अध्याय ६९ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दासीभिर्निष्ककण्ठीभिः सुवासोभिरलंकृम् । पुंभिः सकंचुकोष्णीषसुवस्त्रमणिकुण्डलैः ॥११॥
बाह्यप्रचारींपुरुष व्यक्ति । भगवद्भवनीं विराजती । सर्व व्यवहारी सावधवृत्ती । नियुक्ता कृत्यीं अतंद्रित ॥९९॥
पट्टकूले पीताम्बर परिधानें । कंचुकोपकंचुक अमूल्य वसनें । तगटी पल्लव कटिबंधनें । विविधा रत्नीं रागाढ्यें ॥१००॥
उष्णीषें म्हणिजे शिरोवेष्टनें । शशाङ्कसाम्यें शुभ्रवर्णें । एकें सुरंगें सहस्रकिरणें । एकें अरुणें आरक्तें ॥१॥
एकें इन्द्रनीळभासुरें । एकें सुपीतकार्तस्वरें । एकें गारुत्मतरागप्रचुरें । अमूल्य उष्णीषें ॥२॥
मणिमयकुण्डलें झळकती श्रवणीं । मुद्रिकामण्डित मिरवती पाणि । कटकांगदीं कण्ठाभरणीं । पुरुषश्रेणी विराजती ॥३॥
जे जे ज्या ज्या कार्यावरी । अधिष्ठिले नियमोत्तरीं । ते ते वर्तती निजाधिकारीं । आत्मशरीरीं करनवत् ॥४॥
तिहींकरूनि शोभायमान । दिसे सालंकृत भगवद्भुवन । तें पाहोनि विधिनंदन । अंतःसदनें अवलोकी ॥१०५॥
अंतःसदनीं अंतःपुर । तेथें दासींचा व्यवहार । नाहीं पुंव्यक्तिसंचार । वृद्धाचारपरंपरा ॥६॥
दासे सुंदरा नवयौवना । चपळा चतुरा कर्माभिज्ञा । लावण्यरसाच्या मूर्ति नान । गमती नयनां ऋषीचिया ॥७॥
सर्वा समान शुभसद्गुणी । प्रथमवयस्का प्रमुदित तरुणी । बहुधारूपीं मन्मथरमणी । श्रीकृष्णसदनीं वर्ते कां ॥८॥
अमूल्य हार कण्ठाभरणें । पदकीं लोपिती भास्करकिरणें । मुद्रिकावलये बाहुभूषणें । कुंडलें श्रवणीं जडितांचीं ॥९॥
श्रवणाकल्प विविधापरी । रत्नजडित कार्तस्वरीं । मुक्त जालिया मिरवती शिरीं । वेणिकाभरणीं विराजती ॥११०॥
अमूल्य नथनिका नासापुटीं । मेखळा मिरवती कटितटीं । विविधारंगी कंचुक्या तगटी । दिव्यवसनें परिधानें ॥११॥
ऐसिया अंतःपुरभुवनीं । किङ्करींचिया अनेक श्रेणी । विविधा परिचर्ये लागूनी । व्यवहारती अतंद्रिता ॥१२॥
एवं दासदासीमण्डित । भगवद्भुअन सालंकृत । नारदें विलोकुनी समस्त । देखे अद्भुत तें ऐका ॥१३॥
रत्नप्रदीपनिकरद्युतिभिर्निरस्तध्वांतं विचित्रवलभीषु शिखण्डिनोऽङ्ग ।
नृत्यंन्ति यत्र विहितागुरुधूपमक्षैर्निर्यान्तमीक्ष्य घनबुद्धय उन्नदन्तः ॥१२॥
जया मंदिरामाजी पाहीं । रत्नदीपांच्या समुच्चयीं । तेजःपुंज प्रकाशसमयीं । ध्वान्त कांहीं न थरेची ॥१४॥
ब्रह्माण्डमठी जेंवि दिनमणि । तेंवि हरिभवनीं रत्नमणि । ध्वान्त निरसूनि स्वतेजः किरणीं । पदार्थश्रेणी प्रकाशती ॥११५॥
अंग या कोमळ संबोधनें । शुक संबोधी नृपाकारणें । म्हणे नारद कौतुकें लक्षी नयनें । तीं निजश्रवणें अवधारी ॥१६॥
वलभी नामें चन्द्रशाळिका । त्यांवरी मयूर पावूनि हरिखा । नृत्य करिती तें कारण ऐका । कुरुनायका म्हणे मुनि ॥१७॥
जया भगवद्भुजनामाजी । अगुरुदशाङ्गधूप सहजीं । जळती तद्गतधूमराजी । गवाक्षमार्गें नभ व्यापी ॥१८॥
बर्ही लक्षूनि तें श्यामप्रभा । मानिती सजलघन हा नभा । माजी ओळला ऐसिया क्षोभा । पाहोनि गर्जंती ऊर्ध्वमुखें ॥१९॥
उत्साहभरित प्लुतस्वरें । नाचती वलभीवरी मयूरें । अगुरुधूमाचिया धूसरें । मेघोदरें प्रमोहितें ॥१२०॥
तिये मंदिरीं नारदमुनि । भगवंतातें आपुलें नयनीं । देखता झाला तें कुरुमणि । सादर श्रवणीं अवधारी ॥२१॥
तस्मिन्समानगुणरूपवयःसुवेषदासीसहस्रयुतयाऽनुसवं गृहिण्या ।
विप्रो ददर्श चमरव्यजनेन रुक्मदण्डेन सात्वतपतिं परिवीजयंत्या ॥१३॥
गजदंतपर्यंकारूढ हरि । सन्निध रुक्मिणी संदरी । अजस्र सप्रेम दासी सेवा करी । दासीसहस्रांसमवेत ॥२२॥
तिया दासी म्हणाल कैशा । आपणाससान ज्यांची वयसा । लावण्यरूपगुणांचा ठसा । आपणऐसा प्रतिबिम्बवत ॥२३॥
वसनाभरणें आपणांऐसीं । चापल्यचातुर्यताही सरिसी । ऐशा रुक्मिणी सहस्र दासी । घेऊनि स्वामीसी सेवीतसे ॥२४॥
सहस्र दासींसह वोळगे । तथापि परिचर्या निजाङें । करितां क्षणमात्रही नुबगे । श्रीरंगसंगें रंगल्या ॥१२५॥
रुक्मदंड रत्नखचित । चामरनिष्ठमुष्टिमंडित । मुद्रिकावलयाङ्गदें राजित । कंचुकीयुक्त ऊर्ध्वभुज ॥२६॥
सात्वतपति भक्तपति । मंचकासनीं सप्रेमभक्ति । दासीसहस्रासहित युवति । रुक्मिणी सती वीजितसे ॥२७॥
तिये गृहिणीसहित हरि । वीजितां नारदें देखिला नेत्रीं । नारदातें कवणेपरी । हरि सत्कारीं तें ऐका ॥२८॥
तं संनिरीक्ष्य भगवान्सहसोत्थितः श्रीपर्यंकतः सकलधर्मभृतां वरिष्ठः ।
आनम्य पादयुगलं शिरसा किरीटजुष्टेन सांजलिरवीबिशदासने स्वे ॥१४॥
सम्यक म्हणिजे बरवे परी । सर्वज्ञ जो कां सर्वान्तरीं । नारदातें तो श्रीहरि । लक्षूनि नेत्रीं अकस्मात ॥२९॥
रुक्मिणीचिया मंचकावरूनि । सवेग उठूनि चक्रपाणि । किरीटेसहित मस्तकें करूनी । लागला चरणीं मुनीचिया ॥१३०॥
भूत भविष्य वर्तमान । जितुके असती धार्मिक जन । त्यांमाजी वरिष्ठ जो श्रीकृष्ण । जाणे सम्मान विप्रांचा ॥३१॥
बद्धाञ्जळि चरणयुगळ । प्रेमें नमूनि श्रीगोपाळ । निजासनीं विप्रवत्सळ । बैसवी केवळ पूज्यत्वें ॥३२॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । यालागीं म्हणती श्रीभगवान । अंतरसाक्षी नारदागमन । जाणे संपूर्ण हृत्कमळीं ॥३३॥
जाणोनि नारदाचें हृद्गत । जें पाहों आला निजाचरित । स्वयें आचरूनि इत्थंभूत । दर्शवीतसे तें ऐका ॥३४॥
तस्यावनिज्य चरणौ तदपः स्वमूर्ध्नाऽबिभ्रज्जगद्गुरुतरोऽपि सतां पतिर्हि ।
ब्रह्मण्यदेव इति यद्गुणनाम युक्तं तस्यैव यच्चरणशौचमशेषतीर्थम् ॥१५॥
तया नारदाचें पदकंज । करतळभाळें अधोक्षज । आधीं मर्दूनियां सुरज । कल्याणपुंज भूषितसे ॥१३५॥
त्यानंतरें रत्नखचित । मांडूनि कनकपात्र प्रशस्त । हेमकलशीं गंगामृत । धारा वोतीत वैदर्भी ॥३६॥
रत्नखचित प्रवाळवज्री । दक्षिणहस्तें घेऊनि चक्री । नारदतळवा मर्दन करी । मृदुतरकरीं सप्रेमें ॥३७॥
रुक्मगौरा रुक्मिणीदेवी । शातकुम्भाची शुद्धोदचरवी । करतळीं धरूनि धारा बरवी । ओती अवयवीं साभरणा ॥३८॥
मृदुकरतळें पदतळ हरि । प्रक्षालूनि हृदयीं धरी । स्पर्शूनि वक्त्रीं नेत्रीं शिरीं । वदूनि वस्त्रीं परिमार्जी ॥३९॥
ऐसें करूनि अवनेजन । पादाब्जावनेजित जीवन । मस्तकीं धरीं श्रीभगवान । गुरुतर पूर्ण त्रिजगाचा ॥१४०॥
त्रिजगज्जनक जो विधाता । श्रीकृष्ण विधात्या जनिता । जगद्गुरुतर या संकेता । जाणेनि वक्ता शुक वर्णी ॥४१॥
स्वधर्मीं निरत धार्मिक जन । त्रिजगीं वाखाणिती सज्जन । तयांचाही स्वामी भगवान । पादावनेजन धरी शिरसा ॥४२॥
ऐसा विप्रपादार्चनादर । अत्यंत देखूनि व्यासकुमर । म्हणे ब्रह्मण्यदेवनामोच्चार । पढती साचार आम्नाय ॥४३॥
ब्रह्मण्यदेव हें गुणनाम । यथार्थ मिरवी पुरुषोत्तम । त्याच्या पादशौचोदकाचा नेम । धरिती सकाम तीर्थनिचय ॥४४॥
तीर्थें सकाम पादोदका । गुरुतर गुरुत्वें जगज्जनका । तोही विप्रपदजळपंका । दह्री मस्तकावरी मानें ॥१४५॥
ब्रह्मशब्दें बोलिजे वेद । वेदवेत्ता तत्प्रतिपाद्य । ब्रह्मण्यदेव आनंदकंद । श्रेमुकुन्द अनवर्थ ॥४६॥
ब्रह्मण्यपतिपादनेस्तव । विप्रपादार्चा करी देव । एर्हवीं फळाशा असंभव । कायसी हांव सुकृताची ॥४७॥
दोषक्षाळनें समर्थ त्रिपथा । ते जयाची पादप्रसूता । तोही विप्रपादवनेजन माथां । सेतुसंस्थेलागीं धरी ॥४८॥
एवं चरण प्रक्षाळून । षोडशोपचारीं विधिपूजन । स्वस्थासनीं बैसवून । करी भाषण तें ऐका ॥४९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 11, 2017
TOP