अध्याय ६९ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अव्यक्तलिंगं प्रकृतिष्वंतःपुरगृहादिषु । क्वचिच्चरंतं योगेशं तत्तद्भावबुभुत्सया ॥३६॥

अंतःपुरगृहाच्या ठायीं । आपुल्याप्रकृतींमाजी पाहीं । वेषान्तरें शेषशायी । गूढरूपें विचरतसे ॥३२५॥
त्याचे ते ते अंतर्भाव । जाणूं इच्छूनि श्रीकेशव । वेषान्तरें निज अवयव । लपवूनि विचरे गूढत्वें ॥२६॥
अथवा अंतःपुरगत ललना । त्यांच्या जाणोनि भोगभावना । तद्भोगइच्छेकरूनि जाणा । अव्यक्तलिंगें हरि विचरे ॥२७॥
म्हणाल भोगवासना कैशा । हरि केंवि लपवी आकृतिठसा । यदर्थीं आश्चर्य न मना सहसा । नव्हे योगीशा दुर्घट हें ॥२८॥
यालागीं योगीश्वराच्या ठायीं । अघटितघटना दुर्घट नाहीं । ऐसें जाणोनि शंका हृदयीं । श्रोतीं कांहीं न धरावी ॥२९॥
योगमायेच्या नटनाट्यें । लीले विचरतां वैकुंठपीठें । नारद जाणोनि आत्मनिष्ठे । प्रकट भेटे तें ऐका ॥३३०॥

अथोवाच हृषीकेशं नारदः प्रहसन्निव । योग्मायोदयं वीक्ष्य मानुषीमीयुषो गतिम् ॥३७॥

समस्त सदनें फिरल्यावरी । नारद जाऊनि भेटे हरी । मग हरीतें मधुरोत्तरीं । बोले वैखरी स्मितवक्त्रें ॥३१॥
प्रकर्षें हांसतियांचे परी । हृषीकेशातें निजवैखरी । योगमायेचा उदय नेत्रीं । वेदनिर्धारीं लक्षूनि ॥३२॥
मनुष्याची जैसी गति । तियेतें अनुसरे जो श्रीपति । त्यासी नारद निष्कपटोक्ति । बोले निश्चिती तें ऐका ॥३३॥

विदाम योगमायास्ते दुर्दर्शा अपि योगिनाम् । योगेश्वरात्मन्निर्भाता भवत्पादनिषेवया ॥३८॥

नारद म्हणे भो योगीश्वरा । जाणोनि तव मायाविचारा । जे दुर्दर्श योगियां अपरां । त्या निर्धारा अवधारीं ॥३४॥
अशक्य दावावयाकारणें । अपर योगियांलागिं जें म्हणे । ते तव माया अंतःकरणें । जाणों आम्ही तव कृपा ॥३३५॥
अगा ये आत्मया श्रीहरि । आमुचे मानसीं प्रतीति खरी । तुझी माया हे निर्धारीं । स्वरूपाधारीं भासतसे ॥३६॥
तुझिया पादसेवनेंकरून । आम्ही तव मायाभिज्ञ । येर्‍हवीं योगियांलागून । दुःखेंकरून न देखवे ॥३७॥
षोडशसहस्रसदनान्तरीं । साष्टशतादि वरिष्ठां घरीं । विराजलासि पृथगाचारीं । म्यां निर्धारीं लक्षिलासी ॥३८॥
हे तव अवघी योगमाया । योगेश्वरांही न ये आया । प्रतीत बाणली आमुच्या हृदया । अभेदें तुझिया पदभजनें ॥३९॥
मनुष्यनाट्याची पाहिली लीला । हे तव माया श्रीघननीळा । वास्तवपरमार्थतत्त्वजिह्वाळा । नोहे गोपाळा मी जाणें ॥३४०॥
तुझिया मनुष्यनाट्येंकरून । मोहें भ्रमले विधि ईशान । इंद्र अग्नि यम निरृति वरुण । कुबेर पवनप्रमुख सुर ॥४१॥
मनुष्यनाट्येंकरूनि तुझिया । झणें मोहिसी माझिया हृदया । या कारणास्तव शरण पाया । जे देऊनि अभया आज्ञापीं ॥४२॥

अनुजानीहि मां देव लोकांस्ते यशसाप्लुतान् । पर्यटामि तवोद्गायन्लीलां भुवनपावनाम् ॥३९॥

क्रुपा करूनि आज्ञा देयीं । म्हणसी जासील कोण ठायीं । तरी सर्वगा त्वां हें जाणिजे हृदयीं । तव यशनवाईगतदेशा ॥४३॥
मातें जाणिजे त्वां देवा । तव यशोमंडितां लोकां सर्वां । तव कीर्ति मी गात फिरेन बरवा । श्रीकेशवा हृदयस्था ॥४४॥
भुवनपावनी जे तव लीला । उच्चस्वरें भुवनपाळा । गात होत्साता लोकां सकळां । पर्यंटन मी करीन ॥३४५॥
यदर्थी तुवां कृपा कीजे । मायामोहें न मोहिजे । लीलागायनीं प्रमोदिजे । अभीष्ट माझें हें पुरवीं ॥४६॥
हें ऐकोनि श्रीभगवान । भ्रमभयाकुळ नारद शरण । जाणोनि अभयद बोले वचन । करुणापूर्ण तें ऐका ॥४७॥

श्रीभगवानुवाच - तच्छिक्षयँल्लोकमिममास्थितः पुत्र मा खिदः ।
ब्रह्मन्धर्मस्य वक्ताऽहं कर्ता तदनुमोदिता ॥४०॥

अरे ब्राह्मणा ब्रह्मनंदना । सवर्था खेद न करीं मना । ऐकोनि साकल्य ममाचरणा । समाधाना अवलंबीं ॥४८॥
मी धर्माचा संस्थापक । वक्ता कर्ता अनुमोदक । धर्मसन्मार्गीं शिक्षीं लोक । म्हणोनि सम्यक आचरें पैं ॥४९॥
मी आचरोनि शिक्षीं लोकां । जाणोनि ऐशिया विवेका । खेद न कीजे त्वां पुत्रका । अखिल लोकामाजी रमतां ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP