अध्याय ८२ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अथैकदा द्वारकायां वसतो रामकृष्णयोः । सूर्योपरागः सुमहानासीत्कल्पक्षये यथा ॥१॥

शुक म्हणे गा कुरुपार्थिवा । श्रवणीं सप्रेमळ तूं बरवा । जाणोनि तुझिया अंतरभावा । होय चढावा वक्तृत्वा ॥५॥
पृथुकाख्यान संपल्या वरी । हरिगुणश्रवणाची अवसरी । जाणोनि म्हणे अथ या उपरी । द्वारकापुरीं हरि वसतां ॥६॥
रामकृष्ण द्वारके माजी । ईश्वरावतार हे निर्ज्जरकाजीं । अवतरोनि यदुसमाजीं । वसत असतां ऐश्वर्यें ॥७॥
तंव द्वापरयुगाचिये अंतीं । अल्प उरल्या असतां तिथी । सूर्यग्रहणाची संप्राप्ति । केली वदंती दैवज्ञीं ॥८॥
सुतरा बरव्या प्रकारें करून । महान म्हणिजे मोठें ग्रहण । ब्रह्मप्रळयाचि समान । परम दुश्चिह्नसूचक जें ॥९॥
ज्योतिर्विदीं परमकुशळीं । वर्तवूनि भूमंडळीं । पर्वमहिमा प्रकट केली । सुकृतशाळी जनपदीं ॥१०॥
जैसी ब्रह्मप्रळयावसरीं । व्यक्तिमात्र न थरे दुसरी । तेंवि स्वग्रासें ध्वांतारी । गगनोदरीं समयूख ॥११॥
ऐसा सूर्योपराग थोर । असता जाला दुश्चिह्नकर । जैसा ब्रह्मप्रळय घोर । तेंवि हा क्रूर खग्रास ॥१२॥
दैवज्ञ्रीं हें महापर्व । कथितां ऐकूनि पार्थिव सर्व । स्नानदानादि सत्कर्मार्ह । पर्व अपूर्व मानूनियां ॥१३॥
मग ते राजे राष्ट्रें सहित । तीर्थयात्राप्रसंगोचित । निघते जाले तो वृत्तान्त । परीक्षितिवत अवधारा ॥१४॥

तं ज्ञात्वा मनुजा राजन्पुरस्तादेव सर्वतः । स्वमन्तपञ्चकं क्षेत्रं ययुः श्रेयोविधित्सया ॥२॥

ऐकें राया कौरवपति । सूर्योपरागातें समस्ती । पूर्वीं ऐकोनि जनपदनृपती । सर्वत्र येती कुरुक्षेत्रा ॥१५॥
सूर्य जयाचें अधिदैवत । तें स्यमंतपंचकनाम तीर्थ । स्नानदानाचा महिमा अद्भुत । जाणोनि सुकृतार्थ जन येती ॥१६॥
समस्त भूमंडळींचे राजे । राष्ट्रें सहित सुकृतकाजें । स्यमंतपंचकक्षेत्रा सहजें । येते जाले यात्रार्थ ॥१७॥
स्यमंतपंचक म्हणिजे काय । याचा ऐका अभिप्राय । परीक्षितीतें व्यासतनय । कथिता होय संक्षेपें ॥१८॥

निःक्षत्रियां महीं कुर्वन् रमः शस्त्रभृतां वरः । नृपाणाम रुधिरौधेण यत्र चक्रे महाह्रदान् ॥३॥

अब्रह्मण्य क्षत्रियजाति । वेद द्विजमुखीं विमुखवृत्ति । दुष्कृताचरणीं ज्या प्रवृत्ति । उच्छेदिती धर्मसेतु ॥१९॥
ऐसियांचिया मरणोद्धरणा । विरंचीनें करूनि करुणा । भूतळीं भूभाग निर्मिला जाणा । जो दुश्चरणा क्षयकारी ॥२०॥
त्यावरी श्वेतवाहाहकल्पीं । कुरुनामक वीर प्रतापी । सोमवंशी अतिसाक्षेपीं । जन्म पावला भूचक्रीं ॥२१॥
तेणें शासिलें जगतीचक्र । स्वधर्म संस्थापिला अवक्र । भूमंडळींचा अपर शक्र । अगाध नृपवर कुरुनामा ॥२२॥
तयानें जाणोनि पावन क्षिती । अब्रह्म जे क्षत्रियजाति । जेथें निमालिया उद्धरती । परमदुष्कृति दुरात्मे ॥२३॥
ऐसें सामर्थ्य जे भूभागीं । महर्षिसुखें जाणोनि वेगीं । स्वनामक्षेत्र निर्मिलें जगीं । जें अध भंगी जगाचें ॥२४॥
पुढें हैहय कार्तवीर्य । तेणें जमदग्नि द्विजवर्य । छळूनि आचरला अनार्य । जें अकार्य सद्भूपां ॥२५॥
मुनिकैपक्षास्तव भृगुपति । क्षोभला जैसा चंडदीधिति । प्रळयकाळीं भूतव्यक्ति । भंगी स्वशक्ति प्रज्वळोनी ॥२६॥
इषुधिकोंदंडकुठारपाणि । वदनीं विश्रुत आम्नायखाणी । उत्पथ निर्दळी समराङ्गणीं । बाणीं वाणी सरोष जो ॥२७॥
तेणें मारूनि हैहयपति । प्रकट दाविली पितृभक्ति । पुढें सहस्रार्जुनसंतति । स्मरोनि चित्तीं दुर्वैर ॥२८॥
समित्पलाशकुशप्रसूना । भृगुवर सबंधु गेला वना । जाणोनि तिहीं जमदग्निहनना । केलें ध्यानस्थ लक्षूनी ॥२९॥
ग्लानि करितां रेणुका सती । तीतें निर्भर्त्सूनि ते दुर्मती । जमदग्निमस्तक घेऊनि हातीं । गेले निघोनि स्वपुरातें ॥३०॥
रेणुकेनें एकवीस वार । केले निजहृदयावरी प्रहार । भार्गवें ऐकोनि आर्तस्वर । आला सत्वर धांवोनियां ॥३१॥
हैहयांचें अनार्य दृष्टी । देखोनि क्षोभला जगजेठी । माहिष्मती उठाउठीं । भंगूनि कपटी निर्दळिले ॥३२॥
वाहिले रुधिराचे कल्लोळ । अरिशिरांचे केले अचळ । क्षत्रियरहित वसुधातळ । क्षोभला प्रबळ कराया ॥३३॥
करीत होत्साता निःक्षत्री भू । राम शस्त्रधरांमाजी अपर शंभु । नृपरुधिरौघें निर्मी प्रभु । ह्रद स्वयंभ कुरुक्षेत्रीं ॥३४॥
एकवीस वेळा कुटिला उर । यास्तव पृथ्वी एकवीस वार । करीन निःक्षत्री हा क्रूर । संकल्प केला भृगुवर्यें ॥३५॥
भूमंडळींच्या क्षत्रियश्रेणी । कुरुक्षेत्रीं समराङ्गणीं । वधूनि रुधिरें नाहाणिली धरणी । पितरां तर्पणीं तोषविलें ॥३६॥
क्षत्रियरुधिराचे अगाध । रामें निर्मिले प्रचंड ह्रद । तेथिंच्या तर्पणें अमरवृंद । पावती मोद मुनिपितर ॥३७॥
पूर्वींच पावन विधीतें मही । निर्मिली तेथ कुरुनृपें पाहीं । स्वनामक्षेत्र लोकीं तिहीं । प्रसिद्ध केलें अघहरणा ॥३८॥
पुढें ते स्थळीं परशुराम । क्षत्रियरुधिरें अगाध परम । ह्रद निर्मूनि विशुद्धकाम । यजिता जाला यज्ञातें ॥३९॥

ईजे च भगवान् रामो यत्रास्पृष्टोऽपि कर्मणा । लोकस्य ग्राहन्नीशो यथाऽन्योघापनुत्तये ॥४॥

ह्रद निर्मिले एनसहर । चकारें तेथेंचि राम अध्वर । यजिता जाला विशुद्धिकर । नैष्कर्मपर असतांही ॥४०॥
साक्षात् परब्रह्म भृगुपति । अस्पृष्ट कर्माचरणाप्रति । लोकसंग्रहार्थ अघनिवृत्ति । सामान्यव्यक्ती सम आचरे ॥४१॥
निर्विकार निष्काम धाम । उत्पथमथनास्तव तो राम । अवतरोनि प्रतिष्ठी धर्म । स्वयें सकामवत लोकीं ॥४२॥
परमक्रौर्यें निर्दयवृत्ति । वधिल्या उत्पथक्षत्रियजाति । तया पातकाचे निवृत्ति । श्रुतिसंमति मख यजिले ॥४३॥
ऐसें पावन कुरुक्षेत्र । लोकत्रया माजि पवित्र । स्यमंतपंचक हें विचित्र । नाम सर्वत्र मुनिं पठती ॥४४॥
भूमंडळींचे भूपति सर्व । सूर्योपराग अगाथ पर्व । एकोनि ठाकिती सत्कर्मार्ह । स्यमंतपंचक सानुग पैं ॥४५॥
राजे राजनियोगी जन । राष्ट्रीय प्रजाजन सामान्य । तीर्थयात्रा हे परम गहन । जाणोनि प्रयाण आदरिती ॥४६॥

महत्यां तीर्थयात्रायां तत्राऽऽगन्भारतीः प्रजाः । वृष्णयश्च तथाऊक्रूरवसुदेवाहुकादयः ॥५॥

भरतवर्षांतर्गत प्रजा । तीर्थयात्रार्थ पातल्या बोजा । तेथ यादवही कुरुराजा । आले भाजाकुमरेंसीं ॥४७॥
वृष्णिवंशज निघाले सर्व । श्वफल्क अक्रूर सह दाशार्ह । आहुकदेवकादि वसुदेव । राम केशव सकुटुम्ब ॥४८॥
तीर्थयात्रार्थ यादवगण । कुटुम्बें सहित रामकृष्ण । गेले तेव्हां नगरीं कोण । ठेविले रक्षण तें ऐका ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP