अध्याय ८२ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
N/Aश्रीशुक उवाच - नन्दस्तत्र यदून्प्राप्ताञ्ज्ञात्वा कृष्णपुरोगमान् ।
तत्रागमद्वृतो गोपैरनस्थार्थैर्दिहक्षया ॥३१॥
पूर्वीं नृपांचिया आगमनीं । नंदागमन बादरायणी । वदला तेंचि हें व्याख्यानीं । सिंहालोकना निरूपी ॥२२५॥
महापर्वकाळ उपरागयात्रा । करावयाकारणें कुरुक्षेत्रा । यादव आले हें नंदश्रोत्रा । वार्तामात्र स्पर्शतां ॥२६॥
उताविळ अंतःकरणीं । यादव आले हें जाणोनी । रामकृष्णप्रमुख वृष्णि । भेटीलागूनि हरिखेला ॥२७॥
आणिके ठायीं जरी उतरावें । तरी दूरस्थदर्शना यावें जावें । कृष्णा सहवास तेणें न फवे । ऐशिया भावें उताविळा ॥२८॥
वोझीं तैसींच गाडियांवरी । यात्रोपकरण सर्व सामग्री । आला यादवां शेजारीं । धरूनि अंतरीं दर्शनेच्छा ॥२९॥
यादवांसमीप प्रशस्त मही । देखोनि नंद उतरला पाहीं । कितेक राहिले दुमाचे ठायीं । वस्त्रगृहीं कितेक ॥२३०॥
तं दृष्ट्वा वृष्णयो हृष्टास्तन्वः प्राणमिवोत्थिताः । परिषस्वजिरे गाढं चिरदर्शनकातराः ॥३२॥
देखोनि अकस्मात नंदातें । वृष्णि पावती आनंदातें । ग्राण येतां शरीरातें । तेंवि सचेत ऊटियले ॥३१॥
अवचिता नंद पडतां दृष्टी । परमानंद उथळला पोटीं । सर्व उठिले झडझडाटीं । सप्रेम कंठीं आलिंगिती ॥३२॥
बहुतां दिवसांचें दर्शन । तेणें सप्रेमभरित मन । हृदयीं गाढ आलिङ्गन । देतां नयन पाझरती ॥३३॥
वसुदेवः परिष्वज्य संप्रीतः प्रेमविह्वलः । स्मरन्कंसकृतान्क्लेशान्पुत्रन्यासं च गोकुले ॥३३॥
वसुदेव देखोनि नंदाप्रति । हृदयीं कवळूनि परमप्रीति । स्नेहें विह्वल जाली वृत्ति । स्मरे चित्तीं उपकार ॥३४॥
कंसें आपणा दिधले क्लेश । ते ते स्मरोनियां अशेष । तैं गोकुळीं पुत्रन्यास । केला निःशेष तो आठवी ॥२३५॥
कंसें आम्हां रोधिलें निगडीं । यादव जाले देशोघडी । कोण्ही न पवे ते सांकडीं । भये हडबडी भूभाग ॥३६॥
कोठें ठाव नेदी मही । समीप न ठाके कोण्हीही । दादो तुम्ही ऐसिये समयीं । लेंकुरां दोहीं वांचविलें ॥३७॥
आप्त जाणोनियां आमुचे । कंस लुंठन करी त्यांचें । हृदय करूनियां वज्राचें । केलें कुमरांचें पाळण तां ॥३८॥
तुझा उपकार सविस्तरी । लिहितां न पुरे हे धरित्री । आनंदाश्रु ढळती नेत्रीं । सद्गदवक्रीं हें वदतां ॥३९॥
तंव पातले राममुरारी । नंदयशोदे देखोनि नेत्रीं । मस्तकें ठेवूनि चरणांवरी । दंडापरी वंदूनियां ॥२४०॥
कृष्णरामौ परिष्वज्य पितरावभिवाद्य च । न किञ्चनोचतुः प्रेम्णा साश्रुकण्ठौ कुरूद्वह ॥३४॥
कंठीं घालूनियां मिठी । पितरें कवळिलीं सस्निग्ध भेटी । प्रेमें शब्द न फुटे कंठी । नेत्रपाटीं जळ वाहे ॥४१॥
कौरवधुर्या परीक्षिति । ऐसी रामकृष्णांप्रति । अवस्था जाकळी ते तुज निगुती । नोहे शक्ति मज कथनीं ॥४२॥
तावात्मासनमारोप्य बाहुभ्यां परिरभ्य च । यशोदा च महाभागा सुतौ विजहतुः शुचः ॥३५॥
तैसेचि नंदे हृदयीं गाढ । रामकृष्ण कवळिले दृढ । यशोदाही प्रेमारूढ । दोहीं बाहीं आलिङ्गी ॥४३॥
सुस्निग्धप्रेमाचिये भरीं । पंच वर्षांच्या लेंकुरांपरी । दोघां घेऊनि अंकावरी । अश्रु नेत्रीं विसर्जिती ॥४४॥
नेत्रीं स्रवती बाष्पबिन्दु । कीं तो वियोगदुःखसिन्धु । तेणें मागें लोटतां खेदु । जाणों सद्यः परिहरिला ॥२४५॥
नेत्र परिमार्जूनि हातीं । विशोक अंतर स्थिराविती । सुस्निग्ध सप्रेमाची जाती । पुढती पुढती उचंबळे ॥४६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2017
TOP