अध्याय ६९ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


संपूज्य देवऋषिवर्यमृषिः पुराणो नारायणो नरसखो विधिनोदितेन ।
वाण्याऽभिभाष्य मितयामृतमिष्टया तं प्राह प्रभो भगवते करवामहे किम् ॥१६॥

देवर्षीमाजि जो वर्य । ब्रह्मनिष्ठांमाजी धुर्य । ऐसा नारद आर्यां आर्य । पूजोनि कार्य पुसे हरि ॥१५०॥
राया म्हणसी हरि तो कैसा । पुराण ऋषींमाजी ज्याचा ठसा । नरनारायण नरसखा ऐसा । कंजजईशां जो पूज्य ॥५१॥
नरनारायणवेशें पूर्वीं । तपश्चर्या केली गुर्वी । त्रिजगीं विख्यात सर्वत्र सर्वी । जानती दर्वींकर सुरही ॥५२॥
तोचि हा धर्मसंस्थापना । स्वयें अवतरला त्रैलोक्यराणा । यथाविधि उदिताचरणा । शिक्षी सज्जना आचरोनी ॥५३॥
हित मित मेध्य अमिथ्या वाणी । मधुर अमृताहूनि कल्याणी । तियेकरूनि नारदमुनि । संभाषणीं गौरविला ॥५४॥
भो भगवंता मुनिवरश्रेष्ठा । तव परिचर्या हा मम वांटा । लक्षूनि आमुच्या पूर्णाभीष्टा । करणीयनिष्ठा आज्ञापीं ॥१५५॥
ऐसा कृष्णें नारदमुनि । पूजितां शंकित अंतःकरणीं । म्हणे तव हस्तें सपर्याग्रहणीं । मजलागूनि अनर्हता ॥५६॥
कैसी अनर्हता जरी म्हणसी । तें तूं ऐकें भो हृषीकेशी । निगमप्रत्यय मम मानसीं । सनकादिकांसी संमत जे ॥५७॥

॥ नारद उवाच ॥ - नैवाद्भुतं त्वयि विभोऽखिललोकनाथ मैत्री जनेषु सकलेषु दमः खलानाम् ।
निःश्रेयसाय हि जगत्स्थितिरक्षणाभ्यां स्वैरावतार उरुगाय विदाम सम्यक् ॥१७॥

तुझ्या ठायीं योग्यता घडे । नोहे अद्भुत ना वांकुदे । परन्तु आम्हां योग्यता न घडे । वाटे कोडें यास्तव हें ॥५८॥
कैसी योग्यता तुझ्या ठायीं । ऐकें कथितों तें सर्वही । त्रैलोक्यनायक सर्वां देहीं । सर्वग साक्षी तूं एक ॥५९॥
तूं सर्वांचा आत्मा होसी । अखिलात्मकत्वें मित्रजनासी । आपणा आपण तूं अर्चिसी । अद्भुत येविषीं कोणतें ॥१६०॥
जागृता स्वप्नींची अनेकता । भ्रामक नोहे जेंवि स्वप्नस्था । स्वप्नभ्रमभेदें ते सुप्ता । दुःखावर्तामाजी भंवडी ॥६१॥
करूनि अहिताचें निरसन । स्वहितीं करी संयोजन । मित्र म्हणती त्या सज्जन । जे सर्वज्ञ कविवर्य ॥६२॥
तुजहूनि स्वहितकर्ता नाहीं । जडता निरसूनि चित्प्रवाहीं । नांदविसी संविन्मयीं । सर्वां ठायीं सर्वगत्वें ॥६३॥
सर्वमित्रत्वास्तव हें तुझें । अर्चन करणेंतुजचि साजे । देवर्षित्वगौरव ओझें । न घडे सहजें पूज्यत्वा ॥६४॥
जरी तूं म्हणसी श्रीमुकुन्दा । जगन्मित्रता मज न घडे कदा । मजसीं विरोध मागध चैद्या । कंसादि द्वंद्वा जग जाणे ॥१६५॥
ऐसें न म्हणावें श्रीगोपाळा । तूंण या विश्वाच्या प्रतिपाळा । अवतरूनि मर्दिसी खळां । हे श्रुतिमाळा यश वर्णी ॥६६॥
जैं मी खळाचें करी दमन । तैं सर्वमित्रता न घडे जाण । ऐसें म्हणसी तरी व्याख्यान । ऐकें सर्वज्ञशिरोमणि ॥६७॥
देहतादात्म्याची जडता । भेदबुद्धीची आढ्यता । धरूनि खळत्वें निवडितां । तूं त्यां दण्डिता स्वयें होसी ॥६८॥
अन्तर्यामित्वें तूं मित्र । भेदें भाससी त्यां अमित्र । जडता सांडूनि कैवल्यपात्र । करिसी सन्मात्र मित्रत्वें ॥६९॥
निःश्रेयसाकारणें खळा । दमिसी दुर्द्दान्तां गोपाळा । मित्रां अमित्रां सप्रेमळा । समान मंगळा मेळविसी ॥१७०॥
यालागीं तूं जगन्मित्र । नव्हसी खळ दमितां अमित्र । विवेकहीना वाटे चित्र । न मानिती सन्मात्रवेत्ते जे ॥७१॥
म्हणोनि तूं या जगाची स्थिति । आणि स्वधर्मसेतुरक्षणशक्ति । दोहीं कारणें स्वेच्छा व्यक्ति । धरूनि क्षिति अवतरसी ॥७२॥
भूयिष्ठ कीर्ति निगम गाती । यालागीं उरुगाय ज्यातें म्हणती । तो तूं प्रत्यक्ष कैवल्यपति । बरव्या रीती आम्ही जाणों ॥७३॥
खळातें दमिता अमित्र नव्हसी । साजे जगन्मित्रता तुज ऐसी । ऐसें बहुत आश्चर्यासी । कारण नव्हे जगदीशा ॥७४॥
इतुकें बोलोनि नारदमुनि । पुढती काय वदला वाणी । तें तूं कौरव चूडामणि । सावध श्रवणीं अवधारीं ॥१७५॥

दृष्टं तवाम्घ्रियुगलं जनतापवर्ग ब्रह्मादिभिहृंदि विचिंत्यमगाधबोधैः ।
संसारकूपपतितौत्तरणावलंबं ध्यायंश्चराम्यनुगृहाण यथा स्मृतिः स्यात् ॥१८॥

प्रभो समर्था विश्वव्यापी । करणीयनिष्ठा मज आज्ञापीं । ऐसें वदलासी धार्मिकजल्पीं । सत्यसंकल्पीं पूर्ण करीं ॥७६॥
करणीयनिष्ठ म्हणसील कोण । तवाङ्घ्रियुगळ देखिलें जाण । भक्तजनाचें कैवल्यसदन । दुर्लभ म्हणोन सुर ध्याती ॥७७॥
सामान्य सुरवर सुकृतभाजी । मर्त्यामर्त्यतिग्राजी । भ्रमणशीळ जे कां सहजीं । कर्मामाजी निबद्ध जे ॥७८॥
असो तयांतें दुर्लभतर । परंतु जे कां विधिहरशक्र । केवळ तुझे गुणावतार । नित्य सादर पदभजनीं ॥७९॥
स्वस्वरूपीं जे सावध । ज्यांतें म्हणिजे अगाध बोध । तेहि तुझें पादारविंद । चिंतिती विशद हृत्कमळीं ॥१८०॥
ते कां चिंतीती ऐसे म्हणसी । तरी तूं ऐकें हृषीकेशी । सृष्टिस्थितिलयगुणकर्मांसी । निस्तरणासी लक्षूनी ॥८१॥
बीजामाजी पादप प्रकटे । स्तंभ विटप शाखा फांटे । पत्रीं पुष्पीं फळीं निवटे । परि जीवन घडे तन्मूळीं ॥८२॥
तेंवि विश्वाचें स्थितिलयसृजन । कर्ते विधिहरसंक्रंदन । भवकूपींहूनि त्यां निस्तरण । ध्याती लक्षून तव चरणा ॥८३॥
अथवा संसारकूपीं पतित । तदुद्धरणा कारणभूत । तवाङ्घ्रियुगळध्यानीं निरत । होती संतत सत्पुरुष ॥८४॥
काय करूं हें पुससी जरी । तरी तूं इतुकाचि अनुग्रह करीं । भवाब्धिनौका जे तवाङ्घ्रि । ममान्तरीं तत्स्मृति राहो ॥१८५॥
तवाङ्घ्रियुगळ सप्रेमध्यानीं । धरूनि विचरें मी त्रिभुवनीं । अजस्र अनुरक्त अविस्मरणीं । रथाङ्पाणि करीं इतुकें ॥८६॥
ऐसा प्रार्थूनि रुक्मिणीवर । नारदें केला नमस्कार । न वाढवीच वाग्व्यापार । तेंही अंतर हरि जाणे ॥८७॥
पाहणें सोळा सहस्र घरें । यालागीं तेथूनि उठिला त्वरें । अंतर जाणोनि यादवेश्वरें । प्रेमोपचारें बोळविला ॥८८॥

ततोऽन्यदाविशद्गेहं कृष्णपत्न्याः स नारदः । योगेश्वरेश्वरस्यांग योगमायाविवित्सया ॥१९॥

त्यानंतरें नारदमुनि । आणिकी कृष्णपत्न्यांचे सदनीं । प्रवेशला आदरें करूनी । पहावया नयनीं हरिमाया ॥८९॥
अंग या कोमळ आमंत्रणें । श्रीशुक परीक्षितीतें म्हणे । राया सादर ऐकें श्रवणें । गुणकीर्तनें कृष्णाचीं ॥१९०॥
योगेश्वरांचा योगेश्वर । त्याची योगमाया विचित्र । जाणों इच्छूनि तो मुनिवर । अन्यमंदिर प्रवेशला ॥९१॥
ते मंदिरीं कौतुक काय । नारद जाऊनि नयनीं पाहे । तें तूं राया ऐकता होय । म्हणे तनय व्यासाचा ॥९२॥

दीव्यंतमक्षैस्तत्रापि प्रियया चोद्धवेन च । पूजितः परया भक्त्या प्रत्युत्थानासनादिभिः ॥२०॥

तेथही एकान्तविलासभुवनीं । प्रियेंसहित चक्रपाणि । उद्धवेंसीं सभास्थानीं । पाश ढाळूनि क्रीडतसे ॥९३॥
मांडूनियां सारिपाट । प्रियसहित श्रीवैकुंठ । पाश ढाळूनि क्रीडानिष्ठ । सुखोपविष्ट मुनि देखे ॥९४॥
तेथ येतां तो देवर्षि । आसनावरूनि हृषीकेशी । धांवोनि लागला मुनिचरणांसी । बैसवी त्यासी निजासनीं ॥१९५॥
पूर्विल्या ऐसा यथोपचारीं । नारदा पूजिला झाला हरि । मग संवाद अमृतोत्तरीं । जो आदरी तो ऐका ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP