अध्याय ५९ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तस्याऽऽत्मजोऽयं पादपंकजं भीतः प्रपनार्तिहरोपसादितः ।
तत्पालयैनं कुरु हस्तपंकजं शिरस्यमुष्याखिलकल्मषापहम् ॥३१॥

शरणागताचा दुःखपरिहार । करी तो प्रपन्नार्तिहर । साभिप्राय जगदीश्वर । धरा मधुर संबोधी ॥४२०॥
भो भो प्रपन्नार्तिहरणा । नरकात्मज हा तुझिया चरणा । शरण पातला यावरी करुणा । करूनि सर्वज्ञें रक्षावा ॥२१॥
तस्यात्मज हा त्याचाचि पुत्र । म्हणूनि नरकाहूनि नरकतर । तरी हा तैसाचि हें साचार । तथापि विचार अवधारीं ॥२२॥
तुझिया काळचक्रापुढें । असुर प्रतापी न वाढे । गेले हिरण्याक्षाएवढे । किती ते तोंडें कोण वदे ॥२३॥
रज्तमात्मक आसुरी प्रकृति । सुरविरोधी जन्मप्रभृति । जातिनिसर्गें जे दुष्कृति । दैत्याराति तव नामें ॥२४॥
करिकेसरिनिसर्गवैर । धेनुव्याघ्र मत्स्यधीवर । धूर्तकुरंग बिडाळउंदिर । तैसा श्रीधर दैत्यारि ॥४२५॥
प्रत्यक्ष भौमासुरमर्दन । करूनियां मारिलें अपार सैन्य । मी तंव नरकाचा नंदन । मजलागून हरि कां न मरी ॥२६॥
सहजजातिनिसर्गवैर । विशेष शत्रूचा मी कुमर । मजला देखतांचि श्रीधर । करील संहार तत्काळ ॥२७॥
ऐसी भयाची कणकणी । पितृशोकार्त अंतःकरणीं । म्हणोनि म्यां तुझिये चरणीं । प्रविष्ट केला प्रपन्न ॥२८॥
तूं तंव प्रपन्नार्तिहर । हा तव बिरुदाचा बडिवार । तरी याचे मस्तकीं अभय कर । ठेवोनि किंकर पाळीं हा ॥२९॥
जन्मला नरकासुराच्या कुसीं । म्हणसी केवळ कल्मषराशि । तरी अभय हस्त त्वां ठेविजे शिशीं । अखिल अघांसी तूं हंता ॥४३०॥
तुझिया शंतम करारविंदें । पावन होती अधिष्ठवृंदें । यालागीं भगदत्त हा मुकुन्दें । अभयवरदें पाळावा ॥३१॥
मजवरी करूनि पूर्ण स्नेह । माझ्या तनयाचा हा तनय । वरदहस्तें देऊनि अभय । कृपानुग्रहें पाळावा ॥३२॥
बादरायणि म्हणे राया । हे भूप्रार्थना ऐकोनियां । भगदत्तावरी केली दया । परिसा तिया व्याख्याना ॥३३॥

श्रीशुक उवाच - इति भूम्याऽर्थितो वाग्भिर्भगवान्भक्तिनम्रया । दत्वाऽभयं भौमगृहं प्राविशत्सकलर्द्धिमत् ॥३२॥

इत्यादि मधुरवाणीकरून । धरादेवीनें श्रीभगवान । पूजिला भक्तिप्रेमें पूर्ण । कृपेनें सकर्ण कळवळिला ॥३४॥
धरादेवीनें धरूनि हातीं । बद्धाञ्जली विनीतभक्ति । नयन स्रवती अश्रुपातीं । सस्वेदकान्ति रोमाञ्चित ॥४३५॥
ऐसा भगदत्त कृष्णचरणीं । नेवोनि घालिती झाली धरणि । अभय देऊनि पंकजपाणि । स्पर्शोनि मूर्ध्नि उठविला ॥३६॥
भगदत्त म्हणे श्रीगोपाळा । मनुष्यनाट्यें दाविसी लीला । धर्मस्थापक सुरमुनिपाळा । अवतारमाळा युगीं युगीं ॥३७॥
भो भो सर्वात्मक सर्वगा । चराचरात्मा तूंचि अवघा । शत्रु मित्र सुरासुरवर्गा । भेदविभागा कैं ठाव ॥३८॥
तथापि धर्मोच्छेदक दैत्य । तद्वधाचें मुख्य कृत्य । यालागीं अवतार असंख्यात । सुरकार्यार्थ आंगविसी ॥३९॥
प्रकृतिजनित विरोधी गुण । दैवीसंपत्ति सुरगण । आसुरी आसुर राक्षस निर्घृण । धर्मोच्छेदनकारक जे ॥४४०॥
तूं उभयात्मक चैतन्य । नोहसी प्राकृत प्रकृतिगुण । तूं नेणसी भेदमान । अभेद पूर्ण जगदात्मा ॥४१॥
सत्वसंपत्ति देव भजती । रजतमें असुर विरोधिती । देहाभिमानें उत्पथमति । ते संहरती निजकर्में ॥४२॥
यास्तव माझी हे प्रार्थना । नैसर्गिकां असुरां गुणां । निरसोनि रक्षीं चरणशरणा । स्वदासगणांमाजी गणीं ॥४३॥
ऐसी ऐकोनि विनवणी । कृपेनें द्रवला चक्रपाणि । प्रेमें हृदयीं आलिंगूनी । स्पर्शिला मूर्ध्नि पद्मकरें ॥४४॥
म्हणे तुजला येथोनि अभय । इंद्रप्रमुख अमरवर्य । तुजसीं चालती पूर्णस्नेह । राहें निर्भय निज नगरीं ॥४४५॥
बोलावूनियां प्रजाजन । किंकरपार्षदसह प्रधान । भौमासुराचें भद्रासन । भगदत्तासी समर्पिलें ॥४६॥
मग तेणें वंदूनि भगवच्चरण । प्रार्थूनि प्रवेशवी भौमासन । म्हणे हें स्वामींचें ऐश्वर्य भुवन । अपेक्षित धन स्वीकीजे ॥४७॥
सकळ समृद्धिमंत गृह । नाहीं कोणाचा आग्रह । मजवरी करूनि पूर्ण स्नेह । वस्तुसमूह नेइजे ॥४८॥
भौमसदनीं श्रीभगवान । प्रवेशला देदीप्यमान । तेथ घेतल्या वस्तु कोण । तें संपूर्ण अवधारा ॥४९॥

तत्र राजेंद्रकन्यानां षट्सहस्राधिकायुतम् । भौमाहृतानां विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिः ॥३३॥

प्रधानामात्यपार्षदसचिव । किंकरवेष्टित वासुदेव । भौमगृहींच्या वस्तु सर्व । सादर स्वमेव अवलोकी ॥४५०॥
भगदत्ताचे आज्ञेवरूनी । गृहरक्षकीं उत्कीलनीं । पृथक पृथक कोष्ठश्रेणी । कपाटें उघडोनि दाविती ॥५१॥
अनर्घ्य रत्नें वैदूर्यमणि । जडित जाम्बूनदसुवर्णीं । दिव्य भूषणें त्वाष्ट्रघडणीं । भौमें स्वर्गौनि जियें हरिलें ॥५२॥
तिया विशाळा मंजूषा । उघडूनि दाविती हृषीकेशा । कें ते लक्ष्मीच सुरतावेशा । स्वकान्तेंसीं तनु प्रकटी ॥५३॥
अमूल्य विचित्रा वसनशाळा । अग्निधौता दिव्यदुकूळां । देखतां शक्रा सहस्रडोळां । झांपडी पडे ज्या तेजें ॥५४॥
चिंतामनि गुरुत्मन्ममणि । मुक्ता माणिक्य वैदूर्यमणि । नादवेधादि स्पर्शमणि । ललामश्रेणी बहुजाति ॥४५५॥
वज्र गोमेद पाच प्रवाळ । सद्गुणाढ्य इंद्रनीळ । शाळा उघडूनि रक्षकमेळ । दावूनि गोपाळ तोषविती ॥५६॥
ऐसी पाहतां भौमभुवनें । तेथ देखता झाला ललनारत्नें । भौमें संगृहिलीं प्रयत्नें । समराङ्गणें करूनियां ॥५७॥
राजे जिंकूनि राजतनया । शतोत्तर सोळा सहस्रें राया । भौमें ठेविल्या पर्णावया । शुभमुहूर्तीं एकसर्‍या ॥५८॥
तेथ तें ललनाललाभुवन । देखता झाला जगज्जीवन । कन्यारत्नीं पुरुषरत्न । नयनीं देखोन वेधलिया ॥५९॥
श्रोते शंका करिती येथ । शतोत्तर नाहीं श्लोकसंमत । तरी विष्णुपुराणीं प्रकट अर्थ । आजा बोलिला शुकाचा ॥४६०॥

विष्णुपुराणोक्तम् - कन्यापुरे सकन्यानां षोडशातुलविक्रमः । शताधिकानि ददृशे सहस्राणि महामते ॥

राजकन्या हें वदला शुक । परी त्या देवादिकांच्या सम्यक । तोही पराशरमुखींचा श्लोक । ऐकोनि निःशंक श्रवण कीजे ॥६१॥

देवसिद्धासुरादीनां नृपाणां च जनार्दन । हत्वा हिंस्रोऽसुरः कन्यारुरोध निजमंदिरे ॥

देवासुरगंधर्वराजा । सिद्धचारनमनुष्यराज । एवं राजकन्याचि त्या सहज । प्रतापपुंज भौम हरी ॥६२॥
त्यांतें देखतां गरुडध्वजें । तेव्हां त्यांचीं हृदयकंजें । फुल्लारमान झालीं वोजें । तें कुरुराजे परिसावें ॥६३॥

तं प्रविष्टं स्त्रियो वीक्ष्य नरवीरं विमोहिताः । मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ॥३४॥

आधींच उपवर कन्यारत्नें । विशेष दिअत्यें रोधिलीं यत्नें । तेथोनि सुटिकेच्या प्रयत्नें । सांडविलीं जीं दुःखार्तें ॥६४॥
तेथ अवचित नरवीररत्ना । दैवें पाहती त्यांचे नयन । म्हणती प्रविष्ट झाला कोण । लावण्यभुवन ये ठायीं ॥४६५॥
मनेंकरूनि तिहीं वरिला । म्हणती दैवें प्राप्त केला । आम्हां हा अभीष्ट पति जोडला । तरी तुष्टला जगदीश ॥६६॥

भूयात्पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम् । इति सर्वाः पृथक् कृष्णे भावेन हृदयं दधुः ॥३५॥

मजकारणें हा अभीष्ट पति । दैवें अनुकूळ जरी यदर्थीं । विधिही प्रेरक हो याप्रति । ऐशा भाविती पृथक्पृथक् ॥६७॥
सप्रेम आस्तिक्यभावें करूनी । आपुलाल्या अंतःकरणीं । कृष्ण वरिती अवघ्या जणी । म्हणती भवानी तुष्टो कां ॥६८॥
माता पिता तुटला आम्हां । वरपड्या झाल्या होतों भौमा । कृपा आली पुरुषोत्तमा । तरी नरललामा योजियलें ॥६९॥
म्हणती मनोरथा पावो सिद्धी । यदर्थीं साह्य हो कां विधि । ऐसी जाणोनियां तयांची बुद्धि । करुणानिधि कळवळिला ॥४७०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP