अध्याय ६९ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कुर्वतं विग्रहं कैश्चित्संधिं चान्यत्र केशवम् । कुत्रापि सहरामेण चितयंतं सतां शिवम् ॥३१॥

उद्धवप्रमुख मंत्रिवर्ग । घेऊनि एकान्तीं श्रीरंग । बलिष्ठदुर्मदशत्रुभंग । करणीयमार्ग विवरीतसे ॥९४॥
मगधपाळप्रमुख रिपु । तद्विग्रहीं कृतसंकल्प । समरीं अजिंक असुरकल्प । केंवि दुर्दर्प दमिजे पैं ॥२९५॥
ऐसिये मंत्ररचनेसाठीं । एकान्तसदनीं मंत्रियानिकटी । हरि विवरितां रहस्यगोठी । जाणोनि पोटीं मुनि परते ॥९६॥
तेथूनि प्रवेशे अन्यालयीं । तेथ अमात्येंसी शेषशायी । मंत्ररचना विवरी कायी । ते नवायी अवधारा ॥९७॥
युधिष्ठिराचें भविष्यमाण । राजसूययज्ञाचरण । जाणोनियां हरि सर्वज्ञ । मंत्रविवरण करीतसे ॥९८॥
दिग्विजयार्थ पाण्डव येती । तिहींसीं न धरवे विग्रहमती । संधि करूनि सुहृदप्रीति । सप्रेम भक्ती वाढविजे ॥९९॥
मयूरध्वजप्रमुख राजे । क्षत्रधर्माचिये ओजे । झणें भिडती यालागीं कीजे । संधि समाजें सुहृदत्वें ॥३००॥
आत्मनिष्ठ ते केवळ । परमभक्त सप्रेमळ । तिहीं जिंकिलों मी गोपाळ । द्वारपाळ मी त्यांचा ॥१॥
त्यांची सबाह्य शुश्रूषा करीं । नीच सेवक मी त्यांचे घरीं । तिहींसीं विग्रहें न चले हरि । म्हणोनि विवरी संधिमंत्र ॥२॥
तेथूनी मुनि परते वेगें । अन्य निलयामाजी रिघे । तेथें रामेंसी श्रीरंगें । भक्तकल्याण चिंतिजेतें ॥३॥
जेणें होय विश्वपालन । ऐसी कृपा अवलंबून । तदर्थ कीजे दुष्टदमन । हें विवरी भगवान रामेंसी ॥४॥
ऐसा करुणावत्सल हरि । संकर्षणेंसी मंत्र विवरी । हें जाणोनियां अंतरीं । अन्यागारीं मुनि पाहे ॥३०५॥

पुत्राणां दुहितॄणां च काले विध्युपयापनम् । दारैर्वरैस्तत्सदृशैः कल्पयंतं विभूतिभिः ॥३२॥

तेथ वृद्धस्वजनमेळीं । कन्यापुत्रांचे यथोक्तकाळीं । विवाह योजी श्रीवनमाळी । तुल्यभूपाळीं सोयरिका ॥६॥
आपणांसमान विभवें ज्यांचीं । समता रूपशीळतेगुणांची । लक्षूनि सोयरीक करी साची । विवाह रची विधिप्रणीत ॥७॥
कन्येसारिखा पाहोनि वर । कन्यादानीं होय तत्पर । स्नुषा लक्षूनियां सुन्दर । योजी श्रीधर पुत्रातें ॥८॥
ऐसें देखोनि परते मुनि । सवेग प्रवेशे आणिके सदनीं । तेथ देखता होय नयनीं । कोदंडपाणि तें ऐक ॥९॥

प्रस्थापनोपानयनैरपत्यानां महोत्सवान् । वीक्ष्य योगेश्वरेशस्य येषां लोका विसिस्मिरे ॥३३॥

अपत्यांच्या महोत्सवीं । मूळें पाठवी कन्या आणावी । स्नुषा जामात गौरवीं । आणूनि मांडवी सोहळियां ॥३१०॥
तैसाचि सुहृदांचिये सदनीं । कन्या पुत्र चक्रपाणि । धाडी सोहळिया सम्मानीं । वस्त्राभरणीं मंडित पैं ॥११॥
निष्प्रपंच निर्विकार । योगीश्वरांचा ईश्वर । देखोनि प्रपंचीं तत्पर । विस्मयकर जन होय ॥१२॥
योगेश्वराचे हे अपूर्व । अपत्यांचे महोत्सव । देखूनि लोक विस्मित सर्व । करिती नवलाव हृत्कमळीं ॥१३॥
देखूनि मुनि आणिका गृहा । जाऊनि पाहे भगवदीका । तेथ कौतुक देखे महा । तें कुरुवर्या अवधारी ॥१४॥

यजंतं सकलान्देवान्क्वापि ऋतुभिरूर्जितैः । पूर्तयंतं क्वचिद्धर्मं कूपाराममठादिभिः ॥३४॥

ऊर्जित ऐसे जे ऋतुवर । तिहींकरूनि सर्व सुरवर । यजितां देखूनि कमलावर । मुनि सत्वर परतला ॥३१५॥
अन्य सदनीं रिघोनि पाहे । तेथ अपूर्वधर्मप्रवाहें । तदुचित क्रिया संपादिताहे । तें लवलाहें अवधारीं ॥१६॥
पूर्व सदनीं इष्टाचरण । देखोनि निवाला विधिनंदन । येथ आपूर्तविधिविधान । दिसे संपूर्ण हरि करितां ॥१७॥
आपूर्त म्हणावें कशासी । ऐसा संशय ज्यां मानसीं । तिहीं ऐकावें आपूर्तासी । संक्षेपेंसी कथिजेल ॥१८॥
वापी कूप तडाग सर । वनोद्यानें आराम रुचिर । देवायतनें विश्रामकर । धर्मशाळा मठ मठिका ॥१९॥
पुरें गोपुरें अग्रहारें । तीर्थें क्षेत्रें मनोहरें । पुण्यसरिता उभयतीरें । सोपानबद्ध पथरचना ॥३२०॥
इत्यादि आपूर्तधर्मप्रवाह । करितां देखोनि कमलानाहो । सवेग सांडूनि मुनि तें गृह । अन्य मंदिरीं प्रवेशला ॥२१॥

चरंतं मृगयां क्वापि हयमारुह्य सैंधवम् । घ्नंतं ततः पशून्मेध्यान्परीतं यदुपुंगवैः ॥३५॥

सिन्धुदेशसंभव हय । सैन्धव त्याचें नामधेय । त्यावरी वैसोनि रमाप्रिय । पारधी जाय साटोपें ॥२२॥
यदुवंशीं जे नामाथिले । शूरप्रतापी वर दाटुले । तिंहीं वेष्टित मृगयालीले । मुनीचे डोळे हरि पाहती ॥२३॥
तेथ सज्जूनि चापबाण । पवित्रां पशूंतें शर विंधून । मारिता होय श्रीभगवान । अनुलक्षून मुनि परते ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP