अध्याय ७२ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
हरिश्चंद्रो रंतिदेव उंछवृत्तिः शिबिर्बलिः । व्याधः कपोतो बहवो ह्यध्रुवेण ध्रुवं गताः ॥२१॥
राजा हरिश्चंद्र सूर्यवंशीं । विश्वामित्रें छळितां त्यासी । राज्यदानाचे दक्षिणेसी । जो कुटुंबेंसिं विकूनि घे ॥१५०॥
विकूनि घेतलें चाण्डालसदनीं । परंतु सत्त्व न संडी छळूनी । अयोध्याजनेंसीं स्वर्गभुवनीं । बैसूनि विमानीं प्रवेशला ॥५१॥
अठ्ठेचाळिस दिवसवरी । सकुटुंब निर्जळ निराहारी । किंचित प्राप्त झाल्या तदुपरी । याचक अवसरीं ते आला ॥५२॥
त्याचा न करूनि यांचा भंग । रंतिदेव धार्मिक चांग । तदन्नोदकें तो पूजूनि साङ्ग । पावला अभंग ब्रह्मलोक ॥५३॥
कुटुम्बेसहित मुद्गलमुनि । उंछवृत्ति अवलंबूनी । षण्मासपर्यंत उपोषणीं । धान्य संग्रही पारणया ॥५४॥
तंव त्या पारणयाचे काळीं । दुर्वासा मुनि येऊनि छळी । परि तो सत्त्वधीर न डंडळी । अर्पूनि सकळीं व्रत रक्षी ॥१५५॥
ऐसा चिरकाळ छळितां मुनि । मुद्गल न करी सत्त्वहानि । कुटुम्बेंसहित ब्रह्मसदनीं । बैसोनि विमानीं प्रवेशला ॥५६॥
तैसेंचि शिबिनृपाचें करणें । कपोता श्येन घेतां प्राणें । मखमंडपीं शिबीतें तेणें । प्राणरक्षणें याचिलें ॥५७॥
रायें धर्षितां श्येनाप्रति । श्येन म्हणे मी परम क्षुधार्ति । माझा भक्ष्य माझे हातीं । न देतां अपकीर्ति तव माथां ॥५८॥
यज्ञमंडपीं मज निराश । जातां वरील तुज अपयश । ऐसें ऐकूनि शिबी नरेश । बोले श्येनास मृदुवचनें ॥५९॥
कपोतकाच्या भारंभार । तुजला अर्पीन मांस अपर । श्येन म्हणे तूं सत्त्वधीर । तरी स्वशीर खंडूनी ॥१६०॥
शरणागता रक्षावया । शिबीनें सोलूनि दिधली काया । सत्त्वप्रतापें त्रिदशालया । गेला अन्वयासह नगरा ॥६१॥
बळीतें विष्णु वामनवेशें । त्रिपादभूदानाच्या मिषें । विष्णुकापट्या भार्गवाधीशें । कथितां मानसें न डंडळी ॥६२॥
त्रिपादभूदानाचे भरीं । बळि सर्वस्व अर्पण करी । आत्मनिवेदनें बटुवेषधारी । सत्त्वें श्रीहरि जिंकियला ॥६३॥
अद्यापि होऊनि द्वारपाळ । बळीतें रक्षूनि गोपाळ । पुढें करीन आखंडळ । प्रतिज्ञा अढळ हे ज्याची ॥६४॥
असोत नरवरांच्या गोठी । ऐकें सामान्य जीवकोटी । माजि सत्त्वधीर जे जगजेठी । ते मम पाठीं अवधारीं ॥१६५॥
कपोतपक्षी तिर्यग्योनी । क्षुधित व्याध अतिथिस्थानीं । पत्नीसहित स्वमांसदानीं । होऊनि विमानीं मिरविले ॥६६॥
व्याधें देखूनि कपोतधैर्य । पश्चात्तापें तापला होय । दावानळीं होमूनि देह । मग निष्पाप राहे सुरभुवनीं ॥६७॥
ऐसें सांगूं आणिक किती । अध्रुवशरीरलोभनिवृत्ति । करूनि अपवर्गातें भजती । धन्य त्रिजगतीं तुज ऐसें ॥६८॥
राया ऐकें ब्रार्हद्रथा । कायशा पूर्वनृपांच्या कथा । अतिथियाञ्चा न करीं वृथा । होयीं परुता सत्त्वस्थ ॥६९॥
ऐसें ऐकूनि ब्राह्मणवचन । मगधेन्द्र झाला सावधान । चिह्नें लक्षूनि करी विवरण । बोले वचन तें ऐका ॥१७०॥
श्रीशुक उवाच - स्वरैराकृतिभिस्तांस्तु प्रकोष्ठैर्ज्याहतैरपि । राजन्यबंधून्विज्ञाय दृष्टपूर्वानचिंतयत् ॥२२॥
शुक म्हणे गा कुरुसत्तमा । ऐसा ब्राह्मणीं सत्त्वमहिमा । कथितां ऐकूनि मागधनामा । हृदयपद्मामाज विवरी ॥७१॥
वर्णिती पूर्वील सत्त्वधीर । दिसती ब्राह्मणवेषधर । यथार्थ नसती हे द्विजवर । क्षत्रिय साचार अवगमती ॥७२॥
शस्त्रास्त्रशिक्षितवर्ष्माकृति । भैरवकंठीरवस्वर गमती । ज्याहतप्रकोष्ठ मज अवगमती । देखिले वाटती पूर्वीं हे ॥७३॥
द्रौपदीस्वयंवरादिकांच्या ठायीं । देखिले वाटती हे ब्राह्मण तयीं । असो आणिकही कोठें कहीं । लक्षिलें ऐसें वाटतसे ॥७४॥
ब्राह्मण नव्हती हे क्षत्रिय । हे जाणोनि मानसीं कृतनिश्चय । करिता झाला मागधराय । तो मुनिवर्य निरूपी ॥१७५॥
राजन्यबंधवो ह्येते ब्रह्मलिंगानि बिभ्रति । ददामि भिक्षितं तेभ्य आत्मानमपि दुस्त्यजम् ॥२३॥
ब्राह्मण म्हणती हे क्षत्रियबंधु । इहीं ब्रह्मचिह्नें धरिलीं विविधु । मायिक छळूं आले प्रसिद्धु । तर्ही सत्त्व विशुद्ध मी न टाकीं ॥७६॥
मज ये काळीं जे मागती । तें मी देईन तयांप्रति । धनसुतवनितादि संपत्ति । हो कां दुस्त्यज स्वतनूही ॥७७॥
वचन गोवूनि वदती काम । तैं तो अदेय दुस्त्यज परम । ऐसें जाणोनिही मी नियम । सत्त्व निःसीम नुलंघीं ॥७८॥
बलेर्नु श्रूयते कीर्तिर्वितता दिक्ष्वकल्मषा । ऐश्वर्याद्भ्रंशितस्यापि विप्रव्याजे न विष्णूना ॥२४॥
अकल्मष निर्मळ बळीची कीर्ति । विस्तीर्ण विस्तारली दिगंतीं । तें काय अविदित आम्हांप्रति । जाणों निश्चिती अवघेंच कीं ॥७९॥
श्रीविष्णूनें ब्राह्मणमिषें । बळीचें ऐश्वर्य छलनावशें । भ्रंशिलें असतां सत्त्वविशेषें । उज्ज्वल यशें मिरवे तो ॥८०॥
श्रियं जिहीर्षतेंद्रस्य विष्णवे द्विजरूपिणे । जानन्नपि महीं प्रादाद्वार्यमाणोऽपि दैत्यराट् ॥२५॥
ब्राह्मणभजनें इंद्रसंपत्ति । जिंकूनि हरितां बळीनें निगुती । वामनवेषें तयाप्रति । छळी श्रीपति याञ्चेनें ॥८१॥
तया बटुरूपा विष्णूतें । छळक अंतरीं जाणोनि निरुतें । शुक्रें वारितांही बळीतें । तथापि महीतें तो त्या दे ॥८२॥
यास्तव द्वारपाळ श्रीपति । त्रिजगीं विस्तृत उज्ज्वल किर्ति । वामन इंद्रपदाची सूती । घेऊनि सुतळीं संरक्षीं ॥८३॥
छळना साहूनि सर्वस्वदानें । यश ऐश्वर्य साधिलें बळीनें । नश्वरलोभें विमुखपणें । अतिथि दवडणें धिक् तेव्हां ॥८४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP