अध्याय ५८ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एकदा पाण्डवान्द्रष्टुं प्रतीतान्पुरुषोत्तमः । इंद्रप्रस्थं गतः श्रीमान्युयुधानादिभिर्वृतः ॥१॥

राया अठ्ठावन्नीं कथा । पंच पाणिग्रहणें कर्ता । जाला श्रीकृष्ण तत्वता । ते तूं वार्ता अवधारीं ॥७॥
कालिंदीच्या पाणिग्रहणा । हृदयीं चिंतूनि द्वारकाराणा । गेला पाण्डवांचिया दर्शना । सवें युयुधाना घेऊनि ॥८॥
कालिंदीचा उद्वाहकाम । किमर्थ चिंती मेघश्याम । तरी तो स्वजनकल्पद्रुम । जाणोनि प्रेम तयेचें ॥९॥
असो हें प्रसंगें येईल पुढें । प्रस्तुत पाण्डवदर्शनचाडे । गेले इंद्रप्रस्थाकडे । तेंचि निवाडें अवधारा ॥१०॥
रुक्मिणी आणि जाम्बवती । तृतेय सत्यभामा युवती । तद्विलासप्रेमासक्ति । लालस श्रीपतिरतिरसिका ॥११॥
आहुकभूपासन्निधानें । सुखोपविष्ट सभास्थानीं । स्वधर्मचर्चापुण्यश्रवणीं । चक्रपाणि वर्ततसे ॥१२॥
उखामंडळीं मृगयामिषें । भोजान्धकवृष्णिसरिसे । भ्रमण करितां सुखसंतोषें । मुनिमानसें प्रोत्साही ॥१३॥
ऐसा आनंदभरित काळ । क्रमित असतां श्रीगोपाळ । तंव आठवला पुण्यशीळ । हृदयकमळीं युधिष्ठिर ॥१४॥
मग कोण्हे एके सुदैव दिवसीं । पाण्डवप्रेमें हृषीकेशी। जाकळूनि त्यां देखावयासी । इंद्रप्रस्थासी चालिला ॥१५॥
प्रेमें जाकळावया कारण । जे लाक्षागारीं पाण्डवां मरण । तेचि प्रकटले पुन्हां वांचोन । पाञ्चाळभुवनीं अकस्मात ॥१६॥
द्रौपदीचिये स्वयंवरीं । प्रकट जाले पाञ्चाळपुरीं । यंत्र भेदूनि राजे समरीं । जिणोनि नोवरी परणिले ॥१७॥
कौरवांचा भंगिला दर्प । दाविला भूचक्रीं प्रताप । इंद्रप्रस्थीं युधिष्ठिर नृप । गृहस्थ होऊनि नांदतसे ॥१८॥
ऐसिया पाण्डवांतें श्रीपति । पहावयाकारणें सप्रेमप्रीति । सात्यकिप्रमुख वाहिनेपति । दारुक सारथि रथ सज्जी ॥१९॥
शुभमुहूर्तीं द्वारकापुर । सोडूनि निघाला जगदीश्वर । वामभागीं चास मयूर । जातां सूचिती शुभ शकुन ॥२०॥
दक्षिणभागीं सवत्स धेनु । स्वर्चित ब्राह्मण प्रसन्नवदन । भेटले तिहीं आशीर्वचन । देऊनि कल्याण इच्छिलें ॥२१॥
कुंजरपृष्ठीं प्रस्थानभेरी । भ्रूसंकेतें ठोकिल्या गजरीं । जननीजनकां भूपा हरि । नमूनि रहंवरीं आरूढले ॥२२॥
लंघूनि साब्रमतीचें जळ । पुष्करतीर्थीं श्रीगोपाळ । तीर्थविधानें क्रमूनि काळ । मथुरामंडळ ठाकिलें ॥२३॥
तेथूनि पातले पुरंदरप्रस्था । गजभेरीचा ध्वनि ऐकतां । युधिष्टिरराया किंकरीं वार्ता । निवेदन करितां जाणवला ॥२४॥
भीमार्जुनयुधिष्ठिर । सहित माद्रीचेही कुमर । वार्ताश्रवणं अतिसत्वर । कैसे उठिले तें ऐका ॥२५॥

दृष्ट्वा तमागतं पार्था मुकुंदमखिलेश्वरम् । उत्तस्थुर्युगपद्वीराः प्राणा मुख्यमिवाऽऽगतम् ॥२॥

एकेचि समयीं पांचही वीर । वळघोनि उत्तुंग गोपुर । समीप देखोनियां श्रीधर । धांविले सत्वर सामोरे ॥२६॥
अवयव इंद्रियें पंचप्राण । उपरम पावतां विश्वाभिमान । असतांही सचेतन । वृत्तिशून्य तीं आघवीं ॥२७॥
कीं मुख्यविश्वाभिमानागमनें । होतीं सर्वही सचेतनें । स्वव्यापारीं प्राणकरणें । तच्चैतन्यें प्रवर्तती ॥२८॥
तेंवि अखिलात्मा अखिलेश्वर । मुकुंद सुखकंद श्रीधर । तदागमनें अतिसत्वर । उठिले कुमर पाण्डूचे ॥२९॥
चंद्रें अधिष्ठितां उदयाद्रि । सिंधुजळ धांवे सामोरी । तेंवि पाण्डव पादचारी । सेविती हरि अभिगमनें ॥३०॥
पांचही बंधु एकेचि समयीं । देखोनियां शेषशायी । कैसे भेटते जाले तेंही । श्रवणालयीं निवेदितों ॥३१॥

परिष्वज्याच्युतं वीरा अंगसंगहतैनसः । सानुरागस्मितं वक्त्रं वीक्ष्य तस्य मुदं ययुः ॥३॥

रथीं असतां जनार्दन । सर्वीं करूनि अभिवंदन । सप्रेम प्रीती हास्यवदन । अवलोकून निवाले ॥३२॥
युधिष्ठिराचिया आगमनीं । रथावरूनि चक्रपाणि । भेटता जाला उतरूनि धरणी । पाहूनि नयनीं संतुष्ट ॥३३॥
अच्युतातें आलिंगून । पाण्डव निवाले संपूर्ण । जालें पापांचें क्षालन । असंगांगसंस्पर्शें ॥३४॥
तिये भेटीचा विचार । यथाशास्त्र वृद्धाचार । तो तूं ऐकें सविस्तर । श्रवणीं सादर होऊनी ॥३५॥

युधिष्ठिरस्य भीमस्य कृत्वा पादाभिवंदनम् । अर्जुन परिरभ्याथ यमाभ्यां चाभिवंदितः ॥४॥

युधिष्ठिरासह भीमाचे । कृष्णें चरण वंदिले साचे । समनवयस्का अर्जुनाचें । हृदय हृदयीं आळंगिलें ॥३६॥
माद्रीतनय चरणांवरी । मस्तक ठेवूनि नमिती हरि । कृष्णें स्पर्शोनि शंतमकरीं । अतिसत्वरी ऊठविले ॥३७॥
कृष्णदर्शनें मोदावाप्ति । संस्पर्शनें अघनिवृत्ति । मग भेटले सप्रेम भक्ति । युयुधानादि अनुगांतें ॥३८॥
बैसूनियां एके रथीं । नगरीं चालतां राजपथीं । पुढें नगरजनांच्या पंक्ति । हरि अर्चिती सप्रेमें ॥३९॥
कुर्वंडूनि सांडिती बळी । साष्टांग नमिती भूमंडळीं । गीतनृत्यांची धुमाळी । वाहूनि टाळी हरि स्मरती ॥४०॥
बहुविध वाद्यें दोहींकडे । सप्रेमदर्शनाचिये चाडे । लोक दाटतां पुढें पुढें । वेत्रपाणि निवारिती ॥४१॥
ऐसिया परी परमोत्साहीं । सदना नेऊनि शेषशायी । पाण्डव करिते जाले कायी । तें तूं नवायी अवधारीं ॥४२॥

परमासनमासीनं कृष्णा कृष्णमनिन्दिता । नवोढा व्रीडिता किंचिच्छन्नैरेत्याभ्यवन्दत ॥५॥

परमषेष्ठ दिव्यासन । तेथें बैसविला भगवान । येर यादव सह युयुधान । सभास्थानीं बैसविले ॥४३॥
लावूनि अंतर्धानपट । पांचही बंधु कृष्णानिकट । याज्ञसेनी अंतर्निष्ठ । येती जाली हरिनमना ॥४४॥
कृष्णा म्हणिजे याज्ञसेनी । अनिंदिता या विशेषणीं । विशेषिली काय म्हणोनी । तें सज्जनीं परिसावें ॥४५॥
पांचा बंधूंसि भार्या एकी । निर्दोष सुस्नात अग्निमुखीं । यास्तव निंदेच्या कलंकीं । कोण्ही न नोकी जगत्त्रयीं ॥४६॥
ऐसी द्रौपदी नव नोवरी । पाण्डवें सहित देखोनि हरि । किंचित् व्रीडिता स्वशरीरीं । आली बाहेरी मंदगती ॥४७॥
आच्छादूनियां अंगयष्टि । श्रीकृष्णाचे चरण दृष्टी । नमिती जाली ते गोरटी । उत्साह पोटीं मानूनी ॥४८॥
द्रौपदी कृष्णासि बोलावया । कांहीं संकोच करील राया । म्हणोनि यादवां पूजावया । पाण्डवीं सपर्या आणिली ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP