मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक १ ते २ अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक १ ते २ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते २ Translation - भाषांतर राजोवाच - यहा हतो भगवता भौमे येन च ताः स्त्रियाः । निरुद्धा यत्तदाचक्ष्य विक्रमं शार्ङ्गधन्वनः ॥१॥वाड्मयप्रकाशकभास्करा । विशिष्ठाचिया प्रपौत्रपुत्रा । त्रिकालज्ञा योगीश्वरा । हरियशवक्त्रामृत पाजीं ॥७॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । त्या कृष्णानें भौमहनन । जैसें केलें तैसें कथन । करूनि श्रवण तृप्त करीं ॥८॥षोडश सहस्र कन्यारत्नें । भौमासुरानें हरूनि यत्नें । निरोधूनियां रक्षिलीं प्रयत्नें । तेंहीं श्रवणें परिसवीं ॥९॥चकारार्थी भौमनिधन । योजिलें कोण्या कारणें करून । ते सविस्तर निरूपण । कीजे कथन मुनिवर्या ॥१०॥इया श्रवणामाजि लाभ । चार्ही पुरुषार्थ स्वयंभ । जोडती आणि पद्मनाभ । होय वल्लभ सप्रेमें ॥११॥क्षीरोदमथनोद्भवरत्न । तेजें शार्ङ्गशरासन । वाहे म्हणोन श्रीभगवान । शार्ङ्गधन्वा कवि म्हणती ॥१२॥शार्ङ्गपाणीचा विक्रम । कैसा भौमनिधनोद्यम । कन्या हरूनि मेघश्याम । विवाहसंभ्रम संपादी ॥१३॥हें मज सांगा विस्तारून । म्हणोनि रायें केला प्रश्न । तो निरूपी शुक भगवान । कीजे श्रवण तें संतीं ॥१४॥श्रीशुक उवाच - इंद्रेण हृतच्छत्रेण हृतकुंडलबंधुना । हृतामराद्रिस्थानेन ज्ञापितो भौमचेष्टितम् ।सभार्यो गरूडारूढः प्राग्ज्योतिषपुरं ययौ ॥२॥राया कुरुकुळक्षीरोदका । वाड्माधुर्यपीयूषजनका । हरिगुणप्रश्नप्रकाशका । ललामतिलका कौस्तुभा ॥१५॥तव जठरींचा करुणाड्कुर । तोचि केवळ सुरतरुवर । ऐश्वर्यलक्ष्मीविजयचंद्र । मारक गर खळकुटिलां ॥१६॥धर्मोपचारक धन्वंतरि । कलिमलरुग्णा निरुजा करी । याचकस्वेच्छा दुभाळु भारी । ते तव दित्सा सुरसुरभि ॥१७॥दृढधैर्याचा ऐरावती । तुजपासव तत्प्रसूति । त्वद्भवचातुर्यकळा दिगंतीं । नृत्य करिती सुरांगना ॥१८॥तुझा प्रताप उच्चैःश्रवा । तरणिसमान तुझिया नांवा । वाहूनि तावी दुष्टदानवां । बोधक सर्वां जवाथिया ॥१९॥लावण्यरौचर्याची मदिरा । नयनीं प्राशितां ललनानिकरा । प्रमदा होती प्रमादपरा । मन्मथतंत्रा विविशत्वें ॥२०॥नीतिप्रत्यंचामंडित । शार्ङ्गकोदंड तव चेष्टि । कैं कोण्हाही नोहे नत । भूभुज भ्रान्त गुणघोषें ॥२१॥भीतां अभयद दृप्तां भयद । त्वद्भवकंबुसंभवनाद । तुझी बिरुदावळी विशद । एवं क्षीरोद तूं राया ॥२२॥तुझिया प्रश्नीं माझें मन । होऊनि हरिगुणगरिमाभिज्ञ । परमोत्साहें कथितां पूर्ण । श्रवणीं सज्जन रंजविती ॥२३॥द्वारकेमाजि वसतां हरि । इंद्रें येऊनि दीनापरी । भौमचेष्टित परोपरी । करुणोत्तरीं श्रुत केलें ॥२४॥अमृतस्रावी वरुणच्छत्र । हरिता जाला धरित्रीपुत्र । मान भंगोनि क्लेशपात्र । संतप्तगात्र सुरवर्य ॥२५॥लोकपाळांमाजि वर्ण । तत्प्रभुत्वें संक्रंदन । हरिलें भंगोनि आतपत्राण । मरणासमान श्रम मानी ॥२६॥बंधु म्हणिजे माता अदिति । भौमें तिचिया कुंडलांप्रति । हिरूनि नेलिया हृदयीं खंती । मानी सुरपति बहुसाळ ॥२७॥अमरलोकीं मणिपर्वत । विचित्रधातुरत्नमंडित । प्राग्ज्योतिष नगर तेथ । भौमें रचिलें प्रतापें ॥२८॥इत्यादि दुःखें दिवस्पति । हृदयीं स्मरूनि कृष्णाप्रति । विदित करूनि केली विनंती । भौमदुर्मतिहननार्थ ॥२९॥कोणे समयीं कोणे ठायीं । इंद्रें प्रार्थिला शेषशायी । हें तूं राया पुससी कांहीं । तरी तें सर्वही तुज कथितों ॥३०॥वाराहपुराणींचा संकेत । भूमिदेवीनें भगवंत । प्रार्थूनि भौमासुराचा घात । न करीं म्हणोनि याचिला ॥३१॥तेव्हां भूमिदेवीतें हरि । अभय देऊनि प्रतिज्ञा करी । तुझिये आज्ञेवेगळा न मरीं । जाण निर्धारीं भौमा मी ॥३२॥तिये भूमिदेवीचा अंश । जाणोनि सत्यभामा प्रत्यक्ष । सवें घेऊनि जगदधीश । भौमवधास पैं गेला ॥३३॥अग्निपुराणीं कथा ऐसी । सत्यभामा प्रिय कृष्णासे । तिचिये सदनीं असतां त्यासे । इंद्रें येऊनि प्रार्थिलें ॥३४॥तेव्हां प्रियेचिया वालभें । सवें नेऊनि पद्मनाभें । भौम वधिला समरक्षोभें । कौतुक कनकाभें दाखविलें ॥३५॥असो हरिवंशीं विस्तृत । निरूपिला जो वृत्तान्त । तोही अवधारा संकेत । अल्पसा येथ कथिजेल ॥३६॥द्वारकाभुवन निर्मिल्यावरी । तेथ ऐश्वर्यें नांदतां हरि । धरूनि दर्शनेच्छा अंतरीं । नारदमुनि पातला ॥३७॥सुरुतरूचें प्रसून एक । कृष्णचरणीं अर्पिलें देख । तया सुवासें सम्यक । द्वारकाभुवन कोंदलें ॥३८॥अमरलोकींचें अमोघ सुमन । रुक्मिणीप्रेमें श्रीभगवान । देता जाला कौतुकेंकरून । घ्राणतर्पण मानूनी ॥३९॥द्वारकेमाजि तो परिमाळ । भरतां वेधले प्राणि सकळ । चंदनीं व्याळ कमळीं अलिउळ । तैसे विह्वळ सौरभ्यें ॥४०॥सूर्यरश्मि ब्रह्मांडमठीं । प्रसरती परंतु बिंबानिकटीं । उष्मा प्रकाश विशेष दाटी । सौरभ्य उठी तेंवि सुमनीं ॥४१॥केवळ रुक्मिणिचें मंदिर । झालें दिव्यसुगंधागार । गुंजारवती कृष्णभ्रमर । तेणें अंबर मुखरित ॥४२॥तिये रुक्मिणीचिया दासी । सहज विचरतां पण्यदेशीं । सत्यभामेच्या किंकरींसीं । संगम जाला अवचिता ॥४३॥तंव त्या डवरल्या दिव्यसुगंधें । रुक्मिण्यैश्वर्य वदती शब्दें । श्रीकृष्णाचीं वाक्यें स्निग्धें । अन्य नायिका न लाहती ॥४४॥स्वस्वामिनीचा कृष्णीं प्रेमा । यास्तव प्रियतम पुरुषोत्तमा । अन्य नायिका हरिसंगमा । इच्छितां श्रमा पावती ॥४५॥पट्टमहिषी रुक्मिणी एकी । येरी नायिका मात्र कामुकी । कृष्णपढियंती भीमकी । सुरनरपन्नकीं विख्यात ॥४६॥काली पातला ब्रह्मनंदन । तेणें कृष्णासि उपायन । अर्पिलें अमरलोकींचें सुमन । जें द्वारकाभुवन भरी वासें ॥४७॥आमुची स्वामिनी हरिवल्लभा । परम पढियंती पंकजनाभा । तियेच्या रतिरसगौरवलाभा । सौरभ्यशोभा हरि अर्पी ॥४८॥ऐशा बोलती परस्परीं । ऐकोनि भामेच्या किंकरी । खेद पावोनि अभ्यंतरीं । पातल्या झडकरी निज सदना ॥४९॥नमस्कारूनि गोसाविणी । म्हणती वृथा आमुचीं जिणीं । बाह्य विचरतां लाजिरवाणीं । धन्य रुक्मिणी सेविती त्या ॥५०॥रुक्मिणी आवडे पुरुषोत्तमा । उभयतांचा उत्कृष्ट प्रेमा । इतर नायिका हरिसंगमा । हृदयपद्मामाजि झुरती ॥५१॥सत्यभामा हे ऐकोनि गोष्टी । म्हणे मजवीण अवघे सृष्टी । कृष्णासि प्रियतमा गोरटी । नाहींच पोटीं निश्चय हा ॥५२॥ऐसें असतां आजि हे वार्ता । तुमच्या वदनें म्यां ऐकतां । परम विस्मय गमला चित्ता । कारण तत्त्वता मज सांगा ॥५३॥तंव त्या म्हणती गोसाविणी । सद्गुणचातुर्यलावण्यखाणी । आजिपर्यंत आमुचे मनीं । नाहीं मुखरणी आन वधू ॥५४॥तुझिया वचनासाठीं जीव । देऊं शके वासुदेव । ऐसा होतां आमुचा भाव । तो आजि वाव जाला पैं ॥५५॥आजि आम्हांसि हाटवटीं । जातां भेटल्या रुकिणीचेटी । परस्परें वदतां गोठी । ऐकोनि पोटीं स्मय गमला ॥५६॥स्वर्गींहूनि नारदमुनि । येऊनि भेटला चक्रपाणी । तेणें श्रीकृष्णाचे चरणीं । दिव्य सुमन समर्पिलें ॥५७॥तयाच्या गंधें द्वारकापुर । जालें संपूर्ण सौरभ्यप्रचुर । अपूर्व जाणोनि शार्ङ्गधर । देता जाला भीमकिये ॥५८॥कामुकी मात्र अपरांगना । रुक्मिणी मुखरणी वरांगना । इत्यादि ऐकूनि दासीवचना । विषादें मना बाचटिलें ॥५९॥ऐसें ऐकोनि किंकरीवचन । क्षोभलें सत्यभामेचें मन । पिटूनि हृदय ललाट वदन । दीर्घ रुदन आदरिलें ॥६०॥गडबडाम लोळे धरणिवरी । भंवत्या सांवरिती किंकरी । म्हणती स्वामिनी शोक न करीं । झणें श्रीहरि परिसेल ॥६१॥तंव ते म्हणे परत्या सरा । रुक्मिणी पढियंती श्रीधरा । माझिया स्नेहा पडला चिरा । आतां शरीरा मी न रखें ॥६२॥केश तोडितां करतळीं । सुटली वीरगुंठी मोकळी । तुटली मुक्ताफळांची जाळी । मुक्तें भूतळीं विखुरलीं ॥६३॥तडतडां तोडिले कंठींचे हार । फाडिली कंचुकी दिव्याम्बर । कर्ण घ्राण करपद शिर । रत्नालंकार विसंचिल ॥६४॥दांत खाऊनि ओष्ठ रगडी । दीर्घाक्रोशें बोटें मोडी । म्हणे सवतीनें तडातोडी । प्रेमविघडि पैं केली ॥६५॥बोल कायसा सवतीप्रति । कुटिल कपटी हा श्रीपति । कार्यापुरती लावूनि प्रीति । वर्ते निश्चिति बहिरंग ॥६६॥भोळी नेणें मी कपट याचें । वालभ मानीं बहिरंगाचें । साजणें खंडलें येथूनि साचें । कोण जिणियाचें सुख आतां ॥६७॥म्हणोनि धडधडां बडवी उर । करतळीं पिटी निकरें शिर । आक्रंदोनि टाकी शरीर । किंकरीनिकर सांवरिती ॥६८॥कंठीं घालूं पाहे पाश । शस्त्रें करूं इच्छी नाश । हृदयीं घालूनि पाषाणास । प्राण निःशेष देऊं इच्छी ॥६९॥कपटीयाचें साजणें काय । सधर माहेर नाहीं माय । यालागीं छेदूनि सांडीन काय । पुन्हा न पाहें मुख हरीचें ॥७०॥माझिया सखिया सांगातिणी । तुम्ही जिवलगा मायबहिणी । वोज करा माझिये मरणीं । न लवा पाणी कपटियाच्या ॥७१॥येथें आलिया गिरिधर । त्यासि न वदावें उत्तर । माजें झांकूनि शरीर । त्यास बाहीर दवडा गे ॥७२॥आता कायसी भीड त्याची । प्रकट गोष्टी वदा साची । जे अधिकारी दिव्यपुष्पाची । वाढवीं तयेची वल्लभता ॥७३॥ऐसी सांडूनि हरीची भीड । त्याचें कपट दावा उघड । पुढती बोलतां आला उभड । घेऊनि तोंड रडे पडे ॥७४॥गडबडां धरणीवरी लोळे । सर्वांग धुळीनें माखलें । मूर्च्छा गात्र विकळ पडिलें । प्राण जाले व्याकुळ ॥७५॥ऐसिये समयीं किंकरीजनें । मंचकीं पहुडविलें उचलुनी । झांकूनियां सूक्ष्म वसनीं । मौनें दुरूनि निरीक्षिती ॥७६॥भामामंदिरीं वर्तलें ऐसें । जाणोनि सर्वज्ञें परेशें । पूर्वभजनप्रेमोत्कर्षें । प्रकटी विशेषें लाम्पट्य ॥७७॥अकस्मात भामासदनीं । येऊनियां चक्रपाणि । उद्विग्न देखूनि परिचारिणी । करसंकेतें पुसतसे ॥७८॥अस्ताव्यस्त गृहोपकरणें । त्रुटितें खंडितें रत्नाभरणें । मुक्ताहार मणिभूषणें । अन्वेषणें करिताती ॥७९॥ऐसिया व्यग्र किंकरीगणा । करसंकेतें त्रैलोक्यराणा । पुसतां उपांशु करिती कथना । सर्वाचरणा भामेच्या ॥८०॥विदित असतांही श्रीहरि । तर्जनी ठेवूनि नासिकेवरी । मौनमुद्रेनें किंकरी वारी । शय्यागारी प्रवेशे ॥८१॥भामा अचेतन पुत्रिकाप्राय । देखोनि म्हणे परमाश्चर्य । वृथा श्रमाचें कारण काय । महदन्याय हा केला ॥८२॥मग बैसोनि मंचकावरी । उपबर्हणा काढूनि हरि । भामामस्तक मांडियेवरी । धरूनि आदरी सान्तवना ॥८३॥मुखावरील वसनाञ्चळ । काढूनि कारुण्यें गोपाळ । स्पर्शें शंतम श्रीकर कमळ । चिहनें सकळ अवलोकी ॥८४॥केश मोकळे मुखावरी । श्रवणामागें वारूनि हरि । नम्र परिमार्जूनि करीं । अधर अंबरें पूशिले ॥८५॥साञ्जन द्रवले बाष्पबिंदु । तेणें कळंकी वदनेंदु । राहु स्पर्शासम सखेदु । मंदानंदु म्लानत्वें ॥८६॥सूर्योपरागीं खग्रास होतां । पद्मां कुमुदां समसाम्यता । तेंवि नयनाब्जां कुड्मलीकृतां । मन्मथजनितां अवलोकी ॥८७॥कनककदळीचिया वना । प्रबळ झगटतां शोकपवना । चिरफळ्या होती सुकुमारपर्णा । कंचुकावसना तेंवि दशा ॥८८॥जेंवि हाटकेश्वराचिया लिंगा । सार्द्र कुसुमीं पूजिल्या आंगा । कल्माष उठती तेंवि डागां । कज्जलबाष्पीं कुचकुंभीं ॥८९॥पद्मजाच्या प्रबोधनीं । पद्मालयें पाणिग्रहणीं । पद्मारहिता अभयदानीं । शंतमपणि विलसती जे ॥९०॥तया पाणिपद्में हरि । स्पर्शोनि भामापयोधरीं । कज्जलबिंदु मार्जन करी । आणि मोहरी कामोर्मि ॥९१॥घृतादिद्रावक सहस्रकिरण । जलसान्निध्यें द्रवे लवण । पूर्णचंद्रातें विलोकून । द्रवे संपूर्ण शशिकान्त ॥९२॥तेंवि कृष्णाच्या कृपापाङ्गें । चेतना द्रवलीं भामाअंगें । तथापि ईर्ष्या मानभंगें । न करी जागें निजवर्ष्मा ॥९३॥ऐसें जाणोनि श्रीमुकुंद । अखिलाद्यैक आनंदकंद । म्हणे कायसा एवढा खेद । किमर्थ विषाद संभवला ॥९४॥पट्टमहिषी प्रियतमा मज । यालागिं सांगों आलों गुज । सखेद देखोनि हृदयकंज । विहवळ जालें पैं माझें ॥९५॥कोणतें शोकाचें कारण । प्रियतमेवीण सांगेल कोण । कथिल्यावांचूनि अंतःकरण । खेदमार्जन केंवि करी ॥९६॥ऐसें वदनें बोले हरि । गात्र कुरवाळी शंतमकरीं । हें ऐकोनि रोषातुरी । काय करी सत्यभामा ॥९७॥करकरां खाऊनियां दांत । क्रोधें झिडकूनि टाकिला हात । ओष्ठ चावोनि हुंकारयुक्त । तिग्मदृक्पात वक्तमुखें ॥९८॥करूनि गात्रा परिवर्तन । किमर्थ कितवाचें आगमन । मम गात्राचें संस्पर्शन । अयोग्य जाण कुहकत्वें ॥९९॥सुमनसभुवनोद्भव जें सुमन । मुनिप्रसादमय संपूर्ण । तें जियेतें समर्पून । सुप्रसन्न पैं केलें ॥१००॥जयेच्या सौमनस्याकारणें । सुमनससुमना समर्पणें । तियेचे सुरतीं सुख भोगणें । संस्पर्शन तद्गात्रा ॥१॥कैतवभावें प्रतारणा । करूनि दाविली स्निग्धभावना । आजिपर्यंत अंतःकरणा । भांबाविलें पैं माझ्या ॥२॥आजि जाणों आले गुण । कळलें प्रेमाचें लक्षण । यावरी सर्वथा न ठेवीं प्राण । न दावीं वदन सवतीतें ॥३॥वडील वडवडिली मजभोंवतीं । वालभ लावूनि विघडिला पति । वाडवा वरपडली मम प्रीति । फुटलें मोतीं सांधेना ॥४॥इत्यादि सरोष क्रूरवचनें । सोढव्य करूनि जनार्दनें । चुंबन देऊनि हास्यवदनें । ललितलालनें लालवित ॥१०५॥म्हणे तूं मज दयिताग्रणी । हें तूंचि जाणसी अंतःकरणीं वृथा प्रवर्तों परिहारकरणीं । कैतवकरणीसमसमय ॥६॥तव वचनाची मज शिराणी । जे तूं दयिता वरिष्ट राणी । म्हणोनि अपूर्व गोष्टी कर्णीं । आलों धांवोनि कथावया ॥७॥येथ देखोनि तुझी हे दशा । खेदें कवळिलें करणत्रिदशा । कथूं आलों गुह्य पदशा । अवधारणें हें तुज उचित ॥८॥इत्यादि वचनें मेघनीळा । वर्षतां विषाददावानळा । शांत करूनि हृत्पद्ममुकुळा । फुल्लार केलें संस्पर्शें ॥९॥कटिपासूनि शयनाकार । अर्ध अर्धांगीं धृतशरीर । चुम्बूनि वक्त्रासहस्रार । श्रवणीं श्रीधर गुज सांगे ॥११०॥आर्यवर्यांचिये मुकुटीं । ज्याची पूज्यता वैकुण्ठपीठीं । तो मुनि कृपेनें पातला भेटी । ते अमृतवृष्टिसम घटिका ॥११॥सुरसद्मभव तेणें सुमन । सुरवरभोग्यसौरभ्यपूर्ण । समर्पिलें मज उपायन । स्नेहवर्धन करूनियां ॥१२॥तयाच्या दर्शनें भुलले नयन । सौरभ्यवेधें वेधिलें घ्राण । तेव्हां माझें अंतःकरण । विचारीं पूर्ण प्रवर्तलें ॥१३॥हें अर्पावें दयितेप्रति । दयिताग्रणी ते सात्राजिती । तृतीय पत्नी लौकिकरीती । वडील म्हणती भीमकिये ॥१४॥जें जें आचरिजे पैं श्रेष्ठीं । इतरां जनां तेचि राहटी । यालागिं वेदशास्त्रपरिपाटी । लौकिकदृष्टि रक्षावया ॥११५॥पुष्पार्पणें वडिलपण । रक्षिलें तीसी देऊनि मान । परंतु आमुचें अंतःकरण । कोण्हालागून न तर्के ॥१६॥पुष्पदर्शनें आह्लाद जाला । तेव्हांचि चित्तें संकल्प केला । सुदुम आणूनि सत्यभामेला । समर्पावा सप्रेमें ॥१७॥कीं ते माझी प्रियांतुरी । सर्वदा राहणें तियेचे घरीं । सुरद्रुमसुमनाच्या सेजारीं । पौरंदरीशचीसाम्य ॥१८॥ऐसें संकल्पिलें मनीं । तें गुजकथना तुजलागूनी । येथ आलिया हे तव करणी । देखोनि मनीं स्मय गमला ॥१९॥तुजसारिखी चातुर्यखाणी । पट्टमहिषी वरिष्ठराणी । निजगुजकथनाची शिराणी । अंतःकरणीं बहु वाटे ॥१२०॥कोणें डहुळिलें मानसा । प्रबळ विशाद हा कायसा । ईर्ष्याखेदें ऐसी दशा । आंगवणें हं अनुचित पैं ॥२१॥पूर्वीं तुझिये पाणिग्रहणीं । प्रसन्न पितरें देवता अग्नि । महर्षि वदले आशीर्वचनीं । अविच्छिन्ना प्रीतिरस्तु ॥२२॥तया आशीर्वादनिश्चयें । तव विषादीं न वाटे भय । आजि देखोनि हा अतिशय । परमाश्चर्य मज जालें ॥२३॥भीमकीच्या पाणिग्रहणीं । वीर पडिले समराङ्गणीं । धडमुण्डांकित जाली धरणी । विडम्बणी रुक्मिया ॥२४॥बळात्कारें केलें हरण । तेथ कें सुखाचें पाणिग्रहण । मातापिताजन उद्विग्न । आशीर्वचनें तैशींची ॥१२५॥असो येथूनि सांडी खेद । सत्य मानूनि ममानुवाद । प्रेमा अविच्छिन्न अभेद । वृथा विषाद न करावा ॥२६॥ऐसें बोधितां कैटभारि । भामा प्रमुदित अभ्यन्तरीं । तथापि विषाद जो बाहेरी । तो झडकरी न सांडवे ॥२७॥मेघ उघडल्या सलिल वाहे । अग्निगोपनीं धूम्र राहे । तेंवि ईर्ष्या दाविती होय । आनन्दमय जाल्याही ॥२८॥श्वास सांडूनि श्रमितापरी । झिडकूनि बैसे पाठिमोरी । म्हणे ऐसिया मधुरोत्तरीं । कितव प्रतारी मुग्धांतें ॥२९॥जेथें रुचलें असेल मन । तेथ सुखें करावें गमन । भूत भविष्य वर्तमान । आमुचें येथूनि अदृष्टें ॥१३०॥ऐसी उदासीन भामा । वचनें बोले मेघश्यामा । रोषें दुणावी पूर्वप्रेमा । रतिसंगमा वांछूनी ॥३१॥हें जाणोनि कमलारमण । खुणावूनियां किंकरीगण । पात्रीं भरूनि उष्णजीवन । गंडूषपात्र आणविलें ॥३२॥गंडूषपात्र धरिती एकी । दुजी जळ घाली हरिहस्तकीं । द्विभुजीं भामा कवळूनि निकी । अपरीं कौतुकीं मुख क्षाळी ॥३३॥सूक्ष्मवसनें पुसूनि वदन । धूसर कांति परिमार्जून । तगटी कंचुकी लेववून । करवी परिधान पट्कुळ ॥३४॥केशशोधनपट्टिकायंत्र । स्वकरीं घेऊनि त्रैलोक्यमित्र । धम्मिल्ल विंचरूनि सुतार । ग्रथी वेणिका निजहस्तें ॥१३५॥अर्धशशांक मौळसुमन । मध्यें बिजोरा देदीप्यमान । तद्गत तंतूकुत गोपन । वेणिकारचनकौशल्यें ॥३६॥मूद राखडी केतकीपत्र । कांकडोळा श्रीफळ बदर । पथ्या आमळक गुच्छोत्तर । रत्नखचित खेवणिका ॥३७॥सुनीळ यमुना केशपाश । श्वेत जाह्नवी पुष्पविशेष । रत्नाभरणें भारईस । समय त्रिवेणी भासुरभा ॥३८॥ऐसी वेणिका रचूनि शौरि । पृष्ठीं संवाहन स्वकरीं करी । तेणें सत्यभामा घाबिरी । नमस्कारी हरिचरणा ॥३९॥सखिया हांसती मंद मंद । म्हणती आजिचा परमानंद । भोगावया वनितावृंद । अल्प सुकृतें योग्य नव्हे ॥१४०॥हें ऐकोनि भामावदन । जालें प्रमुदित फुल्लारमान । तुलना न करी राकारमण । अमृतपूर्ण असतांही ॥४१॥कृष्णें केशर घेऊनि करीं । निढळीं रेखिली कुंकुमचिरी । ऊध्वरेखा तयाउपरी । रम्य कस्तूरी कोरींव ॥४२॥भृकुटिमध्यस्थ भा गोंदिली । तया उपरि चंदनटिकली । त्रियामा मोहूनि परिमार्जिली । वदनपंकजा मर्दूनियां ॥४३॥नयनीं सूदलें दिव्यांजन । तेणें सोज्वळ दिसती नयन । तद्भाभोक्ता जगज्जीवन । प्रमुदित मन भामेचें ॥४४॥वसनें कंचुकीसह कुचतटीं । झांकूनि कंठा दिधली उटी । कोंपरकळाविया मणगटीं । मलयज पोटीं चर्चिला ॥१४५॥रत्नमंजूषाउत्कीलनें । स्वकरीं लेववी रत्नभूषणें । मुक्ताफळादि श्रवणाभरणें । निडळमाळिका आकर्ण ॥४६॥बाहुभूषणें जडित चुडे । रत्नखचित कंकणजोडे । मुद्रिकांवरी अनर्घ्य खडे । ते चहूंकडे भा तरळे ॥४७॥ग्रैवेयकें कंठाभरणें । मुक्तमाळीका पदकें पूर्णें । वैडूर्यमंडित कांचसुमनें । हार डोलती कुचकलशीं ॥४८॥सांवरूनियां क्षौमवसना । कटिप्रदेशीं अमूल्य रशना । स्वकरी लेववी त्रैलोक्यराणा । पाशकीलना योजूनी ॥४९॥मंजीर नूपुर अंदु वाळे । पदाग्रीं योजवी दशांगुळें । अणवट जोडवियांच्या ताळें । पोल्हारियांचा रव गाजे ॥१५०॥विरोद्या शफरिका सेवटीं । रत्नजडिता कनिष्ठ बोटीं । सुमनहार घालूनि कंठीं । चुंबी गोरटी परमात्मा ॥५१॥कृष्णें खुणावितां सहचरी । मुकुर दाखवी घेऊनि करीं । दंपती देखूनि मुकुरान्तरीं । भामा अंतरीं उल्हासे ॥५२॥ऐसिया सलंकृता वर्ष्मा । भोगीं योग्यता पुरुषोत्तमा । ऐसें अंतरीं भावूनि भामा । प्रमुदित क्षेमा अभिलाषी ॥५३॥इत्यादि दावूनि स्त्रैणचर्या । प्रकुपित प्रसन्न केली जाया । पुढें लक्षूनि अन्य कार्या । तें कुरुवर्या अवधारीं ॥५४॥श्रीकृष्णइच्छेच्या प्रेरणें । ऐसिये समयीं संक्रंदनें । भामासदनीं दीनवदनें । कथिलें गार्हाणें भौमाचें ॥१५५॥श्रीकृष्णातें वृद्धश्रवा । म्हणे भो भो वासुदेवा । भौमें त्रासिलें अमरां सर्वां । तो श्रम आघवा तुज विदित ॥५६॥अमृतस्रावी वरुणच्छत्र । हरिलें करूनि बळात्कार । अदितिमातेचा श्रृंगार । कुंडलें रुचिरें अपहरिलीं ॥५७॥अमराद्रि जो बोलिजे स्वर्ग । तेथ जें उतम मणिश्रृंग । तें स्थान हरूनियां निलाग । राहे अभंग दुष्टात्मा ॥५८॥डोळां हरळ जैसा खुपे । जिंकिला न वचे निजप्रतापें । अमर कांपती ज्याचेनि दर्पें । खगेंद्र झडपे सर्पवत् ॥५९॥करावयासि सुरकैपक्ष । अवतरलासि तूं गोपा दक्ष । जाणोनि आलों शरणापेक्ष । रक्षीं स्वपक्ष साक्षेपें ॥१६०॥शरणागताची आर्ति हरणें । हेंचि विवरिजे अंतःकरणें । त्यावीण वनितावालभ करणें । श्रेष्ठांकारणें अनुचित हें ॥६१॥ऐसें ऐकोनि अमरावनकें । अभीष्ट मानिलें मन्मथजनकें । म्हणे प्रसंगें योजिलें निकें । समरकौतुकें स्मरलास्य ॥६२॥भूमितनय भौमासुर । भामा भूमीचा अवतार । इचिये आज्ञेनें हा असुर । संहारीन ये काळीं ॥६३॥ऐसें विवरूनि अंतःकरणीं । भामेसहित चक्रपाणि । गरुडारूढ भौमहननीं । सज्ज होऊनि निघाला ॥६४॥बुझावितां भामासती। इंद्रें कथिली सुरविपत्ति । दोंहीं संकटांची निवृति । करी श्रीपति कौतुकें ॥१६५॥यत्नीं पत्नी बुझाली । पुढती तिची उपेक्षा केली । तैं लालसता वृथा गेली । आंगीं लागली कुहकता ॥६६॥शरणागताच्या आर्तिहरणा । न करूनि करितां स्त्रैणाचरणा । तैं धिक्कार श्रेष्ठपणा । सुरमुनिगणामाजिवडा ॥६७॥यालागिं दोन्ही एके समयीं । साधावया शेषशायी । केली कौशल्यें नवाई । दोघां हृदयीं सुखवृद्धि ॥६८॥गरुडारूढ अंकासनीं । प्राणवल्लभा समराङ्गणीं । सत्यभामे वेगळी कोण्ही । चक्रपाणि आन नेणे ॥६९॥ऐसिया बोधें प्रमुदित भामा । रतिरस सांडूनि हरि संग्रामा । आला म्हणोनि अमरोत्तमा । हृदयीं प्रेमा उचंबळे ॥१७०॥प्राग्ज्योतिषपुराप्रति । गरुडारूढ मारुतगति । दैवतासहित दयिताप्रीती । गेला श्रीपति उत्साहें ॥७१॥म्हणाल किमर्थ गरुडारूढ । तोही ऐका अर्थ उघड । प्राग्ज्योतिषपुर अवघड । पवना सांकडें प्रवेशीं ॥७२॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP