अध्याय ५८ वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नवनागसहस्राणि नागाच्छतगुणान्रथान् । रथाच्छतगुणानश्वानश्वाच्छतगुणान्नरान् ॥५१॥

भूमंडळींचा पुरंदर । यालागिं क्षीरोद्भव कुंजर । जिणती तैसे नव सहस्र । सालंकार गज दिधले ॥५४॥
कुंजरां शतगुणें रहंवर । कनकाम्बरीं कृतगुढार । रत्नखचित राजेश्वर । देता जाला नव नियुतें ॥४५५॥
गगनगामी तुरंगरत्नें । हेमललाममय पल्याणें । रथसंख्येचिया शतगुणें । आंदणा दिधलीं नव कोटी ॥५६॥
अश्वां शतगुणीं पदातिवीर । तरुण सगुण सुंदर चतुर । दिव्याम्बरीं सालंकार । दिधले किंकर नवार्बुदें ॥५७॥
शिबिरें जवनिका अंतःपट । दिव्यासनें भाजनें श्रेष्ठ । सुगंध द्रव्यें रसस्वादिष्ट । शाकटी शकटीसह उष्ट्र ॥५८॥
पारिबर्ह ऐसियापरी । राजा वधूवरां अर्पण करी । मग नोवरी घेऊनियां मुरारि । गेला गजरीं निजशिबिरा ॥५९॥
राजपत्न्यांसहित नृपति । सुहृदां आप्तां नागरां युवती । मूळ वर्‍हाडी रथ पदाति । शिबिरा जाती वोळवित ॥४६०॥
तेथ समस्तां बहु सम्मान । उपायनें समर्पून । सुमनें सुगंध ताम्बूलदान । प्रार्थना करून बोळविले ॥६१॥
कृष्णें प्रार्थितां भोजनाप्रति । कोशलरायें केली विनति । पुत्र प्रसवेल नाग्नजिती । तैं देइजे पंक्ती निजशेष ॥६२॥
वेदमर्यादा जाणोनि हरि । भोजनाचा आग्रह न करी । नोवरी घेऊनि सहपरिवारीं । द्वारके मुरारि चालिला ॥६३॥
कुंजरभेरीच्या संकेतीं । सेना सन्नद्ध जाली निगुती । वीर वळघले अश्वीं रथीं । द्वारकापंथीं चमू चाले ॥६४॥
कोशलपति निज सेनेसीं । बोळवावया वधूवरांसीं । जाता जाला द्वारकेसी । आहलादेंसीं हरिसंगें ॥४६५॥

दंपती रथमारोप्य महत्या सेनया वृतौ । स्नेहविक्लिन्नहृदयो यापयामास कोशलः ॥५२॥

रथीं बैसवूनियां दंपती । प्रबळसेनावेष्टित भोंवती । स्नेहाविष्ट कोशलपति । द्रवला चित्तीं ते काळीं ॥६६॥
नाग्नजितीचा वियोगखेद । कीं कृष्णलाभाचा परमानंद । उभययोगें न वदे शब्द । पुशी बाष्पोद पुनःपुन्हा ॥६७॥
छत्रचामरें आतपत्रें । ध्वजा झळकती दिव्यांबरें । दुंदुभिप्रमुखवाद्यगजरें । जातां सामोरे द्विज आले ॥६८॥
स्वर्चित सुस्नात कुसुमपाणि । अनुवादती मंगळवाणी । वधूवरांतें आशीर्वचनीं । गौरविती ते द्विजवर्य ॥६९॥
पुरंध्री भेटल्या पूर्णकलशीं । बल्लव बल्लवीसह गोरसीं । चास नकुळ वामदेशीं । भारद्वाजेंसिं पैं गेले ॥४७०॥
आज्ञा मागोनि कोशलपति । मूळ वर्‍हाडी स्वपुरा जाती । यादव चालतां द्वारकापथीं । वर्तला ख्याति तें ऐका ॥७१॥

श्रुत्वैतद्रुरुधुर्भूपा नयंतं पथि कन्यकाम् । भग्नवीर्याः दुर्मर्षा सुयदुभिर्गोवृषैः पुरा ॥५३॥

नाग्नजितीच्या लावण्यरूपा । ऐकोनि अवस्था लागली भूपां । तिहीं पूर्वीं वृषभदर्पा । दमितां संतापा पावले ॥७२॥
वृषभ दमितां पावले भंगा । विषाणप्रहारीं भेदले अंगा । लज्जित होऊनि गेले मागां । तिहीं या प्रसंगा ऐकोनी ॥७३॥
कृष्णें सप्त वृषभ दमिले । नाग्नजितीतें प्रतापें वरिलें । हें ऐकोनि विषादा चढिले । रोधिते जाले मार्गातें ॥७४॥
पूर्वीं वैदर्भीच्या हरणीं । यादवीं भंगिले समराङ्गणीं । जरासंधाच्या साह्याचरणीं । त्रासिले रणीं यदुसुभटीं ॥४७५॥
भग्नवीर्य नग्न उघडे । निर्लज्ज पळाले यादवांपुढें । सप्त वृषभीं मोडिलीं हाडें । वधूचे चाडे तिहीं पुढती ॥७६॥
राठापुरीच्या पश्चिमदेशीं । निर्जळमरुमंडळप्रदेशीं । बळें नोवरी हारावयासी । मार्ग रोधूनि राहिले ॥७७॥
पूर्वीं भंगले होते जितुके । समानदुःखी मिळोनि तितुके । कन्या नेतां यदुनायकें । दुर्मर्ष तवकें उठावले ॥७८॥
घ्या घ्या म्हणोनि यादवभारीं । रिघोनि करिती मारामारी । एक वर्षंती बाणधारीं । एक शस्त्रास्त्रीं भिडताती ॥७९॥
भिंडिपाळांचे गुंडेमार । अग्नियंत्रें सुटती क्रूर । बिकट मार्ग रोधूनि शूर । पायभार स्थिरावले ॥४८०॥
ठायीं ठायीं झाडोझाडीं । राहूनि लोटिती प्रचंड धोंडी । घ्या घ्या मारा म्हणती तोंडीं । यादवें बापुडीं सांपडलीं ॥८१॥
आजिचा समय फावला आम्हां । जीत धराया मेघश्यामा । नाग्नजितीचा धरिला प्रेमा । तेणें संग्रामा वरपडला ॥८२॥
आतां जाईल कोणीकडे । पडला बलिष्ठाचिये दाढे । कोशलपतिही बापुडें । सौहार्दभिडे सांपडलें ॥८३॥
नोवरी हिरोनि धरा हरि । नेऊनि मागधाचिये नगरीं । उमचा मागील समरहारी । म्हणोनि शस्त्रास्त्रीं वर्षती ॥८४॥
जैसे दरवडेकरी चोर । दुष्ट दुर्मद लहान थोर । वस्त्राहरणासि तत्पर । तेंवि पामर संघटती ॥४८५॥
यादवांचें सन्नद्ध सैन्य । अग्रभागीं वीर अर्जुन । पार्ष्णिरक्षक तो युयुधान । गान्दिनीनंदन सव्यपार्श्वीं ॥८६॥
वामपार्श्वीं उद्धव वीर । मध्यें कोशल आणि श्रीधर । अष्टौ भागीं यदुकुमार । धीर गंभीर प्रतापी ॥८७॥
ऐकोन परिवीरांची हाक । यादव उठावले निःशंक । घृतावदानें जेंवि पावक । तेंवि सम्मुख चौकटले ॥८८॥
पर्वताचिये अवघड संधीं । मार्ग रोधूनियां दुर्मदीं । बाण वर्षतां विशालबुद्धि । बीभित्सु युद्धीं उठावला ॥८९॥

तानस्यतः शरव्रातान्बंधुप्रियकृदर्जुनः । गांडिवी कालयामास सिंहः क्शुद्रमृगानिव ॥५४॥

सोयरा म्हणिजे सुहृदा बंधु । त्या कृष्णातें करावया मोदु । फाल्गुन करिता जाला युद्धु । तो प्रबंधु अवधारा ॥४९०॥
मार्ग रोधूनि बळिष्ठ वैरी । वर्षत असताझं बाणधारीं । अर्जुनें तोषूनि अभ्यंतरीं । गांडीव करी ज्याबद्ध ॥९१॥
प्रळयवातें भंगती मेघ । तेंवि पार्थाचे शर अमोघ । शत्रुसैन्या केला भंग । सोडूनि मार्ग ते पळती ॥९२॥
आकर्ण गांडिवाकृष्ट बाणीं । रणा आणिल्या वीरश्रेणी । पुढें समरीं न थरे कोण्ही । प्राण घेऊनि पळाले ॥९३॥
जेंवि लोटतां मृगनायकें । लपती पळती जंबुकें शशकें । अजसम गजादि स्वापदें मशकें । तेंवि क्षुल्लकें भयभीत ॥९४॥
भग्नवीर्य नृपांच्या थाटी । पळती समरीं देऊनि पाठी । यादव प्रतापी महाहठी । त्यांतें लुंठिती विजयार्थ ॥४९५॥
जिंकिले अश्व रथ कुंजर । कित्तेक जीत धरिले वीर । सामान्य पदातियांचा भार । वोझीं देऊनि चालविले ॥९६॥
कित्तेक तृणें धरिती दांतीं । प्राणदाना एक मागती । एकीं भेदरा घेतला चित्तीं । उदो म्हणती जीवभयें ॥९७॥
वस्त्रें हिरतल्या नागव्या झुंडी । वोडणाची करूनि परवडी । खङ्ग दिवटी उदो तोंडीं । म्हणती नव खंडीं फिरों भूतें ॥९८॥
साधुनिंदा घडली मुखें । श्वान म्हणविती तया दोषें । भुंकभुंको नाचती सुखें । एळकोटघोषें गर्जोनी ॥९९॥
प्राण वांचवावया रणीं । एक म्हणविती दिंडिगाणी । भस्मोद्धूलनीं शंखस्फुरणीं । पाषाण मूर्ध्नीं एक वाहती ॥५००॥
एक उताणें पदले पंथीं । नेत्रीं घालूनि अपयशमाती । अंध पंगू म्हणविताती । मुखें गर्जती धर्म जागो ॥१॥
ऐसे असंख्य वेषधारी । प्राणरक्षणें परोपरी । भराडे बाळसंतोष भिकारी । बहुधा शरीरीं नट नटले ॥२॥
दीनाहूनि दीन फकीर । पोटासाठीं दारोदार । कंठशोषें करिती किरकिर । केंवि दुस्तर निस्तरवे ॥३॥
शौर्य हारपोनि गेलें समरीं । पुरुषार्थभंगें म्हणविती नारी । सौर्‍या नाचती देऊनि फेरी । श्मश्रु वक्त्रीं लाजविती ॥४॥
ऐसियांतें यादववीर । सोडिती देऊनि नभीकार । पाखंडवेषें भरूनि उदर । लज्जित स्वपुरें प्रवेशती ॥५०५॥
कैंची नोवरी कैंचें यश । हारविले गजरथाश्व निःशेष । नागवे उघडे देशोदेश । पावोनि अपयश रिपु गेले ॥६॥
कृष्णें अरिली विजयलक्ष्मी । यादव यशस्वी संग्रामीं । भगवत्प्रताप भरला व्योमीं । हेमललामीं गज भरिले ॥७॥
परमानंदें चढले घाट । रथ चालती घडघडाट । महावाद्यांचा बोभाट । पढती भाट जयबिरुदें ॥८॥
श्वफल्कप्रमुख यादवश्रेष्ठ । येतां देखूनि श्रीवैकुंठ । त्यातें भेटूनि रथोपविष्ट । होऊनि संतुष्ट चालिले ॥९॥
लंघूनियां साभ्रमती । पुढें ठाइली द्वारावती । वार्ता ऐकोनि रेवतीपति । नृपसंकेतीं पातला ॥५१०॥
महाद्वारीं दंपतीवरूनी । बळी सांडिले वोवाळूनी । विप्रां रत्नांजलि अर्पूनी । सभास्थानीं प्रवेशले ॥११॥
भद्रासनीं उग्रसेन । प्रमुदित दंपती लक्षून । कृष्णप्रमुखां आलिंगून । सदनालागून पाठविले ॥१२॥
पारिबर्ह कोशलदत्त । नृपा अर्पूनि केलें विदित । उग्रसेनें तें समस्त । देऊनि भगवंत गौरविला ॥१३॥
कोशलपतीतें आलिंगन । देवक वसुदेव उग्रसेन । स्नेहसंभ्रमें देती जाण । म्हणती धन्य तव योगें ॥१४॥
येरु चरणीं घाली मिठी । म्हणे मज विलोका कृपादृष्टी । तुमच्या सौजन्यें भूपृष्ठीं । सनाथ जालों स्वामियां ॥५१५॥
परस्परीं मधुरोत्तरीं । स्नेह वर्षती अमृतधारी । नृपाची आज्ञा घेऊनि हरि । पारिबर्हेंशीं निघाला ॥१६॥

पारिबर्हमुपागृह्य द्वारकामेत्य सत्यया । रेमे यदूनामृषभो भगवान्देवकीसुतः ॥५५॥

आंदणा नाम पारिबर्ह । कोशलें दीधलें तितुकें सर्व । घेऊनियां वासुदेव । निजभुवनाप्रति पातला ॥१७॥
सत्या म्हणिजे नाग्नजिती । तिच्या ठायीं परमप्रीति । विशेष कोशलनृपाची भक्ति । तिणें श्रीपति वश केला ॥१८॥
जो कां देवकीचा तनय । ज्याचें अचिंत्य गुणैश्वर्य । यदूंमाजि ऋषभ जो यदुवर्य । सत्याप्रिय तो जाला ॥१९॥
चैत्ररथादि नंदनवनीं । अमरेन्द्र क्रीडे सह इंद्राणी । सत्यासमवेत चक्रपाणि । द्वारकाभुवनीं तेंवि रमे ॥५२०॥
सत्यारहित श्रीभगवंत । निमेष नोहे असत्यावृत । यालागिं सदैव सत्यायुक्त । क्रीडे त्रिजगांत जगदात्मा ॥२१॥
लोकरयीं अपूर्व वस्तु । सत्येकारणें दे भगवंत । मनीं असमायी वृत्तान्त । तो एकान्त सत्येसीं ॥२२॥
माशब्दें जे निषेधोक्ति । मिथ्या माया अविद्याभ्रान्ति । तीतें विसरोनियां श्रीपति । रमी एकान्तीं सह सत्या ॥२३॥
एवं श्रीकृष्ण सत्यारमण । त्यासि नावडे असत्य भान । सत्या प्रियतम जीवप्राण । श्रोते सज्ञान जाणती ॥२४॥
ऐसें कथिलें विवाहषट्क । यावरी सप्तमाचा विवेक । सावध होऊनि नावेक । श्रोतीं सम्यक परिसावा ॥५२५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP