याप्रमाणें बगळा ध्यानस्थ होऊन पुढें आलेला मासा पटकन्‍ गिळून टाकतो त्याप्रमाणें द्र्व्यसंग्रहासंबंधी नेहमी विचार करावा. द्रव्यादि पदार्थांची व बलाची वृद्धि करण्यासाठी व शत्रूला जिंकण्यासाठी सिंहाप्रमाणें प्रयत्न करावा. लांडग्या व चित्त्याप्रमाणें लपून छपून शत्रूला पकडावें. जर अत्यंत बलवान्‍ शत्रू जवळ आला असेल तर सशाप्रमाणें दूर पळून जावें व शत्रूवर एकदम छापा घालावा. याप्रमाणें विजय करणार्‍य़ा राजाच्या राज्यांत जे कोणी दुष्ट डाकु किंवा लुटारु असतील व राजाचे जे कोणी शत्रू असतील त्यांना सामादि उपायांनी वश करुन घ्यावें. हे उपाय चार आहेत. (१) साम-शांततेनें स्नेह करुन राहणें, [२] दान-कांही देऊन त्यांना शांत करणें, (३) भेद-फंदफितुरी फोड तोड करुन शत्रूला वश करणें व जर हे तीनहि उपाय साधले नाहीत तर [४] दण्ड-शिक्षा किंवा युद्ध करुन त्यांना वश करुन घेणें. याप्रमाणें हे चार उपाय आहेत ।४।५।६।७
मनुमहर्षि राष्ट्राची स्वस्थता व राज्यक्रांति यांची कारणें, सांगतात.
॥ यथोद्धरति निर्दाता कक्षं धान्यं च रक्षति ॥
॥ तथा रक्षेन्नृपो राष्ट्रं हन्याच्च परिपन्थिन: ॥८॥ मनु. अ. ७ श्लो. ११०
॥ मोहाद्राजा स्वराष्ट्रं य: कर्षयत्यनवेक्षया ॥
॥ सोचिराद्वश्यते राज्याज्जीविताच्च सबान्धव: ॥९॥ मनु. अ. ७ श्लो. १११
॥ शरीरकर्षणात्प्राणा: क्षीयन्ते प्राणिनां यथा ॥
॥ तथा राज्ञामपि प्राणा: क्षीयन्ते राष्ट्रकर्षणात्‍ ॥१०॥ मनु. अ. ७ श्लो. ११२
ज्या प्रमाणे धान्याचा व्यापारी दगडकोंड्याचा त्याग करुन धान्याचे रक्षण करतो, त्याचप्रमाणें राजानें दुष्ट लोकांना शिक्षा करुन सज्जनांचे व राष्ट्राचें उत्तम रीतीनें पालन करावें म्हणजे राष्ट्र सुस्थितीत राहतें पण जो राजा आपल्या राष्ट्राला कष्ट देतो व त्रास देतो, त्याचा बंधुवर्गासहवर्तमान पूर्ण नाश होतो व त्यांच्या हातांतून राजसत्ताहि नाहीसी होते. ज्याप्रमाणें शरिराला दुर्बळ करण्यानें  व फार त्रास देण्यानें प्राण नाहींसे होतात तद्वतच राजाला क्षीण करण्यानें किंवा प्रजेला दु:ख देण्यानें राजांचे प्राण नाहीसे होतात ॥८॥९॥१०॥
राष्ट्राचें रक्षण कसें करावें तें मनुमहर्षि सांगतात.
॥ राष्ट्रस्य संग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्‍ ॥
॥ सुसंगृहितराष्ट्रो हि पार्थिव: सुखमेधते ॥११॥ मनु. अ. ७ श्लो. ११३
॥ द्वयोस्त्रयाणां पच्चानां मध्ये गुल्ममधिष्ठितम्‍ ॥
॥ तथा ग्रामशतानां च कुर्याद्राष्टस्य संग्रहम्‍ ॥१२॥ मनु. अ. ७ श्लो. ११४
॥ ग्रामस्याधिपतिं कुर्याद्दशग्रामपतिं तथा ॥
॥ विंशतिशं शतेशं च सहस्त्रपतिमेव च ॥१३॥ मनु. अ. ७ श्लो. ११५
अर्थ:- राजा व राजसभा यांनी राजकार्याविषयीं असा प्रयत्न करावा की, ज्याच्या योगाने राज्याचें रक्षण होईल व प्रजेला सुख प्राप्त होईल. जो राजा राज्यपालनामध्यें तत्पर असतो व ज्याची प्रजा सुखी असते त्याला अत्यंत सुख मिळतें. राज्याचा बंदोबस्त नीट करण्यासाठी दोन, तीन, पांच व शंभर गावांच्या ठिकाणी राज्यस्थान करुन, ग्रामसंख्येप्रमाणें व कामाप्रमाणें योग्य अधिकारीवर्ग नेमून सर्व राज्याचें उत्तम प्रकारें रक्षण करावें. दरएक गावांमध्यें एक एक अधिकारी नेमावा, पुन: शंभर गावांवर चवथा नेमावा व हजार गावांवर पांचवा नेमावा. याप्रमाणें अधिकारी नेमून कारभार चालवावा. सध्यांच्या राज्यव्यवस्थेमध्येंहे असाच प्रकार आहे, दरएक गावांला एक पाटील पटवारी असतो, दहा गांवांवर एक ठाणेदार असतो. प्रत्येक दोन ठाण्यांवर एक मोठा ठाणेदार असतो, पांच ठाण्यांवर एक तहसीलदार, दहा तहसीली मिळून एक जिल्हा होतो व प्रत्येक जिल्ह्याला एक मोठा अम्मलदार असतो. ही व्यवस्थाही मन्वादि धर्मशास्त्रांवरुनच घेतलेली आहे. असो.-
॥ ग्रामदोषान्‍ समुत्पन्नान्‍ ग्रामिक: शनकै: स्वयम्‍ ॥
॥ शंसेद्‍ ग्रामदशेशाय दशेशो विंशतीशिनम्‍ ॥१४॥ मनु. अ. ७ श्लो. ११६
॥ विंशतिशस्तु तत्सर्वं शतेशाय निवेदयेत्‍ ॥
॥ शंसेद्‍ ग्रामशतेशस्तु सहस्त्रपतये स्वयम्‍ ॥१५॥ मनु. अ. ७ श्लो. ११७
अर्थ:- पूर्वी सांगीतल्याप्रमाणें प्रबंध करुन अशी आज्ञा करावी की, जे जे दोष ग्रामामध्ये उत्पन्न होतील, ते ते गुप्तपणानें ग्रामपतीने दशग्रामपतीला सांगावें; त्यानें वीस गावाच्या अधिकार्‍याला ते कळवावें; त्यानें आपल्या वीस गावांतील वर्तमान शतग्राम अधिपतीला कळवावें त्यानें आपल्या शंभर गांवांतील वर्तमान सहस्त्रग्रामाधिपतीला नित्य कळवीत जावें. वीस वीस ग्रामांच्या पांच अधिकार्‍यांवर शंभर गावचा एक अधिकारी असतो; ह्मणून वीस वीस गांवच्या पांच अधिकार्‍यांनी आपल्या वरिष्ठ शतग्रामपतीला आपल्या गांवातील वर्तमान कळवावें.
शतग्रामपतींने सहस्त्रग्रामपतीला विदित करावें; त्यानें दशसहस्त्रग्रामपतीला कळवावें, त्यांनी त्यांनी आपलें वृत्त एक लक्ष गांवांवर नेमलेल्या राज सभेला कळवावें व या अशा लक्षग्रामाधिष्ठित राज सभांनी सार्वभौम-चक्रवर्ती-महाराज - सभेला आपापलें वृत्त विदित करावें व या प्रमाणें सर्व भूमंडलाचें नियंत्रण व प्रतिपालन उत्तम रीतीनें करावें ॥१४॥१५॥
॥ तेषां ग्राम्याणि कार्याणि पृथक्कार्याणि चैव हि ॥
॥ जाज्ञोन्य: सचिव: स्निग्धस्त्नानि पश्येदतन्द्रित: ॥१६॥ म.अ. ७ श्लो.१२०
॥ नगरे नगरे चैकं कुर्यात्सर्वार्थचिन्तकम्‍ ॥
॥ उचै: स्थानं घोररुपं नक्षत्राणामिव ग्रहम्‍ ॥१७॥ म.अ. ७ श्लो.१२१
॥ स ताननुपरिक्रामेत्‍ सर्वानेव सदा स्वयम्‍ ॥
॥ तेषां वृत्तं परिणयेत्‍ सम्यग्राष्ट्रेषु तच्चरै: ॥१८॥ म.अ. ७ श्लो.१२२
अर्थ:- पूर्वी सांगितलेले जे ग्रामाधीशादिक त्यांच्यावर राजसभेमधील नेमलेला जो राजाचा ( प्रतिनिधी) सचिव त्यानें आळस सोडून प्रेमानें सर्व न्यायाधीशादि राजपुरुष आपापली कामें योग्य करीत आहेत कीं नाहीत तें फिरतीवर जाऊन पहावें. प्रत्येक मोठमोठ्या नगरामध्यें एक कार्यविचार करणारी सभा स्थापावी व ती भरण्याचें ठिकाण सुंदर, उंच, विशाल, व चंद्राप्रमाणें शोभायमान्‍ असे असावें. या सभेमध्ये जे जे उत्तम विद्वान असतील व विद्येच्या योगानें कार्याकार्यनिर्णय करण्यास समर्थ असतील, त्यांना नेमावें व त्यांनी तेथें जमून विचार करावा, राजा व प्रजा यांना काय हितकर आहे तें पहावें व त्या त्या नियमांचा प्रकाश करावा. ज्या सभापतीला नित्य,फिरतीच्या कामावर नेमलें असेल, त्याच्या हाताखाली गुप्त हेर पुष्कळ द्यावे. हे चार भिन्न भिन्न जातीचे असावे. या हेरांकडून त्यानें सर्व राजपुरुषांचे व प्रजाचे सर्व गुणदोष गुप्तपणानें जाणावे व जे अपराधी असतील त्याला शिक्षा करावी व जे गुणी असतील त्यांचा सन्मान करावा. १६॥१७॥१८॥
॥ राज्ञो हि रक्षाधिकृता: परस्वादायिन: शठा: ॥
॥ भृत्या भवन्ति प्रायेण तेभ्यो रक्षेदिमा: प्रजा: ॥१९॥ म.अ.७ श्लो.१२३
॥ ये कार्तिकेभ्योऽर्थमेव गृहीयु: पापचेतस: ॥
॥ तेषां सर्वस्वमादाय राजा कुर्यात्‍ प्रवासनम्‍ ॥२०॥ म.अ. ७ श्लो.१२४
अर्थ:- राजानें धार्मिक, कुलीन व सुपरीक्षित विद्वानांलाच अधिकारी नेमावे; व त्यांच्या हाताखाली जसे चांगले लोक नेमावे तसेच कांही शठ, डाकू किंवा परस्वांचे हरण करणारे लोक असतील त्यांनाहि नेमून त्यांचे दुर्गुण जाऊन ते सदुगुणी होतीत्ल असें करावें. अशा रीतीने लांच घेऊन अन्याय करतात, त्यांचें सर्वस्व हरण करून त्यांना योग्य दंड करुन व हद्दपार करुन, त्यांना अशा ठिकाणी नेऊन ठेवावें की, त्या ठिकाणाहून ते इतर येऊं शकणार नाहीत. अशा लाचखाऊ दुष्ट पुरुषांना जर दंड केला नाही तर परत लोकांनाही तसा अन्याय करण्यास उत्तेजन येईल व दुसरे राजपुरुषहि अन्याय करूं लागतील, ह्मणून त्यांना योग्य दंड करावा. राजपुरुषांना जें वेतन द्यावयाचे तें असें असावें की, त्या योगाने त्यांचा योगक्षेम चांगला चालेल व साधारणपणे ते धनाढ्यही होतील;  त्यांना मासिक किंवा वार्षिक वेतन द्यावें किंवा तहाहयात भूमीचें उत्पन्न तोडून द्यावें. राजपुरुष वृद्ध होऊन काम करण्यास असमर्थ झाले ह्मणजे त्यांना अर्धा पगार देऊन विश्रांती घेण्यास सांगावें. हा पगार ते जिवंत असतील तर त्यांचीहि योग्य व्यवस्था सरकारांतून द्रव्य वगैरे देऊन करावी. पण जर त्यांच्या बालक अल्पवयी असतील तर किंवा स्त्रिया जिवंत असतील तर त्यांचीहि योग्य व्यवस्था सरकारांतूण द्र्व्य वगैरे देऊन करावी. पण जर त्यांच्या स्त्रिया किंवा मुलें कुकर्म करणारी होतील तर त्यांना काही एक देउं नये. याप्रमाणें राजाचा बंदोबस्त करावा. ॥१९॥२०॥ मनु करग्रहण सांगतात.
॥  यथा फलेन युज्येत राजा कर्ता च कर्मणाम्‍ ॥
॥ तथावेक्ष्य नृपो राष्ट्रे कल्पयेत्सततं करान्‍ ॥२१॥ म.अ. ७ श्लो.१२८
॥ यथाल्पाऽल्पो ग्रहीतव्यो राष्ट्राद्राज्ञाद्विक: कर: ॥२२॥ म.अ. ७ श्लो.१२९
॥ नोच्छिंद्यादात्मनो मूलं परेषां चातितृष्णया ॥
॥ उच्छिंदन्य़ ह्यात्मनो मूलमात्मानं ताश्च पीडयेत्‍ ॥२३॥ म.अ. ७ श्लो. १३९


References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP