मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर राजोवाच - कोऽन्यस्तेऽभ्यधिको नाथ कन्यावर इहेप्सितः । गुणैकधाम्नो यस्यांगे श्रीर्वसत्यनपायिनी ॥४१॥अचिंत्यगुणांचें एकातयन । लक्षूनि विश्वश्री आपण । आंगीं वसते अपायविहीन । संतोषोनियां सर्वस्वें ॥२७॥ऐसिया तुजहूनि अधिकतर । भो भो नाथ श्रेष्ठवर । कोण अन्य असे प्रियकर । हें तूं अंतर जाणसी ॥२८॥इह म्हणिजे या भूमंडळीं । कन्येसि ईप्सित नृपवरमौळी । ऐश्वर्यसंपन्न सद्गुणशाळी । कोण वनमाळी तुजहूनी ॥२९॥राज्यलक्ष्मीसी भुलती जन । ते लक्ष्मी भुलोनि सेवी चरण । यालागीं तुजहूनि कोण आन । असे संपन्न श्रेष्ठ वर ॥३३०॥यावरी तूं जरी म्हणसी हरि । कन्या अर्पिजे विवाहगजरीं । यदर्थीं नियमाच्या उत्तरीं । समय मुरारि म्यां केला ॥३१॥कोण नियम कैसा समय । तो तुज कथितों परिसता होय । जाणती भूमंडळींचे राय । दुर्घट काय तें ऐक ॥३२॥किं त्वस्माभिः कृतः पूर्वं समयः सात्वतर्षभ । पुंसां वीर्यपरीक्षार्थ कन्यावरपरीप्सया ॥४२॥तव दर्शना पूर्वीं आम्हीं । प्रतिज्ञासमय केला नियमीं । किमर्थ तो ही सात्वतस्वामी । तां हृत्पद्मीं विवरावा ॥३३॥आम्हां क्षत्रियांचा हा धर्म । वीर्यशौर्यपरीक्षाकाम । स्वयंवरीं करूनि दुर्घट नियम । कन्याललाम मग द्यावें ॥३४॥कन्येयोग्य इच्छूनि वर । पुरुषपरीक्षेकारणें घोर । प्रतिज्ञा केली म्यां दुर्धर । ते तूं सादर अवधारीं ॥३३५॥सप्तैते गोवृषा वीर दुर्दांता दुरवग्रहाः । एतैर्भग्ना सुबह्वो भिन्नगात्रा नृपात्मजाः ॥४३॥ऐसें म्हणोनि श्रीकृष्ण हातीं । धरूनि उठिला कोसलनृपति । माडियेवरूनि तया प्रति । वृषभशाळा दाखविली ॥३६॥सातही वृषभ कृतान्तकल्प । अपेट अशिक्षित दुर्दर्प । यांतें दमावया अनाटोप । भंगिले नृप बहु यांहीं ॥३७॥कारुष कलिंग नेपाळ । तेलंग तिगळ मल्याळ चौळ । टंकण कोंकण वळित मावळ । महाराष्ट्र केरळ मत्स्यादि ॥३८॥पुन्नाट कर्णाट पुलिंद द्रविड । आंध्र वैदर्भ पांचाळ पाण्ड्य । चैद्य मागध नैषध गौड । मालव प्रचंड विंधादि ॥३९॥मद्रसैन्धवादि काश्मीर । कच्छ बर्बर गुर्जर अपर । हैहय केकय इत्यादि थोर । नृपकुमार भंगियले ॥३४०॥विषाणप्रहारीं भेदिलीं गात्रें । थदका मारूनि चूर्ण शरीरें । होऊनि नृपात्मज माघारे । गेले काविरें घेऊनियां ॥४१॥ऐशा नृपसुतांच्या गति । ऐकोनि कन्यावरणीं पुढती । कोण्ही हांव न धरिती चित्तीं । समय श्रीपति तो ऐसा ॥४२॥न दमितां हे वृषभ सप्त । कन्या अर्पूं मानूनि आप्त । तरी प्रतिज्ञाभंगदोषें लिप्त । हें गुज गुप्त तुज कथितों ॥४३॥प्रतिज्ञाभंग न घडे मज । जामाता जोडे गरुडध्वज । कन्यामनोरथ पुरती सहज । तैं नाचेन भोज आनंदें ॥४४॥मत्कृतसमयभंग न पवे । कन्यामनोरथ सफल व्हावे । भीड सांडूनि ऐसिया भावें । बोलता जाला कृष्णेंसीं ॥३४५॥यदि मे निगृहीताः स्युस्त्वयैव यदुनंदन । परो भवानभिमतो दुहितुर्मे श्रियःपते ॥४४॥भो भो यदुकुळनंदना । तूं या वृषांच्या करिसी दमना । तरी मी अर्पीन कन्यारत्ना । जे सोयरा जुना जुनाट ॥४६॥माझिये कन्येसि अभिमत वर । तूं एक सर्वज्ञ जगदीश्वर । तुझिये परीक्षेचा विचार । न लगे इतरां सम करणें ॥४७॥जे श्री ईश्वरातें जन्मवी । सर्वज्ञत्वादि लेणें लेववी । पुढती थापटुनियां निजवी । कैवल्यपदवीमाजिवडी ॥४८॥ते पूर्णश्रियेचा तूं पति । सामान्य श्रिया दास्य करिती । कन्या अर्पितां त्या तुज प्रति । पूर्वज नाचती आनंदें ॥४९॥माझे पुरवूनि मनोरथ । मत्कन्येचे पुरविजे आर्त । वृषभ दमूनि मम जामात । होऊनि सनाथ मज कीजे ॥३५०॥ऐसी सप्रेम नृपाची वाणी । ऐकोनि ऊठिला चक्रपाणि । कुरुकंजारप्रबोधतरणि । ते तूं श्रवणीं अवधारीं ॥५१॥एवं समयमाकण्यं बध्वा परिकरं प्रभुः । आत्मानं कृत्वा न्यगृण्हाल्लीलयैव तान्॥४५॥ऐसा प्रतिज्ञासमयनिगम । श्रवण होतांचि पुरुषोत्तम । कंचुकपल्लवीं परिकरोत्तम । बांधोनि सन्नद्ध जाहला ॥५२॥कास कासिली मालगांठी । मस्तकीं बांधली वीरगुंठी । माळा खोवूनियां परवंटी । स्वयें जगजेठी उठावला ॥५३॥सभागारीं वर्तली कथा । अंतःपुरीं हे ऐकोनि वार्ता । नोवरीसहित नृपाच्या कांता । गवाक्षपथें विलोकिती ॥५४॥सूक्ष्म रंध्रीं जालांतरीं । सादर पाहती नृपाच्या नारी । तंव राजाज्ञेच्या संकेतसूत्रीं । वृषभ किंकरीं चेतविले ॥३५५॥वृषभशाळेचें कपाट मुक्त । करूनि धुडाविले उन्मत्त । बाहेरी लोटले अकस्मात । जेंवि कृतान्त प्रळयान्तीं ॥५६॥कौतुक पहावया नागरजनीं । सभा घनवटली उच्चस्थानीं । भवतीं कपाटें पिहित करूनी । वृषभ प्राङ्गणीं शोभविले ॥५७॥निर्बीज अग्नियंत्राचे कडके । पटह दुंदुभि वाद्यें अनेकें । वीर गर्जना करिती मुखें । सामान्य लोकें संत्रस्त ॥५८॥व्याघ्राजिनें वंशयष्टि । लंबाळ बांधोनि वृषभा दृष्टि । दावितां बावरे जाले हट्टी । महाफुंफाटीं उठावती ॥५९॥मही उकरिती पुढिला चरणीं । उलथूं पाहती तीक्ष्ण विषाणीं । व्याघ्रचर्मांची पडतां घाणी । बळें क्षोभोनि फुंपाती ॥३६०॥क्षणक्षणा मूत्र पुरीष । करिती दुर्दान्त सप्त वृष । तद्दमनार्थ महादावेश । धरूनि परेश उठावला ॥६१॥नोवरी मानसीं नवस करी । शिव भवानी कुळेश्वरी । मज पावो ये अवसरीं । विजयी हरि हो वृषदमनीं ॥६२॥अगा सवितया भास्करा । विश्वचक्षु विश्वंभा । धांवें पावें इंदिरावरा । कृष्ण नोवरा मज योजीं ॥६३॥अनेकजन्मान्तरींचें पुण्य । व्रत तप दानें अनुष्ठान । सफळ हो कां मजलागून । यदुनंदनवरलाभें ॥६४॥नोवरीचे संकल्प ऐसे । जाणोनि हृदयस्थें परेशें । वृषभदमना परमोल्लासें । उडी घातली सभाङ्गणीं ॥३६५॥अरिष्ट दमिता जो श्रीपति । आपुल्या करूनि सप्तधा मूर्ति । तैसाचि सप्त वृषभांप्रति । निग्रही निगुती लीलेनें ॥६६॥धुधुवत विखार काळियाना । प्रळयकाळचि सकळा जना । गारुडी कंठीं घालूनि वसना । समान मिरवी कीं न अहो ॥६७॥व्याघ्रादि क्रूर श्वापदजाति । साबरमंत्रें अभिमंत्रिती । श्रवणीं धरूनि नाचविती । सर्वांप्रति हें विदित असो ॥६८॥ऐशा सामान्य मनुजापासीं । कृत्रिम कौशल्यांचिया राशि । हा तों हृदयस्थ हृषीकेशी । चराचरांसि चेतविता ॥६९॥मशक मेरूहूनि घनवट । मेरु मशकाहूनि फळकट । स्वसत्ता कर्त्ता वैकुंठपीठ । त्या दुर्घट हें काय ॥३७०॥सर्व जनासि नयनानंद । कर्ता श्रीहरि परमानंद । लीलेकरूनि सप्त बलिवर्द । खेळवी विनोद दावावया ॥७१॥मसतकीं हाणोनियां थापा । सप्त वृषभां आणी कोपा । सवेंचि धरूनि सातही शेंपा । वोढी वत्सपांसम वत्सां ॥७२॥गगना विंधतां तीक्ष्ण बाण । वृथा जाय जेंवि संधान । तेंवि वृषांचीं शृंगें तीक्ष्ण । हाणिता कृष्ण गवसेना ॥७३॥वृषभा हाणितां टिरीवरी । तो परतोनि शृंगें मारी । तंव पुढें ठाकोनियां मुरारि । प्रतापें धरी शृंगाग्रा ॥७४॥बस्त उन्मत्त मस्त जाले । परी कुंजरें धरितां सुटिका न चले । तेंवि सप्तधा होऊनि सप्त मोकळे । वृष आकळिले घननीळें ॥३७५॥शृंगीं धरूनि शतधनुष्यें । मागें लोटिलें पुराणपुरुषें । सवेंचि सप्तांचीं धरूनि पुसें । वोढी आवेशें फरफरा ॥७६॥ऐसें कौतुक सभेच्या जनां । दाविता जाला यादवराणा । विशेष नाग्नजितीच्या मना । संशयनिरसनालागूनी ॥७७॥हें ऐकोनि श्रोते जन । म्हणती तयेसी संशय कोण । कृष्णीं आसक्त तियेचें मन । जाणोनि वधूगण उपहासी ॥७८॥कृष्ण कमनीय नोवरा खरा । रुचला तुझिया अभ्यंतरा । परंतु यातें बहुत दारा । तुज शेजारा कैं जोडे ॥७९॥इत्यादि स्त्रियांच्या उपहासवचनीं । संशयापन नृपनंदिनी । जाणोनि सप्तधा चक्रपाणि । होऊनि दमनीं वृष बांधे ॥३८०॥बहुधा रूपें धरूनि हरि । असपत्नभावें रमवी नारी । ऐसा संशय करूनि दुरी । स्वयें नोवरी प्रोत्साही ॥८१॥येर्हवीं एकला सातां जणां । समर्थ असतां वृषनिग्रहणा । सप्तधा जाला त्या कारणा । श्रोत्यां सज्जनां सूचविलें ॥८२॥सभाप्राङ्गणीं मुहूर्त चारी । वृषभां खेळई कैटभारि । त्यानंतरें बांधोनि दोरीं । वोढी श्रीहरि तें ऐका ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP