अध्याय ५९ वा - श्लोक ४१ ते ४६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ययाच आनम्य किरीटकोटिभिः पादौ स्पृशन्नच्युतमर्थसाधनम् ।
सिद्धार्थ एतेन विगृह्यते महानहो सुराणां च तमो धिगाढ्यताम् ॥४१॥

राया पहा पां कौरवनाथा । केवढी देवांची कृतघ्नता । धिग् धिग् त्यांची वरिष्ठता । द्रविणाढ्यता धिक् त्यांची ॥४१॥
अहो इंद्रें द्वारकेप्रति । जाऊनि परमदीनवृत्ति । करुणा भाकूनियां श्रीपति । कथिली आर्ति बहुसाल ॥४२॥
श्रीकृष्णाच्या चरणा निकटीं । नमस्कारितां मुकुटकोटि । वारंवार पादपीठीं । संघटती तें विसरला ॥४३॥
दीनवदनें अनाथपणें । सांगे रडोनियां गार्‍हाणें । तोंड करूनि केविलवाणें । विनीतपणें विनवूनियां ॥४४॥
स्वकार्य साधावयालागीं । याचिला कैपक्षी शार्ङ्गी । तें कार्य साधिल्या लागवेगीं । युद्धप्रसंगीं मिसळला ॥५४५॥
अच्युतैश्वर्यसंपन्न । विशेष आपुला अर्थसाधन । ऐशातें जाणोनि संक्रंदन । सिद्धार्थ होऊन पालटला ॥४६॥
आपुला साधल्यानंतर अर्थ । पार्यातकाचा धरूनि स्वार्थ । इंद्राणीचे भिडेनिमित्त । त्रैलोक्यनाथ विरोधिला ॥४७॥
विचार तरी केला काय । भौमापुढें इंद्र गाय । तो भौम जेणें मशकप्राय । वधूनि सुरसाह्य साधिलें ॥४८॥
तो कृष्ण आकळेल संग्रामीं । हें न जाणवे हृदयपद्मीं । महाक्रोधतमाची ऊर्मी । बळें संग्रामीं संघटले ॥४९॥
ऐसें सुरांचें मूर्खपण । धिग् धिग् महत्त्व थोरपण । धिग् धिग् ऐश्वर्यताअभिमान । धिक्कार पूर्ण धनाढ्यत्वा ॥५५०॥
ऐसे धिक्कारूनि सुरगण । रायासि करूनि सावधान । म्हणे व्यासाचा नंदन । कृष्णकीर्तन अवधारीं ॥५१॥
कृष्णं सशत सोळा । भौमसंग्रहीता कन्यका सकळा । द्वारके नेऊनि पर्णिता झाला । विचित्र सोहळा तो ऐका ॥५२॥

अहो मुहूर्त एकस्मिन्नानागारेषु ताः स्त्रियः । यथोपयेमे भगवांस्तावद्रूपधरोऽव्ययः ॥४२॥

अहो म्हणिजे परमाश्चर्य । कुरुभूपाळा सांगिजे काय । एक्या मुहूर्तें वधूसमुदाय । कृष्णें पर्णिला पृथक्पृथक् ॥५३॥
यथाविधानें यथाविभवें । सर्वांप्रति सम गौरवें । न्यून पूर्ण कोण्हा नव्हे । न होतां ठावें परस्परें ॥५४॥
समस्तांचीं मातापितरें । त्यांचे आप्त स्वजन सोयरे । कृष्णें आणिले चमत्कारें । कीं तीं शरीरें स्वयें धरिलीं ॥५५५॥
रत्नखचितें दिव्य भुवनें । तयां वोपिलीं वसतिस्थानें । पृथग्रूपें धरिलीं कृष्णें । त्यांसी सम्मानें भेटला ॥५६॥
तिहीं नेऊनि एकान्तासी । गुह्य वदती भगवंतेंसी । जे ते म्हणतीं मम कन्येसी । ज्येष्ठत्व दीजे पर्णूनी ॥५७॥
मी सर्वस्वें हीन दीन । भाग्यें लाधलों भगवच्चरण । आधीं माझेंचि कन्यारत्न । वरूनि मान्य मज कीजे ॥५८॥
ऐकोनि हांसे चक्रापाणि । म्हणे एक मुहूर्त सर्वां लग्नीं । तथापि तुमची आज्ञा मूर्ध्निं । मी वंदूनि वर्तन ॥५९॥
पुढती श्वशुर विनति करिती । राम वसुदेव सह भूपति । सर्व यादव सहित युवती । मंडपा निगुती आणावे ॥५६०॥
रेवती रुक्मिणी जाम्बवती । भामा कालिंदी नाग्नजिती । मित्रविंदा भद्रा सती । लक्ष्मणे सहित आणाव्या ॥६१॥
देवकी आदि वरमातरा । सुभद्राप्रमुखा करवल्या इतरा । गर्गप्रमुखां ऋषीश्वरां । आणूनि वरा मम कन्या ॥६२॥
प्रद्युम्न आणिजे रतिसहित । उपचारसामग्रीसमवेत । नियोगीं स्थापूनि कथिजे कृत्य । मज सनाथ करूनियां ॥६३॥
ऐसेंच सर्वांही विनविलें । कृष्णें सर्वही मान्य केलें । त्याहूनि विशेष संपादिलें । तेंही कथिलें जातसे ॥६४॥
तिहीं कथिलीं तितुकीं रूपें । स्वयें नटोनि कंदर्पबापें । तितुकिये मंडपीं साक्षेपें । पाणिग्रहणीं सादर पैं ॥५६५॥
मंडप बहुळी शिल्पनवाई । करावया सर्वां ठायीं । तितुके विश्वकर्मे पाहीं । कृष्णें लवलाहीं निर्मिले ॥६६॥
रत्नखचितें सभास्थानें । विविध शाळा सह सोपानें । विचित्र रंगीं चित्रिलीं भुवनें । उडती जीवनें ऊर्ध्वगती ॥६७॥
कनकपुटांचीं चित्रासनें । रत्नखचितें दिव्यवितानें । गाद्या मृदोळिया वोटंगणें । विचित्र वसनें जवनिका ॥६८॥
विचित्र पाकशाळांच्या ठायीं । अन्नपूर्णा निर्मिल्या पाहीं । न्यून पूर्ण कोठें काहीं । शेषशायी पडों नेदी ॥६९॥
वरुणें केली जलसमृद्धि । अन्नपूर्णेची पाकसिद्धि । उभयसुहृदीं यादवमांदी । सभास्थानीं विराजली ॥५७०॥
रंभाप्रमुख नृत्याङ्गना । गंधर्व आलाप करिती नाना । नारद तुम्बुरु सामगाना । भावमूर्च्छना दाखविती ॥७१॥
ध्वजा छत्रें आतपत्रें । शंख दुंदुभि मंगळतुरें । रत्नदंडी दिव्य चामरें । सभास्थानीं ढळताती ॥७२॥
गणेशपूजनें मंगळमूर्ति । प्रकट झाला वरदस्थिती । मातृकागृहगणांची पंक्ति । प्रकट घेती सपर्या ॥७३॥
पुण्याहवाचनीं महर्षि सकळ । स्वस्तिपुण्याह शुभमंगळ । आशीर्वाद ओपिती सफळ । नान्दीश्राद्ध सारूनी ॥७४॥
देवकप्रतिष्ठा उभय भागीं । सर्वां मंडपीं झाली वेगीं । जो तो मानी श्रीशार्ङ्गी । आम्हीं ये प्रसंगीं जोडिला ॥५७५॥
संपादूनि कुळधर्मासी । तेलहळदी दोहों पक्षीं । द्विजपूजनें भोजनासी । सारूनि घटिका प्रतिष्ठिली ॥७६॥
भास्करभट्ट समयकथनीं । ब्रह्म घटिका प्रतिष्ठी जीवनीं । काळंभट्ट अवलोकनीं । सावधानीं बैसला ॥७७॥
वधूसी समर्पिलें फळ । सवेंचि वरासी आलें मूळ । नगरीं मिरवूनि गोपाळ । नेला तत्काळ मंडपा ॥७८॥
मुहूर्तमात्र लग्नावकाश । यालागीं मिरवणुकेचा विशेष । न वाढवूनियां हृषीकेश । मंदपास त्वरें आलें ॥७९॥
वधूबापें वरपूजन । मधुपर्केसीं केलें जाण । तैसेंचि वसुदेवें आपण । केलें पूजन वधूचें ॥५८०॥
तंव भास्करभट्टें सावधान । म्हणोनि सूचिलें घटिकामान । ब्रह्मदेवें विधिविधान । सारूनि जवनिक धरियेलें ॥८१॥
नोवरा उभा पूर्वाभिमुख । नोवरी नोवरियासम्मुख । मध्यें भेदाचें जवनिक । धरूनि म्हणती सावधान ॥८२॥
अष्टेक्षण स्पष्टगिरा । निगमचतुष्टय कृतोच्चारा । मंगळाष्टकीं वधूवरां । आशीर्वाद अभीष्ट दे ॥८३॥
प्रत्यगात्मत्वें नोवरी पाहे । वरा पूर्णत्वें हृदयीं ध्याये । ओंपुण्यकाळाचा लक्षिती समय । शबळीं शुद्धत्व निवडूनी ॥८४॥
संश्लिष्टतादि भूमिका चारी । करवल्या अक्षता टाकिती शिरीं । काळंभट्ट सावध करी । अतिसमय वर्तत ह्मणोनियां ॥५८५॥
अतिसमयीं करावें काय । तरी लक्ष्मीनारायणचिंतनोपाय । अंतीं मति ते गति होय । यालागीं सोय हे धरावी ॥८६॥
बहुविध शास्त्रांचा लौकिक । गलबला सांडूनि हा निष्टंक । कुळ संकेतें अन्वयात्मक । स्वामी व्यतिरेकें चिंतावा ॥८७॥
अन्वयें जाणोनि आपुलें कुळ । कुळस्वामी जो कुळाचें मूळ । तो चिन्मात्र चिंतिजे अमळ । सावध निश्चळ निःशब्द ॥८८॥
ओंपुण्यकाळाचिया गजरा । लक्षूनि सूचना वाजान्तरां । सुटतां साक्षित्व जवनिकपदरा । दशविध तुरा उत्साह ॥८९॥
ऐसें करितां सावधान । सरलें समयाचें व्यवधान । ओंपुण्यकाळीं लागलें लग्न । प्रत्यक्प्रवण अभेदें ॥५९०॥
त्वंतत्पदांची निरासता । असिपदीं आत्मैक्यता । लग्न लागतांचि तत्त्वता । विपरीतावस्था पारुषली ॥९१॥
नोवरा बैसला पूर्वाभिमुख । नोवरी झाली प्रत्यग्मुख । कंकण बांधूनि पृथक् पृथक् । एकात्मसुख परस्परें ॥९२॥
असो हे अध्यात्मपरिभाषा । सामान्य श्रोतयांच्या मानसा । बोध न होतां मानिती विरसा । यालागीं परिसा सरळार्थ ॥९३॥
गर्गाचार्य याज्ञिक सारी । कुबेर ब्राह्मणां वांटी भूरी । चंद्रमा ताम्बूल अर्पी करीं । अश्विनीकुमारीं सौरभ्य ॥९४॥
इंद्र अर्पी सुमनमाळा । सभानायकां लोकां सकळां । कृष्णविवाहसुखसोहळा । पाहोनि डोळां त्रिजग निवे ॥५९५॥
निशाणें लागल्या दुंदुभि । सुरांचे जयजयकार नभीं । पुष्पवृष्टीचा सुसेव्य सुरभि । प्रसरे ककुभीं न समात ॥९६॥
गौरीहरां पूजावया । आम्रवृक्ष सिंपावया । नोवरी कडिये घेवोनियां । यादवराया चला ह्मणती ॥९७॥
वृद्धाचारा देऊनि मान । नोवरी घेऊनि जनार्दन । पूजावया गौरीरमण । आला वचन नुलंघितां ॥९८॥
कृष्ण वंदूनि गौरीरमण । म्हणे माझे हृदयीं तुझें ध्यान । तुझे हृदयीं आमुचें स्थान । प्रेमपूजन परस्परें ॥९९॥
वधूचीं जियें मातापितरें । प्रेमें निर्भर परस्परें । देखोनि संतुष्ट वधूवरें । म्हणती श्रीधरें सुख दिधलें ॥६००॥
सोळा सहस्र वडीलपणा । कन्येसीं देऊनि यादवराणा । मान दिधला आमुच्या वचना । संतुष्ट मनामाजिवडी ॥१॥
यानंतरें वधूचा तात । समस्त यादवां विनवी विदित । माझा मंदप शोभिवंत । चारी दिवस करावा ॥२॥
माझिये मंडपीं तुमचें शेष । मजला देऊनि कीजे तोष । आज्ञा प्रमाण हृषीकेश । म्हणोनि वचनास मान्य करी ॥३॥
पुढती म्हणे जी दातारा । आपुलिया सुहृदां आप्तां समग्रां । अक्षत देऊनि परमादरा । करूनि पाचारा पंक्तीसी ॥४॥
ऐकोनि तोषला जनार्दन । उद्धव अक्रूर पाचारून । म्हणे मम श्वशुरासवें जाऊन । अक्षत देऊन येइजे ॥६०५॥
मंगळतुरांचिया गजरीं । प्रथम सोळा सहस्रां घरीं । नूतन सुहृदां सांगोनि त्वरीं । द्वारकापुरीं मग सांगों ॥६॥
म्हणोनि जातां मंदिरा एका । तंव द्वारीं बळरामा सात्त्विका । सहित देखिलें वधूजनका । एकमेकां निमंत्रिती ॥७॥
तेणें नेतां मंदपान्तरीं । तेथेंही श्रीकृष्ण आणि नोवरी । ओहर देखूनि बोहर्‍यावरी । झाला अंतरीं विस्मित तो ॥८॥
उग्रसेनेंसीं यादवसभा । इंद्रादि सुरवरसमूह उभा । सर्व सामग्री मंडपशोभा । स्वमंडपींची अगवमिले ॥९॥
परंतु वधू आणि वधूचीं पितरें । तत्पक्षींचीं सुहृदें इतरें । पृथक् पृथक् इतुकेंचि मात्रें । येरें समग्र पूर्ववत् ॥६१०॥
ऐसीच सोळा सहस्र सदनीं । अक्षत परस्परें सर्वां जनीं । नेतां वधूवरां देखोने । आश्चर्य मनीं न समाये ॥११॥
म्हणती आमुचे मंडपीं हरि । आमुची तनया वरूनि गजरीं । ओहर उपविष्ट बोहल्यावरी । येथ मुरारि कैं आला ॥१२॥
तंव तेथिंचा वधूबाप येवूनि पुढां । म्हणे क्षणैक बैसोनि घ्या जी विडा । आम्ही तुमचिया बिर्‍हाडा । अक्षत घेवोनि येतसों ॥१३॥
उग्रसेनादि अभ्युत्थानें । देऊनि बैसविती सम्मानें । परिमळद्रव्यें माळा सुमनें । अहेर वसनें समर्पिती ॥१४॥
उद्धव अक्रूर सवें होते । ते उपचार अर्पितां देखोनि तेथें । परमाश्चर्यें म्हणती त्यांतें । तेथें तेथें केंवि तुम्ही ॥६१५॥
मंडगर्भी जंव पाहती । तंव यादवेंसीं आहुकनृपति । देवकीप्रमुखा सर्व युवति । सुरमुनिपंक्ति नटनाट्यें ॥१६॥
देखोनि मानिती आपुले मनीं । कृष्ण आमुचे मंडपींहूनी । पर्णावया हे नृपनंदिनी । आला घेवोनि सर्वांतें ॥१७॥
प्रथम पाळीलें आमुचें वचन । कन्या पर्णूनि केलें धन्य । आतां यांचे भीडे करून । सर्वां घेऊन हरि आला ॥१८॥
यादवेंसीं आलिया हरि । मागें मंडपामाझारी । कोणी नसेल हो झडकरी । आज्ञा घेऊनि जाइजे ॥१९॥
मग आज्ञा घेवोनि उठिले । सवेग निज मंडपा आले । तंव यथापूर्ण देखते झाले । सभा वोहरें सुरमुनिही ॥६२०॥
तेणें झाले सविन्मय । म्हणती केवढें परमाश्चर्य । सर्वांठायीं देवकीतनय । सभासमुदायसमवेत ॥२१॥
जेथवरी आपुली धांव पुरे । तितुकीं फिरोनि पाहती घरें । सर्व समृद्धि सभा ओहरें । देखोनि मुरे मन बुद्धि ॥२२॥
अनेक दर्पणीं एकचि बिंब । एक जीवन अनेक थेंब । एक द्रुमबीज अनेक कोंभ । सवेग स्वयंभ हरि तैसा ॥२३॥
मुळीं शुकाचा गूढार्थ । तो उपलविला अल्पसा येथ । सविस्तर कथावया असमर्थ । भारतीनाथ चहुं वदनीं ॥२४॥
तावत् म्हणिजे तितुकीं रूपें । धरूनि यथाव विधीच्या बापें । अव्यय म्हणिजे सत्यसंकल्पें । वेंच न होतां कल्पिलीं ॥६२५॥
चैतन्य समान सर्वां ठायीं । तेंवि न्यून पूर्ण कोठें नाहीं । भगवत्पदें हें सामर्थ्य पाहीं । ऐश्वर्यनवाई प्रकाशी ॥२६॥
यथावत्पदें वॄद्धाचार । जरी वर्णावा सूत्रानुसार । तरी प्रभु एकनाथ तो विस्तार । अध्यात्मप्रचुर बोलिले ॥२७॥
रुक्मिणीस्वयंवरामाझारी । वदली स्वामींची वैखरी । तेचि पुढती वदतां चतुरीं । काय म्हणीजेल तें विवरा ॥२८॥
बेगड सोन्याहूनि पिंवळी । आंबिल अमृताहूनि आगळी । तैसी हे वक्तृत्वनव्हाळी । स्वामिकाव्यसम गमिजे ॥२९॥
जवा आगळीक काशी ऐसें । सर्व तीर्था म्हणिजेत असें । परी जवा आगळें माहोर ऐसें । वाराणसीतें न म्हणती ॥६३०॥
वेदा न म्हणिजे कवित्व । विवर्त नोहे मुख्य तत्त्व । कर्मबद्ध अपर जीव । वासुदेवासम न कीजे ॥३१॥
तेंवि प्रभूचिया वाख्याना । सम न कराव्या कविता आना । विप्रवेशें द्वारकाराणा । वाहे जीवना ज्या सदनीं ॥३२॥
तया पभूचिया कृपावरदें । वाखाणिलीं मुळींचीं पदें । एक मुहूर्तें विवाहसमुदें । केलीं मुकुन्दें तीं कथिलीं ॥३३॥
एवं सर्वत्र समसमान । चारी दिवस लग्नविधान । एरेणीपूजन वंशपात्रदान । साडे वाहून गृहभरणी ॥३४॥
सर्वां एकचि गृहप्रवेश । करोनि लक्ष्मीपूजनास । रुक्मिणीप्रमुख भाणवस । अष्ट वरिष्ठा निरोविती ॥६३५॥
ऐसा षोडश दिन सोहळा । शतोत्तर षोडश सहस्र अबळा । पर्णूनियां घनसांवळा । गृहस्थ झाला कुरुवर्या ॥३६॥
बहुत वनिता ये अवतारीं । किमर्थ पर्णी कैटभारि । राया ऐसी शंका न करीं । रहस्य अवधारीं यदर्थीं ॥३७॥
आबह्मकल्पापासून कल्प । निष्कळ गाळीव कल्मषपंक । तयाचा निर्मिला कळिकाळपुरुष । जो निःशेष दोषात्मा ॥३८॥
जन्मलिय बाळकासी । अवयव मात्र असती त्यासी । प्रकट होती प्रौढ वयसीं । हेही तैसी गोष्टी असे ॥३९॥
ब्रह्मवयसा चढोचढी । चढती युगांच्या परवडी । तैसीं तैसीं दुष्कृतें गाढीं । कळिकाळप्रौढी पावतसें ॥६४०॥
पन्नास वरुषें ब्रह्मयाचीं । पूर्वपरार्धीं संपलीं साचीं । तैसीच प्रौढता कळिकाळाची । वृद्धि दोषांची जुनावली ॥४१॥
जंव जंव विषाचा वाढे तरु । तितुकी मारकता होय निबर । कीं दिवसेंदिवस अभ्यासपर । विद्या कुविद्या वाढतसे ॥४२॥
तेंवि वर्तमान ब्रह्मयास । द्वितीय परार्ध पूर्व दिवस । युगचौकडिया अठ्ठावीस । कळिकाळास प्रौढत्व ॥४३॥
ऐसा पौढ कळीमळाब्धि । प्राणि तरती कवणे विधी । स्वहितविषयीं नुदैजे बुद्धि । विषयोन्मादीं निमज्जती ॥४४॥
नटापरी साधनाभास । श्रौतस्मार्तव्रतसंन्यास । वर्णाश्रमधर्म पडिले ओस । वेदशास्त्रांस कोण पुसे ॥६४५॥
शिस्नोदरपरायण । संप्रदाय कौळाचरण । जारणमारण वशीकरण । बोधप्रवीण गुरुवर्य ॥४६॥
धर्मपत्नीचा करूनि त्याग । दंड कमंडलु संन्यासमार्ग । अनलकांचा करिती संग । आश्रमसोंगविडंबना ॥४७॥
धनधान्याच्या संग्रहार्थ । उपार्जिती धनिक गृहस्थ । जार चौर्य मद्यद्यूत । घातपातपरायण ॥४८॥
वेदान्तवक्ते ब्रह्मनिष्ठ । विषयप्राप्ति मानिती उत्कृष्ट । ज्ञान बोधूनि भरिती पोट । म्हणती भ्रष्ट विरागिया ॥४९॥
आधींच अज्ञानें अज्ञानें आंधळीं । वरी ज्ञात्यांची ऐसी चाली । कलिमलसमुद्रामाजी पडलीं । कोणा काढिलीं न वचती ॥६५०॥
विषयावांचून न रुचे कांहीं । पश्वादिकां समान पाहीं । विषयाभिलाष सर्वां देहीं । बाह्य सर्वही श्रुतिमार्ग ॥५१॥
वामी कामीं लावूनि ध्वजा । गुरुत्वें बोधिती कौलपूजा । यथा राजा तथा प्रजा । कोणा लज्जा कोणाची ॥५२॥
पाखंडियांचे शिष्टाचार । साबरागमींचे चमत्कार । हेतुवादी वक्ते चतुर । जार चोर प्रतिष्ठित ॥५३॥
ऐशिया पापाब्धिमाझारीं । नौका जर्जर झालिया चारी । त्यांचीं नांवें तूं अवधारीं । कुरुधरित्रीवल्लभा ॥५४॥
कर्म उपासना ज्ञानयोग । हे तरणोपायनौका साङ्ग । कलियुगीं यांचा झाला भंग । तोही प्रसंग अवधारीं ॥६५५॥
अनाचारें बुडालें कर्म । देश काळ पात्र विषम । मंत्र तंत्र द्रव्य अधम । कर्ता सकाम विषयार्थीं ॥५६॥
भक्तीवांचूनि उपासना । देहलोभें भंगिली जाणा । गुरुवेदान्तशास्त्रवचना । विश्वासेना कोणीही ॥५७॥
विरागेंवीण भंगलें ज्ञान । ज्ञात्यासी न सुटे विषयाचरण । म्हणती आत्मा निर्लेप पूर्ण । यथेष्टाचरण प्रबोधिती ॥५८॥
निरुपद्रवी न मिळे स्थळ । योगारूढ गुरु प्राञ्जळ । प्रवृत्तिदमनीं नोहे बळ । मानस चंचळ अनावर ॥५९॥
गोगण नोहे प्रत्यक्प्रवण । अन्नाविणें व्याकुळ प्राण । सहसा न सुटे विषयाचरण । केंवि पवन निरोधवे ॥६६०॥
एवं नावा न चलती चारी । कळिकाळपापाब्धिमाझारी । प्राणी बुडतां कवण तारी । म्हणोनि श्रीहरि कळवळिला ॥६१॥
एक तरनोपाय दृढ । नाममात्रें तरती मूढ । ज्ञानविहीन केवळ जड । जैसे दगड सेतुपथीं ॥६२॥
परंतु नाम न घेती कोणी । यालागीं स्वयें चक्रपाणि । प्रवृत्ति दावी विषयाचरणीं । अवतरोनि यदुवंशीं ॥६३॥
साधक बाधक संसाररीति । कर्मप्रवृत्तिनिवृत्ति । गुणानुरूप रोचक मति । दावी श्रीपति वर्तोनी ॥६४॥
मुचुकुंदासी केला बोध । समरीं भंगिला जरासंध । रुक्मिणी वरिली भावनाशुद्ध । रुक्मि विरुद्ध विडंबिला ॥६६५॥
असो ऐसी वर्तमानीं । गुणानुसार दाविली करणी । भावी कामुक विषयी प्राणी । ह्यांलागोनि तरावया ॥६६॥
गीत संगीत कामशास्त्र । जें कां श्रृंगाररसप्रचुर । संपादूनि त्रिविध कलत्र । क्रीडला विचित्र यदुवर्य ॥६७॥
त्रिविध कैशा म्हणाल दारा । त्याही सांगिजती अवधारा । एकी स्वकीया दुसरी परा । तिसरी वेश्या अभिसारिका ॥६८॥
परकीयेची रसोत्पत्ति । कामशास्त्रीं विशेष वदती । यालागीं भोगोनि बल्लवयुवति । कामुकां प्रवृत्ति हरि दावी ॥६९॥
अभिसारिकेची निर्भय रति । क्षणभंगुर प्रेमोत्पत्ति । कुब्जा भोगूनि ते प्रवृत्ति । दावी श्रीपति कामुकां ॥६७०॥
स्वकीयांचा रतिविकास । ललना पर्णूनियां बहुवस । गृहमेधियांसम विन्यास । हृषीकेश स्वयें दावी ॥७१॥
त्रिविधहरिक्रीडाचिंतनें । कामुकां लागती तीव्र ध्यानें । श्रवणें पठनें स्मरणें मननें । लीलाकथनें भव तरती ॥७२॥
वस्तुसामर्थ्यमहिमा ऐसा । लोह पालटे स्पर्शतां स्पर्शा । तैसे हरिगुण क्षालिती दोषा । गातां सदोषा हरिलीला ॥७३॥
परकीया आणि अभिसारिका । पूर्वार्धीं कथिल्या कुरुनायका । स्वकीया पर्णूनि गृहकौतुका । दावी कामुकां जगदात्मा ॥७४॥
विषयी कामुक तारावया । पूर्णकामेंही कामचर्या । यथेष्टाचरणादि त्रिविध राया । केली स्वमायालाघवें ॥६७५॥
तें कृष्णाचें गृहस्थपण । विषयविलास स्वधर्माचरण । येथूनि कथिजेल वक्ष्यमाण । तें कीजे श्रवण सत्पुरुषीं ॥७६॥

गृहेषु तासामनपाय्यतर्क्यकृन्निरस्तसाम्यातिशयेष्ववस्थितः ।
रेमे रमाभिर्निजकामसंप्लुतो यथेतरो गार्हकमेधिकांश्चरन् ॥४४॥

शतोत्तर षोडश सहस्रां गृहीं । न्यूनाधिक कोठें नाहीं । सर्वां समान शेषशायी । अतर्क्य नवाई दाखवी ॥७७॥
जें ऐश्वर्य नेणे विधि । विश्वकर्मा न सृजी कधीं । ऐशिया अनेक भोगसमृद्धि । स्वयें उपपादी अतर्क्य ॥७८॥
जे ते मानी आपणावरी । परम प्रीति श्रीकृष्ण करी । मजवेगळा न वचे दुरी । कदा श्रीहरि आणकी पें ॥७९॥
अष्टनायिकाकेलिविहारी । सप्रेम सोळा सहस्रां घरीं । एके रमेसींच क्रीडे हरि । निर्विकारी आत्मरत ॥६८०॥
अनेक शुद्धोपाधिवशें । अनेक आत्मप्रतिभाभासें । तेथ रमिजे स्वात्मविलासें । जेंवि पुरुषें अद्वैतें ॥८१॥
तेही आत्मभा रमादेवी । साष्ट शत षोडश सहस्रां नांवीं । एक रुक्मिणीच जाणावी । अंश भावी पृथक्त्वें ॥८२॥
स्वनंदपरिपूर्ण जो कां हरि । अत्मप्रभेसीं क्रीडा करी । एकानेक पृथगाकारीं । भेदकुसरी रुचवूनी ॥८३॥
मिथ्याविषयाभासीं रमती । त्यासीं अपाय काळवृत्ति । तैसी नव्हे पैं आत्मरति । स्वानंदपूर्ति अजस्र ॥८४॥
एर्‍हवीं गृहमेधियां परी । गृहस्थधर्म आचरें हरि । युवायुवतिविलासकुसरी । स्मरविकारीं अनुकरणें ॥६८५॥
तियें अनुकरणें यथाविधि । परीक्षितीतें शुक प्रबोधी । श्रोतीं परिसावीं कुशलबुद्धी । श्लोक प्रतिपादी व्याख्यानीं ॥८६॥

इत्थं रमापतिमवाप्य पतिं स्त्रियस्ता ब्रह्मादयोऽपि न विदुः पदवीं यदीयाम् ।
भेजुर्मुदाऽविरतमेधितयाऽनुरागहासावलोकनवसंगमजल्पलज्जाः ॥४५॥

इत्थं पूर्वोक्त स्त्रिया समस्ती । रमारमण जो कमलापति । पावोनि सप्रेमें दंपती - । भावें वर्तती अनुरागें ॥८७॥
ज्याची पदवी ब्रह्मादि हर । जाणों न शकती सविस्तर । ऐशियातें वनितानिकर । स्मरविकार अनुभविती ॥८८॥
मुदा म्हणिजे हर्षोत्कर्षें । सानुरागलोकहासें । प्रथमनवसंगावेशें । सलज्ज भजती वाग्जल्पें ॥८९॥
कटाक्षबाणें विंधिती कृष्णा । स्निग्ध सस्मित् मुरडिती वदना । नवसंगमीं वदती वचना । संकेतसूचना नर्मोक्ति ॥६९०॥
वेणिकाकर्षण वाममुष्टी । अपरें धरूनियां हनुवटी । चुंबन देतां दशन ओष्ठिं । स्मरसंतुष्टी रोविती ॥९१॥
मन्मथकदनें धरितां कुच । तन्वंगिया तनुसंकोच । करूनि वदती उच्चावच । जीं अवाच्यें स्मरगुह्यें ॥९२॥
इत्यादिप्रकारीं समस्त वनिता । जिया रमेच्या अंशभूता । लाहोनि रमारमण भर्ता । झाल्या भजत्या भगवंतीं ॥९३॥
ललितलाघवलालनीं ललना । स्मरसंगमीं ललितां यूनां । मग ते चढे गर्वाभिमाना । गुणलावण्या वर मानी ॥९४॥
तेणें मदगर्वें अपाय । उभयप्रेमामाजी होय । तैसा नोहे वधूसमुदाय । जिहीं यदुराय वर वरिला ॥६९५॥
स्मरविकारभरें रमण । झाला गमतांही स्वाधीन । तरी अगर्व दास्याचरण । ज्या संपूर्ण न संडिती ॥९६॥
सर्व समृद्धि असतां घरीं । परंतु निजाङ्गें सेवाधिकारी । नियमें भजती सर्वोपचारीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥९७॥

प्रत्युद्गमासनवरार्हणपादशौचतांबूलविश्रमणवीजनगंधमाल्यैः ।
केशप्रसारशयनस्नपनोपहार्यैर्दासीशता अपि विभोर्विदधुः स्म दास्यम् ॥४६॥

सदनीं शतानुशत दासी । कुशल चतुरा गुणैकराशि । असतां निजाङ्गें सेवेसी । करिती दिननिशीं हरिरमणी ॥९८॥
स्वकान्त देखोनियां सम्मुख । उथोनि ठाती चरणोन्मुख । होऊनि तिरोहित सम्यक । दास्य अचुक आचरती ॥९९॥
दिव्यासनरचनाविधि । वोळंगे सादर कुशल बुद्धि । वरिष्ठ साळंकारसमृद्धि । चित्रप्रभेदीं लेवविती ॥७००॥
पादशौचाच्या आचरणीं । मंचकीं उपविष्ट चक्रपाणि । कनककलशीं उष्ण पाणी । कनकभाजनीं पादार्चा ॥१॥
रत्नखचित प्रवाळवज्री । पदतळ क्षाळिती कंकणगजरीं । सविलास स्मेरापाङ्गें शौरि । निरखी साजिरी सर्व तनु ॥२॥
चंचळ कचकुचश्रवणाभरणें । नितंबगुच्छ कंठभूषणें । क्कणितकिंकिणीकरकंकणें । पाहे नयनें नलिनाक्ष ॥३॥
नर्मोत्तरीं मानस मोही । लीलेकरूनि स्पर्शे देहीं । तत्स्पर्शाची सुखनवाई । अमोघ सुकृतें अनुभविती ॥४॥
अभ्यंगपरिचर्येच्या काजा । करूनि रत्नपीठीं गरुडध्वजा । बैसवूनियां बरवे ओजा । मुक्त मूर्धजां उकलिती ॥७०५॥
कनकपात्रीं सुगंध तैला । दासी माखिती भगवत्कुरळां । वनिताहस्तें निषेध केला । म्हणोनि जवळी तिष्ठती त्या ॥६॥
सुगंधद्रव्यीं उद्वर्तना । कृष्णशरीरीं उटिती ललना । प्रमुदितहृदयें पाहती वदना । सलज्जनयना स्मितवक्त्रीं ॥७॥
त्वाष्ट्र सुघटित मांडूनि चौकी । कृष्ण बैसवोनि उष्णोदकीं । भोंवतीं ओळंगती सेवकी । वनिताहस्तकीं जळकलशी ॥८॥
करकौशल्यें क्षाळिती केश । केशप्रसाधनपट्टिकेस । घेऊनि विंचरती विशेष । स्निग्धता अशेष क्षाळूने ॥९॥
भुज पद पृष्ठ मर्दिती करीं । उद्वर्तनांश संलग्न जठरीं । तोही क्षाळूनि अभिषेक शिरीं । करिती सुंदरी उष्णजळें ॥७१०॥
पंचप्रकारीं नीराजनें । जळ फळ सुमनें रत्नें अन्नें । तदुपरि अंगपरिमार्जनें । सूक्ष्मवसनें वधू करिती ॥११॥
रत्नपाद्का अर्पिती चरणीं । देती पीताम्बर परिधानीं । आर्द्रवस्त्रा निष्पीडनीं । उत्तरीय देऊनि प्रवर्तती ॥१२॥
दिव्यासनीं बैसवूनि । केशर कस्तूरी हरिचंदन । तिलकधारण विलेपन । करिती चर्चन सर्वाङ्गीं ॥१३॥
संध्यावंदना शुद्धोदक । आचमनार्थ पृथक् पृथक् । कनककलशीं देती सम्यक । भूषणें अनेक लेवविती ॥१४॥
रत्नखचितें कुंडलें श्रवणीं । मुक्तमाळिका कौस्तुभमणि । वैजयंती कंठाभरणीं । बाहुभूषणें मुद्रिका ॥७१५॥
करकंकणें कटिमेखळा । पदभूषणें चरणयुगळा । सुमनहार पंकजमाळा । कुसुमें कुरळां ग्रथिताती ॥१६॥
धूपदीपार्पणोत्तर । विविध नैवेद्य अमृतोपहार । मध्य पानीन सुतप्त नीर । आंचवणार्थ समर्पिती ॥१७॥
गंडूषपात्र मांडूनि तळीं । धारा वोतिती हरिकरतळीं । वदन कर पद क्षाळूनि चैलीं । परिमार्जिती सुधौत ॥१८॥
रुचिरें रोचक पाचक फळें । मधुरें सुपक्वें रसाळें । अर्पूनियां त्रयोदशमेळें । ताम्बूलविडियां समर्पिती ॥१९॥
काया वाचा तनु मन धन । करूनि सर्वस्वें अर्पण । करीं घेवोनि नलदव्यजन । करिती विश्रमण मंदतर ॥७२०॥
त्यानंतरें मंचकयानीं । राजोपचार समर्पूनी । सुगंधचूर्णाच्या उधळणीं । मुकुटीं खोविती अवतंस ॥२१॥
दिव्य दर्पण देऊनि करीं । ललामदंडी द्वय चामरीं । क्कणितकंकणा ढाळिती नारी । अपरा सुचिरीं करतरळा ॥२२॥
नाना कौतुकें रसिकानंद । काव्यकौशल्यें छंदप्रबंध । गीत नृत्य हास्य विनोद । स्तवनीं गोविंद रंजविती ॥२३॥
मुरजप्रमुख वाद्यकुमरी । अक्षक्रीढा नानापरि । इतिहासादि कीर्तनगजरीं । वल्लभा चतुरी रंजविती ॥२४॥
सदनीं शतानुशत दासी । सुंदरा चतुरा गुणैकराशि । असतां स्वामीचे सेवेसीं । निजाङ्गेंसीं अनुरक्ता ॥७२५॥
साष्ट शतें सहस्रें सोळा । समान ओळंगती घननीळा । त्यांमाजी कोणीचा कळवळा । न्यून आगळा जरी पुससी ॥२६॥
तरी ते एकचि कमळादेवी । अनेकरूपें रतिगौरवीं । नटोनि स्वनाथमनोरथभावीं । विविधा दावी रसचर्या ॥२७॥
जैसा गान्धर्वनिगमवेत्ता । विपंची सज्जी आपुल्या चित्ता । जेंवि ते तैसीच स्वरसंमता । होय तद्गीता अनुसरती ॥२८॥
तेंवि कृष्णाच्या अंतर्भावीं । अष्टनायिका रसगौरवीं । बहुधा नटोनि कमलादेवी । दावी आघवीं अनुकरणें ॥२९॥
सूत्रधाराच्या करचाळणें । सायखाडियांच्या पुतळ्या चळणें । तेंवि नटती नायिका गुणें । हरीच्छेनें हरिरमणी ॥७३०॥
असो ऐसे कळिकाळीन । विषयासागरीं नर निमग्न । तत्कार्ण्यें कळवळून । विषयाचरण हरि प्रकटी ॥३१॥
तया कथांचिया श्रवणीं । बैसतां प्रेमा अंतःकरणीं । प्रकटे तैं तो भवनिस्तरणीं । सुदृढ तरणीमय होय ॥३२॥
ऐसें जाणोनि साधकवर्गीं । भजिजे हरिगुणनौकामार्गीं । श्रवणें मननें निजान्तरंगीं । रमतां भंगी कलिमलता ॥३३॥
कुरुनरपाळा इतुकी कथा । वैय्यासकि झाला कथिता । वक्ष्यमाणीं हरीच्या चित्ता । सम अनुकरता वाखाणी ॥३४॥
सर्वां वरिष्ठ मुख्य राणी । मनोऽनुकूळा वरवर्णिनी । कृष्णप्रियतमा जे रुक्मिणी । स्तोभी प्रेरणीं हरीच्छा ॥७३५॥
तिये व्याख्यानीं चिद्रसपाना । श्रोतीं सावध बैसिजे श्रवणा । दयार्णवाची विज्ञापना । इतुकी सज्जना सलगीची ॥३६॥
इतुकें श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं श्रीशुक कथी । तें परिसोनि परीक्षिति । श्रवणीं प्रीति वाड करी ॥३७॥
विषयाचरण श्रीकृष्णाचें । परि हें रहस्य उपनिषदांचें । संहितारूप गुह्य साचें । परमहंसाचें शुक आशंसी ॥३८॥
दशमींचा हा एकोनषष्टि । श्रवणें मननें विवेकदृष्टि । श्रोतयां कैवल्यरसाची वृष्टि । प्रेम संतुष्टीमाजि करी ॥३९॥
श्रीएकनाथ कल्पतरु । चिदानंद सुमनभारु । स्वानंदाचा फलविस्तारु । गोविंदरसें सुरसाळ ॥७४०॥
तद्रस रसाळ पूर्णानुभव । बोधें भरला दयार्णव । श्रवणें पर्वीं पुण्यवैभव । श्रोते सदैव लाहती ॥४१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽ‍ष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भौमासुरवधपार्यातहरणसुरमदक्षालनसशतषोडशसहस्रनृपकन्यापाणिग्रहणं नामैकोनषष्टितमोऽध्यायः ॥५९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४६॥ ओवी संख्या ॥७४१॥ एवं संख्या ॥७८७॥ ( एकोणसाठावा अध्याय मिळून ओवीसंख्या २८६३९ )

अध्याय एकोणसाठावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP