अध्याय ८२ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
रोहिणी देवकी चाथ परिष्वज्य व्रजेश्वरीम् । स्मरन्त्यौ तत्कृतां मैत्रीं बाष्पकण्ठ्यौ समूचतुः ॥३६॥
तंव रोहिणी देवकी प्रीति । नमस्कारूनि नंदाप्रति । यशोदेतें आलिङ्गिती । पूर्वील स्मरती स्नेहमैत्री ॥४७॥
कंठ दाटले वोरसभरें । मुखें शब्द न उच्चारे । ऐसी अवस्था परस्परें । स्फुंदती अंतरें द्रवलेनी ॥४८॥
मग वसुदेवादि यादवगणीं । नंद बैसविला निजासनीं । यशोदेतें सुखासनीं । देवकी रोहिणी बैसविती ॥४९॥
का विस्मरेत वां मैत्रीमनिवृत्तां व्रजेश्वरि । अव्याप्याप्यैन्द्रमैश्वर्यं यस्या नेह प्रतिक्रिया ॥३७॥
देवकी रोहिणी यशोदेसी । म्हणती व्रजेश्वरी कल्याणराशी । तुमची मैत्री हृदयकोशीं । अहर्निशी स्मरत असों ॥२५०॥
ब्रह्माण्डभरी उपकार तुमचा । सर्वथा वदों न शकवे वाचा । निवृत्तिकारण असतां साचा । अनिवृत्ति आमुचा जीव जाणे ॥५१॥
इंद्रलक्ष्मीही जालिया प्राप्त । तदैश्वर्यें होऊं अंकित । तथापि प्रतिक्रिया किंचित । नहूं समर्थ करावया ॥५२॥
बोलों न शकवेचि सर्वथा । मौन आदरी वाग्देवता । तथापि अल्पस्वल्प उच्चारितां । त्या संकेता परिसिजे ॥५३॥
एतावदृष्टपितरौ युवयोः स्म पित्रोः सम्प्रीणनाभ्युदयपोषणपालनानि ॥
प्रपयोषतुर्भवति पक्ष्म ह यद्वदक्ष्णोर्न्यस्ताव कुत्र च भयौ न सतां परः स्वः ॥३८॥
रामकृष्ण हीं लेंकुरें तान्हीं । गुप्त ठेविलीं तुमचिये सदनीं । जननी जनक यां लागूनी । मुळींहूनी अदृष्ट ॥५४॥
जयांसी नाहीं जन्ममरण । त्यांचे जननीजनक कोण । मा ते देखती कैं कोठून । गिरा हें वचन प्रतिपादी ॥२५५॥
तस्मात तुम्हीच माता पिता । तुमच्या ठायींच पितृत्व तत्वता । ठेविलें मुळींहूनि तत्वता । सर्वलालनता पावलें ॥५६॥
तुम्हीं उत्संगीं कडिये खांदां । वाहूनि पावविलें प्रमोदा । भातुक्याच्या अनेक स्वादा । चाखवूनियां लाविलें ॥५७॥
अंग्या टोप्या पादत्राणें । फडक्या वोढण्या कटिबंधनें । हेमरत्नांचीं विचित्राभरणें । बहुतां गुणें बहु केलीं ॥५८॥
ऊर्जित अभ्युदय जिताणी । गृहशान्त्यर्थ जोशी जाणी । देवदेव्हारे पुंसवणी । केली सांडणी पायरवीं ॥५९॥
व्रतें यात्रा सायास नवस । यास्तव केले तुम्हीं बहुवस । दांत डोळे अनेक क्लेश । साहिले विशेष बालत्वीं ॥२६०॥
साय दुग्ध दधि नवनीत । शर्करा सद्यस्तप्त घृत । मक्षिकासंभवमधुमिश्रित । तुम्हीं यां संतत कवळ दिल्हे ॥६१॥
अनेक पक्कान्नपरवडी । बाळच्छंदें घातली कोडी । ती ती पुरविली आवडी । नाहीं सवडी दाखविली ॥६२॥
विचित्र परोपरीचीं पक्कान्नें । पायस संयाव शुभ्र परमान्नें । घृतपाचितें दिव्य ओदनें । नृपाशनार्हें जेवविलीं ॥६३॥
स्तनपानादि धारोष्ण क्षीर । प्राशवूनियां निरंतर । वाढविले हे उभय कुमर । हा उपकार केंवि फिटे ॥६४॥
नाना खेळांचिया परवडी । देऊनि पुरविली आवडी । दिसों न दिधलीं बापुडीं । नाना सांकडीं सोसिलिया ॥२६५॥
कंसभयाच्या संकटीं । विघ्नें सोशिलीं कोट्यनुकोटी । येव्हडी साहोनियां साहोनियां अटाटी । नुमसां गोठी कोठें कैं ॥६६॥
पोषण पालन ऐसिया परी । तुम्हांपासूनि राममुरारी । पावोनि वाढले तुमचे घरीं । गोष्ठी दुसरी न जाणतां ॥६७॥
तुम्हीच केवल मातापिता । ऐशी भावना यांचिया चित्ता । न विसंबलां रक्षण करितां । नेत्रपातांचिया परी ॥६८॥
पातीं सदैव रक्षिती बुबुळां । तैसे परी तुम्ही या बाळां । यास्तव निर्भय खेळती खेळां । मनें मोकळा वावरूनी ॥६९॥
तस्मात सदय सज्जनांसी । भावना नाहीं स्वपर ऐसी । हें काय वदिजे तुम्हांपाशीं । परि सदैव मानसीं स्मरत असों ॥२७०॥
ऐशी देवकी रोहिणी । यशोदेप्रति उपकारश्रेणी । स्मरोनि वदल्या मंजुळवाणी । त्या घातल्या श्रवणीं नृपाचिये ॥७१॥
त्या वरी गोपींचा वोरस । विरहिणींचा संभ्रमरस । वाखाणील व्यासौरस । तोही विशेष अवधारा ॥७२॥
श्रीशुक उवाच - गोप्यश्च कृष्णमुपलभ्य चिरादभीष्टं यत्प्रेक्षणे दृशिषु पक्ष्मकृतं शपन्ति ।
दृग्भिहृदीकृतमलं परिरभ्य सर्वास्तद्भावमापुरपि नित्ययुजां दुरापम् ॥३९॥
गोपी पावोनि कृष्णसान्निध्य । संतत ध्यानयोगें जें साध्य । चिरकाळ अभीष्ट आत्माराध्य । म्हणती विरोध विधिकृत हा ॥७३॥
बहुतां दिवशीं प्रियतमभेटी । यास्तव प्रेक्षणीं आवडी मोठी । परंतु विधीची करणी खोटी । जे पक्ष्मणीं दृष्टि वृथा केल्या ॥७४॥
या लागीं शापिती विधातिया । म्हणती पातीं कां डोळियां । निर्मिली त्यांची विमेषक्रिया । हरि पहावया विक्षेपक ॥२७५॥
अंगुळें मोडूनि कडकडाटीं । विधातियावरी क्षोभती पोटीं । कृष्णमूर्ति प्राशूनि दृष्टी । नेती भेटी हृदयकमळा ॥७६॥
हृदयीं नेऊनि कृष्णध्यान । देती सप्रेम आलिङ्गन । ठाकती कृष्णमय होऊ । ताटस्थ्य संपूर्ण तनुभावा ॥७७॥
योगाभ्यासी योगारूढ । त्यासिही प्राप्ति जे अवघड । ते चित्सुखावाप्ति लाहती उघड । प्रपंचकाबाड विसरूनी ॥७८॥
ऐसिया स्वपादनिरता गोपी । जाणोनियां विश्वव्यापी । सभा सांडूनियां साक्षेपीं । तत्प्रेम जोपी तें ऐका ॥७९॥
भगवांस्तास्तथाभूता विविक्त उपसङ्गतः । आश्लिष्यानामयं पृष्ट्वा प्रहसन्निदमब्रवीत ॥४०॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । यालागीं सर्वज्ञ श्रीभगवान । गोपीहृद्गत अनुभवून । एकान्तस्थान प्रवेशला ॥२८०॥
गोपी पावल्या चित्सुखावाप्ति । हृदयीं कवळूनि आपुली मूर्ति । ऐसें जाणोनि कमलापति । तयां एकान्तीं भेटला ॥८१॥
विविक्तस्थानीं अंतरवेत्ता । जाला गोपींतें आळंगिता । अंतरबाह्य पूर्णावस्था । त्या तन्मयता अनुभविती ॥८२॥
ऐसिया गोपी कवळूनि हृदयीं । विश्रान्ति पावविल्या अक्षयी । क्षेम कुशल अनामयीं । प्रश्नप्रवाहीं श्रम नुरवी ॥८३॥
हास्यवदनें गोपींप्रति । मधुरोत्तरीं कमलापति । बोलता जाला तेंचि श्रोतीं । एकाग्रवृत्ति परिसावें ॥८४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2017
TOP