अध्याय ८२ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ययुभरित तत्क्षेत्रं स्वमघं क्षपयिष्णवः । गदप्रद्युम्नसांबाद्याः सुचंद्रशुक्रसारणैः ॥६॥
आस्तेऽनिरुद्धो रक्षायां कृतवर्मा च यूथपः ।

द्वारकादुर्गरक्षणार्थ । वीर ठेविले प्रतापवंत । ऐका त्यांचा नामसंकेत । वीरश्रीकान्त धनुर्धर ॥५०॥
सारणनामा रोहिणीतनय । संकर्षणाचा अग्रज होय । ऐसाचि शुकनामा वृष्णिधुर्य । निःसीम शौर्य पैं ज्याचें ॥५१॥
चारुचंद्र जो रुक्मिणीसुत । सुचंद्र त्याचाचि नामसंकेत । सन्नद्ध बद्ध स्वबळें सहित । दुर्गरक्षार्थ स्थापिले ॥५२॥
अनिरुद्धनामा प्रद्युम्नतनय । तो या सर्वांसि केला धुर्य । कृतवर्मा जो भोजकां आर्य । शौर्यश्रीमंत सेनानी ॥५३॥
द्वारकादुर्गरक्षणासाठीं । ऐसे वीर प्रतापजेठी । ठेवूनि त्यांसि कथिली गोठी । सावध घरटी द्या म्हणूनी ॥५४॥
झणें शाल्वाचिये परी । रिक्त लक्षूनि द्वारकापुरी । बळात्कारें रिघती वैरी । यास्तव फेरी न चुकिजे ॥५५॥
दुर्गxxxx रणमंडळीं । अहोरात्र रक्षक बळी । जागवावे सर्वकाळीं । यंत्रशाळी सिंहरवे ॥५६॥
ऐसी द्वारकादुर्गगोपना । वीर प्रतापी प्रबळ सेना । ठेवूनि हस्तप्रक्षाळना । जाते जाले कुरुक्षेत्रीं ॥५७॥
देवकीची ज्येष्ठ भगिनी । देवरक्षिता वसुदेवपत्नी । तयेचा कुमार प्रतापतरणी । गदाधरानुज गदनामा ॥५८॥
वैदर्भीचा ज्येष्ठ कुमर । प्रद्युम्ननामा महावीर । त्रिजगीं ज्यातें म्हणती मार । अपर कुमर यदुकुळींचा ॥५९॥
साम्ब जाम्बवतीचा सुत । दुर्योधनाचा जो जामात । ऐसे वीर प्रतापवंत । यदुचक्रांत पुरस्सर ॥६०॥
अनेकजन्मींच्या सह्वलकशपणा । जाते जाले तीर्थस्नाना । दैवज्ञमुखें सूर्यग्रहणा । घेऊनि स्वगणासह पोष्यां ॥६१॥
तयांची सेना सपरिवार । प्रयाणकाळीं परम रुचिर । शोभती जाली मनोहर । ऐकें सादर कुरुसुरपा ॥६२॥

ते रथैर्देवधिष्ण्याभैर्हयैश्च तरलप्लवैः । गजैर्नदद्भिरभ्राभैर्नृभिर्विद्याधरद्युभिः ॥७॥

द्वारके बाहेर निघाले भार । समस्त यादव सह परिवार । गगनगर्भीं जैसे अमर । तैसे भासुर विराजती ॥६३॥
जैसीं अमरांचीं विमानें । जियें म्हणिजती देवधिष्ण्यें । द्व्य रहंवर तेणें मानें । भासुरपणें चापल्यें ॥६४॥
विमाननिष्ठ जैसे हंस । तैसे प्रजवीन अश्वविशेष । रथीं जुंपिले ते गगनास । पवनवेगें आक्रमिती ॥६५॥
सजलमेधा सम भासुर । दिग्गजप्राय मत्त कुञ्जर । गर्जती विद्युत्पतनाकार । प्रलयजलधरपडिपाडें ॥६६॥
गजीं रहंवरीं तुरंगीं नर । विद्याधरासारिखे रुचिर । त्वाष्ट्रनिर्मित अळंकार । दिसती भासुर सुरसाम्यें ॥६७॥
देव गंधर्व साध्य सिद्ध । चारण विद्याधर प्रसिद्ध । वस्वादित्यप्रमुख बुध । ते यदुवृंद साकल्यें ॥६८॥
अमरीं वेष्टित अमरपति । तैसा यदुचक्रीं श्रीपति । विराजमान चालती पंथीं । तें तूं भूपति अवधारीं ॥६९॥

व्यरोचन्त महातेजाः पथि काञ्चनमालिनः । दिव्यस्रग्वस्त्रसन्नाहाः कलत्रैः खेचरा इव ॥८॥

तेजःपुंज दिसती सकळ । जैसें भासुर रविमंडळ । तैसें समग्र यादवकुळ । तेजबंबाळ पथीं शोभे ॥७०॥
रत्नकाञ्चनमाळा कंठीं । दिव्यसुमनावतंस मुकुटीं । दिव्याम्बर शोभती तगटी । घेतल्या उटी दिव्यगंधीं ॥७१॥
रत्नखचित्र वज्रसन्नाह । देदीप्यमान जैसे हव्यवाह । ऐसे वीरांचे समुदाव । भासुर ग्रहगणपडिपाडें ॥७२॥
सालंकृता वस्त्राभरणीं । तरुणी स्वतेजें लोपिती तरणि । ऐसिया कळत्रीं यादवश्रेणी । जेंवि विमानीं सुरपंक्ति ॥७३॥
ऐसी द्वारकापुरींची यात्रा । कतिपयदिवसीं क्रमूनि गोत्रा । ठाकूनि आली कुरुक्षेत्रा । अभिमन्युपुत्रा अवधारीं ॥७४॥

तत्र स्नात्वा महाभागा उपोष्य सुसमाहिताः । ब्राह्मणेभ्यो ददुर्धेनूर्वासः स्रग्रुक्ममालिनीः ॥९॥

सकळ यादव कुरुक्षेत्रीं । पाहोनि विस्तीर्ण रम्य धरित्री । तेथ राहिले पोष्यकलत्रीं । स्वजनगोत्रीं यथासुखें ॥७५॥
तेथ रामनिर्मित ह्रदीं । सभाग्य यादवांची मांदी । स्नानें करूनि यथाविधी । नियमें उपोषित राहिले ॥७६॥
ब्राह्मणांकारणें धेनुदानें । साळंकृतें यथाविधानें । हेमाबरें स्रक्चंदनें । मंडित केली तें ऐका ॥७७॥
पूर्वदिवसीं कृतोपवास । ग्रहणीं होतां वलयस्पर्श । कृताहिका ही जन अशेष । आले विशेष रामह्रदा ॥७८॥
तया रामह्रदाच्या ठायीं । विधिवत स्नानें करूनि पाहीं । गोभूहिरण्यादि सर्वही । यथाविधानें समर्पिती ॥७९॥
देश काळ द्रव्य पात्र । यथाविधि समाहित स्वगोत्र । जाणोनि दानें यथासूत्र । करिती सर्वत्र सत्क्षेत्रीं ॥८०॥
दानपात्र द्विज ग्रहणकाळीं । दानें न घेती सत्कर्मशाळी । तदुद्देशें जल करतळीं । संकल्पसलिलीं सोडिती ते ॥८१॥
यथाविधानें मनोमय । ध्यान करोनि सलिलीं तोय । सोडितां ते सुकृतनिचय । लाहती आम्नायाज्ञेनें ॥८२॥
मुक्तस्नानोत्तर ते दान । करितां पात्र निर्दूषण । यजमान लाहे सुकृत पूर्ण । तेंही यदुगण आचरती ॥८३॥

रामर्‍हदेषु विधिवत्पुनराप्लुत्य वृष्णयः । ददुः स्वप्नं द्विजाग्रेभ्यः कृष्णे नो भक्तिरस्त्विति ॥१०॥

पुढती रामह्रदाच्या ठायीं । मुक्तस्नानें करूनि पाहीं । अन्नदानें द्विजसमुदायीं । करिती सर्वही सप्रेमें ॥८४॥
आमुची भक्ति कृष्णीं असो । भूतीं अभिन्न कृष्णचि दिसो । कृष्णीं सस्निग्ध प्रेमा विलसो । संकल्पघोष हा करिती ॥८५॥
ऐसीं गोभूतिलाज्यदानें । याचि संकल्पें विधिविधानें । करिती पूजूनियां द्विजरत्नें । मग भोजन स्वयें करिती ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP