अध्याय ५९ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पाञ्चजन्यध्वनिं श्रुत्वा युगांताशनिभीषणम् । मुरः शयान उत्तस्थौ दैत्यः पंचशिरा जलात् ॥६॥
जलामाजि ज्याचें निलय । महाप्रतापी असुरवर्य । जो कां प्रळयरुद्रप्राय । पंचवदनी मुरनामा ॥३॥
कृष्णें जेव्हां पाञ्चजन्य । स्फुरिला चंडावेशें करून । तेणें दणाणिलें ब्रह्माण्डभुवन । मुर ऐकोन तो घोष ॥४॥
महर्युगाचे प्रलयकाळीं । संवर्तनामा धनमंडळीं । विद्युत्पतनगर्जनाशाळी । त्याहूनि आगळी भयंकर ॥२०५॥
पाञ्चजन्याची प्रचंड ध्वनि । मुरदैत्याचे पडतां श्रवणीं । उठिला परिखाजळापासूनि । पंचवदनी महादैत्य ॥६॥
ज्याचा आश्रय भौमासुरा । समरीं अजिंक अमरां असुरां । तेथ भूचरां पामरां नरां । दळणीं दरारा काय तया ॥७॥
तेणें परिसोनि शंखस्वना । केली प्रचंड गडगर्जना । जल सांडूनि पातला रणा । कुरुनररत्ना तें परिसें ॥८॥
त्रिशूलमुद्यम्य सुदुर्निरीक्षणो युगांतसूर्यानलरोचिरुल्बणः ।
ग्रसंस्त्रिलोकीमिवपंचभिर्मुखैरभ्यद्रवत्तार्क्ष्यसुतं यथोरगः ॥७॥
प्राग्ज्योतिषपुरावकाशीं । अकस्मात हृषीकेशी । गरुडारूढ तेजोराशि । सत्यभामेसीं देखिला ॥९॥
महाप्रलयींच्या सौदामनी । तैसीं आयुधें वसविलीं पाणीं । मुर देखूनि सक्रोध नयनीं । समप्रलयाग्नि प्रज्वळला ॥२१०॥
पडताळूनि प्रचंड त्रिशूळ । तुळिता जाला स्वबाहुबळ । युगान्तसूर्यप्रळयानळ । उल्बण प्रबळ तत्साम्य ॥११॥
भासुर भयंकर ज्याची वपु । कालाग्निरुद्रासमान कोपु । अमरां अशक्य समरीं दर्पु । पाहतां लोप सुरनयनां ॥१२॥
दुःखें न पाहवे ज्याकडे । कोण तयासि समरीं भीडे । त्रैलोक्य ग्रासील पांचही तोंडें । रोषें प्रचंडें उठावला ॥१३॥
खगेंद्रदळणा दंदशूक । क्रोधे धांवे जेंवि सम्मुख । गरुडारूढ त्रैलोक्यजनक । देखोनि सरोख उठावला ॥१४॥
आविध्य शूलं तरसा गरुत्मते निरस्यवक्त्रैर्व्यनदत्स पंचभिः ।
स रोदसी सर्वदिशोंऽबरं महानापूरयन्नंडकटाहमावृणोत् ॥८॥
तरसा म्हणिजे सवेग समरीं । शूळनिक्षेप गरुडावरी । करूनि गर्जना पांचही वक्त्रीं । करिता जाला भयंकर ॥२१५॥
पंचवक्त्रोद्भव गर्जना । सप्त पाताळें भूगोल गगना । पूर्ण करूनि दिक्कंकणा । ब्रह्मकटाह कोंदला ॥१६॥
तेणें सुरलोक हडबडी । पडली कृतान्ता झांपडी । एकवीस स्वर्गाच्या उतरंडी । पडों पाहती एकसरा ॥१७॥
ऐसा मुरदैत्याचा यावा । त्रिशूळें गरुड जंव भेदावा । कृष्णें हास्य करूनि तेव्हां । केलें लाघवा तें ऐका ॥१८॥
तदाऽऽपतद्वै त्रिशिखं गरुत्मते हरिः शराभ्यामभिनत्त्रिधौजसा ।
मुखेषु तं चापि शरैरताडयत्तस्मैं गदां सोऽपि रुषा व्यमुञ्चत ॥९॥
त्रिशूळें गरुड भेदे न भेदे । तंव शार्ङ्ग सज्जूनि गोविन्दें । दोहीं बाणीं छेदिला मध्यें । त्रिखण्ड करूनि पाडिला ॥१९॥
बाणपंचकें पांचां वदनीं । दैत्य विंधिला लीलेंकरूनी । तोही क्षोभला आवेशोनी । गदा घेऊनि उठावला ॥२२०॥
वज्रप्राय गदाप्रहार । येतां देखोनि गदाधर । गदाप्रहारें गदाप्रहार । वारिता जाला तें ऐका ॥२१॥
तामापतन्तीं गदया गदामृधे गदाग्रजो निर्बिभेदे सहस्रधा ।
उद्यम्य बाहूनभिधावतोऽजितः शिरांसि चक्रेण जहार लीलया ।
व्यसुः पपाताऽम्भसि कृत्तशीर्षो निकृत्तशृंगोऽद्रिरिवेन्द्रतेजसा ॥१०॥
दैत्यें प्रेरिली कठोर गदा । तिणें करितां हृदयभेदा । स्वगदेनें केली सहस्रधा । गर्जूनि जलदासम कृष्णें ॥२२॥
वृथा गेला गदाप्रहार । तेणें दैत्य क्षोभला थोर । बाहु उभारूनि सत्वर । कृष्णासमोर धांविन्नला ॥२३॥
त्रिजगज्जेता कृष्ण अजित । चक्र प्रेरूनि धगधगीत । पांचही शिरें सरसिजवत् । लीलालाघवें छेदिलीं ॥२४॥
शिरें छेदिलीं वरिच्यावरी । गर्जत भरलीं तीं अम्बरीं । कबन्ध पडलें जळान्तरीं । जैसा अद्रि वज्रहत ॥२२५॥
शिरें खण्डतां गेले प्राण । छिन्नशीर्ष प्राणविहीन । दैत्यकलेवर गिरिसमान । परिखा जीवनीं रिचवलें ॥२६॥
इन्द्र प्रतापें वज्रघातें । गिरिशृंग भंगी अवचितें । तें जेंवि समुद्रा आतौतें । पावे निघातें अधःपतन ॥२७॥
तैसा परिखाजळीं बळी । छेदूनि पाडिला जिये वेळीं । तेव्हां हाहाकार आरोळी । दैत्यमण्डळीं प्रवर्तली ॥२८॥
तें ऐकोनि त्यांचे सूत । त्यांहूनि प्रतापी अत्यद्भुत । क्षोभें उठिले ते मात । राया समस्त मुनि सांगे ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP