अध्याय ७२ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न कश्चिन्मत्परं लोके तेजसा यशसा श्रिया । विभूतिभिर्वाऽभिभवेद्देवोऽपि किमु पार्थिवः ॥११॥

ऐसिया मत्पर तूतें धर्मा । पराभवूं न शके ब्रह्मा । येरां अमरां कायसी गरिमा । नृपां अधमां कोण पुसे ॥८३॥
ऐसिया तुझी पराभवशंका । असो परती कुरुनायका । परि अपरां मत्परां अकिंचन रंकां । कोण्ही न शके पराभवूं ॥८४॥
तेजःप्रभावें करूनि कोण्ही । मत्परा पराभवूं न शके जनीं । अथवा प्रबळ चतुरंगिणी । सन्नद्ध रणीं न जिंकवे ॥८५॥
अथवा केवळ उज्ज्वळ यशें । कीं तुंगैश्वर्यलक्ष्मीवशें । कीं विभवें महत्वें चातुर्यलेशें । गुणें अशेषें न लोपवें ॥८६॥
मत्परां जिंकूं न शके देव । तेथ केवुते नर पार्थिव । तो मी वशवर्ती केशव । असतां भेव मग काय ॥८७॥
कोण्हां एका आंगें भवीं । मत्परातें पराभवी । ऐसा न देखें सुरमानवीं । दैत्यीं दानवीं असुरींही ॥८८॥
ऐसें वदतां जगदीश्वर । परमानंदें युधिष्ठिर । उचंबळला जेंवि सागर । पूर्ण गंभीर सुधामय ॥८९॥
शुक म्हणे गा कुरुमंडना । राया परीक्षिति सर्वज्ञा । धर्में परिसोनि भगवद्वचना । केली योजना ते ऐका ॥९०॥

श्रीशुक उवाच - निशम्य भगवद्गीतं प्रीतः फुल्लमुखाम्बुजः ।
भ्रातृन्दिग्विजयेऽयुङ्क्त । विष्णुतेजोपबृंहितान् ॥१२॥

जें जें वदला अधोक्षज । धर्में विवरूनि तद्गत बीज । फुल्लारमान वदनाम्भोज । झालें सहज शरदिन्दुवत ॥९१॥
भगवद्वचनें धर्मानुजीं । देवांश ऐसी ऐकोनि वाजी । वीरश्री आवेश भरला भुजीं । वैष्णव तेजीं भ्राजिष्ठ ॥९२॥
विष्णुतेजें आप्यायित । भीमार्जुन माद्रीसुत । त्यांतें युधिष्ठिर नियोजित । दिग्विजयार्थ तें ऐका ॥९३॥

सहदेवं दक्षिणस्यामादिशत्सह सृंजयैः ।
दिशि प्रतीच्यां नकुलमुदीच्यां सव्यसाचिनम् । प्राच्यां वृकोदरं मत्स्यैः केकयैः सह मद्रकैः ॥१३॥
ते विजित्य नृपान्वीरा आजर्‍हुर्दिग्भ्य ओजसा । अजातशत्रवे भूरि द्रविणं नृप यक्ष्यते ॥१४॥

सहदेवनामा माद्रीसुत । दक्षिणे प्रेरिला दिग्विजयार्थ । सवें सृंजय सेनेसहित । प्रतापवंत प्रयोजिला ॥९४॥
पश्चिमदिशे नकुळ वीर । सवें देऊनि मत्स्य नृपवर । प्रबळ चतुरंग दळभार । प्रेरी युधिष्ठिर योजुनि ॥९५॥
उदीचीप्रति सव्यसाची । प्रबळ सेना कैकयांची । देऊनि प्रेरिता तो युधिष्ठिर । आज्ञा वंदूनि निघाला ॥९६॥
पूर्व दिशेतें वकोदर । सवें देऊनि मद्रकभार । प्रेरिता झाला युधिष्ठिर । तोही सत्वर चालिला ॥९७॥
कोणे दिशे कोण कोण नृपती । प्रबळ सेनासंभार किती । युद्धें झालीं त्यांची गणती । महाभारतीं सविस्तर ॥९८॥
येथ समासें बादरायणि । सूत्रप्राय वदला वाणी । यालागीं संक्षेप व्याख्यानीं । भारत श्रवणीं अनुगमिजे ॥९९॥
इतुकीं श्रोतीं जाणिजे सूजना । यथाविभागें कुरुनंदना । पाण्डवीं जिंकिले देश नाना । युधिष्ठिराज्ञा ते नमिती ॥१००॥
ऐसे प्रतापी पाण्डववीर । नृपांतें जिंकूनि वश भूचक्र । करूनि आणिलें धन अपार । यज्ञसंभारसिद्ध्यर्थ ॥१॥
ऐकें राया परीक्षिति । अजातशत्रु धर्मनृपति । दीक्षित जाणोनि धनसंपत्ति । राजे वोपिती जिंकिले ते ॥२॥
सर्वं भूमंडळ केलें वश । राजे वर्त्तती होऊनि दास । त्रैलोक्यविभव इंद्रप्रस्थास । जैं राजसूयास धर्म यजी ॥३॥
यज्ञकर्त्या धर्माप्रति । अनुजीं भूचक्रजयसंपत्ति । समर्पिली संभारार्थी । हें ऐकूनि परीक्षिति पुसों पाहे ॥४॥
दिक्चक्र जिंकूनि वसुधा वश । भूपमात्र केले दास । म्हणतां मागधजय विशेष । पुसावया नृप इच्छी ॥१०५॥
जाणोनि नृपाचें अंतर । मागधवधाचा प्रकार । कथिता झाला व्यासकुमर । सविस्तर तो ऐका ॥६॥

श्रुत्वाऽजितं जरासंधं नृपतेध्ययितो हरिः । आहोपायं तमेवाऽद्य उद्धवो यमुवाच ह ॥१५॥

शुक म्हणे गा परीक्षिति । मागधवधानंतर क्षिति । पाण्डवीं जिंकिली हें तुजप्रति । सांगों सुमति विसरलों ॥७॥
जेव्हां धर्में विचार पुसिला । तेव्हांचि कृष्ण त्यातें वदला । जंववरी मागध नाहीं वधिला । तंव न वचे केला राजसूय ॥८॥
मागधवधाचें दुर्घट कार्य । पुसतां धर्मराय । कृष्णें कथिता अभिप्राय । ऐकोनि राहे स्तब्ध मनीं ॥९॥
जरासंध अजिंक रणीं । राजा सचिंत हें ऐकोनी । त्यासि आद्य जो चक्रपाणी । सांगे श्रवणीं कृत मंत्र ॥११०॥
यादवसभेमाजि उद्धवें । उपाय कथिला कौशल्यविभवें । त्या मंत्राचें रहस्य आघवें । धर्मां देवें प्रकाशिलें ॥११॥
धर्म ऐकोनि उपायरचना । पाचारूनि भीमार्जुनां । समर्पूनि जनार्दना । म्हणे या यत्नां सफळ करीं ॥१२॥
कृष्णें ऐकूनि धर्मवचन । सवें घेऊनि भीमार्जुन । निघतां झाला तें व्याख्यान । सावधान अवधारा ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP