अध्याय ७२ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भीमसेनोऽर्जुनः कृष्णो ब्रह्मलिंगधरास्त्रयः । जग्मुर्गिरिव्रजं तात बृहद्रथसुतो यतः ॥१६॥

कृष्णार्जुन भीमसेन । क्षत्रियवेष पालटून । ब्राह्मणचिह्नें अवलंबून । झाले ब्राह्मण पट्कर्मी ॥१४॥
वत्सें वत्सप वत्सहरणीं । होऊनि मोहिल्या गोगौळणी । त्या तेथें विप्राची अवगणी । अशक्य नतनीं कायसें ॥११५॥
तिघीं धरूनि ब्राह्मणवेष । सवेग ठाकिला मागध देश । बृहद्रथसुताचा जेथ वास । त्या गिरिव्रजपुरास पातले ॥१६॥
तेथ जाऊन केलें काय । तोही कथितो अभिप्राय । परिसावया सावध होय । म्हणे तनय व्यासाचा ॥१७॥

ते गत्वातिथ्यवेलायां गृहेषु गृहमेधिनम् । ब्रह्मण्यं समयाचेरन्राजन्या ब्रह्मलिगिनः ॥१७॥

गृहमेधी जे गृहस्थाश्रमी । वर्तत असतां नित्य स्वधर्मीं । त्यांचिये अतिथिवेळानियमीं । मागधसद्मीं प्रवेशले ॥१८॥
क्षत्रिय असतां ब्राह्मणवेशीं । याचिते झाले मागधासी । अतिथिसमयाच्या विशेषीं । तें नृपासि शुक सांगे ॥१९॥

राजन्विद्ध्यतिथीन्प्राप्तनर्थिनो दूरमागतान् । तन्नः प्रयच्छ भद्रं ते यद्वयं कामयामहे ॥१८॥

राया असो तुज कल्याण । आम्ही दूरस्थ अतिथि जाण । अतिथिसमयातें ठाकून । प्राप्त झालों धर्मज्ञा ॥१२०॥
आम्ही जिया अर्थाचे अर्थी । तो तूं देईं आम्हांप्रति । संकल्पधारा सोडितां क्षिती । मागूं तुजप्रति अभिलषित ॥२१॥
विमुख होऊं नये ये काळीं । यालागीं संकल्पजळाञ्जली । वदान्य होऊनियां भूतळीं । सोडितां सकळी काम वदों ॥२२॥
जरी तूं राया वदसी ऐसें । आधीं गोवितां संकल्पपाशें । पुढें याञ्चा दुर्घट असे । शंका मानसें हे धरिजे ॥२३॥
तुम्ही गोवूनि संकल्पजाळीं । अदेय याञ्चा दुर्घट केली । देऊं न शकतां वृथा गेली । तरी काळिमा लागली दातृत्वा ॥२४॥
तुम्ही ब्राह्मण याञ्चापर । नृपाभरणें वरिष्ठतर । मुकुट कुंडलें श्वेत चामर । अदेय साचार हें तुमचें ॥१२५॥
अत्यंत दुस्सह पुत्रवियोग । कीं धनरत्नभंडारही अनेक । जो पुत्राचा दायभाग । म्हणसी निलाग याञ्चा हे ॥२६॥
तरी ऐकें गा मगधपाळा । परम वदान्य धर्मशीळा । हे मति अल्पका दीला कुटिळा । नोहे निर्मळा तुजयोग्य ॥२७॥
यदर्थी अवधारीं दृष्टान्त । जेणें नोहे धर्मोपहत । सत्त्वधीराचा वृत्तान्त । असेल विदित पुन्हा ऐक ॥२८॥

किं दुर्मर्ष तितिक्षूणां किमकार्यमसाधुभिः । किं न देयं वदान्यानां कः परः समदर्शिनाम् ॥१९॥

असाधु जे नर दुर्जन । त्यांसि अकार्य ऐसें कर्म कोण । छळन परपीडन हिंसन । सर्व त्यालागून करणीय ॥२९॥
तैसे क्षमस्वी तितिक्षु साधु । त्यांसि न सोसवे कोणता खेदु । सहनशीळांप्रति दुःखद । कोण संबंध दुस्त्यज पैं ॥१३०॥
अत्यंत वदान्य जे उदार । कोण पदार्थ त्यां अदेयतर । येथिंचें वैभव सर्व नश्वर । जाणोनि धीर सर्वार्पणीं ॥३१॥
सर्वज्ञ जाणती एकात्मता । तेचि समदर्शी तत्त्वता । त्यांसि स्वपरभेदवार्ता । म्हणतां वक्तृता मोघ गमे ॥३२॥
यालागीं राया तुझ्या ठायीं । सर्वसद्गुण वसती पाहीं । अतिथियाञ्च्या भंगितां कांहीं । लाभ कीं हानि हें विवरीं ॥३३॥

योऽनित्येन शरीरेण सतां गेयं यशो ध्रुवम् । नाचिनोति स्वयं कल्पः स वाच्यः शोच्य एव सः ॥२०॥

मनुष्यलोकीं जन्मूनि प्राणी । अनित्य शरीरादि जाणोनी । अढळ उज्ज्वळ यशःसाधनीं । जो प्रयत्नीं न प्रवर्तें ॥३४॥
शरीरारोग्य बळ पाटव । इंद्रियव्यापार पटुतर सर्व । तेज ऐश्वर्य बुद्धिगौरव । असतां यश ध्रुव न साधी जो ॥१३५॥
वाच्य म्हणिजे त्रिजगीं निन्द्य । तो नर पामर अभाग्य मंद । शोकदुःखांचा सजीव कंद । कल्मषहृद कुटिळात्मा ॥३६॥
म्हणसी यश तें कैसें काये । ध्रुव होत्सातें कोठें राहे । नाक डोळे हात पाये । त्रिजगीं जाय केंवि पां तें ॥३७॥
यदर्थीं ऐकें मागधपाळा । सारासारविचारकुशळा । पय प्राशूनि सांडी जळा । बुद्धि मराळसम विवरीं ॥३८॥
सज्जन गाती जें यश वदनीं । शीतळ उज्वळ शशिसम गगनीं । भूतभविष्यद्वर्तमानीं । त्रिजगीं कोंदूनि ध्रुव राहे ॥३९॥
भाट बंदिजन गायक । वेतनें भक्षूनि यशाचे घोषक । पठती सादरता सन्मुख । होती विमुख अवेतनें ॥१४०॥
महिमा वदती तोंडावरी । वेतन न पावतां छीथू करी । ऐसे यशस्वी घरोघरीं । नरीं पामरीं गाइजती ॥४१॥
संतत गाती ऐसियांतें । अविरत पढती भगबच्चरितें । जें यश वसवी सद्वदनातें । त्रिजगीं त्यातें ध्रुव म्हणिजे ॥४२॥
संतीं गाइजे तेंचि संत । येर वैभव तें असंत । क्षणिक दृश्य नाशवंत । जाणोनि महंत उपेक्षिती ॥४३॥
म्हणसी संतीं हरिगुण गावे । कासया नृपयश तिंहीं पढावें । तरी जे अर्पूनि नश्वरविभवें । हरिगौरवें नर तुळती ॥४४॥
त्यांची सत्कीर्ति मंदाकिनी । प्रवाहरूहें संतां वदनीं । कलिमळ क्षाळी श्रवणीं पठनीं । अढळ त्रिभुवनीं विस्तृत जे ॥१४५॥
यालागीं तोचि बुद्धिमंत । जो नश्वरदानें यश शाश्वत । जोडूनि मिरवे त्रिजगाआंत । याञ्चा उपहत न करूनि ॥४६॥
कुटुंबें प्राणेंसिं अवंचक । राया पाहें मुद्गलादिक । याञ्चाभंगाचाकळंक । न शिवोनि शशाङ्कयश साजे ॥४७॥
पूर्वीं गाती ज्यां पुराणें । वर्तमानीं ऐकिजे श्रवणें । पुधें तरती श्रवणें पठनें । यशें विस्तीर्णें जयांचीं ॥४८॥
राया म्हणसी ऐसे कोण । ऐक संक्षेपें करितों कथन । कावल देऊनि कैवल्यसदन । साधूनि यशोधन ध्रुव जें का ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP